पाल्क सामुद्रधुनी  : भारताचे आग्नेय टोक व श्रीलंका देशाचा उत्तर भाग, यांदरम्यान साधारणपणे १०० उत्तर अक्षांश व ८०० पूर्व रेखांश यांच्या छेदनबिंदूच्या आसपासचा चिंचोळा सागरी प्रदेश. रॉबर्ट पाल्क या मद्रासच्या गव्हर्नराच्या (१७५५-६३) स्मृतिप्रीत्यर्थ हे नाव दिले गेले. तमिळनाडू राज्याच्या कॅलिमीर भूशिरापासून श्रीलंकेच्या कनकेसंतुराईपर्यंत सर्वांत चिंचोळ्या भागाचे अंतर ५५ किमी. आहे. याच्या दक्षिणेकडील पांबन (रामेश्वर) बेट, ॲडम्स ब्रिज व मानार बेटापर्यंतच्या भागास पाल्कचा उपसागर म्हणतात. या उपसागराचा पूर्व-पश्चिम विस्तार १३५ किमी. व उत्तर-दक्षिण विस्तार १४० किमी. आहे. हा सर्व भाग उथळ असून त्याची सरासरी खोली १४ मी. आहे. पाल्कच्या उपसागरातून मानारच्या आखातात पांबनजवळच्या चिंचोळ्या भागातून जाता येते. परंतु, जलमग्न चुनखडक, प्रवाळ बेटे, जोरदार सागरी प्रवाह व वादळी ईशान्य मोसमी वारे यांमुळे बऱ्याच वेळा पाल्क सामुद्रधुनीजवळ जहाजांना मार्ग काढणे अवघड जाते. म्हणून लहानलहान जहाजांतून वाहतूक केली जाते. श्रीलंकेच्या उत्तरेकडील जाफना हे महत्तवाचे बंदर या उपसागरावरच आहे. या जलभागात विशिष्ट प्रकारचे शंख-शिंपले भरपूर सापडत असून त्यांना भारतीय बांगडी उद्योगाकडून भरपूर मागणी आहे. मिहिर सेन या भारतीय जलतरणपटूने ६ एप्रिल १९६६ रोजी पाल्क सामुद्रधुनी पोहत पार करण्याचा पहिला साहसी विक्रम केला.

ताबड, मो. द. आठल्ये, द.बा.