पालिभाषा : पाली ही जातकांची, तसेच धम्मपद दीघनिकाय  इ. बौद्ध धर्मग्रंथांची भाषा आहे. पाली याचा मूळ अर्थ ओळ किंवा पंक्ती असा आहे. एखाद्या धर्मग्रंथातील वचन किंवा उतारा, असाही अर्थ नंतर त्याला लक्षणेने आला आहे.

पाली ही मगधाची भाषा असून बुद्धाने त्या भाषेत धर्मप्रचार केला, असा समज बराच काळ प्रचलित होता पण तो बरोबर नाही. भाषिक अभ्यासावरून असे दिसते, की मगधाच्या भाषेची म्हणजे मागधीची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पालीला लागू पडत नाहीत. उदा., मागधीत श हा एकमेव घर्षक आहे, र हा वर्ण कुठेही नाही, त्याच्या जागी सर्वत्र ल च आढळतो आणि अकारान्त पुल्लिंगी नामांचे प्रथमेचे एकवचन एकारान्त असते. पालीत स हा एकमेव घर्षक आहे, र व ल हे दोन्ही द्रववर्ण आहेत आणि अकारान्त पुल्लिंगी नामांचे प्रथमेचे एकवचन ओकारान्त असते. या व इतर काही कारणांमुळे पालीला मागधी किंवा मागधीची पूर्वावस्था म्हणणे चुकीचे ठरते.

अशोकाच्या शिलालेखांची भाषा पाहिली, तर पालीचे साम्य पूर्वेकडील संस्कृतोत्तर भाषांपेक्षा पश्चिमेकडील भाषांशी अधिक असल्याचे दिसून येते. भाषिक अवस्थेकडे पाहिले, तर ती शौरसेनीपूर्वीची प्राकृत अवस्था आहे, असे स्पष्ट दिसते. तसेच एकंदर बौद्ध वाङ्मय बुद्धानंतर काही शतकांनी पुरे झालेले आहे, ही गोष्टही संशाधकांना मान्य आहे. तेव्हा पाली ही बुद्धाची मातृभाषा किंवा बुद्धसमकालीन अशी बोली होती, हा समज ग्राह्य मानता येत नाही.

संस्कृतच्या तुलनेने पालीची वैशिष्ट्ये : पाली ही संस्कृतची सर्वांत उत्तरावस्था असल्यामुळे त्या दृष्टीने तिची वैशिष्ट्ये समजून घेणे उद्बोधधक ठरते. म्हणून तिकडे आधी लक्ष देऊया.

वर्णव्यवस्था : संस्कृतमधील अ, आ, इ, ई, उ, ऊ हे स्वर पालीत तसेच राहतात. ऐ व औ यांचे ए व ओ होतात. ऋ व ॠ यांचे अ, इ किंवा उ होतात. लृ चा उ होतो. संयुक्त व्यंजनापूर्वी दीर्घ स्वर असल्यास तो ऱ्हस्व होतो, अ चा नंतर येणाऱ्या विसर्गासह ओ होतो. इतर स्वरानंतर येणाऱ्या विसर्गाचा लोप होतो. श, ष, स यांच्या जागी पालीत फक्त स हा एकच घर्षक आढळतो.

स्वरमध्यस्थ ड व ढ यांचे ळ व ळह होतात. इतर सर्व व्यंजने तशीच राहतात. मात्र शौरसेनी व माहाराष्ट्री या नंतर येणाऱ्या प्राकृत अवस्थांची पूर्वचिन्हे पालीत आढळतात. संयुक्त व्यंजनांत होणारी महत्त्वाची परिवर्तने पुढीलप्रमाणे : कोणत्याही व्यंजनाबरोबर र आधी किंवा नंतर आला, तर त्याचा लोप होतो व त्याच्या जागी जवळचे व्यंजन येते (मार्ग-मग्ग अग्र-अग्ग). शब्दारंभी मात्र एकच व्यंजन येते (ग्राम-गाम). म, न, य, व हे अंत्यस्थानी असल्यास त्यांच्या जागी त्यांच्या आधीचे व्यंजन येते. दोन स्फोटकांचा संयोग असल्यास त्यांतला पहिला नाहीसा होऊन त्याच्या जागी दुसरा येतो (भक्त-भत्त सप्त-सत्त). स्फोटकापूर्वी किंवा नंतर स, ष किंवा श आल्यास त्याचे द्वित्व होऊन दुसरा स्फोटक महाप्राण बनतो (मस्तक-मत्थअ अक्षर-अक्खर). शब्दारंभी मात्र फक्त महाप्राण स्फोटकच उरतो (स्खल-खल). त्स चा च्छ होतो (वत्स-वच्छ). त्य, थ्य, द्य, ध्य यांचे अनुक्रमे च्च, च्छ, ज्ज, ज्झ होतात (सत्य-सच्च रथ्या –रच्छा अद्य-अज्ज द्यूत-जूत सन्ध्या-संझा). न्य, ज्ञ यांचा ञ्ञ होतो. बाह्य संपर्क आणि इतर कारणांनी काही अपवाद झाल्यासारखे दिसतात.


व्याकरण : नामात तीन लिंगे, दोन वचने व संबोधन धरून आठ विभक्त्या आहेत. नामांच्या रूपावलीत लिंगाप्रमाणे अंत्य वर्णालाही महत्त्व आहे.

पालीत संस्कृतप्रमाणे परस्मैपद व आत्मनेपद हे प्रकार आहेत पण कोणताही धातू यांतील कोणत्याही पदाप्रमाणे चालू शकतो. पण परस्मैपद हेच अधिक वापरात आहे. आत्मनेपदाचा उपयोग कर्मणिप्रयोगापुरता मर्यादित आहे. यावरून संस्कृतच्या दृष्टीने पालीचा वेगळेपणा लक्षात यायला मदत होईल.

ध्वनिविचार :पालीची वर्णव्यवस्था पुढीलप्रमाणे आहे :

स्वर : अ, आ,इ, ई, उ, ऊ, ए, ओ. व्यंजने :     स्फोटक :क, ख, ग, घ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध,                                     प, फ, ब, भ.                          अर्धस्फोटक :च, छ, ज, झ.                          अनुनासिक : ङ, ञ, ण, न, म.                          अर्धस्वर : य, व.                          कंपक : र.                          पार्श्विक : ल, ळ.                          घर्षक : स, ह.

व्याकरण : नाम : नामात तीन लिंगे, दोन वचने आणि आठ विभक्त्या आहेत. नामाच्या अंत्य वर्णानुसार प्रत्यय लागताना त्यात थोडाफार फरक होतो. काही रूपे संस्कृतानुसारी आहेत – उदा., राजन्‌चे प्रथमेचे एकवचन राजा होते – तर बरीचशी रूपे परिवर्तनाने वेगळी झालेली आहेत. उदा., राजन्‌चे तृतीयेचे एकवचन रज्जा = सं. राज्ञा, तसेच राजिना = राजिन+ आ. संस्कृतचे अवशेष अशा प्रकारे काही रूपांत आढळले, तरी एकंदर रूपावली सोपी आणि स्पष्ट आहे. उदा., बुद्ध व भिक्खु हे शब्द घेऊ :

बुद्ध 

भिक्खु 

एकवचन

अनेकवचन

एकवचन

अनेकवचन 

प्र.

बुद्धो

बुद्धा

भिक्खु 

भिक्खू, भिक्खवो 

द्वि.

बुद्धं

बुद्धे

भिक्खुं

भिक्खू, भिक्खवो

तृ.

बुद्धेन, बुद्धा

बुद्धेहि

भिक्खुना

भिक्खूमि, भिक्खूहि 

च.

बुद्धस्स

बुद्धानं

भिक्खुस्स,

भिक्खुनो

भिक्खूनं 

पं.

बुद्धा,

बुद्धस्मा,

बुद्धम्हा

बुद्धेहि

भिक्खुना,

भिक्खुस्मा,

भिक्खुम्हा

भिक्खूभि, भिक्खूहि

ष.

बुद्धस्स

बुद्धानं

भिक्खुस्स,

भिक्खुनो

भिक्खूनं 

स.

बुद्धे,

बुद्धस्मिं, बुद्धम्हि

बुद्धेसु

भिक्खुस्मिं,

भिक्खुम्हि

भिक्खूसु,

भिक्खूसु 

सं.

बुद्ध

बुद्धा 

भिक्खु 

भिक्खू, भिक्खवो 

सर्वनाम : पुरुषवाचक सर्वनामे अम्ह, तुम्ह, व सो स्त्रीवाचक सा ही आहेत. त्यांची रूपावली अशी :

अम्ह 

एकवचन

अनेकवचन

प्र. 

अह

मयं, अम्हे, नो

द्वि. 

मं, ममं

अम्हे, अम्हाकं, नो

तृ. 

मया, मे

अम्हेभि, अम्हेहि, नो

च. 

मय्हं, मम, अम्हं, ममं, मे

अम्हाकं, अस्माकं, नो

पं. 

मयो, मे

अम्हेभि, अम्हेहि, नो

ष. 

मय्हं, मम, अम्हं, ममं, मे

अम्हाकं, अस्माकं, नो

स. 

मयि

अम्हेसु

तुम्ह 

एकवचन

अनेकवचन

प्र. 

त्वं, तुवं

तुम्हे, वो

द्वि. 

त्वं, तुवं, तं, तवं

तुम्हे, वो

तृ. 

तया, त्वया, ते

तुम्हेभि, तुम्हेहि, वो

च. 

तव, तुय्हं, तुम्हं, ते

तुम्हाकं, वो

पं. 

तया, त्वया, ते

तुम्हेभि, तुम्हेहि, वो

ष. 

तव, तुय्हं, तुम्हं, ते

तुम्हाकं, वो

स. 

तयि, त्वयि

तुम्हेसु

त 

पुल्लिंग

स्त्रीलिंग

नपुंसकलिंग

प्र. 

सो

सा

तं, नं 

द्वि. 

तं, नं

तं, नं

तं, नं

तृ. 

तेन, नेन

ताय, नाय

तेन, नेन

च. 

तस्स, नस्स  

ताय, नाय, तिस्सा, तिस्साय, तस्सा, तस्साय

तस्स, नस्स

पं. 

तस्मा, तम्हा, नस्मा, नम्हा

ताय, नाय

तस्मा, तम्हा, नस्मा, नम्हा

ष.

तस्स, नस्स

ताय, नाय, तिस्सा, तिस्साय, तस्सा, तस्साय

तस्स, नस्स

स.

तस्मिं, तम्हि, नस्मिं, नम्हि

ताय, नायं, तिस्सं, तस्सं, नस्सं

तस्मिं, तम्हि, तस्मिं, नम्हि

अनेकवचन

प्र.

ते, ने

ता, तायो, ना, नायो

ते, ने, तानि, नानि

द्वि.

ते, ने

ता, तायो, ना, नायो

ते, ने, तानि, नानि

तृ.

तेभि, तेहि, नेभि, नेहि

ताभि, ताहि, नाभि, नाहि

तेभि, तेहि, नेभि, नेहि

च.

तेसं, तेसानं, नेसं, नेसानं

तासं, तासानं, नासं, नासानं

तेसं, तेसानं, नेसं, नेसानं

पं.

तेभि, तेहि, नेभि, नेहि

ताभि, ताहि, नाभि, नाहि

तेभि, तेहि, नेभि, नेहि

ष.

तेसं, तेसानं, नेसं, नेसानं

तासं, तासानं, नासं, नासानं

तेसं, तेसानं, नेसं, नेसानं

स.

तेसु, नेसु

तासु, नासु

तेसु, नेसु

विशेषण : विशेषण ज्या नामाशी संबंधित असते त्या नामाचे लिंग, वचन व विभक्ती ते घेते. अकारान्त विशेषणांचे स्त्रीलिंग अ ऐवजी आ ठेवून होते. कधी कधी ई ही अ ची जागा घेते. विशेषणाचे मूळ रूप नामापूर्वी जोडून समासही बनवता येतो.

संख्यावाचक शब्दांचा वापर बराच गुंतागुंतीचा आहे. १ ते १८ या संख्या विशेषणाप्रमाणे चालतात. आकारान्त दर्शक शब्द (उदा., वीसा ‘वीस’) स्त्रीलिंगी नामाप्रमाणे चालतात. पण एकंदरीत ही गुंतागुंत थोडक्या सामान्य नियमांच्या पलीकडची आहे.


क्रियापद : क्रियापदाची रूपे, पुरुष, वचन आणि काळ दर्शवतात. कर्मणी रूपवाचक प्रत्ययही कर्तरीसारखेच आहेत. संस्कृतचा पूर्णभूतकाळ नष्ट झाला आहे. अनद्यतन व अपूर्णभूत स्पष्टपणे भिन्न राहिलेले नाहीत, संकेतार्थ मात्र चालू आहे. धातुसाधितांचा सहायक क्रियापदांबरोबर उपयोग करून नवी कालदर्शक रचना कित्येकदा साधण्यात येते. ही क्रियापदे प्रामुख्याने अस व हु ही आहेत. वर्तमानकाळात अकारान्त प्रत्ययपूर्व रूपे फार मोठ्या प्रमाणात असून त्याचा परिणाम एकंदर क्रियापदावर झाला आहे. काही प्रत्ययपूर्व एकारान्त रूपेही आहेत. कालवाचक रूपे व इतर साधित शब्द वर्तमानकाळाच्या रूपावरून बनवले जातात. संस्कृतात ते धातूवरून बनवले जात. एकंदरीत क्रियापदांची रूपावली संस्कृतच्या मानाने बरीच सोपी झाली आहे.

खाली अस, हु आणि भर यांची रूपावली नमुन्यादाखल दिली आहे.

वर्तमान

अस

हु

एकवचन

अनेकवचन

एकवचन

अनेकवचन

प्र.

अस्मि, अम्हि

अस्म, अम्ह

होमि

होम

द्वि.

असि

अत्थ

होसि

होथ

तृ.

अत्थि

सन्ति

होति

होन्ति

भर

एकवचन

अनेकवचन

प्र.

भरामिं

भराम

द्वि.

भरसि

भरथ

तृ.

भरति

भरन्ति

भविष्य

अस धातूला भविष्यकाळाची रूपावली नाही.

हु

एकवचन

अनेकवचन

प्र.

हेस्सामि, हेस्सं, हेहिभि, होहिमि

हेस्साम, हेहिम, होहिम

द्वि.

हेस्ससि, हेहिसि, होहिसि

हेस्सथ, हेहिथ, होहिथ

तृ.

हेस्सति, हेहिति, होहिति

हेस्सन्ति, हेहिन्ति, होहिन्ति

भर

एकवचन

अनेकवचन

प्र.

भरिस्सामि, भरिस्सं

भरिस्साम

द्वि.

भरिस्ससि

भरिस्सथ

तृ.

भरिस्सति

भरिस्सन्ति

संकतार्थ

अस धातूला संकेतार्थाची रूपावली नाही.

हु

भर

एकवचन

अनेकवचन

एकवचन

अनेकवचन

प्र.

अहुविस्सं

अहुविस्सम्ह

(अ) भरिस्सं

(अ) भरिस्सम्ह

द्वि.

अहुविस्से, अहुविस्ससे

अहुविस्सथ

(अ) भरिस्स

(अ) भरिस्सथ

तृ.

अहुविस्स

अहुविस्संसु

(अ) भरिस्स

(अ) भरिस्संसु

भूतकाळ

अस

हु

एकवचन

अनेकवचन

एकवचन

अनेकवचन

प्र.

आसिं

आसिम्ह

अहोसिं

अहोसिम्ह

द्वि.

आसि

आसित्थ

अहोसि

अहोसित्थ

तृ.

आसि

आसिंसु, आसुं

अहोसि, अहुवा, अहु

अहेसुं

भर

एकवचन

अनेकवचन

प्र.

अभरिं

अभरिम्ह

द्वि.

अभरि

अभरित्थ

तृ.

अभरि

अभरिंसु

आज्ञार्थाचे प्रत्यय प्र. पु. मी-म द्वि. पु. हि-थ आणि तृ.पु. तु-अन्तु हे आहेत.

याशिवाय वर्तमान, भूत, भविष्य,विध्यर्थ, इ. दर्शक धातुसाधिते आहेत. वर्तमान धातुसाधिताचे अन्त व मान हे प्रत्यय आहेत. भूतकाळाचा प्रत्यय त किंवा इत आहे. पण बरीचशी धातुसाधिते संस्कृतमधून सरळ आल्यामुळे या नियमाला अपवाद आहेत. भविष्यका ळाचे धातुसाधित धातूला इस्स हा प्रत्यय लावून पुढे अन्त हा प्रत्यय जोडून होते. विघ्यर्थवाचक धातुसाधित धातूला तब्ब, इतब्ब, अनीय किंवा य हे प्रत्यय लावल्याने मिळते.

हेत्वर्थक अव्यय धातूला तुं प्रत्यय लावून आणि भूतकाळवाचक अव्यय त्वा व कधीकधी य हा प्रत्यय लावून सिद्ध होते. त्वाच्या अर्थी कवितेत त्वान व तून ही रूपेही आढळतात.

समास: संस्कृतप्रमाणेच पालीमध्ये समास आहेत आणि त्यांची नावेही संस्कृतवरूनच आलेली आहेत. ते असे : द्वन्द, समाहार, द्वन्द, कम्मधारय, द्विगु, तप्पुरिस (दुतिया-, ततिया-, चतुत्थी, पज्जमी-, छट्टी-, सप्तमी-, तप्पुरिस), अलुत्त तप्पुरिस, उपपदतप्पुरिस, बहुब्बीही, मज्झिमपदलोपी, अव्ययीभाव.

पालीत समासाची लांबी प्रमाणशीर असते. उगीच शब्दाला शब्द जोडून लांबलचक साखळी बनवण्याची पंडिती वृत्ती इथे नाही. म्हणूनच दोनांपेक्षा अधिक शब्दांचा समासही खटकत नाही. एकंदरीतच लेखनाचा डौल टाळून संभाषणात्मक किंवा निवेदनात्मक राहण्याकडे भाषेची प्रवृत्ती आहे : मरणभयतज्जितो भिगो दारुदकतेलतन्दुलादीनि गंगातीरवासी व वत्थूनि.

संधी : पालीचे संधिनियम संस्कृतसारखे कडक नाहीत. आधीच्या शब्दाच्या शेवटी असणारा स्वर नंतर येणाऱ्या शब्दाच्या प्रारंभीच्या स्वराशी सांधला जाईलच असे नाही. अशा परिस्थितीत कधी दोन स्वरांचा संधी होतो, कधी त्यातला आधीचा स्वर जाऊन नंतरचा शिल्लक राहतो, तर कधी त्यातला आधीचा राहून नंतर येणारा लोप पावतो : न +अहोसि= नाहोसि च +अपि=चापि न+अत्थि= नत्थि अथ+ एको= अथेको एकेन+ उपायेन= एकेनुपायेन.

ओ किंवा ए नंतर येणारा अ लोप पावतो : देवो+ अम्हि= देवो Sम्हि. शब्दानंतर येणाऱ्या इतिमधील आद्य इ नाहीशी होऊन त्याआधीचा स्वर दीर्घ होतो : गच्छाम+इति+गच्छामा S ति साधु+इति= साधूति.

इ, ई, उ, ऊ, ए व ओ यांच्यामागून भिन्न प्रकारचे स्वर आल्यास त्यांच्या जागी अनुक्रमे य्, य्, व्, व्, अय्, व अव् येतात. मात्र ए व ओ हे मूळ संस्कृतातले ऐ व औ असले, तर त्यांच्या जागी आय् व आव् येतात.

इ, उ, ए व ओ यांच्या जागी विकल्पाने अनुक्रमे यि, वु, ये व वो येतात.

अनुस्वारानंतर य किंवा ह आल्यास तो विकल्याने ञ होतो : तं येव = तं येव किंवा तञ्ञेच. नंतर स्फोटक आल्यास अनुस्वार विकल्पाने त्या वर्गातील अनुनासिक बनतो : चंपक=चम्पक गंध= गन्ध.


पालीचा अभ्यास : पालीच्या अभ्यासाचे महत्त्व भारतीयांना पटवून देण्याचे कार्य पाश्चात्त्य विद्वानांनी केले. या शतकाच्या प्रारंभी बौद्ध धर्माबद्दल तीव्र कुतूहल उत्पन्न झाल्याने त्याच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करण्याचे खडतर व्रत धर्मानंद कोसंबी यांनी पतकरले आणि पाली व बौद्ध धर्मग्रंथ यांचा मराठी वाचकांना परिचय करून देण्याचे काम मुख्यतः त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गात डॉ. पु.वि.बापट, प्रा. चिं.वि. जोशी, प्रा.चिं.वै. राजवाडे इत्यादींचा समावेश होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे अनुयायी यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे पाली व बौद्ध वाङ्म य यांच्या अभ्यासाला थोडी चालना मिळाली आहे पण ती म्हणावी तितकी जोरदार नाही. पालीच्या अभ्यासाने भारतीय नव-आर्यभाषांच्या ऐतिहासिक संशोधनाला निश्चितच मदत होणार आहे.

पाली उतारा : अतीते बाराणसियं ब्रह्मदत्ते रज्जं कारेन्ते बोधिसत्तो हिमवन्तपदेसे रुक्खकोठ्ठसकुणो हुत्वा निब्बत्ति. अथेकस्स सीहस्य मंसं खादन्तस्स अट्ठि गले लग्गि, गलो उध्दुमायि, गोचरं गण्हितुं न सक्कोति, खरा वेदना वत्तन्ति.

अथ नं सो सकुणो गोचरपसुतो दिस्वा साखाय निलीनो ‘किन्ते सम्म दुक्खतीति’ पुच्छि. सो तमत्थं. आचिखि ‘अहन्ते सम्म एतं अट्ठि अपनेय्यं, भयेन ते मुखं पविसितुं न विसहामि, खादेय्यासि पिमन्ति’. ‘मा भायि सम्म, नाहन्तं खादामि, जीवितं मे देहीति’.

भाषांतर : प्राचीन काळी वाराणशीत ब्रह्मदत्त राज्य करत असता, बोधिसत्त हिमवंतप्रदेशात सुतारपक्षी होऊन पुन्हा जन्माला आला. आता मास खात असता एका सिंहाच्या घशात हाड अडकले, घसा सुजला, अन्न खाता येईना, तीव्र वेदना व्हायला लागल्या.

तेव्हा त्याला खाण्यासाठी (भुकेने) व्याकुळ झालेला पाहून फांदीवर बसलेल्या पक्ष्याने विचारले, ‘मित्रा, तुला काय दुःख होतं आहे?’ त्याने ती परिस्थिती सांगितली. ‘मित्रा, मी तुझं ते हाड काढलं असतं, (पण) भीतीमुळे तुझ्या तोंडात शिरायला मी धजत नाही. तू मला खाशीलसुद्धा म्हणून’. ‘भिऊ नकोस मित्रा, मी तुला खात नाही. मला प्राणदान दे’. जवसकुणजातके.

संदर्भ :     1. Geiger, Wilhelm, Trans, Ghosha, Batakrishna, Pali Literature and Language, Calcutta,          1956.                2. y3wuohi, C.V. A Manual of Pali, Poona, 1936.

कालेलकर, ना.गो.