पालक – १ : कायद्याच्या परिभाषेत ‘पालक’ (गार्डियन) या संज्ञेला विशिष्ट अर्थ आहे. सर्वसामान्यपणे दुसऱ्याचे जो पालन करतो, त्यास पालक असे म्हणतात. असे पालक विशेषतः अज्ञान व वेडे यांच्या बाबतींत आवश्यक असतात. अज्ञान मुलाच्या वा मुलीच्या हिताचे रक्षण करणे, ही जबाबदारी पूर्वी राजेलोकांवर असे. अज्ञानांच्या हिताचे रक्षण दोन दृष्टींनी करावे लागते : एक त्यांच्या शरीराचे रक्षण व दुसरे म्हणजे त्यांच्या संपत्तीचे रक्षण. लहान मुलांच्या भरणपोषणाची जबाबदारी आता कायद्यानेच आईवडिलांवर टाकली आहे आणि त्यातल्या त्यात ही जबाबदारी प्रथम वडिलांवर असते. वडील हयात नसल्यास किंवा हयात असून नालायक ठरल्यास, आईकडे पालकत्वाची सर्व जबाबदारी जाते. ज्या ठिकाणी अज्ञानाच्या मिळकतीची व्यवस्था आईवडिलांकडून व्यवस्थित होत नाही असे वाटते, त्या वेळी अशा मिळकतीची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी सरकारवर सोपविण्यात येते. सरकार हे अशा ठिकाणी पालकाची भूमिका वठवते. सरकारला हे काम करता यावे म्हणून आपल्याकडे पाल्याधिकरणाची स्थापना झाली आहे व त्यास त्याच्या ताब्यातील मिळकतीची व्यवस्था बरोबर करता यावी, म्हणून खास अधिकार पाल्याधिकरण अधिनियमाने दिलेले आहेत. अज्ञानावर दावा लागल्यास त्या दाव्यात अज्ञानाच्या हिताचे संरक्षण व्हावे, म्हणून त्या त्या दाव्यापुरते पालन करणारे नेमून काम पुढे चालवावे लागते. अज्ञान वादीचा दावा त्याच्यातर्फे, कोणीही इष्टमित्र नसताना, दाखल केल्यास तो काढून टाकताना त्याचा खर्च संबंधित वकिलास भरावा लागतो. दिवाणी कार्यवाहीत न्यायालय अज्ञान प्रतिवादीसाठी विवाहाप्रीत्यर्थ पालक नेमते. अज्ञान हिंदू विवाहित मुलीच्या शरीराचा पालक म्हणून नवऱ्यास समजले जाते व मुली पळवून नेण्याच्या गुन्ह्याबाबत ज्याच्या कोणाच्या ताब्यातून मुलीला पळवून नेले असेल, त्याला त्या कामापुरते पालक म्हणून समजले जाते. भारतात सर्वसाधारणपणे पालक व पाल्य अधिनियम १८९० व हिंदू अज्ञान व पालकत्व अधिनियम १९५६ यांमधील तरतुदींनुसार पालक नेमले जातात. अज्ञान कोणाला समजावे या बाबतीत भारतीय सज्ञानता अधिनियम १८७५ प्रमाणे हिंदू मुलगा किंवा मुलगी १८ वर्षांची पूर्ण झाल्यावर सज्ञान समजण्यात येते. मात्र अज्ञानाची मिळकत जर सरकारने नेमलेल्या व्यवस्थापकाकडे असेल, तर वयाच्या २१ वर्षानंतर अज्ञानास स्वतःची मिळकत आपल्या ताब्यात घेता येते. हिंदू एकत्र कुटुंबात त्यातील कर्ता पुरुष पालक म्हणून समजला जातो.

गाडगीळ, श्री.वि.