पार्सन्स, सर चार्लस अल्जेर्नॉन : (१३ जून १८५४ -११ फेब्रुवारी १९३१). ब्रिटिश अभियंते. त्यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या ⇨ वाफ टरबाइनाच्या   शोधाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. डब्लिन येथील ट्रिनिटी कॉलेजात (१८७१-७३) आणि केंब्रिज येथील सेंट जॉन्स कॉलेजात (१८७३-७७) शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एल्सविक येथील आर्मस्ट्राँग वर्क्समध्ये (१८७७-८१) आणि लीड्स येथील किटसन कारखान्यात अभियांत्रिकी कामाचा अनुभव मिळविला. १८८४ मध्ये गेट्सहेड येथील क्लार्क, चॅपमन अँड कंपनी या कारखान्यात त्यांनी भागीदारी घेतली. पुढे त्यांच्या वाफ टरबाइनाच्या शोधाला प्रसिद्धी मिळाल्यावर त्यांनी ही भागीदारी सोडून वाफ टरबाइने, विद्युत् जनित्रे (डायनामो) व इतर विद्युत् साधने तयार करण्याचा स्वतःचा ’सी.ए. पार्सन्स अँड कंपनी’ हा कारखाना हीटन (टाईन नदीवरील न्यूकॅसलजवळ) येथे १८८९ मध्ये स्थापन केला. १८९४ मध्ये त्यांनी वॉल्झेंड (नॉर्थम्ब रलंड) येथे ‘पार्सन्स मरीन स्टीम टरबाइन कंपनी’ जहाजांकरिता वाफ टरबाइने तयार करण्यासाठी सुरू केली. आपल्या कंपनीच्या अध्यक्षपदाबरोबरच त्यांनी अनेक विद्युत् पुरवठा आणि अभियांत्रिकी कंपन्यांच्या संचालक मंडळांवर काम केले.

त्यांनी लावलेल्या अनेक शोधांपैकी उच्च वेगी विद्युत् जनित्राशी संलग्नपणे वापरावयाच्या वाफ टरबाइनाचा त्यांचा शोध सर्व जगभर विद्युत् निर्मितीत व सागरी जहाजांच्या प्रचालनात [→ जहाजाचे एंजिन] क्रांतिकारक ठरला. त्या काळी विद्युत् जनित्राचा वेग केवळ १,५०० फेरे प्रती मिनिट इतकाच होता, तर पार्सन्स यांच्या टरबाइनाचा वेग १८,००० फेरे प्रती मिनिट इतका जास्त होता. पार्सन्स यांनी आपल्या टरबाइनाला सरळ जोडता येईल असे विद्युत् जनित्रही तयार केले व असे शेकडो विद्युत् निर्मिती संच १८८९ पर्यंत प्रचारात आले. १८९४ मध्ये त्यांनी जहाजांच्या प्रचालनासाठी वाफ टरबाइनाचा उपयोग करण्यास सुरुवात केली व १९०५ पासून ब्रिटिश युद्धनौकांसाठी या टरबाइनाचा उपयोग प्रमाणभूत मानला जाऊ लागला. वेगवान जहाजांकरिताही हे टरबाइन आर्थिक दृष्ट्या काटकसरीचे असल्याचे दिसून आले आणि पार्सन्स यांनी अनुरूप दंतचक्रमाला विकसित केल्यावर कमी वेगाच्या जहाजांकरिताही हे वाफ टरबाइन वापरण्यात येऊ लागले. प्रकाशीय उपकरणांत वापरावयाची काच व ज्योतिषशास्त्रीय दूरदर्शक यांच्या निर्मितीतही त्यांनी मोठ्या सुधारणा केल्या.

पार्सन्स यांना १८९८ साली रॉयल सोसायटीचे सदस्यत्व आणि १९०२ साली रॅम्फर्ड पदक, १९११ मध्ये ‘नाइट’ व १९२७ मध्ये ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हे किताब लाभले. ते इन्स्टिट्यूट ऑफ मरीन एंजिनिअर्सचे १९०५ – ०६ मध्ये व ब्रिटिश ॲसोशिएशनचे १९१९ – २० मध्ये अध्यक्ष होते. त्यांचे शास्त्रीय निबंध व अध्यक्षीय भाषणे त्यांच्या मरणोत्तर १९३४ साली एकत्रितपणे प्रसिद्ध झाली. ते जमेकातील किंग्स्टन येथे ‘डचेस ऑफ रिचमंड’ या जहाजावर मृत्यू पावले.

कानिटकर, बा.मो. कुलकर्णी, सतीश.