पारिस्थितीकीय युद्धतंत्र : मानवसमूह ज्या नैसर्गिक व मानवनिर्मित अनुकूल परिस्थितीत जीवन जगतो, त्या परिस्थितीतच जीवनविरोधी परिवर्तन व विकृती मुद्दाम घडविणे आणि तिच्यावर नियंत्रण ठेवणे, यास पारिस्थितीकीय युद्धतंत्र असे म्हणतात. हे युद्धतंत्र बाल्यावस्थेत आहे तथापि काही शक्तिशाली राष्ट्रांत त्याचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अत्याधुनिक तंत्राचा मानवसामाजावर चिरकालीन दुष्परिणाम होण्याचा दाट संभव असल्यामुळे ⇨जैव व रासायनिक युद्धतंत्रा प्रमाणे या युद्धतंत्रावरही अंतरराष्ट्रीय निर्बंध घालण्याचे अमेरिका व रशिया या राष्ट्रांनी सुचविले आहे. ज्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था शेतीप्रधान आहे व ज्यांवर वादळे, भूकंप, पूर , दुष्काळ इ. नैसर्गिक संकटे वरचेवर येतात, अशी राष्ट्रे या युद्धतंत्राचे बळी ठरू शकतात.
पृथ्वीवरील काही प्रदेशांत नैसर्गिक अस्थिरता नेहमीच असते. निसर्गाने संचय केलेल्या ऊर्जेमुळे ही अस्थिरता निर्माण होते. ही नैसर्गिक अस्थिरता ओळखणे हीच पारिस्थितीकीय युद्धतंत्राची गुरुकिल्ली आहे. अस्थिर ऊर्जासंचयात ऊर्जेची थोडीशी भर घातल्यास तिचा प्रचंड उद्रेक होतो, हे गृहीत धरून महास्फोटकांचा किंवा अणुबाँबचा स्फोट करून व वातावरणातील मेघद्रव्यात शुष्क बर्फ ( घनरूप CO2 ), द्रव प्रोपेन वगैरे मिसळून संचित उर्जेचा उद्रेक घडविता येतो. किरणोत्सर्गी, रासायनिक व जैव साधने आणि द्रव्ये यांचासुद्धा वापर केला जातो. तसेच आैषधिनाशके व अपर्णनद्र्व्ये वापरून वनस्पतीचा प्राणिसृष्टीचा संहार करण्यात येतो. अजस्त्र यांत्रिक ‘ रोम नांगर’ वापरून विस्तीर्ण जंगलांची तोड केली जाते व रणक्षेत्रावर अतिशीघ्र ज्वलनशील द्रव्ये पेटवून आणि वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करवून प्राणिमात्राला मृत्यूच्या खाईत लोटता येते. परिवर्तन व विकृती घडवून आणण्यासाठी पुढीलप्रमाणे काही क्षेत्रे उपलब्ध होऊ शकतात : (१) धुके (२) वातावरणीय विद्युत गुणधर्म (३) विद्युत चुंबकीय क्षेत्र (४) तडित् उत्पात (५) ओझोन व आयनीय स्तर (६) सागराचे , भौतिक रासायनिक व विद्युत प्रचल (७) सागरी लाटा, गोठलेले पृष्ठभाग (८) गारांची वादळे (९) हिमालोट (१०) मृत्तीकालोट (११) नदीप्रवाह (१२) तेलाच्या खाणी व (१३) ज्वालामुखी-उद्रेक इत्यादी. याप्रमाणेच उपग्रहाकरवीही वातावरणातील नैसर्गीक अस्थिरता ओळखता येते. त्याच प्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करून शिलावरण, जीवावरण व गभीर प्रदेशातील अदलाबदलांचे अंदाज बांधता येतात. तसेच भविष्यात दूरगामी विमाने किंवा आंतरखंडीय क्षेपणास्त्रांद्वारे परिवर्तन आणि विकृती साधने शत्रुप्रदेशात सोडता येतील व रणांगणावर रासायनिक, किरणोत्सर्गी आणि जैव अस्त्रे वापरली जातील.
पाण्यात विष कालवणे, वेढा घातल्यानंतर तटबंदीच्या आत सडलेली प्रेते टाकून रोगराई पसरवणे, कालव्याचे बांध फोडून पूर आणणे, नदीचे तीर फोडणे ( दाशराज्ञ युद्ध , ऋग्वेद मंडळ ७-१८) नदीचा प्रवाह वळविणे ( बॅबिलन – वेढा इ.स. पु. ५३९ ) इ, तंत्रे प्राचीन काळापासून युद्धामध्ये वापरली जात आहेत. पहिल्या महायुद्धात [ → महायुद्ध, पहले] रासायनिक तंत्रसाधनांचा वापर झाला. १९६६ ते १९७५ या कालखंडात अमेरिकेने व्हिएटनामविरुद्ध पारीस्थितीकीय युद्धतंत्राचा वापर केला. पानबंधारे फोडणे, आैषधिनाशन, अपर्णन, जंगले तोडणे, दग्धभूक्रीया, वातावरणीय बदल इ. साधनांचा वापर प्रामुख्याने केला गेला. बाँबवर्षावामुळे जमिनी शेतीभातीसाठी अयोग्य झाल्या. नदीकालव्याच्या प्रवाहातील बदल व गारांचे पावसावरील नियंत्रण या क्षेत्रांत रशियाने बरीच प्रगती केलेली आहे.
पारिस्थितीकीय युद्धतंत्राचे विध्वंसक स्वरूप फार दूरगामी आहे. निसर्ग व मानव निर्मित सामाजिक व्यवस्था यांचा नायनाट करण्याचे सामर्थ्य त्यात आहे.
पारिस्थितीकीय युद्धाचे अमानुष स्वरूप लक्षात घेऊन अमेरिका आणि रशिया या राष्ट्रांनी २१ ऑगस्ट १९७५ रोजी पारिस्थितीकीय परिवर्तनक्षम तंत्रे व साधने यांवर बंदी घालण्याची शिफारस जागतिक निःशस्त्रीकरण समितीपुढे केलेली आहे.
पहा : अणुयुद्ध गनिमी युद्धतंत्र जंगल युद्धतंत्र डोंगरी युद्धतंत्र नाविक युद्धतंत्र मरुभूमी युद्धतंत्र वायू युद्धतंत्र संयुक्त सेनाकारवाई क्षेपणास्त्रे.
संदर्भ : 1. Hees, H. W. Ed. Weather and Climate Modification, New York, 1974.
2. Seshagiri, N. The Weather Weapon, New Delhi, 1977.
दीक्षित, हे. वि.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..