पाराना नदी : दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीखालोखाल दुसऱ्या क्रमांकाची नदी. स्थूलमानाने उत्तर-दक्षिण वाहणारी ही नदी ब्राझील, पॅराग्वाय आणि अर्जेंटिना या देशांतून वाहत जाऊन अटलांटिक महासागरास मिळते. लांबी ३,९९८ किमी. जलवाहनक्षेत्र ३०,००,००० चौ. किमी. सिबॅश्चन कॅबट व पेद्रो दे मेंदोसा यांनी अनुक्रमे १५२६ आणि १५३६ मध्ये या नदीचे समन्वेषण केले होते. सेरा दा मँटीकेरा व सेरा दोस पिरिनिअस या पर्वतांत उगम पावणाऱ्या अनुक्रमे ग्रांदे आणि पारानाईबा या नद्यांचा ब्राझीलमध्ये २०० द. येथे होणारा संगम, हे पारानाचे उगमस्थान. या संगमापासून सु. २,८०० किमी. लांबीचा (पॅराग्वाय नदी मिळेपर्यंतचा) या नदीचा प्रवाह म्हणजे आल्तो (वरचा) पाराना. या प्रवाहक्षेत्रात पाराना नदीस पश्चिमेकडून व्हर्द, पार्दू, इव्हीन्येमा व पूर्वेकडून त्यिते, पाराना पानेमा, ईव्हाई, ईग्वासू या नद्या मिळतात. आल्तो पाराना प्रथम प्राचीन ब्राझीलियन पर्वतातून मार्गक्रमण करीत नैर्ऋत्येस वाहत जाते. नंतर ब्राझील-पॅराग्वाय यांच्या सरहद्दीवरून वाहत असता सेरा दी मराकाझू या पर्वतातून तिला मार्ग काढावा लागतो. या भागात ग्वाइरा हा धबधबा निर्माण झाला आहे. या धबधब्यापासून पाराना नदी ब्राझील-पॅराग्वाय यांच्या सरहद्दीवरून सु. ६० ते ९० मी. रुंद दरीतून वाहते. पुढे ईग्वासू नदी-संगमानंतर पॅराग्वाय नदी मिळेपर्यंतच्या भागात ती पॅराग्वाय व अर्जेंटिना यांमधील सरहद्द बनते. या भागात तिच्या डाव्या तीरावर सेरा दे मीस्योनेस पर्वताचे सरळ कडे आले आहेत. येथपर्यंत नैर्ऋत्यवाहिनी असलेली ही नदी पोसादासजवळ पश्चिमेकडे वळते. यानंतर पासो दे पात्रिया येथे पाराना नदीला पॅराग्वाय नदी मिळते. संगमानंतर ती कोर्येंतेसजवळ दक्षिणेकडे वळून अर्जेंटिनातून वाहत जाते. तिला सांता फेजवळ सालादो ही उपनदी मिळाल्यानंतर, ती पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास मिळते. तिच्या मुखाजवळ रीओ द ला प्लाता ही विस्तृत नदीमुखखाडी तयार झाली आहे. पारानाने निर्मिलेल्या त्रिभुज प्रदेशाचा शिरोबिंदू उत्तरेकडे द्यामांते येथे असून येथूनच हिच्या प्रवाहशाखा आग्नेयीकडे वाहत जाऊन रिओ द ला प्लातास मिळतात. पारानाच्या त्रिभुज प्रदेशाची वरच्या भागात कमाल रुंदी १७.७ किमी., तर खालच्या भागात सु. ६४ किमी. असून त्याचे क्षेत्र १४,२४५ चौ. किमी. आहे (१९७०). त्रिभुज प्रदेशात होणाऱ्या तिच्या अनेक शाखांपैकी पाराना ग्यूएझू व पाराना दे लास पाल्मास ह्या प्रमुख आहेत. दर सेकंदास किमान १७,२९४ घ. मी. पाण्याचे वहन करणारी ही नदी दरवर्षी सु. १६.५ कोटी टन गाळ आणते. पाराना नदीखोऱ्यातील हवामान उष्ण व दमट आहे. तिच्या खोऱ्यात पॅटी, सुरुबी, पेजेरी, दोरोदो इ. मासे व घोरपड, वॉटरबोआ, खडखड्या साप इ. प्राणी आढळतात.
जाधव. रा. ग. गाडे, ना. स.