पापुअन : न्यू गिनी व त्याच्या परिसरातील बेटांवर राहणाऱ्या एतद्देशीय आदिवासींना सुरुवातीच्या मार्गनिर्देशकांनी दिलेली संज्ञा.
वांशिक दृष्ट्या त्यांचे वर्गीकरण करणे कठीण आहे. पापुअन भाषासमूहातील बोलीभाषा ते बोलत असले, तरी तिच्या आणखी काही बोलीभाषा आहेत. त्यांची लोकसंख्या २४,६३,००० (१९६२) होती. सु. २,३०,००० मेलानीशिअन समूहातील मेलानीशिअन भाषा न बोलणाऱ्या लोकांनाही पापुअन या नावाने संबोधितात. मोठे पण पुढे आलेले गरुडाच्या चोचीसारखे नाक, जाड भुवया, लांबट मस्तक, कुरळे लोकरीसारखे फुगलेले केस आणि पिंगट काळा वर्ण ही यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये असून या केसांमुळेच त्यांना पापुअन ही संज्ञा प्राप्त झाली आहे (पापुवाह म्हणजे कुरळे लोकरी केस).
यांची घरे समुद्रकिनाऱ्यापासून बरीच आत टेकडीजवळ असतात. बहुधा एकच धाब्याचे खूप लांब (जवळजवळ १५०-१८० मी.) सामायिक घर असून, त्यात बांबु अथवा फांद्यांच्या भिंती घालून वेगवेगळ्या खोल्या करतात. अशा घरांना मोरोंग म्हणतात. काही ठिकाणी झाडावर घरे बांधतात, त्याला दोबो म्हणतात. हे लोक नावा तयार करण्यात निष्णात आहेत.
पापुअन हे वराहपालनात वाकबगार असून ते डुकराचे मांस विकतात आणि खातात. शेतीही थोड्या प्रमाणात चालते. किनारपट्टीवर मासेमारीचा धंदा चालतो. कंदमुळे, मासे, पशुपक्ष्यांचे मांस हेच यांचे मुख्य अन्न असून ते शिजविण्यासाठी लागणारी भांडी दुसऱ्यांकडून धान्याच्या विनिमयातून ते घेतात किंवा जमिनीच्या खड्ड्यात पदार्थ ठेवून त्यांवर तापविलेले दगड ठेवून शिजविण्याची क्रिया करतात. वस्तीच्या अंतर्भागात पाणी मिळत नाही, म्हणून बांबूच्या साहाय्याने समुद्राचे पाणी आत आणतात. समुद्रात भिजून वाळलेल्या ओंडक्यांवरील साचलेल्या थरांतून ते मीठ काढतात. हे लोक नशा चढविणारी दारू पीत नाहीतच पण पदार्थ आंबवून त्याची दारू करणेही त्यांना माहीत नाही. मात्र घराच्या आसपास तंबाखू लावतात व ती खूप प्रमाणात ओढतात. स्त्रिया व पुरुष एकत्र जेवत नाहीत. पुरुष आणि स्त्रिया मोजके कपडे वापरतात. जंगलात राहणारे बहुतेक पापुअन अर्धनग्नच असतात.
यांचे कपडे म्हणजे अंगाभोवती गुंडाळलेले एक फडके असते. हाडे, दात, शंख, शिंपले यांचे दागिने स्त्री-पुरुष दोघेही वापरतात. कोणत्याही समारंभप्रसंगी पुरुष सर्वांगाला चुना किंवा रंग लावून त्यावर विशिष्ट आकृत्या काढतात आणि मुखवटे वापरतात. तसेच कानात, कमरेला, डोक्यावर पिसे खोचून सामूहिक नृत्य करतेवेळी एका बाजूने उघडे असलेले ढोलके वाजवून ते गीत न म्हणता नुसताच मोठा आवाज काढतात. त्या वेळी काहीजण बासरी वाजवितात. शिकारीसाठी दगडाची किंवा कठीण बांबूची तीक्ष्ण हत्यारे वापरतात. काहीतरी शिकार गवसल्यानंतरच अंगावर गोंदून घेण्याची त्यांच्यात पद्धत आहे.
यांत कुलचिन्हवादी बहिर्विवाही कुळी असून अदलाबदल विवाह बरेच होतात. यांच्यात पितृसत्ताक कुटुंबपद्धती असून जमिनीवर वैयक्तिक मालकी असते. मुलांना वारसाहक्क समप्रमाणात प्राप्त होतो. नेतृत्व वंशपरंपरेने चालते.
जादू, मंत्र-तंत्र वगैरेचे विधी ते पाळतात. पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास आहे. पूर्वजांच्या कृपेनेच धनधान्य मिळत असते, अशी त्यांची समजूत आहे. अलीकडे या लोकांना सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलियन शासनाने काही भरीव कार्यक्रम व योजना आखल्यामुळे पापुअन लोकांत झपाट्याने शिक्षणप्रसार होत आहे, त्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारले असून पूर्वीची शिरोमृगया आणि आपापसांतील लढाया १९७० नंतर जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत.
संदर्भ : 1. Maher, R. F. New Men of Papua : a Study in Culture Change, Don Mills, 1961.
2. Saulnier, Tony, Headhunters of Papua, London, 1961.
कीर्तने, सुमति
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..