पांढरकळी : (कोदरसी हि. डालमे सं. भूरी, धूसरा, फली गु. शीनवी क. इबत्ती गिड लॅ. सेक्युरेनेगा व्हिरोजा, फ्ल्युजिया मायक्रोकार्पा कुल-युफोर्बिएसी). ह्या मोठ्या झुडपाचा प्रसार सिंधूच्या आणि काश्मीरच्या पूर्वेस, आसामपर्यंत, हिमालयात (२,००० मी. उंचीपर्यंत) व भारतात इतरत्र पानझडी जंगलांत आहे शिवाय चीन, ऑस्ट्रेलिया, कार निकोबार बेट, मलेशिया, उष्ण आफ्रिका इ. प्रदेशांतही ते आढळते. हे झुडूप सु. ८ मी. उंच, बिनकाटेरी व द्विभक्त लिंगी असून खोडावरील साल पातळ, गुळगुळीत, लालसर करडी असते व तीवर ⇨ वल्करंध्रांचे (बारीक छिद्रांचे) ठिपके असतात. फांद्या लहान व कोनीय (धारदार) पाने साधी, एकाआड एक, पातळ, दीर्घवृत्ताकृती-गोलसर, २·५–७·५ × १·५–४·५ सेंमी., भिन्न लांबी-रुंदीची फुले हिरवट पिवळी, सुगंधी, एकलिंगी, फार लहान व सूक्ष्म छदांनी वेढलेल्या झुबक्यांनी, पानांच्या बगलेत मे-जूनमध्ये येतात. पुं-पुष्पे अनेक व स्त्री-पुष्पे १–५ केसरदले ३–५, किंजदले ३ व किंजले विभागलेली व भिन्न झाडांवर येतात [⟶ फूल] फळे दोन प्रकारची : लहान व शुष्क अथवा मोठी (८ मिमी. व्यास), पांढरी व मांसल आणि खाद्य असतात. सामान्य लक्षणे ⇨ यूफोर्बिएसी कुलात (एरंड कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळात बिया ३–६ असतात.
परम्यावर मुळांचा उपयोग करतात. पानांचा रस वा चुरा तंबाखूत मिसळून जखमांतील कृमी (किडे) मारण्यास लावतात. पाने पाण्यात उकळून तो काढा बद्धकोष्ठतेवर सारक म्हणून देतात व जखमा धुण्यास वापरतात. साल मत्स्यविष असून तीत १०% टॅनीन असते ती कातडी कमाविण्यासाठी वापरतात. मूळ वेदना कमी करण्यास उपयुक्त असून शिवाय ते स्तंभक (आकुंचन करणारे), रेचक व कामोत्तेजक असते. सालही स्तंभक म्हणून अतिसारात व न्यूमोनियात देतात. याचे लाकूड पिवळट तांबडे, तांबडे किंवा पांढरे, कठीण, बळकट व टिकाऊ असून त्यापासून शेतीची अवजारे, साध्या छपराचे सांगाडे, वासे व काठ्या तयार करतात.
सेक्युरिनेगा ल्यूकोपायरस (फ्ल्युजिया ल्यूकोपायरस) या जातीलाही ‘पांढरफळी’ म्हणतात.तिला लहान पाने व तीक्ष्ण काटे असतात. हिच्या फुलाचे वर दिलेल्या जातीशी साम्य असून स्त्री-पुष्पे लाल, पुं-पुष्पे हिरवट पिवळी आणि मृदुफळे लहान (६ मिमी. व्यास) गोलसर, पांढरी व गुळगुळीत आणि खाद्य असतात. लाकूड कठीण व वरच्याप्रमाणे, शिवाय जळणासही उपयुक्त असते. पानांचा औषधी उपयोग वरीलप्रमाणे करतात. मुळांचा काढा झोप येण्यास व तापावर देतात. खोडातून पाझरणारा डिंक चिकटविण्यास वापरतात. पाला बोकड व मेंढ्या खातात. लाकूड विशेषेकरून तंबूच्या खुंट्या, खुर्च्यांचे पाय, हातात धरावयाच्या काठ्या इत्यादींसाठी वापरतात. झाडे उत्तम शोभिवंत कुंपणाकरिता लावतात.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.
“