किड्स्टन, रॉबर्ट : (२९ जून १८५२ — १३ जुलै १९२४). ब्रिटिश पुरावनस्पतिशास्त्रज्ञ. त्यांचे महत्त्वाचे संशोधनकार्य जीवाश्म (अवशेषरूपी) वनस्पतीसंबंधी आहे. यांचा जन्म बिशप्टन हाऊस (रेनफ्रूशर) येथे झाला व त्यांचे शिक्षण स्टर्लिंग हायस्कूल व एडिंबरो विद्यापीठात झाले. १८८०—१९०४ या काळात त्यांनी आपले लक्ष वनस्पतिविज्ञानातील वर्णनात्मक व वर्गीकरणात्मक आणि भूविज्ञानातील स्तरविज्ञान (खडकांतील स्तरांची रचना व त्यांतील जीवाश्म यांचा अभ्यास करणारे विज्ञान, स्ट्रॅटिग्राफी) यांविषयक समस्यांवर केंद्रीत केले होते त्यानंतर त्यांनी संरचनेचवर संशोधन केले. ⇨ बीजी नेच्यांसंबंधीचे (१९०४) पहिले वर्णन त्यांनीच १९०४ मध्ये केले. त्यांचे अतिशय महत्त्वाचे कार्य म्हणजे ऱ्हाइनेचर्टाच्या डेव्होनियन (सु. ४२ ते ३६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) वनस्पतींसंबंधी डब्ल्यू. एच्. लॅंग यांच्या समवेत १९१७—२१ या काळात केलेले कार्य होय. तत्पूर्वी सु. ६० वर्षे सायलोफायटांचा शोध लागला होता, परंतु त्यांचे महत्त्व किड्स्टन व लॅंग यांच्या ⇨ सायलोफायटेलीझच्या (हा गण व त्याला आधारभूत असे तीन नवीन वंश) शोधापर्यंत कळले नव्हते. किड्स्टन यांचे सर्वांत मोठे लेखनकार्य म्हणजे द फॉसील प्लॅंट‌्स ऑफ द कार‌्बॉनिफेरस रॉक्स ऑफ ग्रेट ब्रिटन (सहा खंड प्रसिद्ध, १९२३ – २५) हा बहुमोल ग्रंथ होय परंतु त्यांच्या मृत्यूच्या वेळी तो पूर्ण झाला नव्हता. तत्पूर्वी ग्विनव्हॉन यांच्या समवेत त्यांनी पुरातन ऑस्मुंडेसी [→नेचे] संबंधीचा निबंध पुरा केला होता. ते वेल्समधील गोलफाख गोच् येथे मृत्यू पावले. 

पहा : पुरावनस्पतिविज्ञान.

जमदाडे, ज. वि.