पॅरिस : फ्रान्सची राजधानी. जगातील एक सुंदर, सुनियोजित आणि इतिहासप्रसिद्ध असे हे शहर यूरोपीय कलासंस्कृतीचे केंद्र समजले जाते. क्षेत्रफळ १०५ चौ. किमी. महानगरीय क्षेत्र १२,००८ चौ. किमी. लोकसंख्या २२,९०,९०० उपनगरांसह सु. ९१,५०,००० (१९७५ अंदाज). फ्रान्सच्या उत्तरेकडील मैदानी भागाच्या केंद्रस्थानी असलेले हे शहर प्रारंभी सेन नदीच्या पात्रातील ईल द ला सीते या बेटावर वसलेले होते, ते आता नदीच्या दोन्ही काठांवर पसरले आहे. या शहराचा परिघ ३३ किमी. असून त्याच्या महानगरीय विभागात देशातील सु. एकषष्ठांश लोक राहतात. रोमन लोकांचा अंमल या भागावर बसण्यापूर्वी ईल द ला सीते बेटावर गॉल जमातीपैकी पॅरिसी लोक राहत होते. त्यांवरूनच शहराला ‘पॅरिस’ हे नाव पडल्याचे मानले जाते.

शहरातील सखल भागाची उंची समुद्रसपाटीपासून २५ मी. असून जास्तीत जास्त उंची १३० मी. आहे. पॅरिसच्या दक्षिणेला सेन नदीच्या डाव्या किनाऱ्यावर माँ सँ झंव्ह्येव्ह आणि माँ पार्नास या टेकड्या आहेत, तर उत्तरेला सेनच्या उजव्या किनाऱ्यावर माँमार्त्र व बेलव्हिल या टेकड्या आहेत. शहराच्या पश्चिम भागात माँ व्हालेरीं ही टेकडी आहे. पॅरिसचे हवामान सौम्य, दमट परंतु आल्हाददायक आहे. किमान सरासरी तपमान ४° से. असून कमाल तपमान १९° से. आढळते. तपमान क्वचितच गोठणबिंदूच्या खाली जाते. पाऊस मुख्यतः पश्चिमी वाऱ्यांपासून मिळत असून वर्षभर हलक्या सरी पडतात. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० सेंमी. आहे. एकंदरीत पॅरिसचे हवामान सम आहे.  

प्राचीन काळी सेन नदीतील ईल द ला सीते बेटावर गॉल लोकांपैकी पॅरिसी टोळीची वसाहत होती. इ. स. पू. ५२ मध्ये ज्यूलियस सीझरने तिचा पराभव करून तेथे रोमन ठाणे उभारले व त्या भागाला ‘लुटेशिया’ हे नाव देण्यात आले. रोमनांनी तटबंदी उभारून ते ठाणे सुरक्षित केले. सेन आणि तिच्या उपनद्यांतून त्याचप्रमाणे आजूबाजूंच्या मैदानी प्रदेशांतून वाहतूक करणे सोपे होते. मैदानातील जमीन सुपीक असल्यामुळे शेती फायदेशीर होती. परिणामतः लुटेशियाची वाढ झाली आणि इ.स. दुसऱ्या शतकाच्या सुमारास त्याचा विस्तार सेन नदीच्या डाव्या किनाऱ्यापर्यंत झाला. तिसऱ्या शतकात जर्मन व स्कँडिनेव्हियन टोळ्यांनी या वसाहतीची नासधूस केली. त्यामुळे तेथील वस्ती पुन्हा मूळ बेटापुरती स्थिरावली. पाचव्या शतकात तेथे हूणांची आक्रमणे सुरू झाली. त्यांचा यशस्वी प्रतिकार करणाऱ्या माँ सँ झंव्ह्येव्ह या संत स्त्रीच्या सन्मानार्थ नदीच्या डाव्या तीरावरील टेकडीला तिचे नाव देण्यात आले. पुढे फ्रँक राजा क्लोव्हिसने रोमन सत्ता नष्ट करून ५०८ मध्ये पॅरिस हे आपले मुख्य ठाणे केले. शार्लमेनच्या कारकीर्दीत पॅरिसचे महत्त्व कमी झाले पण फ्रान्सचा ड्यूक युग कापे ह्याने ९८७ मध्ये पॅरिस ही आपली राजधानी केली. फ्रान्स राष्ट्राच्या उदयाचा तो काळ होता. त्याच काळात पॅरिसचे महत्त्व वाढून त्याच्या भावी विकासाचा पाया घातला गेला. दहाव्या शतकात पॅरिस फ्रान्सचे राजकीय केंद्र बनले. अकराव्या शतकाच्या सुरुवातीपासून हे शहर सेन नदीच्या दोन्ही काठांवर पसरले. डाव्या तीरावर प्रामुख्याने शैक्षणिक संस्था, तर उजव्या तीरावर व्यापारी विभाग स्थापन झाला. मूळ बेटाचा भाग राज्यकारभाराचे केंद्रस्थान बनला.

जोन ऑफ आर्कचा पुतळा, पॅरिस.फिलिप ऑगस्टस राजाच्या (११८०-१२२३) कारकीर्दीत पॅरिसमध्ये अनेक सुधारणा झाल्या. त्याने डाव्या तीरावर अनेक शाळा, महाविद्यालये, चर्च, रुग्णालये आणि उजव्या तीरावर संरक्षणासाठी छोटासा किल्ला बांधला. त्याच्याच काळात ⇨ पॅरिस विद्यापीठाची स्थापना झाली. हळूहळू हे विद्यापीठ यूरोपचे शैक्षणिक केंद्र बनले. याच काळात नोत्रदाम येथील गॉथिक वास्तुशैलीतील कॅथीड्रल उभारण्यात आले. नवव्या लुईच्या काळात (१२२६–७०) धार्मिक कृत्यांसाठी सँ शापॅल बांधण्यात आले. त्यानंतर इंग्लंडबरोबरच्या युद्धात अंतर्गत कलहामुळे पॅरिसचे महत्त्व कमी झाले पण जोन ऑफ आर्कच्या स्फूर्तिदायक नेतृत्वामुळे इंग्रजांची पीछेहाट होऊन अकराव्या लुईच्या कारकीर्दीत पॅरिसचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित झाले. पहिल्या फ्रान्सिसच्या कारकीर्दीत (१५१५–४७) लूव्हर राजवाडा व ओतेल द व्हिलसारख्या भव्य वास्तूंची भर पडून पॅरिसचे वैभव वाढले. त्यानंतरच्या धार्मिक संघर्षाच्या काळात पॅरिसचे बरेच नुकसान झाले पण चौथ्या हेन्ऱीने फ्रान्समधील अंदाधुंदी नष्ट करून प्रबल राजसत्ता स्थापन केली. (१५८८–१६१०). त्याच्याच प्रयत्नांमुळे पॅरिसची गणना त्या काळच्या सर्वांगसुंदर शहरात होऊ लागली. पॅरिसमधील पहिला पुतळा चौथ्या हेन्ऱीचाच आहे. चौदाव्या लुईच्या काळात (१६४३ – १७१५) अनेक चौक, कॅथीड्रल, चर्च आणि भव्य इमारती उभारण्यात येऊन शहराच्या वैभवात पुष्कळच भर पडली. पंधराव्या लुईने पॅरिसमध्ये अनेक सुधारणा केल्या. अठराव्या शतकाचे शेवटचे दशक फ्रेंच राज्यक्रांतीच्या धामधुमीत गेले. क्रांतीचा पुरस्कार करणारी नगरी म्हणून पॅरिसला फ्रेंच इतिहासात आणि राजकारणात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झाले. नेपोलियन बोनापार्टची उभी हयात युद्धाने गजबजलेली असूनही त्याने पॅरिसच्या विकासाच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या. अनेक पूल, विजयकमानी, स्मारके, चौक,नदीकाठचे दगडी कठडे, वृक्षाच्छादित रुंद रस्ते, विविध उद्याने, फाँतेन्ब्लो येथील व अन्य राजवाड्यांतील सुंदर लाकडी सामान व चित्रसंग्रह यांद्वारे नेपोलियनने पॅरिसला भव्यता व सौंदर्य प्राप्त करून दिले. १७८९,१८३० आणि १८४८ मधील काळात पॅरिसच्या जुन्या, अरुंद आणि वेड्यावाकड्या रस्त्यांमुळे दंगेखोरांचे कसे फावले हे लक्षात घेऊन तिसऱ्या नेपालियनने ओस्मान या तज्ञाच्या मदतीने शहराच्या विकासासाठी नव्या योजना आखून पॅरिसला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न केला. सरळ रुंद रस्ते, नगरातील दिवा-बत्तीची व सांडपाण्याच्या निकासाची सोय, कारंजी, प्राणिसंग्रहालय, वनस्पतिउद्यान व अनेक स्मारके इत्यादींची सुनियोजित उभारणी याच काळात करण्यात आली. १८६७ मध्ये त्याने सुरू केलेल्या पॅरिसच्या प्रदर्शनाची परंपरा पुढेही चालू राहिली. त्यानंतर  साधारणपणे दर बारा वर्षांनी भरलेल्या प्रदर्शनांमुळे पॅरिसच्या सौंदर्यात भर पडत गेली व त्याचे महत्त्वही वाढत गेले. १८७०–७१च्या फ्रँको-जर्मन युद्धात व नंतरच्या पॅरिस कम्यूनच्या विध्वंसक कारकीर्दीत पॅरिसची पुष्कळच हानी झाली. तत्कालीन प्रस्थापित सरकारला विरोध करणाऱ्या पॅरिस कम्यूनने त्वील्ररी राजवाड्यासारख्या अनेक वास्तू नष्ट केल्या तथापि पुढे त्यांपैकी अनेक वास्तूंचा जीर्णोद्धार करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात पॅरिसमध्ये अनेक सुधारणा झाल्या. उद्योगधंदे, व्यापार इ. क्षेत्रांत शहर खूप पुढे आले. पॅरिस हे अंतर्गत जलमार्ग, लोहमार्ग व सडका यांचे मोठे केंद्र बनले. पहिल्या महायुद्धात जर्मन बाँबफेकीने पॅरिसचे पुष्कळ नुकसान झाले पण दुसऱ्या महायुद्धकाळात फ्रान्सचा पराभव अटळ आहे हे दिसताच पॅरिस आरक्षित शहर असल्याची घोषणा झाल्याने विनासंघर्ष ते जर्मनांच्या ताब्यात गेले व शहराची हानी टळली. जर्मनव्याप्त फ्रान्सचे युद्धकालीन प्रशासनकेंद्र पॅरिसमध्येच होते. शरणागतीनंतर लवकरच फ्रान्समध्ये सर्वत्र भूमिगत देशभक्तांचे उठाव सुरू झाले व पॅरिसच्या जर्मन प्रशासकांना भूमिगत सैनिकांनी त्रस्त केले. १९४४ मध्ये दोस्तांच्या सेना पॅरिसच्या परिसरात पोहोचण्याच्या सुमारास भूमिगत सेनांनी उघड बंड केले. महायुद्धानंतरच्या काळात पॅरिसचे महत्त्व वाढतच गेले.


पॅरिसची वाढ सतत होत आहे. १९६० मध्ये शां एलीझेच्या पश्चिम टोकावर रोन पाँजवळ नवे प्रदर्शनगृह उभारण्यात आले. त्या वेळी सर्व जुन्या प्रदर्शनगृहांना पूर्वीचेच रंग देण्यात येऊन एकप्रकारे स्मारकरूपाने ती जतन करण्यात आली. याच वेळी नव्या भुयारी मार्गाची आखणी करून शहरी वाहतुकीतील अडचणींचे निराकरण करण्यात आले.  

पॅरिस शहराच्या सध्याच्या रचनेवर सेन नदी व तिचे १२ किमी. लांबीचे वळण यांचा फार महत्त्वाचा परिणाम झाला आहे. नदीच्या मर्मस्थानी असलेल्या ईल द ला सीते बेटावरच शहराच्या वसाहतीस सुरुवात झाली. दोन्ही बाजूंच्या नदीप्रवाहांमुळे ही जागा इतिहासकाळात फारच सुरक्षित ठरली. साहजिकच हा भाग राजकीय व धार्मिक सत्तांचे केंद्रस्थान बनला. या भागात शासकीय आणि न्यायदानविषयक कार्यालये केंद्रित झालेली आढळली, तरी अपुऱ्या जागेमुळे ती–पॅरिसचा आजचा विस्तार पाहता बेटाचा भाग अपुरा पडतो – बेटासभोवतालच्या भागांतदेखील पसरलेली आहेत. पूर्वी व्यापारी भाग म्हणून विकास पावलेला उत्तरेकडील सेनच्या उजव्या काठावरील भाग  पूर्वीसारखाच गजबजलेला आहे. या भागात शेअर बाजार, बँक द फ्रान्स, पूर्व-पश्चिम व उत्तरेकडील लोहमार्गांचे केंद्रस्थान आहे. सेन नदीच्या डाव्या किनाऱ्यावरील शहराचा दक्षिण भाग पूर्वीपासून शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. या भागातच पॅरिस विद्यापीठ, म्यूझीयम ऑफ नॅचरल हिस्टरी, वेधशाळा, इन्स्टिट्यूट द फ्रान्स इ. संस्था आहेत. शहराच्या वाढत्या पसाऱ्यामुळे जरी या तीन विभागांत पूर्वीइतका अनन्यसाधारण वेगळेपणा आढळून येत नसला, तरी प्रत्येक विभाग आपले वैशिष्ट्य टिकवून आहे.

पॅरिसची प्रशासनव्यवस्था आगळीच आहे. तेथील प्रशासनव्यवस्थेची १९६५ पासून पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेनुसार पॅरिस शहर, नवीन सहा खाती व सेन-ए-मार्नचे खाते यांचा पॅरिस विभाग (रीजन) तयार करण्यात आला. विभागीय प्रीफेक्ट हा त्याचा प्रमुख असतो. प्रत्येक नवे खाते व नूतन पॅरिस शहर यांवर स्वतंत्र प्रीफेक्ट असतो. पोलीस खात्याचा प्रीफेक्ट हा स्थूलमानाने सर्व महानगरीय प्रदेशावर नियंत्रण ठेवतो. महत्त्वाचे म्हणजे ही प्रशासनव्यवस्था बव्हंशी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. पॅरिस कौन्सिल हे लोकनियुक्त मंडळ असून, त्यावर ९० प्रतिनिधी लोकांतर्फे निवडले जातात पण त्या कौन्सिलचे स्वरूप केवळ सल्लागार मंडळासारखे असते. पॅरिसमधील सार्वजनिक समारंभप्रसंगी त्या कौन्सिलचा अध्यक्ष महापौरांसारखे कार्य पार पाडतो. प्रशासनाच्या सोयीसाठी शहराचे वीस विभाग पाडले असून, त्यांची कार्यालये मध्यवर्ती नगरभवनात आहेत. तेथेच पोलीस, जस्टिस ऑफ पीस व कौन्सिलचा अध्यक्ष यांच्याही कचेऱ्या आहेत.  

सार्वजनिक सेवा शासकीय, निम-खाजगी किंवा महानगरातील विभागीय संघटनांमार्फत पार पाडल्या जातात. त्या बव्हंशी राष्ट्रीय शासनास जबाबदार असतात. वाहतूकव्यवस्था विभागीय प्राधिकरणाच्या कक्षेत मोडते. रस्त्यांच्या व्यवस्था व दुरुस्ती या बाबतींत तांत्रिक, आर्थिक गोष्टींची जबाबदारी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या स्थानिक प्रतिनिधीकडे असते. शहरातील ८० रुग्णालये व इतर वैद्यकीय संस्था मात्र स्थानिक नागरी संघटनेच्या अखत्यारीत आहेत. अशा रीतीने पॅरिसचे प्रशासन राष्ट्रीय शासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे पॅरिसच्या विकासाची कोणतीही योजना आखणे व पूर्ण करणे, हे राष्ट्रीय राजकारण व अर्थकारण यांवर अवलंबून असते.  

शहराच्या वाढीबरोबर अनेक लहानमोठे मार्ग व पूल बांधण्यात आले आहेत. पॅरिस शहरात सार्वजनिक बस वाहतुकीचे ५५ मार्ग असून उपनगरांत ९० आहेत. पॅरिसच्या केंद्रभागातून सर्व दिशांकडे जाणारे लोहमार्गही उपलब्ध आहेत. पॅरिसचा ‘मेट्रो’ म्हणजे भुयारी मार्ग उल्लेखनीय आहे. शहराच्या मध्यातून जाणाऱ्या सेन नदीला एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस दोन प्रचंड पूर येऊन शहराचे खूप नुकसान झाले होते. हा धोका टाळण्यासाठी नदीचे दोन्ही किनारे बांधून काढले आहेत. नदी व कालवे यांच्या पाण्यातून जलमार्गाची सोयही उपलब्ध आहे. हौशी पर्यटकांसाठी नौकाविहाराची सोय करण्यात आली आहे. लांबच्या प्रवासासाठी सुपर महामार्ग आहेत. पॅरिसमध्ये तीन विमानतळ आहेत. एवढी साधने असूनदेखील वाहतूक ही या शहराची मोठीच समस्या आहे.

पॅरिसमध्ये उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण झालेले आढळते. अनेक अवजड उद्योगधंदे राजधानीच्या परिसरात वाढत गेल्याने वाहतूकव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य, शहराचे सौंदर्य यांवर अनिष्ट परिणाम झालेले दिसतात. इलेक्ट्रॉनिकी, विमानउद्योग, मोटारबांधणी इ. यांत्रिक व अवजड उद्योगधंदे शहराच्या नैर्ऋत्य टोकापासून ईशान्य टोकापर्यंत पसरले आहेत. फ्रान्समधील ८०% मोटारउद्योग पॅरिसमध्ये केंद्रित झाला आहे. अंतर्देशीय व आंतरराष्ट्रीय व्यापाराची पॅरिस ही मोठी बाजारपेठ आहे. ले आलची मंडई पंधराव्या शतकापासून प्रसिद्ध असून ती पाँ नफजवळ उत्तरेला आहे. ह्या मंडईला भेट दिल्याशिवाय पॅरिस दर्शन पूर्ण होत नाही. येथील कांद्याचे सूप प्रातःकाळी घेणे, हा अविस्मरणीय अनुभव समजला जातो.  

नेपोलियनने बांधलेली विजयी कमान, पॅरिसपॅरिसचे स्वतंत्र व्यावसायिक कारागीर आपापल्या घरांतच किंवा लहान कर्मशाळांत काम करतात. निरनिराळ्या पेठा विशिष्ट कारागिरीच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. बॅस्तील चौकात लाकडी सामान, मॅरेमध्ये धातुकाम, बीव्हर विभागात कातडी सामान, दक्षिण भागात गॉब्ली पटचित्रे अशी पेठवार विभागणी झालेली दिसते. रू द रिव्होली, रू द लाप आणि रू सँ ह्या पॅरिसच्या प्रसिद्ध बाजारपेठा आहेत. नदीकाठच्या फरसबंद भागात –विशेषतः लॅटिन विभागात – जुन्या-नव्या पुस्तकांची शेकडो दुकाने दिसतात. शिक्षणक्षेत्रातही पॅरिसची कामगिरी मोलाची आहे. पॅरिस विद्यापीठ जगातील एक अत्यंत प्रगत विद्यापीठ समजले जाते. सॉर्बॉनची शैक्षणिक केंद्र म्हणून असलेली ख्यातीही इतिहासकाळापासून चालत आलेली आहे, मूळ बेटाच्या दक्षिण भागातील ‘बूलव्हार द सँ मिशेल’ ह्या रस्त्यावर विद्यापीठाच्या इमारती असून मध्ययुगापासून ‘लॅटिन विभाग’ म्हणूनहा प्रसिद्ध आहे. त्याशिवाय विभिन्न विद्याशाखांची अनेक महाविद्यालये, वैद्यकीय संस्था व पाश्चर इन्स्टिट्यूटसारख्या संशोधन संस्था, अणुउर्जा संशोधनाची प्रयोगशाळा, वेधशाळा यांसारख्या अनेक संस्थाही येथे आढळतात. पॅरिसचे राष्ट्रीय ग्रंथालय विश्वविख्यात असून त्यात ४० लक्ष ग्रंथ व हजारो हस्तलिखिते आहेत. पॅरिसमध्ये एकूण १९ दैनिके व रविवारी प्रसिद्ध होणारी तीन साप्ताहिके आहेत. ल पारिझीं लिबेर आणि फ्रँस स्वार यांचा खप सात लाखांवर आहे. फिगारो, ल माँत यासारखी वृत्तपत्रेही उल्लेखनीय आहेत.


ललित कलांच्या क्षेत्रांत पॅरिस अग्रेसर असून नवनव्या छानछोकी (फॅशन) येथून प्रसृत होतात. यूरोपीय कवी, लेखक, नट, नर्तक, चित्रकार, गायक , वादक यांना पॅरिसचे कायमचे आकर्षण असते. कॉमीदीए फ्रान्सेझ, पॅरिस ऑपेरा व ऑपेरा कॉमिक ही शासकीय नियंत्रणाखालील नाट्यगृहे होत. ह्यांशिवाय इतर सु. १० नाट्यगृहे येथे आहेत. पॅरिस फॅशनचे माहेरघर मानले जाते. स्त्री-पुरुषांच्या वस्त्रप्रावरणांच्या नव्या पद्धती प्रथम पॅरिसमध्ये रूढ होतात आणि नंतर त्यांचा जगभर प्रसार होतो.  

जगातील अनमोल कलाकृतींचे आगर म्हणजे पॅरिसची संग्रहालये व कलावीथी होत. श्रेष्ठ चित्रकार आणि शिल्पकार यांच्या कलाकृतीं लक्सेंबर्ग संग्रहालयात आढळतात. थोर कलाकारांच्या निधनानंतर दहा वर्षांनी त्यांच्या निवडक कलाकृती तेथून लूव्हर संग्रहालयात पाठविल्या जातात. या संग्रहालयात जगप्रसिद्ध अशा प्राचीन व अर्वाचीन कलाकृती प्रदर्शनार्थ ठवलेल्या आहेत. यांशिवाय मध्ययुगीन कलाकृतींचे क्लूनी संग्रहालय, पॅरिसचा इतिहास दाखविणारे कार्नाव्हाले संग्रहालय, भारतीय व पौर्वात्य कलाकृतींचे म्यूझे गिमॅ संग्रहालय, म्यूझे द ला आर्ट फ्रान्सेझ, फ्रेंच शिल्पाकृतींचे संग्रहालय यांसारखी त्याचप्रमाणे फ्रेंच वसाहतीतील कलाकृतींचे, मानववंशशास्त्राचे तसेच विज्ञानविषयक आदी संग्रहालये पॅरिसमध्ये आहेत. समकालीन कलाकृतींचे प्रदर्शन नॅशनल म्यूझीयम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये भरविले जाते.

रुंद, सरळ रस्त्यांचे व भव्य चौकांचे शहर म्हणून पॅरिस प्रसिद्ध आहे. चौकांची संख्या सु. १३० असून त्यांपैकी ‘प्लास द ला काँकॉर्द’, ‘प्लास द ला त्वाल’, ‘प्लास द ला बॅस्तील’ इ. प्रख्यात आहेत. पहिल्यात फ्रान्सच्या आठ शहरांचे प्रतीकात्मक पुतळे व ईजिप्तमधील लक्सॉर मंदिराबाहेरील अष्टकोनी स्तंभापैकी एक ठेवण्यात आला आहे. याच चौकात क्रांतिकाळात गिलोटीन यंत्र उभारले होते. सोळावा लुई व मारी आंत्वानेतचा शिरच्छेद येथेच झाला. प्लास द ला त्वालपासून बारा प्रमुख पथ पॅरिसच्या निरनिराळ्या भागांत जातात. ह्या चौकात नेपोलियन बोनापार्टने उभारलेली विजयकमान असून तिच्याखालील अज्ञात शिपायांच्या स्मारकीय थडग्यांत नंदादीप तेवत असतो. प्लास द ला काँकॉर्दजवळील प्लास द ला कारूझील चौकात नेपोलियनने उभारलेली आणखी एक विजयकमान आहे. प्लास द ला बॅस्तील चौकात फ्रेंच राज्यक्रांतीच्या हत्याकांडातील कुप्रसिद्ध किल्ला होता. १८३० च्या क्रांतीच्या स्मृत्यर्थ त्यात एक ‘जुलै स्तंभ’ उभारलेला आहे. एकंदरीत पॅरिसचे चौक म्हणजे इतिहासातील घटनांची स्मारकेच होत.

पॅरिसचे विहंगम दृश्यपॅरिस सुंदर उपवने व उद्याने यांनी नटलेले आहे. शहराच्या पश्चिम भागात ‘ब्वा द बूलाँय’ हे कृत्रिम उपवन आहे. त्यातील राईपथ व कुंज विलोभनीय वाटतात. शहराच्या उत्तर भागात माँसो, ब्यूटस-शांमाँ ही उद्याने व मध्यभागी त्वील्ऱी बाग आहे. त्वील्ऱीचा राजवाडा १८७१ मध्ये क्रांतिकारकांनी उद्ध्वस्त केला, त्याच भूमीवर हा सुंदर बगीचा आहे. सेनच्या डाव्या काठावरही अनेक उद्याने, हिरवळी व छोटे बगीचे आहेत. या भागातील शां द मार्स मैदानाचा पूर्वी लष्करी शिक्षणासाठी उपयोग होई. सुप्रसिद्ध ⇨आयफेल टॉवर  येथेच आहे. त्याच्या पूर्वेकडे ओतेल देझ व्हालीद म्हणजे निवृत्त शिपायांच्या निवासगृहाची भव्य इमारत आहे. येथेच नेपोलियन बोनापार्टचे थडगे आहे. जारदँ द प्लांत हे पॅरिसचे प्रसिद्ध वनस्पतिउद्यान असून त्यात एक प्राणिसंग्रहालय आहे. पॅरिसच्या आग्नेय कोपऱ्यात मांसाउरिस उद्यान असून त्यात कृत्रिम उपवने आणि लहान सरोवरे आहेत.

पॅरिसमध्ये अनेक भव्य, आकर्षक प्रासाद, कॅथीड्रल, चर्च, आरामगृहे, नाट्यगृहे, संग्रहालये, शासकीय इमारती, व्यापारी कंपन्यांची कार्यालये सर्वत्र दिसतात. प्लास द ला काँकॉर्दच्या वायव्येस द पालॅ द ला एलीझे हे फ्रान्सच्या अध्यक्षांचे निवासस्थान आहे. लूव्हर राजवाडा त्वील्ऱी उद्यानाच्या पूर्व टोकाला असून तो फ्रेंच वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. लूव्हर हे फ्रान्सचे विश्वविख्यात कलासंग्रहालय आहे. पालॅ र‌्वाय्याल लूव्हरच्या उत्तरेस आहे. लूव्हरच्या वायव्येस तिसऱ्या नेपोलियनने बांधलेली ऑपेरा ही भव्य इमारत आहे. ह्या इमारतीपासून लूव्हरपर्यंत ऑपेरा ॲव्हेन्यू हा सुंदर पथ आहे. ओतेल द व्हिल म्हणजे नगरभवन नदीच्या उजव्या किनाऱ्यावर नोत्रदाम कॅथीड्रलच्या उत्तरेस आहे. पालॅ द जस्टिस मूळ बेटावर असून त्यात पॅरिसची पोलीस कचेरी व न्यायालये आहेत. ओतेल द्य ही सातव्या शतकातील भव्य इमारत असून तेथे रुग्णालय आहे. सेनच्या दक्षिण बाजूला असलेल्या लक्सेंबर्गच्या सुंदर राजवाड्यात फ्रेंच विधिमंडळाची अधिवेशने होतात. पूर्वेकडे माँ सँ झंव्ह्येव्ह यावर पँथीआँ या पॅरिसच्या संरक्षक देवतेचे सँ झंव्ह्येव्ह हे चर्च आहे. या इमारतीत रूसो, व्हॉल्तेअर, व्हिक्टर ह्यूगो यांसारख्या थोर फ्रेंच व्यक्तींची थडगी व स्मारके आहेत.  

पॅरिसमधील नोत्रदाम कॅथीड्रल प्रसिद्ध आहे. मूळ बेटावरच सेंट लुईने तेराव्या शतकात बांधलेले सँ शापॅल असून त्यातील चित्रकामाचे सौंदर्य अप्रतिम आहे. माद्लेन हे चतुष्कोणी चर्च असून त्याच्या भव्य स्तंभांवर कलाकुसर केलेली आहे. ते प्लास द ला काँकॉर्द चौकाच्या समोर आहे. साक्रे-कर हे चर्च माँमार्त्र या पॅरिसच्या सर्वांत उंच टेकडीवर असून त्याचा मनोरा चकचकीत, पांढरा आहे.  

जागतिक विशेषतः यूरोपीय राजकारणात पॅरिसचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक तहांच्या वाटाघाटी येथेच झाल्या. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी झालेले अनेक तह पॅरिसमधील नसले, तरी पॅरिसच्या परिसरातील व्हर्सायसारख्या ठिकाणी झालेले आहेत.  

अनेक इतिहासप्रसिद्ध परिषदाही पॅरिसमध्ये भरल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१९ मध्ये तहाचा विचार करण्यासाठी ३२ राष्ट्रांची परिषद येथेच भरली होती. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस २१ राष्ट्रांच्या प्रतिनीधींनी इटली, हंगेरी, बल्गेरिया, रूमानिया, फिनलंड आदी देशांशी होणाऱ्या तहांवर येथेच विचारविनिमय केला. १९४८ व१९५१ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकाही पॅरिसमध्ये भरल्या होत्या. १९६० पर्यंत नाटो संघटनेचे ठाणे येथे होते. यूनेस्कोचे कार्यालय येथेच आहे. जागतिक घडमोडींचे साद-पडसाद पॅरिसमध्ये अखंडपणे उठत असतात.  

ओक, द. ह. फडके, वि. शं.