पॅड्युआ : इटलीच्या व्हेनेतो विभागातील पॅड्युआ प्रांताची राजधानी व ऐतिहासिक शहर. लोकसंख्या २,४२,१८६ (१९७६ अखेर). हे व्हेनिसच्या पश्चिमेस सु. ३५ किमी. व्हेनिस–मिलान लोहमार्गावर बाकील्यॉन नदीतीरावर वसले आहे. हे महामार्ग, लोहमार्ग यांनी मोठ्या शहरांशी तसेच पो, ब्रेंटा व आदीजे या नद्यांशी कालव्यांनी जोडलेले आहे.
पॅड्युआची स्थापना ट्रोजन वीर अँटिनॉरने केल्याची दंतकथा असली, तरी त्याचा पहिला ऐतिहासिक उल्लेख रोमन इतिहासकार लिव्ही याने ख्रि.पू. ३०२ मध्ये केला. रोमन काळात पॅड्युआ हे रोमनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे संपन्न शहर होते. ॲटिलाने ते इ. स. ४५२ मध्ये घेतले. त्याच्या स्वामित्वाबाबत बायझंटिन व गॉथ टोळ्या ह्यांमध्ये सहाव्या शतकात संघर्ष झाला, तथापि ते शेवटी लाँबर्डांच्या हाती पडले व ते त्यांनी ६०१ मध्ये जाळून टाकले. आठव्या शतकात त्यावर फ्रँक टोळ्यांचा अंमल होता. अकराव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत त्याचा स्वतंत्र परगणा म्हणून विकास झाला. दानशूर कॅरारा घराण्याच्या राजवटीत (१३१८–१४०५) तसेच व्हेनिसच्या आधिपत्याखाली (१४०५–१७९७) पॅड्युआची सर्वांगीण भरभराट झाली. १८१४–६६ पर्यंत ते हॅप्सबर्ग राजवटीखाली राहिल्याने इटलीला जोडण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात पॅड्युआवर बाँबवृष्टी होऊन त्याचे मोठे नुकसान झाले.
साखरशुद्धीकरण, मद्ये, प्लॅस्टिक, खाद्यान्ने, फर्निचर, यंत्रसामग्री, ॲल्युमिनियमच्या वस्तू, मोटारगाड्या, रेशीम व रेयॉन कापड, कृषि-अवजारे, वीजसामग्री, रसायने इत्यादींच्या विविध उत्पादनांमुळे आणि धान्ये, फळफळावळ, गुरे यांच्या व्यापारामुळे पॅड्युआ हे मोठे औद्योगिक व व्यापारकेंद्र बनले आहे. येथे प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय व्यापारजत्रा भरते. शहरात एक नभोवाणी व दूरचित्रवाणी केंद्र आहे. दुतर्फा वृक्षराजींनी विनटलेल्या रस्त्यांचे हे शहर प्रबोधनकालीन कलानिर्मितीचे फार मोठे केंद्र मानले जात असून, या शहरात आंद्रीआ मानतेन्या, जॉत्तो द बोंदोने, दोनातेलो व तिशन ह्या जगद्विख्यात कलाकारांनी विविध चर्चमध्ये काढलेली अप्रतिम धार्मिक भित्तिलेपचित्रे, शिल्पाकृती, वास्तुरचना इ. आढळतात. १२२२ मध्ये स्थापन झालेले पॅड्युआ विद्यापीठ हे बोलोन्या विद्यापीठानंतरचे इटलीतील सर्वांत जुने विद्यापीठ असून, त्याच्याशी अनेक तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ व विचारवंत अध्यापक म्हणून (व्हिसेलिअस, गॅलिलिओ) तसेच विद्यार्थी म्हणून (तासो, दान्ते) निगडित आहेत. याशिवाय बाराव्या शतकातील कॅथीड्रल, ग्रंथालय, कलावीथी, यूरोपातील सर्वांत जुने समजले जाणारे वनस्पतिउद्यान (१५०५) इ. गोष्टी प्रवाशांना आकृष्ट करतात.
गाडे, ना. स.
“