पँडॅनेलीझ: (केतकी गण). फुलझाडांपैकी [आवृतबीजी, एकदलिकित वनस्पतीतील ⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] हा एक लहान गण असून यामध्ये पँडॅनेसी, टायफेसी व स्पर्जानिएसी या तीन कुलांचा समावेश (ए. एंग्‍लर यांच्या पद्धतीप्रमाणे) केला जातो. जी. बेंथॅम व जे. डी. हुकर यांच्या पद्धतीत पहिली दोन कुले सेंट्रोस्पर्मी ह्या श्रेणीत घातली आहेत. जे. हचिन्सन यांनी फक्त पँडॅनेसी (केतकी कुल) हे एकच कुल त्या गणात अंतर्भूत केले आहे. ह्या तिन्ही कुलांतील फुलांमध्ये प्रजोत्पादक इंद्रियात ऱ्हास झाल्याने साधेपणा आला असून ती कुले ⇨ लिलिएसी अथवा पलांडू कुलासारख्या पूर्वजापासून उत्क्रांत झाली असावीत असे मानतात. टायफेसी व स्पर्जानिएसी या प्रत्येकीत एकच वंश असून पँडॅनेसी कुलात तीन वंश (पँडॅनस, फ्रेसिनेशियासारारंगा) समाविष्ट केले आहेत. या गणातील वनस्पती वृक्ष, लता, झुडपे व ⇨ ओषधी असून त्यांपैकी कित्येक (उदा., केवडा पाणकणीस) दलदलीत वाढतात. त्यांची पाने अरुंद, लांब, अवृंत (बिनदेठाची), एकाआड एक व तळाशी आवरक (खोडाला वेढून) असतात. फुले लहान, एकलिंगी, एकाच झाडावर किंवा भिन्न झाडांवर येतात त्यांना परिदले (बाहेरील साहाय्यक पुष्पदले) नसतात असलीच तर सूक्ष्म खवल्यासारखी किंवा केसासारखी असतात. केसरदले व किंजदले अनेक किंवा फक्त एकच  पुं-पुष्पात कधी वंध्य किंजपुट आणि स्री-पुष्पात वंध्य केसरदले असतात. काहींत (उदा., पाणकणिसाच्या वंशातील काही जाती) परागकणांच्या चौकड्या आढळतात. [⟶ फूल]. फुले संयुक्त स्तबकासारख्या किंवा कणिश प्रकारच्या फुलोऱ्यांत [⟶ पुष्पबंध] येतात व त्यांवर महाछदाचे संरक्षक आवरण असते. बियांत पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) भरपूर असून कपालिका (उदा., पाणकणीस) अश्मगर्भी (आठळीयुक्त उदा., केवडा) प्रकारची फळे असतात.

पहा : केवडा पाणकणीस.

जमदाडे, ज. वि.