पँटोथिनिक अम्ल : जीवनसत्त्व ब गटातील एक जीवनसत्त्व. रासायनिक सूत्र C9H17O5N. १– हायड्रॉक्सि – २, २–डायमिथिल–ब्युटिरिल–बीटा ॲलॅनीन या नावानेही हे अम्ल ओळखले जाते. त्याची रेणवीय संरचना पुढीलप्रमाणे आहे.
इतिहास : यीस्टच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या एका पदार्थाचा उल्लेख १९०१ च्या सुमारास केलेला आढळतो. हाच पदार्थ पुढे पँटोथिनिक अम्ल असल्याचे दिसून आले. आर्. आर्. विल्यम्स व आर्. ई. वॉटरमन यांना १९२८ च्या सुमारास असे आढळून आले की, ब जीवनसत्त्वातील एक घटक प्राण्यांच्या वाढीस आवश्यक असतो. तो कोरड्या उष्णतेने नष्ट होतो पण शुद्ध स्थितीत त्यांना हा घटक उपलब्ध होऊ शकत नाही. यीस्टच्या वाढीस आवश्यक असणारा पदार्थ शोधताना आर्. जे. विल्यम्स व त्यांचे सहकारी यांना १९३३ मध्ये जो पदार्थ सापडला त्याला त्यांनी पँटोथिनिक अम्ल असे नाव दिले. हे अम्ल निसर्गात सर्वत्र आढळून येते आणि ‘पँटॉस’ या ग्रीक भाषेतील ‘सर्वत्र पसरलेला’ या अर्थाच्या शब्दावरून हे नाव देण्यात आले. १९३० मध्ये कोंबडीच्या पिलामध्ये आढळणाऱ्या त्वचारोगावर गुणकारी ठरलेल्या पदार्थाचे व या अम्लाचे रासायनिक गुणधर्म सारखेच असल्याचे आढळून आले. उंदराचे केस पांढरे होण्यास ब जीवनसत्त्वांचा अभाव हे एक कारण असल्याचे काही शास्त्रज्ञांनी शोधून काढले. यकृताच्या अर्कातील एका पदार्थामुळे केस पांढरे होण्यास प्रतिबंध होतो असे ए. एफ्. मॉर्गन व त्यांचे सहकारी यांना आढळून आले. डी. डब्ल्यू. वूली, एच्.ए.वाइसमान, सी.ए. एल्वेहेजेम व टी. एच्. ज्यूक्स यांनी यकृत अर्कातील पदार्थ आणि विल्यम्स यांनी शोधून काढलेले पँटोथिनिक अम्ल प्रथम वेगळे केले व पुढील वर्षी आर्. मेजर यांच्या मदतीने त्याची रासायनिक संरचना शोधून काढली. १९४० मध्ये अमेरिका, स्वित्झर्लंड व जर्मनी या देशांतील शास्त्रज्ञांनी पँटोथिनिक अम्लाचे संश्लेषण करण्यास (कृत्रिम रीत्या तयार करण्यात) यश मिळवले.
आढळ : पँटोथिनिक अम्ल हे निसर्गात सर्व खाद्यपदार्थांत आढळते. विशेषत: यीस्ट, यकृत, अंड्यांतील पीतक (पिवळा बलक), मूत्रपिंड, गव्हाचा भुस्सा व वाटाणा यांमध्ये ते जास्त प्रमाणात आढळते. काही सूक्ष्मजंतू, बुरशी व हिरव्या वनस्पती तसेच रवंथ करणारे प्राणी आपल्या आतड्यात हे अम्ल संश्लेषित करतात. तृणधान्यांत हे अम्ल आढळते. मोड आलेल्या धान्यात ते जास्त प्रमाणात असते. खाद्यपदार्थांत आढळणाऱ्या पँटोथिनिक अम्लापैकी ८% अम्ल हे इतर पदार्थांशी संयोग पावलेल्या स्वरूपात असते. त्यांपासून ते डायाटेज या एंझाइमाने (जीवरासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थाने) पचन करून वा अम्ल वा क्षार (अल्कली) यांनी जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने घटक अलग करण्याची क्रिया) करून वेगळे करतात.
गुणधर्म : मुक्त स्वरूपातील हे अम्ल पिवळ्या रंगाचे दाट तेल असते. पाणी व एथिल ॲसिटेट यांत ते विरघळते पण बेंझीन आणि क्लोरोफॉर्म यांत विरघळत नाही. हे अम्ल अस्थिर असून उष्णतेने व pH मूल्यामधील [” पीएच मूल्य] बदलामुळे त्याचा नाश होतो. त्याचे जलीय विच्छेदन सहज होते. त्याचे कॅल्शियम संयुग स्थिर असून त्या स्वरूपात ते बाजारात मिळते. हे संयुग पांढरे, स्फटिकीय व गंधहीन असून पाण्यात विरघळते, पण अल्कोहॉलात विरघळत नाही. पँटोथिनिक अम्लात अम्लीय व क्षारकीय (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देण्याचा बेसिक) गुणधर्म आढळतात.
पँटोथिनिक अम्ल हे को-एंझाइम (एंझाइमाबरोबर आढळणारा व त्याच्या क्रियाशीलतेला आवश्यक असणारा पदार्थ) -ए चा घटक आहे. हे को-एंझाइम शरीरातील ⇨ ॲसिटिलीकरण विक्रियेत व ॲसिटिलकोलीन, स्टेरॉइड हॉर्मोने, कोलेस्टेरॉल, वसाम्ले आणि काही ॲमिनो अम्ले यांच्या निर्मितीत तसेच ट्रायकार्बॉक्सिलिक अम्ल चक्रातील ॲसिटोॲसिटेट व सायट्रेट या घटकांच्या संश्लेषणातही भाग घेते. वसा, कार्बोहायड्रेटे व इतर अनेक पदार्थांच्या चयापचयात (शरीरातील भौतिक व रासायनिक घडामोडींत) हे को-एंझाइम क्रियाशील असते. अन्नमार्गात या अम्लाचे सहज शोषण होते. घाम, मूत्र व दूध यांच्यावाटे त्याचे उत्सर्जन होते. सर्वसाधारणत: ते यकृत, मूत्रपिंड व प्लीहा (पानथरी) यांत जास्त प्रमाणात आढळते. रक्तात ते प्रत्येक मिलिलिटरमध्ये ३·७–४० मायक्रोग्रॅम इतके असते.
क्लॉस्ट्रिडियम टेटॅनी, स्ट्रेप्टोकॉकस हीमोलिटिकस, डिल्पोकॉकस न्यूमोनी इ. व पाश्चुरेला, ब्रुसेला इ. जातींच्या सूक्ष्मजंतूंच्या वाढीस हे अम्ल आवश्यक असते. एश्चेरिकिया कोलायसारखे सूक्ष्मजंतू हे अम्ल बीटा-ॲलॅनिनापासून तयार करतात.
अम्लाच्या आमापनास [⟶ आमापन, जैव] समाधानकारक अशा रासायनिक पद्धती उपलब्ध नाहीत. यीस्ट किंवा सूक्ष्मजंतू (उदा., लॅक्टोबॅसिलस ॲरॅबिनोसस) यांचाच उपयोग या अम्लाच्या सूक्ष्मजैव आमापनासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो.
विरोधके : प्राण्यांकडून या अम्लाच्या वापरात तसेच सूक्ष्मजंतूंकडून त्याच्या निर्मितीत बरेच पदार्थ अडथळे आणतात. सल्फापिरिडीन, सॅलिसिलिटे, पँटॉयिलटावरीन, पँथेनॉल, फिनिल पँटोथिनोन, w–मिथिल पँटोथिनिक अम्ल इ. संयुगे पँटोथिनिक अम्लाची विरोधके आहेत. ही संयुगे एंझाइमांच्या क्रियाशीलतेत अडथळा आणतात.
त्रुटिजन्य रोग: पशू व पक्षी यांमधील या अम्लाचे त्रुटिजन्य रोग निरनिराळ्या प्रकारांचे असतात. उंदरांच्या पिलांची वाढ खुंटते. त्यांच्या जननक्षमतेवर परिणाम होतो. गरोदरपणातील या अम्लाच्या त्रुटीमुळे उंदरांच्या निपजणाऱ्या पिलांना डोळे नसतात, केंद्रीय तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) सदोष असते आणि त्यांचे केस पांढरे होतात. कोंबडीच्या पिलाची वाढ खुंटते, भूक मंदावते, त्वचारोग होतो. यकृत वसामय (स्निग्ध पदार्थयुक्त) होते व अंडी उबविण्याची क्षमता कमी होते. घूस, डुक्कर, कुत्रा, कोल्हा इ. प्राण्यांतही या अम्लाची त्रुटी आढळून येते. ⇨ अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकाचे कार्य या अम्लावर अवलंबून असावे. कारण काही प्राण्यांच्या या ग्रंथीमध्ये त्याच्या त्रुटीमुळे झालेले परिणाम सूक्ष्मदर्शकीय तपासणीत दिसून येतात.
या अम्लाची मानवामधील त्रुटी फक्त प्रायोगिक स्वरूपाची आहे. मानवाच्या आतड्यात असणाऱ्या एश्वेरिकिया कोलाय या सूक्ष्मजंतूंकडून पुरेसे पँटोथिनिक अम्ल तयार होते. तसेच ते बऱ्याच खाद्यपदार्थांतून उपलब्ध होते. म्हणून सामान्यत: मानवात याची त्रुटी आढळत नाही. या अम्लाच्या त्रुटीमुळे केस पांढरे होण्याची क्रिया मानवात होत नाही, असे प्रयोगान्ती दिसून आले आहे. पांढरे केस काळे बनविण्यास हे अम्ल सर्वथा निरुपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. अन्नात पँटोथिनिक अम्लाची त्रुटी उत्पन्न करून ज्या विकृती आढळतात त्या या अम्लाच्या त्रुटीमुळे की त्याच्या विरोधकांच्या परिणामामुळे याबद्दल निश्चित एकमत नाही.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपानने पकडलेल्या कैद्यांमध्ये पायांची जळजळ होणारी विकृती आढळली होती. ही विकृती त्या पूर्वीही इतरत्र आढळून आल्याचे उल्लेख आहेत. १९३६–३९ च्या स्पॅनिश यादवी युद्धातही ही विकृती एम्. पॅराइटा यांना आढळून आली, पण तिचे निदान त्यांना करता आले नाही. सी. गोपालन यांनी दररोज २०–४० मिग्रॅ. इतकी कॅल्शियम पँटोथिनेटाची अंत:क्षेपणे (इंजेक्शन) दिल्यास ही विकृती बरी होते असे १९४६ मध्ये दाखवून दिले. पॅराइटा यांनी गोपालन यांचा निष्कर्ष मान्य केला. दक्षिण भारतातील गरीब रहिवाशांमध्ये आढळणारी हातापायांची जळजळ, सुया टोचल्यासारखे वाटणे, बधिरपणा येणे इ. लक्षणे या अम्लाच्या त्रुटिमुळे उद्भवत असावीत. हातापायांची जळजळ होण्यावर हे अम्ल तोंडाने किंवा अंत:क्षेपणाने देतात.
विषबाधा : प्रत्येक किग्रॅ. वजनाला उंदराला २·७ ग्रॅ. व घुशीला ३·४ ग्रॅ. पँटोथिनिक अम्ल अंत:क्षेपणाने दिल्यास ते प्राणी मरतात. ५०–२०० मिग्रॅ/किग्रॅ. वजनाला या प्रमाणात सलग सहा महिन्यांहून जास्त काळ माकडे, कुत्रा व घुशी यांना दिल्यास त्यांच्यावर विषारी परिणाम वा अवयवांत बदल होत नाही. सशाला १०–१५ मिग्रॅ. इतकी मात्रा दिली तरी रक्तदाब, श्वसन व हृदयाचे ठोके यांवर परिणाम होत नाही. शिरेतून १०० मिग्रॅ.चे अंत:क्षेपण केल्यास मानवावर दुष्परिणाम दिसून येत नाही. रिबोफ्लाविन दिल्यास पँटोथिनिक अम्ल जास्त प्रमाणात उत्सर्जित होते.
दैनंदिन गरज : मानवाच्या या अम्लाच्या दैनंदिन गरजेविषयी शास्त्रज्ञांत एकमत नाही. सर्वसामान्यत: अनुकूल परिस्थितीत सु. ६–१० मिग्रॅ. (काहींच्या मते ३–४ मिग्रॅ.) इतके पँटोथिनिक अम्ल प्रतिदिनी दिल्यास पुरते.
संदर्भ: 1. Bicknell, F. Prescott, F. The Vitamins in Medicine, London, 1953.
2. Sebrell, W. H. (Jr.) Harris, R. S. The Vitamins, Vol. IV., New York and London, 1967.
3. West, E. S. Todd, W. R. Textbook of Biochemistry, New York, 1961.
हेगिष्टे, म. द.