पर्सेल, एडवर्ड मिल्स : (३० ऑगस्ट १९१२ – ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. १९५२ सालच्या भौतिकीच्या नोबेल परितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म टेलरव्हिल ( इलिनॉय ) येथे झाला. १९३३ मध्ये परड्यू विद्यापीठाची विद्युत् अभियांत्रिकीची बी. एस्. ही पदवी मिळविल्यानंतर त्यांना एक वर्ष जर्मनीत कार्लझूए येथे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विनिमय योजनेखाली अध्ययन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठाच्या ए. एम्. ( १९३५ ) आणि पीएच्. डी. ( १९३८ ) या पदव्या संपादन केल्या. दोन वर्षे हारव्हर्ड विद्यापीठात भौतिकीचे निदेशक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर १९४१ -४५ या काळात मॅसॅचूसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रेडिएशन लॅबोरेटरीत नवीन सूक्ष्मतरंग तंत्र व नवीन कंप्रता पट्ट (संकेत प्रेषणासाठी उपयुक्त असणारा कंप्रतांचा – दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांच्या संख्यांचा—पल्ला) यांचा लष्करी कामाकरिता रडारचा विकास करण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी स्थापन झालेल्या शास्त्रज्ञांच्या गटाचे ते प्रमुख होते. १९४६ मध्ये ते हार्व्हर्ड विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक व १९४९ मध्ये प्राध्यापक झाले. त्यानंतर १९५८–६० या काळात ते विज्ञानाचे डॉनर प्राध्यापक होते व १९६० साली गेरअर्ड गेड विद्यापीठात प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली.
चुंबकीय क्षेत्रात फिरत असलेल्या आणवीय कणांच्या कंप्रतेशी ⇨ अनुस्पंदनमिळविण्यासाठी रेडिओ –कंप्रता ( ३० किलोहर्टझ –३०० मेगॅहर्ट्झ ) व सूक्ष्मतरंग ( ३०० मेगॅहर्ट्झ—३,००,००० मेगॅहर्ट्झ ) आंदोलनाचा पर्सेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपयोग केला. ही पद्धत अणुकेंद्रीय चुंबकीय अनुस्पंदन शोषण पद्धत या नावाने ओळखण्यात येते. १९४६ मध्ये पर्सेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेणामधील प्रोटॉनामुळे होणाऱ्या अणुकेंद्रीय चुंबकीय अनुस्पंदनाचा शोध लावला. त्याच सुमारास ⇨ फीलिक्स ब्लॉकव त्यांच्या सहकाऱ्यांनी स्टॅनफर्ड येथे पाण्यातील प्रोटॉनाच्या अणुकेंद्रीय चुंबकीय अनुस्पंदनाचा शोध लावला. या कार्याकरिताच पर्सेल व ब्लॉक यांना नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला. या शोधामुळे अणुकेंद्रीय परिबले [→ अणुकेंद्रीय व आणवीय परिबले ], द्रव व घन पदार्थातील रासायनिक बंध व आणवीय बंधन यांसंबंधी महत्त्वाची माहिती उपलब्ध होऊन चुंबकीय अनुस्पंदन वर्णपटविज्ञानाचे नवीन संशोधन क्षेत्र निर्माण झाले. पर्सेल यांनी यानंतर अणुकेंद्रीय चुंबकत्व स्थिरांकांचे मापन व नीच तापमानाला आढळणारे आणवीय चुंबकीय वर्तन यांसंबंधी संशोधन केले. १९५२ साली एच्. आय्. ईवेन यांच्या समवेत पर्सेल यांनी बाह्य अवकाशातून येणाऱ्या प्रारणातील ( तरंगरूपी ऊर्जेतील ) उदासीन आणवीय हायड्रो जनाच्या २१ सेंमी. तरंलांबीच्या रेषेचा शोध लावला [→ रेडिओ ज्योतिषशास्त्र ]. या शोधामुळे दीर्घिकांमधील ( तारामंडळांतील ) हायड्रोजनाच्या वितरणासंबंधी महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली व त्यामुळे रेडिओ ज्योतिषशास्त्राच्या उपयुक्ततेत नवीन भर पडली.
पर्सेल हे अमेरिकन फिजिकल सोसायटी व नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थांचे सदस्य आहेत . आयझनहौअर व केनेडी यांच्या कालखंडात अमेरिकेच्या अध्यक्षांच्या विज्ञान सल्लागार समितीचे ते सदस्य होते. त्यांचे शास्त्रीय लेख फिजिकल रिव्ह्यू या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत.
भदे, व. ग.