पर्शिंग, जॉन जोसेफ : (१३ सप्टेंबर १८६०–१५ जुलै १९४८). पहिल्या महायुद्धातील (१९१४–१८) अमेरिकी सेनाप्रमुख. मिसूरी राज्यात लक्लीड या खेडेगावी जन्म. १८८६ साली अमेरिकी सैन्यात अधिकारी. १८८६–९१ या काळात अमेरिकन इंडियनांच्या ‘घोस्ट डान्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंडाचा बीमोड करण्यात सहभागी. १८९१–९५ या काळात नेब्रॅस्का विद्यापीठात प्राध्यापक व कायद्याचा विद्यार्थी. सैनिकी पेशा सोडून वकिली करण्याची इच्छा. १८९९–१९०३, १९०७–०८ व १९०९–१३ या काळात त्याने फिलिपीन्समधील भिंदानाओ प्रांतात बंडखोर भोरो जमातीला फारसा रक्तपात न करता शांत केले. निग्रो सैनिकांबरोबर काम केल्यामुळे तसेच कडक शिस्तीचा म्हणून त्याचा ‘निग्रो’ किंवा ‘काळा जॅक’ असा उल्लेख केला जाई. १९१६-१७ साली मेक्सिकोचा क्रांतिकारक पान्चो व्हीया याच्या उठावाला आळा घालण्याची कामगिरी त्याने पार पडली. १९१७ साली मेजर जनरलचा हुद्दा त्यास मिळाला. पहिल्या महायुद्धात भाग घेतलेल्या अमेरिकी सेनांचा तो सेनापती होता. अमेरिकन सैनिक व अधिकारी युद्धकलेत अननुभवी आहेत, म्हणून अमेरिकन सेना वेगळ्या न ठेवता त्यांना दोस्तसैन्यात सामील करावे, या इतर दोस्तराष्ट्रांच्या बेताला त्याने हाणून पाडले. मे-जून १९१८ मध्ये पॅरिसपासून ८० किमी. अंतरावर जर्मन सैन्याची आगेकूच कँटीन्यी, शॅटोटीअरी व बेलोवुड येथे यशस्वी लढाया करून त्याने रोखली. सप्टेंबर-नोव्हेंबर १९१८ मध्ये अमेरिकन सैन्याने सँ मीयेल, म्यूज-ऑरगाॅन या क्षेत्रांत चढाई करून जर्मन सेनेला माघार घ्यावयास लावली आणि परिणामतः युद्धबंदीची बोलणी सुरू झाली. जर्मनीचा पुरा बीमोड होण्यापूर्वीच दोस्तराष्ट्रांनी महायुद्ध थांबविण्याची घोडचूक केली, असे पर्शिंगचे ठाम मत होते. जॉर्ज वॉशिंग्टननंतर पर्शिंगलाच जनरल ऑफ द आर्मीज हा हुद्दा देण्यात आला (१९१९). पर्शिंग हा काही कुशल सेनापती नव्हता परंतु अमेरिकन यादवी युद्धानंतर प्रथमच आधुनिक पद्धतीच्या युद्धासाठी त्याने कष्टाने व कुशलतेने सेना उभ्या केल्या तसेच पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या पडत्या काळात महत्त्वाच्या लढाया मारल्या आणि विजयश्री खेचून आणली. पॅटन, हॉजेझ यांसारख्या पुढे प्रसिद्धी पावलेल्या अधिकाऱ्यांना त्याने तयार केले. १९२१–२४ या काळात तो चीफ ऑफ स्टाफ होता. १९२४ साली तो निवृत्त झाला. वॉशिंग्टन येथे त्याचे निधन झाले. त्याची माय एक्स्पीरिअन्सेस इन द वर्ल्ड वॉर ही द्विखंडात्मक आत्मकथा प्रसिद्ध आहे. या पुस्तकाला ‘पुलिटझर प्राईज’ मिळाले होते (१९३२).
संदर्भ :Carver, Sir Michael, Field Marshel, The War Lords, Landon, 1976.
दीक्षित, हे. वि.