पर्ल हार्बर : अमेरिकेतील हवाई राज्याच्या ओआहू बेटाच्य द. किनाऱ्यावरील नैसर्गिक, भूवेष्टित बंदर. हे अमेरिकेच्या पॅसिफिक नाविक दलाचे मुख्य केंद्र असून होनोलूलूच्या वायव्येस ११ किमी. वर आहे. वाइपिओ, पर्ल सिटी द्वीपकल्प आणि फोर्ड बेट यांमुळे या बंदरास चार जलपाश लाभले असून, नौवहन क्षेत्र २६ चौ. किमी. व शंभरांवर नांगरठाणी आहेत. एकेकाळी येथे मोती शिंपले सापडत असल्याने पर्ल नदीमुखखाडीवरील या बंदराला हवाईयन ‘वाइ मोमी’(मोती पाणी) संबोधीत त्याचे ‘प्यूलोआ’ असे दुसरे नाव होते.
अमेरिकन नौदलाचा लेफ्टनंट चार्ल्स विल्क्सने १८४० मध्ये प्रथम या भागाचे भूपृष्ठीय सर्वेक्षण केले. अमेरिकेला १८८७ मध्ये हवाईयन राजांकडून एका करारान्वये कोळसा भरण्यासाठी व सर्वसाधारण दुरुस्त्या करण्याचे ठिकाण म्हणून, या बंदराचा विशेष वापर करण्याचे अधिकार मिळाले. १८९८ नंतर उद्भवलेल्या स्पॅनिश-अमेरिकन युद्धामुळे पॅसिफिकमधील तळ म्हणून पर्ल हार्बरचे महत्त्व लक्षात येऊन, त्याचा विकास करण्यात आला. १९०८ नंतर तेथे नाविक तळ व १९१९ मध्ये सुकी गोदी उभारण्यात आली. १९४० पासून या तळावर सु. १०० जहाजे, नौदल व वायुदल यांमधील बरेच सैन्य, युद्धसंचमांडणी व सामग्री ठेवण्यात आली होती.
जपानी बाँबफेक्या विमानांनी ७ डिसेंबर १९४१ रोजी पर्ल हार्बरवर सकाळी ७·५५ वाजता अनपेक्षित व अचानक हल्ला चढविला. दुसरा हल्ला एक तासाने सुरू झाला. व्हाइस ॲडमिरल चुइची नागुमो याने ३३ जपानी विमानवाहू युद्धनौकांनिशी या हल्ल्याचे नेतृत्व होते व या काफिल्यात ३५३ विमाने होती. पॅसिफिक तळाचे अमेरिकी नेतृत्व ॲडमिरल हझबंड एडवर्ड किमेल व हवाईमधील भूदलाचे नेतृत्व ले. जनरल वॉल्टर कॅम्बेल शॉर्ट यांच्याकडे होते. या हल्ल्यामुळे अमेरिकेची १८ जहाजे व १७४ विमाने नष्ट झाली, तर ३,५८१ माणसे मृत्यू पावली. ‘ॲरिझोना’, ‘कॅलिफोर्निया’, ‘वेस्ट व्हर्जिनिया’ व ‘ओक्लाहोमा’ ह्या चार प्रचंड युद्धनौका बुडविण्यात आल्या. ॲरिझोना युद्धनौका तीवरील १,१०२ खलाशांसह बुडाली. जपानचे नुकसान ६ पाणबुड्या, २९ विमाने व १०० माणसे एवढे झाले. किमेल, शॉर्ट व हल्ल्याच्या वेळी सबंध नाविक हालचालींवर देखरेख करणारा ॲडमिरल हॅरल्ड स्टार्क यांच्यावर कडक टीका करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी पर्ल हार्बरवरील हल्ल्याची चौकशी करण्यासाठी १६ डिसेंबर १९४१ रोजी एक आयोगही नेमला. सर्वसाधारणतः पर्ल हार्बरचे नेतृत्व करणाऱ्यांवरील दोषारोपांची तीव्रता कमी करण्यात आली.
पर्ल हार्बर येथे जहाजबांधणी कारखाना, पुरवठाकेंद्र व पाणबुडीतळ आहे. ॲरिझोना या बुडालेल्या युद्धनौकेचा सांगाडा पांढरे काँक्रीट व पोलाद यांनी मढविण्यात आला असून, हे जहाज राष्ट्रीय स्मारक म्हणून ३० मे १९६२ रोजी घोषित करण्यात आले.
गद्रे, वि. रा.
“