पर्थ : ऑस्ट्रेलियाच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया राज्याची राजधानी. लोकसंख्या ९७,२४२ (१९७१), महानगरीय ८,०५,७०० (१९७६). हे राज्याच्या नैऋत्य भागात स्वान नदीच्या उजव्या तीरावर नदीमुखापासून १९ किमी. अंतर्भागात असून, फ्रीमँटल हे त्याचे बंदर आहे. या भागात कॅ. जेम्स स्टर्लिंग १८२७ मध्ये वसाहतीसाठी आला. पुढच्याच वर्षी कॅ. सर चार्ल्स फ्रीमँटल हा या सर्व प्रदेशाची व्यवस्था पाहू लागला. १२ ऑगस्ट १८२९ रोजी पर्थची अधिकृत रीत्या स्थापना करण्यात आली. तत्कालीन ब्रिटिश वसाहत व संरक्षणमंत्री सर जॉर्ज मरी याच्या स्कॉटलंडमधील पर्थशर ह्या जन्मग्रामावरून हे नाव पडले. कूलगार्डी–कॅलगुर्ली (पूर्वेकडे ६०२ किमी.) भागात लागलेला सोन्याच्या खाणींचा शोध (१८९०), सुधारित फ्रीमँटल बंदराच्या वापरास प्रारंभ (१९०१) आणि खंडपार लोहमार्गाचे पूर्ण झालेले काम (१९१७) या तीन घटना म्हणजे पर्थच्या विकासाचे तीन ठळक टप्पे होत.
पर्थचे हवामान भूमध्यसागरी असून हिवाळी पाऊस पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ८७·७ सेंमी. कमाल व किमान तपमान अनुक्रमे २३.२° से. व १३.१° से असून प्रतिदिनी सरासरी सात तास तरी सूर्यदर्शन होते. पर्थ हे मोठे औद्योगिक केंद्र असून अवजड उद्योगांचे केंद्रीकरण प्रमुख्याने क्विनाना, फ्रीमँटल आणि वेल्शपूल या उपनगरी भागांत झाले आहे. विविधांगी निर्मितिउद्योगांमध्ये रंग,प्लॅस्टर, छपाईसाहित्य, धातुपत्रे, सिमेंट, रबर, पोलाद, ॲल्युमिनियम, निकेल, तेलशुद्धीकरण, अन्नप्रक्रिया इत्यादींचा समावेश होतो. जल, हवाई, खुष्की अशा सर्व मार्गांनी पर्थ विविध महानगरांना जोडलेले असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहरातील ‘सेंट जॉर्जेस टेरस’ हा भाग वित्तीय व व्यवसायविषयक घडामोडींचे मुख्य केंद्र समजला जातो.
म्यूझीयम, कलावीथी, कलादालने, ८,००० श्रोत्यांचे मनोरंजनालय, अनेक क्रीडामैदाने, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमैदान व अश्वशर्यतींचे मैदान, वनस्पतिउद्यानविभूषित असे ४०० हेक्टरी ‘किंग्ज पार्क’ हे नैसर्गिक उद्यान, लक्षावधी डॉलर खर्च करून बांधण्यात येत असलेले कलाकेंद्र इत्यादींसाठी पर्थ प्रसिद्ध आहे.
गद्रे, वि. रा.
“