पर्णवलन : (लॅ. टायक्सिस). वनस्पतींच्या खोडावर आढळणाऱ्या साध्या व प्रजोत्पादक कळ्यांमध्ये (कोरक, कलिका) सूक्ष्म आकारमानाची पाने (किंवा पुष्पदले) तेथील मर्यादित जागेत दाटीवाटीने पण विशिष्ट पद्धतीने मांडलेली असतात (कोरक–रचना, कलिका–रचना). यामध्ये पानांच्या (किंवा पुष्पदलांच्या) वैयक्तिक मांडणीस (उदा., घडी पडणे, गुंडाळणे) ‘पर्णवलन’ (दलवलन) म्हणतात आणि अनेक पानांच्या (किंवा पुष्पदलांच्या) परस्परसापेक्ष मांडणीस ‘पर्णसंबंध’ [→पुष्पदलसंबंध] म्हणतात. पर्णवलनाचे अनेक प्रकार असून पुढे दिलेले काही सामान्यपणे आढळतात. यांमध्ये पानाला एक किंवा अनेक घड्या पडलेल्या असतात किंवा ते अनेक प्रकारे गुंडाळलेले असते त्यासंबंधी वापरलेल्या संज्ञा व त्यांचे स्पष्टीकरण पुढे दिले आहे (हे प्रकार पुढे दिलेल्या क्रमानुसारच आकृतीत दर्शविले आहेत). (१) अववलित : पात्याचा वरचा अर्ध खालच्या अर्धावर वाकलेला असतो (उदा.,लोक्काट). (२) संमीलित : पात्याच्या मध्यशिरेवर घडी पडलेली असते (उदा.,पेरू). (३) चूणित : पात्याला अनेक उभ्या घड्या पडलेल्या असतात (उदा., ताड). (४) वलिवंत : अनेक अनियमित घड्या पडून पाते चुरमडलेले असते (उदा.,कोबी). (५) संवलित : सुरळीप्रमाणे पाते उभे गुंडाळलेले असते (उदा., केळ, कर्दळ). (६) अवसंवलित : पाते टोकापासून तळापर्यंत गुंडाळलेले असते (उदा., नेचे). (७) अंतर्वलित : पात्याच्या दोन्ही धारा मध्यशिरेकडे स्वतंत्रपणे वरच्या बाजूस गुंडाळलेल्या असतात (उदा., कमळ). (८) बहिर्वलित : पाते वरीलप्रमाणे परंतु खालच्या बाजूस गुंडाळलेले असते (उदा., कण्हेर).
वर दिलेले भिन्न प्रकार वनस्पतींच्या जातींचे, क्वचित वंशाचे किंवा कुलांचे वैशिष्ट्य असू शकतात त्यामुळे त्यांच्या वर्गीकरणात या लक्षणाचा उपयोग होतो.
परांडेकर, शं. आ.
“