पर्णकृमि : (पर्णाभकृमी, फ्ल्यूक). या चपट्या कृमींचा समावेश प्लॅटिहेल्मिंथिस संघाच्या ⇨ट्रिमॅटोडा वर्गात करतात. त्यांच्या ४०,००० पेक्षा अधिक जाती आहेत. त्यांचे शरीर मऊ, अखंडित (भाग न पडलेले), द्विपार्श्व सममित (दोन समान भाग होणारी शरीराची मांडणी), पानासारखे चपटे, पण काहींचे दंडगोलाकारही असू शकते. त्यांची लांबी १ मिमी. ते अनेक सेंमी. पर्यंत असते. त्या मानव व इतर पृष्ठवंशींमध्ये (पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांमध्ये) आणि काही अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या) असतात. बऱ्याच वेळा त्या ज्या प्राण्याच्या शरीरात असतात, त्याच्या शरीरास इजा करतात किंवा त्याच्या मृत्यूस कारणीभूत होतात.
दहा भिन्न कुलांतील ३६ पेक्षा जास्त जाती मानवात परजीवी असल्याचे नमूद केले गेले आहे. पुढील जाती मानवामध्ये अंतःपरजीवी (त्याच्या शरीरामध्ये वाढणाऱ्या) आहेत : शिस्टोसोमा अँपॉनिकम, शि. मॅनसोनाय व शि. हिमॅटोबियम रक्तामध्ये फॅसिओलॉप्सिस बस्काय आणि हेटेरोफाइज आतड्यात ऑपिस्थॉर्किस सायनेन्सिस व फॅसिओला हेपॅटिका यकृतात आणि पॅरॅगोनिमिस वेस्टरमनाय फुप्फुसात आढळतात.
पहा : खंडितकायी-कृमिरोग ट्रिमॅटोडा पट्टकृमी यकृत.
जमदाडे, ज. वि.