पर्जन्यछाया प्रदेश : पर्वताच्या वातविमुख बाजूस वृष्टीचे प्रमाण ठळकपणे कमी आढळते. अशा प्रदेशास पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात. प्रतिरोध प्रकारच्या वृष्टिमध्येच ही गोष्ट आढळून येते. त्यात उंचसखल भूपृष्ठरचना हेच वृष्टीचे प्रमुख कारण असते. उबदार सागराकडून वारे भूपृष्ठाकडे वाहू लागतात, तेव्हा ते बाष्पभारित असतात. अशी हवा पर्वताच्या पायथ्याशी साचते व भूपृष्ठरचनेनुसार पर्वताच्या वाताभिमुख बाजूस वर चढू लागते, तेव्हा उंचीनुसार तिचे तपमान कमी होत जाते व सांद्रीभवनात वाढ होते. यामुळे वाताभिमुख बाजूस भरपूर वृष्टी होऊन हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते. नंतर ही हवा मागील वाऱ्याच्या रेट्यामुळे वातविमुख बाजूकडे उतरते. पण अशा वेळी ती वातावरणाच्या विरळ थरातून दाट थरात ढकलली गेल्यामुळे तिचे तपमान वाढते. ही स्थिती वृष्टीला प्रतिकूल असल्याने वातविमुख बाजूस वृष्टी अतिशय कमी आढळते. वर्षभर बाष्पयुक्त वाऱ्यांची वाहण्याची दिशा एकच असल्यास पर्जन्यछायेचा प्रदेश ठळकपणे दृष्टोत्पत्तीस येतो. महाराष्ट्रात अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव मोठा आहे. या वाऱ्यांच्या मार्गात सह्याद्री आडवा येतो. त्याचा परिणाम वर्षभरात कोकणातील महाड : ३१९ सेंमी., घाटमाथ्यावर महाबळेश्वर : ६२३ सेंमी., त्यानंतर वातविमुख बाजूकडील थोडे पूर्वेस पाचगणी : १८७ सेंमी., वाई : ७१ सेंमी. आणि फलटण : ४७ सेंमी. याप्रमाणे पावसाचे मान एकदम उतरलेले आढळते. बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात पर्वत आल्याने विरुद्ध बाजूला पडलेली पावसाची उणीव म्हणजेच पर्जन्यछाया होय. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पूर्वेस विशिष्ट अंतरावर असा उत्तर-दक्षिण पर्जन्यछायेचा प्रदेश निश्चित आढळतो. एखाद्या पर्वताच्या दोन्ही बाजूंस जर भिन्न ऋतूंमध्ये बाष्पयुक्त वाऱ्यांच्या वाहण्याच्या दिशांची उलटापालट होत असेल, तर पर्जन्यछायेच्या परिणामांची वजावट होते.
पहा : पर्जन्य
आठल्ये, द. बा.
“