परिस्थिति-अनुकूलन: (अक्लायमटायझेशन). भोवतालची परिस्थिती हळूहळू बदलली, तर तीनुसार वनस्पती व प्राणी आपल्या जीवनक्रमात, जीवनक्रियांत व शरीररचनेत आवश्यक ते बदल घडवितात आणि बदलत्या परिस्थितीशी आपले सर्व व्यवहार जुळवून घेतात, या क्रियेला ‘परिस्थिति-अनुकूलन’ अशी संज्ञा आहे. पृथ्वीच्या पाठीवर विविध प्रकारच्या वनस्पती व प्राणी आढळतात. या वनस्पती व प्राणी आपल्या मूळ निवासस्थानापासून इतरत्र दूरवर पसरलेले आढळतात परंतु या नवीन प्रदेशातही हे सहजपणे राहतात. परिस्थिति-अनुकूलनामुळेच त्यांचे सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू असतात. अनेक वेळा अशा प्रकारचे परिस्थिति-अनुकूलन मानवी प्रयत्नामुळे होते. ज्या वेळी मानवी प्रयत्नांशिवाय हे शक्य होते त्या वेळी या क्रियेला स्वाभाविकीकरण किंवा⇨देशीयभवन असे म्हणतात.
आपल्या अंगी असणाऱ्या परिस्थिति-अनुकूलनाच्या पात्रतेमुळेच मानव या पृथ्वीवरील जंगलात, वाळवंटात व बर्फाळ प्रदेशात यशस्वीपणे जगतो. भोवतालच्या परिस्थितीत जर आकस्मिकपणे मोठा बदल घडला, तर मानवाला तो धोकादायक ठरतो परंतु हाच बदल जर सावकाश होत गेला, तर या बदलत्या परिस्थिप्रमाणे त्याच्या शरीरक्रियांत आवश्यक ते फेरफार होऊन मानव प्राप्त परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. उदा., समुद्राकाठी राहणाऱ्या व्यक्तीला एकदम उंच पर्वतशिखरावर राहण्यास भाग पाडले, तर त्या व्यक्तीला डोके-दुखी, मानसिक अस्वस्थता, श्वासोच्छावासाला त्रास होणे, उलटीची भावना होणे, फुप्फुसांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा न होणे इ. त्रास होईल. परंतु या व्यक्तीला क्रमाक्रमाने उंच जागी राहण्याची सवय केली, तर काही काळानंतर उंच पर्वतशिखरावर ही व्यक्ती सहजपणे राहू शकेल. कारण बदलत्या परिस्थितीनुरूप हळूहळू या व्यक्तीच्या शरीरात आवश्यक ते बदल घडून येतात हे होय. केव्हा केव्हा स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून स्वतःच्या शरीरक्रियेत विशेष बदल न करताही मानव जीवन जगण्यास यशस्वी ठरला आहे. उदा., अती थंड हवामानात घरात शेकोटी पेटवून किंवा अती उष्ण हवामानात पंखे, बर्फ, शीतपेटी यांचा उपयोग करून मानव समाधानाने जगू शकतो.
मानवाप्रमाणेच माणसाळविलेले प्राणी आणि धान्ये (पिके) यांनीही यशस्वीपणे परिस्थिति-अनुकूलन केल्याचे आढळते. पश्चिम आशियात आढळणाऱ्या एक प्रकारच्या गवतापासून गहू, राय, बार्ली व ओट यांची निर्मिती झाली आहे. आता या धान्याची लागवड उष्ण आणि समशीतोष्ण भागांतही केली जाते. विशेषतः गव्हाचे पीक निरनिराळ्या तऱ्हेचे हवामान असणाऱ्या अनेक देशांत काढले जाते व अनेक प्रयोग करून विपुल पीक देणाऱ्या त्याच्या विविध संकरित जातीही तयार केल्या आहेत.
कोंबडा हा मूळचा जंगली पक्षी आहे परंतु मानवाने निरनिराळ्या प्रयोगांनी कोंबड्याच्या अनेक संकरित जाती निर्माण करून त्याची जगातील सर्व भागांत पैदास केली आहे. मेंढ्या, गुरे व घोडे यांच्याबाबतीतही असेच म्हणता येईल. आपल्या मालकाबरोबर राहून व त्याने प्रयोग करून निर्माण केलेल्या संकरित जातींच्या रूपाने शेकडो वर्षानंतर बदलत्या परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्याची पात्रता या माणसाळविलेल्या प्राण्यांत आली आहे.
ब्रिटनमधील अनेक झाडांसंबंधी असेच विधान करता येईल. झाडांची उपयुक्तता, सौंदर्य इ. गुण लक्षात घेऊन काही परदेशीय झाडांची तेथे पद्धतशीर लागवड केल्याचे आढळते. उदा.,चिली देशातील ॲरॉकॅरिया, उ. अमेरिकेतील काटेरी बाभूळ, इटली आणि ग्रीसमधील चेस्टनट इ. परंतु उत्तर यूरोपातील स्प्रूस, मध्य यूरोपातील सिल्व्हर फर, लार्च इ. झाडे ब्रिटनमध्ये परिस्थिति-अनुकूलन करू न शकल्याने तेथे त्यांची लागवड होऊ शकली नाही. वरील उदाहरणांशिवाय आपणास पृथ्वीच्या एका भागातून दुसऱ्या अत्यंत दूर असणाऱ्या भागातही अनेक झाडांची लागवड केल्याचे आढळते. याचे कारण परिस्थिती-अनुकूलन हेच आहे. मेक्सिकोमध्ये आढळणारी काटेरी निवडुंगाची काही झाडे सहजपणे ऑस्ट्रेलियात लावली गेली. या झाडांचे काही वर्षांत तेथे इतके मोठे रान माजले की, मेंढ्यांच्या गवतासाठी राखलेली शेकडो चौ. किमी. कुरणे त्यांनी व्यापून टाकली. तसेच कॅनडामधील पाण्यात आढळणाऱ्या एलोडिया या वनस्पतीची ब्रिटन आणि न्यूझीलंड येथे आयात केल्यावर काही वर्षांतच तिची बेसुमार वाढ होऊन तिने तळी, डबकी, नद्या व्यापून टाकली.
यशस्वीपणे परिस्थिति-अनुकूलन केलेल्या प्राण्यांची अनेक उदाहरणे सांगता येतील. अकराव्या शतकात आयबेरियन द्वीपकल्पामधून काही ससे ब्रिटनमध्ये आणल्यावर ते तेथे उत्तम तऱ्हेने स्थायिक झाले. यांपैकी काही ससे एकोणीसाव्या शतकात ऑस्ट्रेलियात नेण्यात येऊन त्यांची फर व मांस यांच्यासाठी पैदास करण्यात आली. न्यू-साउथ वेल्समधूनही काही ससे याच सुमारास न्यूझीलंडमध्ये नेण्यात आले. या दोन्ही नव्या प्रदेशांत सशांची इतकी बेसुमार वाढ झाली की, ते शेतीला उपद्रव देऊ लागले. त्रिनिदाद येथे उंदीर व ससे यांचा नायनाट करण्यासाठी मुंगसे नेण्यात आली. मुंगसांची तेथे बेसुमार वाढ होऊन त्यांनी उंदीर, ससे यांजबरोबर तेथील सरड्यांचाही फडशा पाडण्यास सुरुवात केली. वास्तविक सरडा हा एक उपयोगी प्राणी आहे. कारण उसावरील नाकतोड्यांचा संहार करून तो उसाची हानी टाळतो. मुंगसांनी सरड्यांची संख्या कमी केल्यामुळे नाकतोड्यांची संख्या वाढून उसाच्या पिकाचे खूप नुकसान होऊ लागले. पिकावरील उपद्रवी कीटकांचा नाश करण्यासाठी यूरोपमधून उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे चिमण्या नेल्या. या पक्ष्यांचीच तेथे अनिर्बंध वाढ होऊन त्यांनी धान्य, पिके व फळे यांनाही उपद्रव करण्यास सुरुवात केली. न्यूझीलंडमध्ये ब्रिटनहून नेलेल्या ट्राउट जातीच्या माशांनी नवीन भागात परिस्थिति-अनुकूलन केल्याचेही आढळते.
उपद्रवी वनस्पती किंवा प्राणी यांचा इतर वनस्पती किंवा प्राणी यांच्या साहाय्यनेही संहार करण्याची एक पद्धत आहे. या पद्धतीला जैव नियंत्रण असे म्हणतात परंतु अशा प्रकारे संहारासाठी किंवा नाशासाठी आणलेल्या वनस्पती किंवा प्राणी हे नवीन जागेत परिस्थिती अनुकुलनाने स्थायिक झाल्याचे आढळते. ऑस्ट्रेलियात काटेरी निवडुंग विपुल प्रमाणात होता. त्याच्या नाशासाठी अमेरिकेतून आणलेले पतंग, पानावरील किडे, कोचिनियल किडे, रेड स्पायडर (लाल कोळी) इ. प्राणी तेथे स्थायिक झाले. कॅलिफोर्नियातील शल्क-कीटकांच्या (खवले किड्यांच्या) नाशासाठी पूर्व आशियातून आणलेले चित्रांग भुंगेरे आणि क्वीन्सलँड व प्वेर्त रीको येथील भुंगेऱ्यांच्या नाशासाठी हवाई बेटातून व बार्बेडोस बेटे येथून आणलेले भेक यांचीही उदाहरणे देता येतील.
भोवतालच्या परिस्थितीतील तापमान वाढत असेल किंवा कमी होत असेल, तर हे बदलते तापमान ठराविक प्रमाणात काही काळ अनुभवल्यानंतर सहन करण्याची शक्ती प्राण्यात येऊ शकते. उष्ण हवामान असणाऱ्या प्रदेशात राहणाऱ्या प्राण्याला एकदम थंड प्रदेशात राहावयास नेले, तर त्याला भोवतालच्या वातावरणाप्रमाणे शरीरक्रिया जुळूवून घेण्यास काही वेळ लागतो. ट्राउट जातीचे मासे ओढ्यातील पाण्यात राहतात. पाण्याचे तापमान उन्हाळ्यात १२ से. असते परंतु हिवाळ्यात पाण्याचे तापमान ८ से. होते. परंतु तापनातील हा बदल हळूहळू होत असल्याने माशांना थंड पाण्यात राहण्याची सवय होते. काही जातीच्या माशांना नेहमीच्या कमाल तापमानापेक्षाही जास्त तापमान असणाऱ्या पाण्यात राहण्याची थोड्याच दिवसांत सवय होते. कारण त्यांच्या शरीरात उष्णतारोधी शक्ती निर्माण होते. अनेक अनियततापी (ज्यांच्या शरीराचे तापमान पर्यावरणाच्या तापमानाप्रमाणे कमीजास्त होते असे) प्राणी परिस्थितीतील तापमान सरासरीपेक्षा जास्त झाले किंवा कमी झाले, तरी ते सहन करू शकतात. उष्ण कटिबंधात आढळणाऱ्या अनेक वनस्पती थंड प्रदेशात जिवंत राहू शकत नाहीत असे आढळते. फक्त काही वनस्पती अशा वेळी आपल्या ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांमध्ये) साखर किंवा मीठ यांचा साठा करून गोठणक्रियेला विरोध करून जगू शकतात.
ध्रुव प्रदेशात कुत्री, अस्वले, सील इ. प्राणी आढळतात. या प्राण्यांच्या कातडीवर बारीक उबदार लव असते व कातडीखाली चरबीचा जाड थर असतो. लव दोन प्रकारची असते . कातडीला लागून आखूड पण दाट लव असते व याशिवाय दुसऱ्या प्रकारची लांब लव असते. शरीराच्या आकारमानाप्रमाणे लवेचा दाटपणा बदलतो. लहान आकारमानाच्या प्राण्याच्या कातडीवरील लव आखूड व विरळ असते. यामुळे या प्राण्यांना सहजपणे हालचाल करता येते. मोठ्या आकारमानाच्या प्राण्यांच्या कातडीवरील लांब व दाट लव असते. शरारातील उष्णता कायम राखण्यासाठी हे लहान आकारमानाचे प्राणी एकत्रितपणे फिरतात किंवा उबदार बिळांत राहतात. ध्रुव प्रदेशात राहणारे लहान आकारमानाचे सस्तन प्राणी आजूबाजूच्या वातावरणातील तापमान –२९ से. कमी होईपर्यंत आपल्या शरीरात जास्त उष्णता निर्माण करीत नाहीत. एस्किमो कुत्रे व कोल्हे वातावरणातील तापमान –४० से. इतके कमी असतानाही उघड्यावर झोपू शकतात. याला कारण कातडीवरील लव व कातडीखालील चरबीचा थर या योगाने त्यांनी केलेले परिस्थिति-अनुकूलन हेच होय. सील, वॉलरस, देवमासा इ. थंड पाण्यात आढळणाऱ्या प्राण्यांच्या कातडीखालील चरबीचा दाट थर असतो आणि सील व वॉलरस यांच्या अंगावर मऊ उबदार लव असते. यामुळे हे प्राणी थंड पाण्यात परिस्थिति-अनुकूलन करून राहू शकतात परंतु हे आवश्यक बदलही त्यांच्या शरीरात शेकडो वर्षानंतर झाले आहेत. अनियततापी प्राण्यांमध्ये बदलत्या तापमानाप्रमाणे परिस्थिति-अनुकूलन करण्याची क्रिया ही त्या प्राण्याच्या शरीराचे तापमान व भोवतालच्या पर्यावरणाचे तापमान यांतील चढ-उताराच्या प्रमाणावर बदलण्याची पात्रता यावर अवलंबून असते. याउलट नियततापी पक्षी व सस्तन प्राणी हे कोणत्याही परिस्थितीत आपल्या शरीराचे तापमान कायम ठेवू शकतात.
समुद्रातील किंवा गोड्या पाण्यातील प्राणी हे सुद्धा परिस्थिति-अनुकूलन करू शकतात. समुद्रात राहणारे प्राणी जर एकदम गोड्या पाण्यात ठेवले किंवा गोड्या पाण्यातील प्राणी समुद्राच्या पाण्यात ठेवले, तर ते ताबडतोब मरतात परंतु ईल व सामन मासे याला अपवाद आहेत. हे मासे समुद्रातून नद्यांच्या प्रवाहात शिरतात व तेथे काही दिवस राहून पुन्हा समुद्रात परततात. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. समुद्रातील प्राणी गोड्या पाण्यात ठेवला, तर भोवतालचे गोडे पाणी त्याच्या शरीरात शिरून शरीरातील द्रवाचे गुणधर्म बदलतात. तसेच गोड्या पाण्यातील प्राणी समुद्राच्या खाऱ्या पाण्यात ठेवला, तर त्याच्या शरीरातील लवणे भोवतालच्या पाण्यात मिसळतात. या क्रियांना ⇨तर्षण म्हणतात परंतु वरील दोन्ही प्रकारच्या प्राण्यांना जर काही दिवस थोड्या प्रमाणात गोड्या अगर खाऱ्या पाण्यात राहण्याची सवय केली, तर काही दिवसांनी परिस्थिति- अनुकूलन करू शकतात. विषारी पदार्थांच्या नजीक राहू लागल्याने प्राण्यामध्ये एक प्रकारची प्रतिकार शक्ती निर्माण होऊन विषारी वातावरणात ते विनासायास राहू शकतात उदा., सूक्ष्मजंतू व प्रोटोझोआ. उंदीर व ससे कार्बन मोनॉक्साइड सारखा विषारी वायू असणाऱ्या भू-प्रदेशातही राहू शकतात. तसेच दरदरोज थोड्या थोड्या प्रमाणात विषारी पदार्थाचे सेवन करून काही दिवसांनंतर विषारी पदार्थांचे कितीही भक्षण केले, तरी शरीरावर कोणताही वाईट परिणाम न होऊ देणारी माणसे जगात आढळतात. सर्पाचे विष रोज थोडे थोडे शरीरात टोचून काही दिवसांनंतर सर्प दंशाची बिलकूल बाधा न होऊ देणारे गारुडी सर्वांना परिचित आहेत. हे एक प्रकारचे रासायनिक परिस्थिति-अनुकूल आहे.
अशा प्रकारे परिस्थिती बदलली, तर तिच्याशी आपले सर्व व्यवहार मिळते जुळते करून घेण्याची अनुकूलनक्षमता वनस्पती व प्राण्यांमध्ये असते. सवयीने हळूहळू सर्व बदल शरीररचनेत किंवा शरीरक्रियेमध्ये होतात. अशा प्रकारे बदल घडवून आणणारे प्राणी व वनस्पती परिस्थिति-अनुकूलन करून जिवंत राहतात तर इतर मरतात परंतु हे सर्व बदल आनुवांशिक असतात असे नाही. वनस्पती व प्राणी हे नवीन बदलत्या परिस्थितीशी कशा प्रकाराने जुळवून घेतात यावर परिस्थिति-अनुकूलन अवलंबून असते. दररोज व निरानिराळ्या ऋतूंतील बदलते तापमान, प्रकाश मिळण्याचा दीर्घ किंवा थोडा काळ व अंधाराचा काळ यांवर बियांचे रुजणे, रोपट्यांची वाढ इ. क्रिया अवलंबून असतात. प्राण्यांच्या बाबतीत यांशिवाय अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींची गरज असते. अनेक वेळा परिस्थितीत घडणाऱ्या आकस्मिक व महत्त्वपूर्ण प्रभावी बदलामुळे प्राण्यांना परिस्थिति-अनुकूलन होऊ शकत नाही परंतु हे बदल जर सावकाश होत गेले, तर टप्प्याटप्प्याने प्राणी किंवा वनस्पती बदलत्या परिस्थितीनुरूप आपले जीवनक्रम बदलून व रचनेत आवश्यक ते बदल घडवून आणतात. समुद्रसपाटीवर राहणारा मानव सवयीने काही काळानंतर पर्वत शिखरावर राहू शकतो. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवर वाढणाऱ्या कॉफीच्या झाडांची टप्प्याटप्प्याने उंच जागी लागवड केल्यास अती उंच पर्वतावरही त्यांची यशस्वीपणे लागवड करता येते. याचे कारण म्हणजे या झाडामध्ये असणारी परिवर्तनशीलता हे आहे. यामुळेच उंच पर्वतावर ही झाडे स्थायिक होऊ शकतात. यूरोपात उगवणा ऱ्या अल्फाल्फा (ल्यूसर्न) जातीच्या गवताचे बी अमेरिकेतील मिनेसोटा राज्यात लावण्यात आले. थंडीच्या पहिल्या मोसमातच त्यातील बरीच रोपटी मेली. जी वाचली त्यांपैकी काही थंडीच्या दुसऱ्या मोसमात मेली. अनेक थंडीच्या मोसमानंतर जी रोपटी थोडीफार वाचली त्यांच्यात थंडी प्रतिबंधक शक्ती निर्माण झाली. या नवीन गुणधर्म असलेल्या अल्फाल्फाची लागवड उत्तर अमेरिकेतील अती थंड भागातही आता सहज करता येऊ लागली आहे. अशा प्रकारे परिस्थिति-अनुकुलनासाठी आवश्यक ते गुणधर्म आनुवंशिक असावे लागतात व त्यामुळे पुढील पिढीत हे गुण उतरून बदलत्या परिस्थितीत हे विशिष्ट गुण असणारे प्राणी अथवा वनस्पतीच यशस्वीपणे जीवन जगतात.
पहा: अनुकूलन परिस्थितिविज्ञान.
संदर्भ: 1. Mathew, W. D. Climate and Evolution, New York, 1939.
2. Rogers, E. S. Human Ecology and Health, New York, 1960.
रानडे, द. र.
“