पराया : (करवती, खरोटा, पोई हिं. सिहौरा क. मित्तलगिड सं. शाखोटक लॅ. स्ट्रेब्लस अँस्पर कुल-मोरेसी).
हा सु. ७·५० – १०·५० मी. उंच व एक मी. घेर असलेला लहान सदापर्णी वृक्ष भारतातील सर्व जंगलांत सामान्यपणे आढळतो शिवाय तो श्रीलंका, मलेशिया, थायलंड व व्हिएटनाम येथेही सापडतो. साल मऊ आणि करडी असून सर्वच भागांवर राठ केस असतात. पाने साधी, २·५ – १० X २·५ – ५ सेंमी., लंबवर्तुळाकृती अगर अंडाकृती , साधारण दातेरी व खरबरीत असतात. पुं. -पुष्पबंध (फुलोरा) कक्षास्थ (बगलेत) गोलाकार गुच्छ असून कक्षास्थ स्त्री-पुष्पबंधावर १-२ फुले असतात.
फुले जानेवारी ते मार्चमध्ये येतात पुं-पुष्पे व स्त्री-पुष्पे वेगवेगळ्या झाडांवर असतात. अश्मगर्भी (आठळी फळ) वाटाण्याएवढे, पिवळे, एकबीजी व पिवळट परिदलांनी वेढलेले असते. इतर सामान्य लक्षणे ⇨ मोरेसी कुलात (वट कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. या वृक्षाचे लाकूड कठीण असून गाड्यांची चाके व जू यांकरिता विशेषेकरून वापरतात. खरबरीत पाने, लाकूड, हस्तिदंत, शिंगाच्या वस्तू इत्यादींना झिलई करण्यास वापरतात. फळे खाद्य आहेत. या वृक्षाची साल कडू व तीव्र विषारी असते तिचा काढा ज्वर, आमांश व अतिसार यांमध्ये देतात. मुळाचा लेप व्रणावर लावतात. चीक जंतुनाशक व स्तंभक (आकुंचन करणारा) असून दूध नासविण्यास उपयुक्त असतो हातापायाच्या भेगांवर तो लावतात. थायलंडमध्ये साल कागद बनविण्यास व लहान फांद्या दंतधावनाकरिता उपयोगात आहेत. गुरांना पाला खाऊ घालतात.
ज्ञानसागर, वि. रा.
“