परशुराम : विष्णूच्या अवतारांपैकी एक अवतार (वायुपुराण ९५·८८ मत्स्यपुराण ४७·२२४) व एक वैदिक ऋषी. हनुमान इ. सात चिरंजीवांपैकी एक. भृगुकुलातील जमदग्नी ऋणी हा त्याचा पिता व इक्ष्वाकू वंशीय राजाची कन्या रेणुका ही त्याची माता. भृगुकुलोत्पन्न म्हणून भार्गवराम, असेही त्याचे नाव रूढ आहे. हा विष्णूचा अवतार व शिवाचा भक्त होता. परशुराम हा विष्णूचा अवतार असल्याच्या कथा विविध पुराणांत आढळत असल्या, तरी इतर अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण मात्र नाही. कार्तवीर्य अर्जुन (हैहय वा सहस्त्रार्जुन अशीही याची नावे) याने आपव वसिष्ठ नावाच्या ऋषीचा अपमान केल्यामुळे त्याने कार्तवीर्याला शाप दिला, की ‘तुला व उन्मत्त क्षत्रियांना मारण्यासाठी विष्णू अवतार घेईल’ अशी कथा हरिवंशात (अध्याय ४०) आढळते. नर्मदेच्या तीरावर जमदग्नींचा आश्रम होता. तेथे वैशाख शुद्ध तृतीयेच्या दिवशी परशुरामाचा जन्म झाला. ही तिथी परशुरामजयंती म्हणून समजली जाते.
परशुरामाने पित्याकडून वेदविद्येचे ज्ञान मिळविले. त्यानंतर गंधमादन पर्वतावर जाऊन त्याने तप केले व शिवाला प्रसन्न करून घेतले. शिवाने त्याला शस्त्रास्त्रविद्या शिकविली व परशू दिला. परशुराम हा धनुर्विद्येत विशेष निष्णात होता. एकदा चित्ररथ गंधर्वाला पाहून रेणुकेचे मन विचलित झाले. त्यामुळे जमदग्नी रागावले व रेणुकेचा वध करण्याची त्यांनी आपल्या पाच मुलांना आज्ञा केली. त्यांपैकी एकट्या परशुरामानेच पित्याची आज्ञा पाळली व आईचा शिरच्छेद केला. त्यामुळे जमदग्नी परशुरामावर संतुष्ट झाले व त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले. परशुरामाने आईला जिवंत करण्याचाच वर मागितला. रेणुका पुन्हा जिवंंत झाली.
परशुरामाने कर्ण व अर्जुन यांना धनुर्विद्या शिकविली. तसेच द्रोणाचार्यांनाही धनुर्विद्या शिकविली व नंतर द्रोणाचार्यांनी ती पुढे कर्ण आणि अर्जुन यांना शिकविली, असेही महाभारतात (आदिपर्व १३०) म्हटले आहे. रामाने शिवधनुष्य मोडले म्हणून परशुरामास राग आला. त्याने रामास आपले धनुष्य देऊन त्यास बाण लावण्यास सांगितले. रामाने त्या धनुष्यास सहज बाण लावला. हा आपल्या पराभव आहे असे समजून परशुराम तप करण्यासाठी महेंद्र पर्वतावर निघून गेला. श्रीकृष्ण कौरवांकडे शिष्टाईसाठी जात असता परशुराम श्रीकृष्णाला भेटला, असे महाभारतात (उद्योग पर्व ८३) म्हटले आहे. परशुराम हा ⇨ सप्तचिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, असे मानले जाते. त्यामुळेच त्याचा निरनिराळ्या काळातील घटनांशी संबंध जोडलेला दिसतो.
हैहय वंशातील राजांचे भृगू हे पुरोहित होते पण त्यांच्यात नंतर वैर उत्पन्न झाले. एकदा हैहय कुळातील कार्तवीर्याने वसिष्ठाचा आश्रम जाळाला, तेव्हा वसिष्ठाने त्याला शाप दिला, की ‘भार्गवकुलोत्पन्न परशुराम तुझा वध करील’. यामुळे जमदग्नी व परशुराम यांच्या संबंधीचे कार्तवीर्याचे वैर अधिक तीव्र झाले. कार्तवीर्य हा जमदग्नींच्या आश्रमात गेला आणि त्याने त्यांची कामधेनू पळविली. त्यामुळे रागावून परशुरामाने कार्तवीर्याबरोबर युद्ध केले व त्यास ठार मारले. कार्तवीर्यास एक हजार हात होते त्यामुळे त्यास सहस्रार्जुन असेही नाव आहे. कार्तवीर्य हा एक हजार राजांइतका पराक्रमी होता त्यामुळे त्याला ‘सहस्रबाहु’ म्हटले असावे. कार्तवीर्याचा वध झाल्याचे समजताच त्याची मुले अत्यंत संतप्त झाली. परशुराम आश्रमात नाही अशी वेळ साधून हैहयांनी जमदग्नींच्या आश्रमावर हल्ला केला आणि त्यांना ठार मारले. पितृवधाची दुःखकारक बातमी समजताच परशुराम तेथे आला. जमदग्नींच्या क्रूर हत्येने तो दुःखी झाला. पित्याच्या अंत्याविधीच्या वेळी परशुरामाने सर्व पृथ्वी निःक्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा घेतली. रेणुका आपल्या पतीबरोबर सती गेली.
हैहय वंशाचे राज्य नर्मदेपासून हिमालयापर्यंत होते. त्यांनी भृगूंचा म्हणजे पर्यायाने ब्राह्मणांचा द्वेष केला. परशुरामाने आपल्या पराक्रमाने हैहय कुळाचा समूळ नाश केला. अंग, वंग, कलिंग, विदेह, दरद, त्रिगर्त, ताम्रलिप्ती, मालव इ. देशांतील राजांचाही त्याने संहार केला. शेवटची लढाई कुरुक्षेत्रावर झाली. तेथील स्यमंतपंचक नावाचे तीर्थ त्याने क्षत्रियांच्या रक्ताने भरून टाकले व त्या रक्ताने पितरांना उद्देशून तर्पण केले, अशी कथा आहे. परशुरामाने बारा हजार राजांचा संहार केला, असेही वर्णन आढळते.
एकवीस वेळा परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केली. क्षत्रियांचा संहार केल्यामुळे सर्व पृथ्वी त्याच्या ताब्यात आली. हत्येचे पातक दूर होण्यासाठी परशुरामाने यज्ञ आरंभिला. या यज्ञातील प्रमुख ऋत्विज कश्यप. त्याला यज्ञदक्षिणा म्हणून सर्व पृथ्वीचे त्याने दान केले. यानंतर कश्यप परशुरामाला म्हणाला, की ‘ही सर्व भूमी आता माझ्या मालकीची आहे, तू आता दक्षिणेकडे जा’ (महाभारत, आदिपर्व, १३० वनपर्व, ११७). ही आज्ञा मान्य करून तो आर्यावर्त सोडून महेंद्र पर्वतावर वास्तव्यासाठी निघून गेला. कश्यपाने काही क्षत्रिय राजवंशांचा शोध करून आर्यावर्तात पुन्हा राज्ये निर्माण केली व विस्कळित झालेली समाजघडी पुन्हा नीट बसवली.
परशुरामाने कश्यपास सर्व भूमीचे दान दिल्यावर, पूर्वेकडील महेंद्र पर्वतावर जाऊन त्याने तपश्चर्या केली. सर्व पृथ्वी कश्यपास दान केल्यामुळे त्याला वसतीकरिता भूमी पाहिजे म्हणून पश्चिम सागराच्या तीरावर उभे राहून त्याने वरुणाची प्रार्थना केली. वरुणाने त्याला नवी भूमी दिली. परशुरामाने आपल्या पराक्रमाने समुद्र मागे हटविला व अपरांत (भडोचपासून केरळपर्यंत) प्रदेश निर्माण केला, अशीही कथा आहे. परशुरामाने आपला परशू दक्षिणेकडे फेकला व त्यामुळे शूर्पारक प्रदेश निर्माण केला. सध्या शूर्पारक (ठाणे जिल्ह्यातील सोपारा) हे परशुरामक्षेत्र मानले जाते. सह्याद्रीच्या दक्षिण बाजूस तिरुवितांकूर (त्रिवांकुर) जवळ महेंद्रगिरी असल्याचे काही अभ्यासक मानतात. अशा प्रकारे नवी भूमी संपादन केल्यावर त्याने अनेक ब्राहाणकुले उत्तरेतून आणली व अपरांत प्रदेशात त्यांच्या वसाहती निर्माण केल्या. या नव्या भूमीस पुढे ‘परशुरामक्षेत्र’ असे नाव मिळाले. येथील ब्राह्मणांचे परशुराम हे कुलदेवत समजले गेले. यानंतर परशुराम तप करण्यासाठी पुन्हा महेंद्र पर्वतावर निघून गेला.
परशुरामाने क्षत्रियांचा संहार केला असला, तरी त्याने दुष्ट क्षत्रियांनाच मारले, असे म्हटले पाहिजे. कारण अनेक क्षत्रियकुलांचे परशुराम हे दैवत असल्याचे दिसून येते. परशुरामाने केवळ एकट्याने हा पराक्रम केला असणे संभवनीय वाटत नसल्यामुळे अशी एक उपपत्ती मांडली जाते, की हैहयांचा नाश करण्यासाठी परशुरामाने अयोध्या, काशी, वैशाली येथील राजांचे साहाय्य घेतले. तसेच आसाममधील नागा लोकांनी व अनेक ब्राह्मण तरुणांनी त्याला साहाय्य केले. परशुरामाचा पराक्रम उत्तर भारतापुरता म्हणजे आर्यावर्तापुरताच मर्यादित असावा, असे दिसते. कारण दक्षिणेतील प्रदेशांचा उल्लेख त्याच्या क्षत्रिय कुलनाशासंबंधीच्या कथांत आढळत नाही. आर्यांचा प्रवेश दक्षिण भारतात होण्यापूर्वीच परशुराम होऊन गेला असावा, असे अभ्यासक मानतात.
रामभार्गवेय याच्या नावावर ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील ११० वे सूक्त आहे. परशुरामाचा अप्रत्यक्ष उल्लेख अथर्ववेदातही (५·१८,१९) आढळतो. परशुराम कल्पसूत्र नावाचा तंत्रशास्त्रावरील एक ग्रंथ त्याच्या नावावर आहे. ‘परशुरामशक’ नावाने केरळात एक कालगणनाही रूढ आहे. परशुरामाची क्षेत्रे भारतात ठिकठिकाणी आढळून येतात. स्यमंतपंचकतीर्थ, महेंद्र पर्वत, चिपळूण, माहूर (रेणुकेचे स्थान) इ. क्षेत्रे प्रसिद्ध आहेत.
हाती परशू घेतलेल्या परशुरामाच्या अनेक मूर्ती व चित्रे आढळून येतात. त्याच्या अलौकिक कृत्यामुळेच त्याची गणना विष्णूच्या ⇨ दशावतारातझाली असावी. परशुरामाची व रेणुकेची देवळे अनेक ठिकाणी आहेत.
संदर्भ : पारखे, म. स. राजराजेश्वर परशुराम, पुणे, १९६७.
भिडे, वि. वि.