परमा: गोनोकोकाय नावाच्या सूक्ष्मजंतूंमुळे जनन-मूत्रमार्गाच्या श्लेष्मकलास्तरास (पातळ पटलाच्या अस्तरास) होणाऱ्या अती संसर्गजन्य व बहुतकरून संभोगजन्य असलेल्या रोगास परमा किंवा पूयप्रमेह म्हणतात. सर्वसाधारण भाषेत त्याचा उल्लेख ‘पू–परमा’ असा करतात. ब्रिटनमध्ये १९७१ मध्ये १,००,००० लोकांमध्ये १२१ व्यक्ती या रोगाने पछाडलेल्या होत्या. अमेरिकेत याच सुमारास हे प्रमाण आठ पटींनी अधिक होते. मद्रास वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हिनिरिऑलॉजी या संस्थेत १९७३ साली गुप्तरोगाच्या एकूण रुग्णांपैकी १४·५९% रुग्ण परम्याचे होते. १,०७० रुग्णांपैकी ८१० पुरुष आणि २६० स्त्रिया-मुले होती. सर्व जगभर पसरलेला मानवातील एक संसर्गजन्य रोग म्हणून परम्याचा उल्लेख करता येतो. रोग्यांपैकी २०% पेक्षा जास्त रोग्यांमध्ये, विशेषेकरून स्त्रियांमध्ये, कोणतीही उघड रोगलक्षणे नसतात. केवळ काळजीपूर्वक तपासणीत, विशेषतः रोग्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींची तपासणी करताना, रोग असल्याचे लक्षात येते. या कारणामुळे वर दिलेले रोगाचे प्रमाण प्रत्यक्षातील प्रमाणापेक्षा पुष्कळसे कमीच असण्याची शक्यता आहे.

इतिहास: अतिप्राचीन काळापासून मानवामध्ये आढळून येणाऱ्या रोगांपैकी परमा हा एक रोग आहे. ५,००० वर्षांपूर्वीच्या चिनी लेखनातून परम्याचा उल्लेख आढळतो. प्राचीन ग्रीक, रोमन, अरबी आणि हिंदू लिखाणांतूनही त्याचे वर्णन आढळते. प्राचीन काळापासून ज्ञात असूनही त्याचा संभोगाशी असलेला घनिष्ठ संबंध मध्ययुगीन काळापर्यंत अज्ञात होता. काही काळपर्यंत उपदंश [⟶ गुप्तरोग उपदंश ] आणि परमा एकाच रोगाच्या दोन अवस्था मानल्या जात. १८३२ मध्ये अमेरिकन वैद्य फिलिपे रिकॉर्ड यांनी हे दोन रोग भिन्न असल्याचे दाखविले. १८७९ मध्ये जर्मन वैद्य आल्बेर्ट नाइसर यांनी या रोगाचे सूक्ष्मजंतू प्रथम शोधून काढले. म्हणून या सूक्ष्मजंतूंना नाइसेरिया गोनोऱ्हिया असेही नाव आहे.

संप्राप्ती व लक्षणे: हा रोग बहुतांशी संभोगजन्य असून अशा प्रकारे आलेला प्रत्यक्ष संपर्क निरोगी व्यक्तीच्या जनन-मूत्रमार्गात सूक्ष्मजंतूंचा शिरकाव होण्यास कारणीभूत असतो. एकूण सात गुप्तरोगांपैकी परमा हा एक रोग असून त्या सर्वांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे [⟶ गुप्तरोग ]. समलिंगी संभोग करणाऱ्या दोन पुरुषांपैकी सक्रिय रोगट पुरुषापासून अक्रिय व्यक्तीच्या गुदाशयात सूक्ष्मजंतूंचे संक्रामण होण्याची शक्यता असते. रोगट व्यक्तीच्या बोटामुळे तिचा रोग स्वतःच्या डोळ्यातील श्लेष्मकलास्तरात शिरण्याची शक्यता असते. प्रसूतीच्या वेळी रोगी मातेच्या दूषित स्रावांच्या संपर्कामुळे जन्मणाऱ्या मुलाच्या डोळ्यांना रोग होऊ शकतो, यालाच नवजात नेत्रशोथ (डोळ्यांची दाहयुक्त सूज) म्हणतात. कधीकधी अजाणतेपणामुळे व अस्वच्छतेमुळे रोगी आई-बाप लहान मुलांना हा रोग होण्यास कारणीभूत होतात.

रोगाचा परिपाककाल (सूक्ष्मजंतू शरीरात शिरल्यापासून रोगलक्षणे दिसेपर्यंतचा काळ) २ ते १० दिवसांचा असतो. वर्णनाच्या सुलभतेकरिता (१) पुरुषांतील परमा, (२) स्त्रियांमधील परमा आणि (३) नवजात नेत्रशोथ असे विभाग पाडले आहेत.

पुरुषांतील परमा: रोगाची सुरुवात बहुतकरून मूत्रमार्गाच्या अग्र भागातील तीव्र शोथाने होते आणि पूयुक्त उत्सर्ग मूत्रमार्गातून वाहू लागतो. पश्चभागात रोग फैलावताच लघवी वारंवार होऊ लागून मूत्रोत्सर्जनाची अत्यावश्यकता अधिकाधिक जाणवते. रोगाच्या सुरुवातीचा पातळ उत्सर्ग हळूहळू वाढत जाऊन चक्क पिवळ्या रंगाचा पू बाहेर पडू लागतो. शिश्नमण्यावरील मूत्रद्वार लाल दिसू लागून सूज येते. कधीकधी शिश्न-वक्रता येते. लघवी गढूळ होऊ लागते. दोन काचेच्या पात्रांत ती धरल्यास पहिल्या प्रथम होणारी लघवी दुसऱ्या पात्रातील लघवीपेक्षा नेहमी अधिक गढूळ आढळते (द्विपात्र परीक्षा). पश्चभागात रोग फैलावण्यास साधारणपणे १० ते १४ दिवस लागतात. त्यानंतर लघवी करताना प्रत्येक वेळी तीव्र वेदना होतात (मूत्रकृच्छ्र). कधीकधी लघवी संपल्यानंतर दोनचार रक्ताचे थेंब गळतात. काही रोग्यांमध्ये डोकेदुखी, अस्वस्थता, जर, जलद नाडी इ. सूक्ष्मजंतुजन्य विषाच्या अभिशोषणामुळे (शरीरातील पेशींतील शोषणामुळे) उद्‌भवणारी लक्षणे दिसतात. गुदाशयशोथ लक्षणविरहित असू शकतो. काही रोग्यांत मलोत्सर्जन वेदनायुक्त असून मल रक्त व पूमिश्रित असतो.

उपद्रव: पुरुषांमध्ये दोन प्रकारचे उपद्रव आढळतात : स्थानीय आणि प्रक्षेपित. (१) स्थानीय उपद्रवांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो : (अ) पराशिश्नमणी (शिश्नमण्याच्या मागील बाजूस असलेल्या) ग्रंथींचे जंतु-संक्रामण. (आ) लीट्र ग्रंथींचे (ए. लीट्र या फ्रेंच शस्त्रक्रियाविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या, शिश्नातील श्लेष्म ग्रंथींचे–बुळबुळीत स्राव देणाऱ्या ग्रंथींचे) जंतु-संक्रामण. (इ) मूत्र मार्गातील श्लेष्मकलास्तराखालील ऊतकात (पेशींच्या समूहात) जंतुसंक्रामणजन्य शोथ व विद्रधी (पूयुक्त गाठ) तयार होणे. विद्रधी फुटून ⇨ नाडीव्रण बनणे आणि त्यामधून मूत्रोत्सर्जन होणे. (ई) कौपर ग्रंथीत (विल्यम कौपर या इंग्लिश शस्त्रक्रियाविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या, शिश्नाच्या मागील बाजूस असलेल्या फुगीर भागातील ग्रंथीत) जंतु-संक्रामण होऊन विद्रधी तयार होणे. (ए) अष्ठीला ग्रंथीचा (पुरुषातील मूत्रमार्गाचा सुरुवातीचा भाग जिच्यामधून जातो त्या मूत्राशयाच्या खालीच व त्यास लागून असणाऱ्या ग्रंथीचा) शोथ व तेथे विद्रधी तयार होणे. (ऐ) रेताशयशोथ. (ओ) रेतोवाहिनीशोथ, अधिवृषणशोथ, (वृषणाच्या म्हणजे पुं-जनन ग्रंथीच्या वरच्या बाजूस असलेल्या लंबवर्तुळाकार पिंडाचा शोथ), जलवृषण (वृषणाच्या भोवती पाणी साचणे). (२) प्रक्षेपित उपद्रव कमी प्रमाणात आढळतात. गोनोकोकाय रक्तप्रवाहात शिरून सांधे किंवा डोळा यांसारख्या शरीरभागामध्ये शोथ उत्पन्न करतात, अशी कल्पना काही वर्षांपूर्वी दृढ होती. अलीकडील संशोधनाप्रमाणे या विकृतींची कारणे रिटर रोगासारख्या (हान्स रिटर या जर्मन आरोग्यशास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या रोगासारख्या) गोनोकोकायविरहित रोगाप्रमाणे असावीत. कधीकधी मात्र गोनोकोकायजन्य पूयुक्त संधिशोथ आढळतो. सांध्यातील द्रवात गोनोकोकाय आढळल्यास निश्चित निदान होते. या उपद्रवावर तातडीने इलाज न केल्यास सांध्याचा पूर्ण नाश होण्याचा धोका असतो. क्वचित आढळणाऱ्या उपद्रवात हृदंतस्तरशोथ (हृदयाच्या आतील अस्तराचा शोथ) व परिहृदयशोथ (हृदय ज्या पटलमय पिशवीत असते तिचा शोथ) यांचा समावेश होतो.

स्त्रियांतील पनमा: प्रौढ स्त्रीमध्ये मूत्रमार्ग, गर्भाशय ग्रीवा (मानेसारखा भाग), बार्थोलिन ग्रंथी (कॅस्पर बार्थोलिन या डच शरीरक्रिया वैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या, योनीद्वाराच्या दोन्ही बाजूंस असणाऱ्या दोन प्रकोष्ठ ग्रंथी), स्कीन ग्रंथी (ए. जे. सी. स्कीन या अमेरिकन स्त्रीरोगतज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या मूत्रद्वाराजवळील ग्रंथी) यांमध्ये मूळ जंतु-संक्रामण सुरू होते. मूत्रमार्ग संक्रामणाची लक्षणे पुरुषाप्रमाणे असतात परंतु पूयुक्त उत्सर्ग जात असल्याचे स्त्रीच्या सहसा लक्षात येत नाही. कधीकधी कोणतीही तीव्र लक्षणे आढळत नाहीत. गर्भाशय ग्रीवाशोथामध्ये कंबर दुखणे व योनिमार्गातून उत्सर्ग जाणे ही लक्षणे उद्‌भवतात. कालांतराने योनिमार्गातील उत्सर्गाच्या प्रत्यक्ष संपर्कामुळे गुदाशयशोथ होण्याचा संभव असतो व तोही लक्षणविरहित असण्याची शक्यता असते. याकरिता स्त्रियांची तपासणी करताना गुदाशय तपासणी करणे आवश्यक असते. लहान मुलींमध्ये मायांगावर (जननेंद्रियाच्या आतील भागावर) शोफ (द्रवयुक्त सूज) आणि योनिमार्गातून पुष्कळ पूयुक्त उत्सर्ग जाणे ही लक्षणे आढळतात.


उपद्रव : स्त्रियांतही स्थानीय आणि प्रक्षेपित उपद्रव आढळतात. स्थानीय उपद्रवात (१) स्कीन व बार्थोलिन ग्रंथींचे जंतु-संक्रामण, (२) बार्थोलिन विद्रधी, (३) अंडवाहिनीशोथ व वंध्यत्व. ब्रिटनमध्ये दरवर्षी ५०० स्त्रियांना गोनोकोकायजन्य चिरकारी (दीर्घकालीन) अंडवाहिनीशोथामुळे वंध्यत्व येत असावे असा अंदाज आहे. (४) अंडाशयशोथ आणि (५) श्रोणिगुहेतील (धडाच्या तळाशी असणाऱ्या हाडांनी आवेष्टित असलेल्या पोकळीतील) पर्युदरशोथ (उदरगुहेच्या अस्तराचा शोथ) यांचा समावेश होतो. प्रक्षेपित उपद्रवात संधिशोथ प्रामुख्याने आढळतो. मात्र या विकृतीत सांध्यातील द्रव तपासून त्यात गोनोकोकाय आढळल्यासच त्यास गोनोकोकायजन्य संधिशोथ म्हणणे योग्य ठरते.

नवजात नेत्रशोथ: प्रसूतीच्या वेळी मातेच्या संक्रामित जननमार्गातील सूक्ष्मजंतू डोळ्यांत शिरल्यामुळे नवजात अर्भकात ही विकृती होते. मातेला परमा असल्यास त्याचा उपद्रव अर्भकास फक्त जन्मतेवेळीच होण्याची शक्यता असते. गोनोकोकायशिवाय स्टॅफिलोकोकाय, स्ट्रेप्टोकोकाय वा न्यूमोकोकाय हे सूक्ष्मजंतूही नेत्रशोथास कारणीभूत असू शकतात. निदानाकरिता डोळ्यातील उत्सर्गाची सूक्ष्मदर्शकीय तपासणी उपयुक्त असते.

प्रौढातील गोनोकोकायजन्य नेत्रशोथ बहुधा एकाच डोळ्यास होतो व तो इतर कारणांमुळे होणाऱ्या नेत्रशोथापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचा असतो.

निदान: निदानाकरिता पुरुषातील मूत्रमार्गातून येणारा उत्सर्ग काचपट्टीवर विशिष्ट अभिरंजनानंतर (कृत्रिम रीत्या रंगविण्याच्या क्रियेनंतर) तपासल्यास गोनोकोकाय स्पष्ट दिसतात. ०·६ ते १ मायक्रॉन (१ मायक्रॉन = १०³ मिमी.) या आकारमानाचे जंतू बहुतकरून जोडीजोडीने व कॉफीच्या बीच्या आकाराचे आढळतात. उत्सर्गात सूक्ष्मजंतू न आढळल्यास प्रयोगशाळेत उत्सर्गाचे विशिष्ट पद्धतीने संवर्धन करून त्याची परीक्षा करतात. स्त्रियांत नुसती काचपट्टीवरील उत्सर्गाची सूक्ष्मदर्शकीय तपासणी तेवढी खात्रीलायक नसल्यामुळे नेहमी प्रयोगशाळेतील संवर्धनानंतरच निदान निश्चित करणे योग्य ठरते. तरीही ५० ते ६०% स्त्रियांत रोग असला, तरी संवर्धन परीक्षेतही गोनोकोकाय सापडत नाहीत.

चिकित्सा: इलाजामध्ये प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे असतात. संभोगाचे वेळी पातळ रबरी पिशवी (निरोध) पुरुषाने वापरणे आणि रोगी स्त्रीशी संभोग झाल्याची शंका आल्यास ताबडतोब तोंडाने सल्फॉनामाइडे औषधे घेणे, यांची रोगप्रतिबंधास मदत होते. परम्यावरील इलाज करण्यापूर्वीच सोबत उपदंश आहे किंवा नाही हे तपासणे जरूर असते. पेनिसिलिनाची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) परम्यावर गुणकारी असतात परंतु कधीकधी अपुऱ्या मात्रेमुळे परमा पूर्ण बरा होऊनही उपदंश दबलेल्या अवस्थेत तसाच राहण्याची शक्यता असते. पेनिसिलिनाच्या अंतःक्षेपणाशिवाय परम्याच्या तीव्रावस्थेत ॲम्पिसिलीन किंवा ॲमॉक्सिसिलीन तोंडाने देणे उपयुक्त ठरले आहे. या औषधांपूर्वी वा पेनिसिलीन अंतःक्षेपणापूर्वी एक तास अगोदर तोंडाने प्रोबेनेसीड औषध दिल्यास अधिक फायदा होतो. काही तज्ञांच्या मताप्रमाणे परम्यावर स्टेप्टोमायसीन सल्फेट अंतःक्षेपणाने व तोंडाने क्लोरटेट्रासायक्लीन आणि ऑक्सिटेट्रासायक्लीन ही औषधे गुणकारी आहेत. परम्याची शंका आल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणे जरूर असते. रोग बरा झाल्यानंतरही तीन महिने वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता असते. स्त्रियांच्या बाबतीत रोग लक्षणविरहित अवस्थेत राहू शकत असल्यामुळे वैद्यकीय सल्ला आणि देखरेख फार महत्त्वाची असतात. उपद्रवावरील इलाजाकरिता नेहमी वैद्यकीय सल्ला आवश्यक असतो.

पेनिसिलिनाची अधिहृषता (ॲलर्जी) असल्यास वर दिलेल्यांपैकी इतर औषधे उपयुक्त असतात. अलीकडील संशोधनानुसार को. ट्रायमोक्झाझोल नावाचे तोंडाने द्यावयाचे औषध गुणकारी ठरले आहे. हे औषध सेप्ट्रिन किंवा बॅक्ट्रिम या नावाने विकले जाते.

रानडे, म. आ. भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा: ह्याच रोगाने दुष्ट असलेल्या स्त्री-पुरुष संभोगाने हा उत्पन्न होतो. मूत्रमार्गामध्ये व्रण उत्पन्न होऊन पू उत्पन्न होतो. हा कफ पित्त दोष भूयिष्ठ विकार आहे. हा उत्पन्न होताच चंदन तेल व दगडीबेर व मध ह्यांचे चाटण द्यावे. सुवर्ण राजवंग, गोक्षुरादी गुग्गुल किंवा नुसते वंग भस्म मध व चंदन तेल ह्यांतून चाटवावे. दशांग लेपाचा इंद्रियावर सकाळ-संध्याकाळ लेप करावा. पू उत्पन्न करणारे दूध, दही, भात इ. पदार्थ वर्ज्य करावेत मीठ वर्ज्य करावे गहू, तूप, मध, मूग ह्यांचा आहारात उपयोग करावा. पुवाचा स्पर्श कोठेही होऊ नये ह्याबद्दल जपावे.

पटवर्धन, शुभदा अ. 

संदर्भ : 1. Alstead, S., Girwood, R. H., Eds. Textbook of Medical Treatment, Edinburgh, 1974.

   2. Davidson, S. Macleod, J., Eds., The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.

   3. Vakil,  R. J., Ed. Textbook of Medicine, Bombay, 1969,