परपीडन व स्वपीडन विकृती : (सॅडिझम–मॅसोकिझम). साधारणपणे लैंगिक प्रेरणातृप्तीच्या संदर्भात परपीडन व स्वपीडन या प्रवृत्तींचा आविष्कार संभवतो. प्रिय वाटणाऱ्या व्यक्तीला जरासा त्रास देण्यात तसेच तिच्याकडून थोडासा त्रास पतकरण्यात आनंद वाटणे, ही प्रवृत्ती साधारणतः सर्वांच्या ठिकाणी दिसून येते. लैंगिक सुखाच्या संबंधातही या दोन प्रवृत्ती सामान्यतः कामप्रेरणेच्या आनुषंगिक असतात, असे दिसते. प्रणयजीवनात परस्परांना जरासे दुखवण्यात आणि दुखवून घेण्यात काही प्रेमिकांना आनंद वाटतो. समागमापूर्वीच्या रतिचेष्टेत तर पुरुषाने स्त्रीला नखक्षत, दंतक्षतादी प्रकारांनी दुखवणे तसेच नमवणे आणि स्त्रीला हे पीडनप्रकार सुखदायक वाटणे या दोन प्रवृत्ती, असंस्कृत स्वरूपात म्हणा की सुसंस्कृत स्वरूपात म्हणा, कमीअधिक प्रमाणात आढळतात.
परपीडनाच्या व स्वपीडनाच्या या दोन्ही प्रवृत्ती पुरुष आणि स्त्रिया या दोहोंच्या ठिकाणी असाव्यात परंतु स्त्रियांतील आक्रमक पीडनप्रवृत्ती ही भीती व लज्जा यांमुळे साधारणतः व्यक्त होत नसावी, असा एक तर्क आहे. स्त्रीपीडन केल्यावाचून उत्कट कामोद्दीपन न होणाऱ्या पुरुषांप्रमाणे स्त्रीकडून ताडन करून घेतल्याविना कामतृप्ती न होणारे पुरुषही आढळतात. तसेच प्रणयक्रीडेत ताडनादी प्रकारांनी पुरुषाला दुखवण्याचा आनंद उपभोगणाऱ्या स्त्रियांची आणि विविध शारीरिक-शाब्दिक ताडनप्रकारांवाचून ज्यांची कामवासना उत्कटतेस पोहोचत नाही, अशा स्त्रियांची उदाहरणेही आढळतात. रतिक्रीडेतील या पीडनाचा व्यक्ती राकट असण्याशी संबंध असतोच, असे नाही.
काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र समागम हे जे लैंगिक चेष्टांचे अंतिम उद्दिष्ट असते, ते बाजूस राहते आणि ताडन-प्रहारादी विविध रीतींनी त्या व्यक्तीस दुखवणे किंवा तिच्याकडून त्याच प्रकारे स्वतःस दुखवून घेणे, हाच कामुक सुख अनुभवण्याचा प्रधान मार्ग होऊन बसतो. अर्थातच लैंगिक प्रेरणेचे हे विकृत आविष्कार म्हणजे ⇨ लैंगिक अपमार्गण होय. प्रिय व्यक्तीला दुखवण्याची वा तिच्याकडून दुखवून घेण्याची मजल तिचा अवमान करण्यापासून तो तिला गंभीर शारीरिक दुखापत करण्यापर्यंत गेल्याची उदाहरणेही आढळतात. मार्कि-द-साद (१७४०–१८१४) या फ्रेंच कादंबरीकाराचे लैंगिक क्रौर्य व त्याच्या कांदबऱ्यांत चित्रित केलेले क्रूर लैंगिक प्रयोग यांवरून ‘सॅडिझम’ ही संज्ञा तसेच लेओपोल्ट फोन झाखर मासोख (१८३६–९५) या जर्मन कादंबरीकाराने, नायिकेने मारलेले फटके व ते खाणारा नायक याचे जे वर्णन केले आहे, त्यावरून ‘मॅसोकिझम’ ही संज्ञा प्रचारात आली आहे.
काही शस्त्रवैद्यांच्या बाबतीत त्यांची शस्त्रक्रियेची आवड तसेच काही लेखकांना गुन्हेगारीसंबंधीच्या हिंसक कथा लिहिण्यात वाटणारा विशेष रस म्हणजे परपीडनाचे उदात्तीकरण असण्याची शक्यता असते.
परपीडनाचे तीन प्रमुख प्रकार पडतात : (१) कामवर्तनाशी संबंधित नसलेले क्रौर्य : धार्मिक कारणास्तव पशुबली वा नरबली देणे, हिंसाचार असलेले चित्रपट, कथा वा कलाकृती तयार करणे, पशुपक्ष्यांची शिकार इ. गोष्टी या प्रकारात येतात. (२) कामवर्तनाशी संबंधित असलेले क्रोर्य : संभोगापूर्वी पतीने पत्नीस मारहाण करणे व तिनेही ती निमूटपणे सोसणे, हे या प्रकारचे उदाहरण. युद्ध किंवा सामाजिक उद्रेकांच्या वेळी या प्रवृत्तीचा आविष्कार अत्याचारांच्या व बलात्कारादी प्रकारांच्या अफवांतून दिसून येतो. (३) संभोगसुखाशी संबंधित क्रौर्य : स्त्रीसुख घेताना अनेक पुरुष स्त्रियांना प्रत्यक्ष इजा करतात, असे दिसून येते. मद्यपानामुळे ही प्रवृत्ती स्वैर होते. संभोगसमयी सर्वसामान्यपणे पुरुष अधिक आक्रमक असल्यामुळे या प्रकारची उदाहरणे पुरुषांमध्ये अधिक आढळतात.
कारणमीमांसा : काही मानसशास्त्रज्ञांच्या मते स्त्रीपुरुषांची समागमपूर्व रतिचेष्टा कधीकधी लहान मुलांच्या नजरेस पडते आणि त्या वेळी पुरुषांकडून होणाऱ्या आक्रमक क्रिया पाहून रतिक्रीडेमध्ये पुरुषाची भूमिका पाशवी, आक्रमक असते आणि स्त्रीची भूमिका ताडन-प्रहारादी प्रकार सहन करून घेण्याची असते, असा चुकीचा अर्थ मुले लावतात. लहान मुलांची ही चुकीची धारणा पक्की होऊन बसल्यामुळे प्रौढपणी त्याप्रमाणेच वर्तन करून ती रतिसुख मिळवीत असतात. मुलांनी मानवी समागमाचे दृश्य पाहिलेले असते, असे या उपपत्तीत गृहीत धरण्यात आलेले आहे व ते अर्थातच विवाद्य आहे.
सिग्मंड फ्रॉइडने जीवन व विनाशन या प्रवृत्तींच्या परिभाषेत परपीडन व स्वपीडन विकृतींची उपपत्ती दिली आहे. त्याच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी प्रेमप्रवृत्ती (ईरॉस) व विनाशन प्रवृत्ती (थॅनॅटास) या दोन निसर्गदत्त प्रेरणा असतातच. कारण जैविक पातळीवर वृद्धिप्रक्रिया चालू असतानाच विनाशाचीही प्रक्रिया चालू असते, हे मूलभूत सत्य आहे. मानसिक पातळीवर ही विनाशन प्रवृत्ती बाल्यावस्थेत स्तनपानाच्या वेळी चावणे, वस्तूंचा विध्वंस करणे या स्वरूपात दिसते. पुढे तिची जेव्हा कामप्रेरणेशी गुंफण होते, तेव्हा ती कामविषय असलेल्या व्यक्तीकडे वळली, तर परपीडनाच्या रूपाने व्यक्त होते आणि स्वतःकडेच वळली, की स्वपीडनाचे रूप धारण करते.
संदर्भ : 1. Berg, Karl, Sadist, London, 1938.
2. Freud, Sigmund Trans. A General Introduction to Psychoanalysis, New York, 1920.
3. Freud, Sigmund Trans. New Introductory Lectures on Psychoanalysis, New York, 1933.
4. Reik, Theodor, Masochism in Modern Man, New York, 1945.
अकोलकर, व. वि.