पपई: (पोपई हिं. पपया, पपिता क. गुप्पे, पप्पाई, पांगी सं. चिरभीता इं. पपाया, पॅपॉ लॅ. कॅरिका पपया कुल-कॅरिकेसी). ह्या परिचित लहान ओषधीय [→ओषधि] वृक्षाचे मूलस्थान मेक्सिको असून हल्ली त्याचा प्रसार उष्ण कटिबंधातील देशांत व उपोष्ण कटिबंधातील उष्ण प्रदेशात सर्वत्र झालेला आढळतो. याचा अंतर्भाव हल्ली ⇨कॅरिकेसी कुलात (पपई कुलात) केला असून याची सामान्य शारीरिक लक्षणे त्यात वर्णिल्याप्रमाणे आहेत. कॅरिका या शास्त्रीय नावाच्या दोन किंवा अधिक जातींच्या संकराने पपईची उत्पत्ती झाली असावी, असे मानतात. याचे खोड सु. ३-४ मी. (क्वचित ६ मी.) उंच असून त्याला फार क्वचित फांद्या फुटतात. पडून गेलेल्या पानांच्या तळांचे वण (किण) खोडावर ठळकपणे दिसतात. खोडात काष्ठाचा भाग फार कमी असतो, त्यामुळे ते नरम असते. खोडाच्या शेंड्यावर मोठी, कमीजास्त विभागलेली, साधी, हस्ताकृती पाने एकाआड एक येऊन त्यांचा एक मोठा झुबका दिसतो. देठ पोकळ, जाडजूड व सु. ६० सेंमी. लांब आणि पानाची पाती तितक्याच व्यासाची असतात.

आ. 1. पपई : (अ) फळांसह झाड (आ) स्त्री - पुरुष (इ) द्विलिंगी पुष्प (ई) नर – पुष्प (उघडलेले) (उ) फळाचा उभा छेद (ऊ) बीजाचा उभा छेद (१) बाह्यावरण (२) अंतरावरण (३)पुष्क (४) गर्भ.

नर व मादी झाडे स्वतंत्र असून त्यांवर पानांच्या बगलेतून लांब नर-पुष्पांचे घोस अथवा एकेकटी स्त्री-पुष्पे येतात. एकत्रलिंगी झाडे व द्विलिंगी फुले क्वचित आढळतात. फुले पिवळी असतात नर-पुष्पांमध्ये पाच पाकळ्या खाली जुळून लांब नलिका बनते व वरचा भाग नसराळ्यासारखा दिसतो. त्यात आखूड तंतूंची दहा केसरदले व वंध्य किंजमंडल असते. स्त्री-पुष्पाच्या पाच मांसल पाकळ्या तळाशी जुळलेल्या परंतु वर सुट्या व बाहेरच्या बाजूस वळलेल्या दिसतात. त्यात वंध्य केसरदले आढळतात किंजदले पाच, जुळलेली व किंजपुट ऊर्ध्वस्थ असून त्यावर पंख्यासारखा पाच भागांचा किंजल्क असतो. किंजपुटात एक कप्पा आणि अनेक बीजके आतील बाजूस तटलग्न (भित्तीय) असतात [→ फूल]. मृदुफळ मोठे, गोलसर किंवा लांबट गोल आणि पिकल्यावर बाहेरून पिवळे व आत पिवळट शेंदरी असते. साधारणपणे त्याची लांबी २०–२५ सेंमी. व व्यास १०–१५ सेंमी. असतो. पिकलेल्या फळातील मगज (गर) गोड व स्वादिष्ट असतो. बिया विपुल व गर्द पिंगट असून त्यांवर नरम बाह्यावरण वा कठीण अंतरावरण असते बाह्यावरणाला आभासी अध्यावरण [→ बीज] म्हणतात त्यावर बारीक पुरळ असतो. फळ पौष्टिक व उत्तम खाद्य आहे. त्यामध्ये पेक्टीन, अ आणि क ही जीवनसत्त्वे व पेपेन नावाचे प्रथिन-पाचक (प्रथिनाचे शरीरात पचन होण्यास मदत करणारे) द्रव्य असते. ते द्रव्य प्राण्यांतील पेप्सिनाप्रमाणे क्रियाशील असते. पेपेन लोकर, चीज, जेली, च्युइंग गम, सौंदर्यप्रसाधने इ. तयार करण्याच्या उद्योगात वापरतात. पाने वा कच्च्या पपईचे तुकडे मांस लवकर शिजण्याकरिता त्यात घालतात कच्ची पपई भाजीकरिता वापरतात. अग्निमांद्यावर फळे उपयुक्त असतात. पेपेन औषधी उपयोगाचे आहे ते प्लीहेचे (पानथरीचे) विकार आणि मासिक पाळीचे विकार यांवर देतात. 

घवघवे, ब. ग.

पपई हे सतत हिरवे राहणारे फळझाड आहे. भारतात ते सोळाव्या शतकात आणले गेले. हल्ली त्याची लागवड हवाई बेटे, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, फिलिपीन्स बेटे आणि भारत या प्रदेशांत होते. भारताच्या कोरड्या तसेच पावसाळी हवामानाच्या व समुद्रसपाटीपासून १,३०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात पपई वाढू शकते. उपलब्ध माहितीप्रमाणे भारतातील पपईच्या लागवडीचे एकूण क्षेत्र १०,८४८ हे. असून  सर्वांत जास्त क्षेत्र (३,८८० हे.) बिहार राज्यात आहे. आसाममध्ये २,०४१ हे., मध्य प्रदेशात २,००० हे. आणि महाराष्ट्र व गुजरात मिळून १,२३६ हे. क्षेत्र आहे आणि इतर राज्यांत १,४१७ हे. क्षेत्र आहे.

हवामान: कोरड्या उष्ण हवामानात आणि योग्य पाणीपुरवठा असेल अशा ठिकाणी पपईची वाढ चांगली होते. २०° से. च्या खालील तापमान पपईला मानवत नाही. थंड हवामानात तयार झालेली फळे बेचव असतात.

जमीन: पपईच्या लागवडीला मोकळी, पाण्याचा निचरा चांगला होणारी तसेच जैव पदार्थांचा भरपूर पुरवठा असलेली जमीन चांगली असते. गाळाच्या जमिनीत त्याचप्रमाणे भारताच्या दक्षिणेकडील भागातील मध्यम काळ्या जमिनीत पपई चांगली वाढते. खडकाळ चुनखडीच्या व जैव पदार्थांचा अभाव असलेल्या तसेच भारी काळ्या व खोलगट जमिनीत पपईची वाढ चांगली होत नाही. या पिकाच्या बाबतीत पाण्याच्या निचऱ्याला फार महत्त्व आहे. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यास रोगामुळे खोड बुंध्याशी कुजते.

लागवड: रोपे लावून लागवड करतात. नांगरणी, भरखत घालणे, कुळवणी वगैरे मशागत केलेल्या जमिनीत कमी पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या सुरुवातीला व जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या अखेरीला रोपे लावतात.

रोपे तयार करणे: चांगल्या जातिवंत पुष्कळ फळे देणाऱ्या झाडाच्या पूर्ण पिकलेल्या फळांचे बी घेऊन ते धुऊन स्वच्छ करून व सावलीत वाळवून साठवून ठेवतात. रोपे करण्याकरिता ताजे बी नेहमी चांगले असते. लागवडीच्या वेळेच्या आधी सु. दोन महिने रोपांसाठी बी पेरतात. एक हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यासाठी रोपे तयार करावयाला २५० ग्रॅ. बी पुरेसे होते. बी सामान्यतः गादी वाफ्यांत लावतात. रोपे ९ – १२ सेंमी. उंचीची झाल्यावर ती वाफ्यांतून काढून तयार केलेल्या जमिनीत कायम जागी लावतात. दोन खड्‌ड्यांमध्ये २-३ मी. हमचौरस अंतर ठेवून रोपे लावतात. रोपाच्या अवस्थेत नर आणि मादी असा भेद ओळखता येत नाही. त्यामुळे लावलेल्या रोपांमधून ४०–६० टक्केच मादीची झाडे निघतात. बाकीची नरझाडे असतात. नरझाडाला फळे येत नाहीत म्हणून ठराविक क्षेत्रातील उत्पन्न कमी येते. हे टाळण्याकरिता एकेका आळ्यात (खड्ड्यात) दोन-तीन रोपे लावतात. रोपे वाढून त्यांना फुले आली म्हणजे नर आणि मादी असा भेद ओळखता येतो. तेव्हा सबंध बागेत दोन-चार नराची झाडे ठेवून बाकीची नराची झाडे तोडून टाकतात. त्यामुळे त्या लागवडीत कमीतकमी निग्म्यापेक्षा अधिक मादी झाडे मिळतात.


पाणी: पपईच्या झाडाला मुळाशी साचलेले पाणी मानवत नाही म्हणून पावसाळ्यात आळ्यात पाणी साचून रहाणार नाही, अशी काळजी घ्यावी लागते. पाऊस नसेल तेव्हा जमिनीच्या मगदुराप्रमाणे १० ते  १२ दिवसांच्या अंतराने पाणी देतात.

खत:लागणीच्या वेळी दर झाडाला दिलेल्या ९ किग्रॅ. भरखताशिवाय वर्षातून दोनदा वरखत घालतात. पश्चिम व दक्षिण भारतात पावसाच्या सुरुवातीला दर झाडाला २५ किग्रॅ. शेणखत व एक किग्रॅ. एरंडीची पेंड देतात. परत नोव्हेबर-डिसेंबरमध्ये तितकेच खत देतात. उत्तर भारतात खत जुलै-ऑगस्ट आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यांत देतात. पेंड आळ्यात घालून मातीत चांगली मिसळतात.

फुले – फळे: लागणीपासून १०–१४ महिन्यांत पपईला फुले येऊन फळे लागू लागतात. फूल आल्यापासून सहा महिन्यांत फळ पक्व होते. तयार झालेल्या फळावर पिवळा रंग दिसू लागला म्हणजे ती टणक असतानाच झाडावरून काढून घेतात म्हणजे त्यांना अपाय न होता ती काढून घेता येतात. झाडावरच पूर्णपणे पिकलेली फळे उत्कृष्ट दर्जाची असतात परंतु फळे झाडावरच पिकू दिल्यास कावळे व इतर पक्षी त्यांची नासाडी करतात. शिवाय पूर्ण पिकल्यावर ती नरम होत असल्यामुळे झाडावरून उतरवून घेताना फुटून नुकसान होते. जरी अशी फळे काळजीपूर्वक काढली, तरी ती दूर अंतरावरील बाजारात पाठविण्यालायक नसतात म्हणून ती टणक असतानाच काढून घेतात.

प्रकार: पपईचे वॉशिंग्टन, कूर्ग हनीड्यू किंवा मधुबिंदू, रांची व गुजरात स्थानिक हे प्रमुख प्रकार असून को-१ व को-२ हे बुटके प्रकारही भारतात उपलब्ध आहेत. तसेच सिलोन, सिंगापूर, बंगलोर हे प्रकारही भारतात लागवडीत आहेत.

वॉशिंग्टन: या प्रकारातील पानांच्या दांड्यांचा रंग जांभळा असतो व खोडावर जांभळ्या रंगाची पेरे असतात. फुले गडद पिवळी असतात. फळ आकाराने लांबट असून त्याच्या देठाकडील बाजूला जांभळी कडा असते. कच्च्या फळाची साल गर्द हिरव्या रंगाची असते. पिकलेल्या फळाची साल तकतकीत पिवळ्या रंगाची असते. फळाचा गर नारंगी रंगाचा आणि गोड असून त्याला चांगला स्वाद असतो. फळाचे वजन सामान्यपणे एक-दोन किग्रॅ. असते. फळात बिया थोड्याच असतात. इतर प्रकारांच्या फळांच्या मानाने वॉशिंग्टन प्रकारचे फळ जास्त टिकते. याच्या बियांपासून तयार होणाऱ्या झाडांमध्ये नरझाडांचे प्रमाण पुष्कळ असते. फळे झाडावर उंचावर धरतात. घरगुती बगीच्यासाठी आणि व्यापारी प्रमाणावर लागवडीसाठी हा प्रकार एकंदरीने चांगला आहे.

कूर्ग हनीड्यू: (मधुबिंदु). हा प्रकार हनीड्यू या जवळजवळ बीजरहित आणि खोडावर कमी उंचीवर फळे धरणाऱ्या प्रकारातून सहज मिळालेल्या रोपट्यापासून तयार करण्यात आला आहे. या प्रकाराची फळे आकारमानाने वॉशिंग्टन प्रकारासारखी परंतु काहीशी कमी लांबट व वॉशिंग्टन प्रकारापेक्षा थोडी कमी गोड परंतु फार स्वादिष्ट असतात. फळात गराचे प्रमाण पुष्कळ असून बियांचे प्रमाण कमी असते. फळांचे उत्पन्नही वॉशिंग्टन प्रकारापेक्षा जास्त येते. हा प्रकार गुजरात आणि सौराष्ट्रात फार लोकप्रिय आहे.

रांची: हा प्रकार दक्षिण भारतात लोकप्रिय आहे. फळे जमिनीपासून थोड्या उंचीवर  लागतात आणि ती अंडाकृती व मध्यम आकारमानाची असतात. गर तकतकीत पिवळा, गोड वा अप्रिय वासरहित असतो. बियांपासून तयार केलेल्या झाडांत पुष्कळ प्रमाणात एकसारखेपणा असतो.

गुजरात स्थानिक: या प्रकाराची झाडे मध्यम उंचीची असतात व त्यांना मोठ्या प्रमाणात फळे लागतात. वॉशिंग्टन प्रकाराशी तुलना करता या प्रकाराच्या पानाचा दांडा हिरवा किंवा पिवळसर हिरवा असून पाने व खोड त्याच रंगाची असतात. फुले पांढरी आणि फळे वॉशिंग्टन प्रकारापेक्षा मोठी असतात. फळातील गर मध्यम गोड असतो परंतु चव किंचित कडवट असते व त्याला थोडासा अप्रिय वास असतो.

नवीन सुधारित प्रकारांमध्ये को -१ उत्पन्नाला फार चांगला आहे. फळे चापटगोलपासून लांबटगोल आकाराची असतात. या प्रकारात एक ते सात किग्रॅ. पर्यंत वजनाची फळे व एका झाडाला १०० ते ७०० पर्यंत फळे लागल्याची नोंद आहे.

आ. २. बुटक्या जातीचे पपईचे झाड

पेपेन: कच्च्या परंतु चांगल्या पोसलेल्या फळांपासून पेपेन काढतात. त्यासाठी फळाच्या पृष्ठभागावर बांबूच्या टोकदार फाट्याने अगर इतर अधातूच्या शस्त्राने लांबीच्या दिशेने ओरखडे काढतात. त्यामुळे सालीमधून दुधासारखा पांढरा चीक वाहू लागतो. तो अधातूच्या भांड्यात गोळा करुन घेतात. हे चीक गोळा करण्याचे काम सकाळीच करतात. गोळा केलेला चीक लगेच अल्कोहॉलामध्ये ठेवतात. नंतर तो ३९° से. तापमानावर कृत्रिम उष्णतेत किंवा उन्हात वाळवितात.सहारणपूरच्या फलसंशोधन केंद्राने पेपेन काढण्याची नवीन पद्धत शोधून काढलेली आहे. या पद्धतीत गोळा केलेला चीक अल्कोहॉ़लामध्ये टाकून घट्ट करतात. तो घट्ट चीक ॲसिटोनामध्ये धुतात व सल्फ्यूरिक अम्लाच्या साह्याने निर्वात पात्रात वाळवितात व हवाबंद बाटल्यांमधून यूरोप-अमेरिकेकडे पाठवितात. तेथे त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून तो भुकटी अगर वड्यांच्या स्वरूपात विक्रीकरिता तयार करतात. फायबर बोर्डच्या डब्यांत भुकटी भरून परदेशी पाठवितात. पेपेनामध्ये प्रथिन – पाचकगुण असतो. पेपेनाचा उपयोग औषधि-द्रव्यांत आणि उद्योगधाद्यांत करतात म्हणून त्याला नेहमी मागणी असते आणि भाव चांगला मिळतो. भारतामध्ये केलेल्या प्रयोगांत असे आढळून आले की, ५०-६० फळे असलेल्या झाडापासून एका हंगामात २२५ ग्रॅ. कच्चे किंवा अशुद्ध पेपेन मिळते. चीक काढून घेतलेली फळे झाडावरच असतात. ती पिकू दिल्यास खाण्यासाठी वापरता येतात परंतु त्यांचा उपयोग पाकवलेले व इतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी करणे उपयुक्त ठरते. जसजशी फळे पिकतात तसतसे त्यांतील पेपेनाचे प्रमाण कमी होऊ लागते [→पेपेन].

उत्पन्न: पपईची झाडे एका वर्षाची झाल्यावर त्यापुढील १२ ते १८ महिन्यांपर्यंत त्यांपासून नियमित फळे मिळतात. तद्नंतर फळांचे आकारमान लहान होते व संख्याही घटते. सरासरीने दरसाल हेक्टरी २५,००० ते ५०,००० किग्रॅ. वजनाची फळे मिळतात. भारतात दर झाडाला एका वर्षात २० ते १५० फळे धरतात. महाराष्ट्रात सरासरीने प्रत्येक झाडाला २७ फळे धरतात व फळाचे सरासरी वजन एक किग्रॅ. असते. झाडे ३-४ वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत राहू देणे आर्थिक दृष्ट्या किफायतशीर नसते.


फळाचे रासायनिक संघटन: पपईच्या फळांतील द्रव्ये व त्यांचे सरासरी शेकडा प्रमाण पुढीलप्रमाणे असते : जलांश ८९·५, प्रथिने ०·५, कार्बोहायड्रेटे ९·५, स्निग्ध पदार्थ ०·१, खनिज पदार्थ ०·४.

पाटील, अ. व्यं.

रोग: पपईवर केवडा, खोडकूज किंवा मूळकूज, करपा इ, रोग आढळतात.

केवडा: हा रोग महाराष्ट्रात पपईचा गंभीर रोग मानला जातो. कारण याच्यामुळे या पिकाचे पुणे जिल्ह्यामधून जवळजवळ उच्चाटन झाले आहे. हा व्हायरसजन्य रोग असून त्याचा प्रादुर्भाव १९४८ सालापासून महाराष्ट्रात, विशेषतः पुणे जिल्ह्यात होऊन शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले. या रोगामुळे प्रथम पानांवर पिवळे ठिपके दिसतात. त्यानंतर हिरव्या पिवळ्या पानांच्या पृष्ठभागावर कोडाप्रमाणे हिरव्या रंगाचे चट्टे दिसतात. पानांच्या दांड्यांची लांबी कमी होते आणि खोड व पानांंच्या देठांवर जलासिक्त (पाण्याने भिजल्यासारखे) भाग आढळतात. रोगग्रस्त झाडांना फळे खूप कमी लागतात व ती आकारमानाने लहान राहतात. रोगाचा जोर जास्त असल्यास झाडे खुरटी राहतात आणि त्यांना फळे येत नाहीत. हा रोग मावा किडीमार्फत फैलावतो. रोगट झाडे तोडून काढून नष्ट करणे हाच एकमेव उपाय उपलब्ध आहे. जर हा रोग एखाद्या टापूत सर्वत्र पसरलेला आढळला, तर त्या भागात एकदोन वर्षे पपईचे पीक घेत नाहीत.

खोडकूज: हा रोग पिथियम ॲफानिडरमेटम या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो. यात खोडाचा जमिनीलगतचा भाग कुजू लागतो. त्यामुळे पाने वाळू लागून कालांतराने झाड मरते. पाणथळ जागी हा रोग नेहमी आढळून येतो. उपाय म्हणून या पिकाखालच्या जमिनीतील पाण्याचा निचरा उत्तम प्रकारचा ठेवतात.

करपा: (अँथ्रॅक्नोज). कोलेटॉट्रिकम ग्लिओस्पोरिऑयडिस कवकामुळे फळावर व पानांवर व्रण पडतात. पाने व फुले-फळे गळतात. यावर उपाय म्हणून मोरचूद आणि धुण्याचा सोडा यांच्यापासून तयार केलेले बर्गंडी मिश्रण झाडावर फवारतात. रोगग्रस्त पाने, फुले, फळे गोळा करून नष्ट करतात.

कीड: पपईवर किडीचा उपद्रव फारसा आढळत नाही. कधीकधी लाल कोळी (रेड स्पायडर) पानांवर किंवा तयार फळांवर आढळतात. त्यांच्यामुळे पाने पिवळी पडतात व फळांवर तपकिरी रंग येतो. यामुळे उत्पन्न घटते. उपाय म्हणून गंधकाची भुकटी झाडावर पिस्कारतात.

रुईकर, स. के.

संदर्भ :1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.

   2. I. C. A. R. Fruit Culture in India, New Delhi, 1963.

   4. Singh, R. Fruits, New Delhi, 1969.

   ४. नागपाल, र. ला. अनु. पाटील, ह. चिं. फळझाडांच्या लागवडीची तत्त्वे आणि पद्धती आणि फळे टिकवून ठेवण्याची तत्त्वे आणि पद्धती, नवी दिल्ली, १९६३.