पनवेल: महाराष्ट्र राज्याच्या कुलाबा जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या २६,६०२ (१९७१). हे मुंबईच्या पूर्वेस सु. २६ किमी. वर मुंबई–बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर व मुंबई – कोकण – गोवा या राज्य महामार्गावर पनवेल खाडीच्या टोकाशी वसले आहे. येथून उत्तरेस ठाण्याकडे, आग्नेयीस खोपोलीकडे (बोरघाट), नैर्ऋत्येस उरणकडे व पश्चिमेला उलव्याकडे मार्ग जातात. दिवा–पनवेल–उरण–आपटा या नव्या कोकण लोहमार्गाने ते मुंबईशी जोडल्याने तसेच भरती आल्यावर लहान बोटी जा–ये करू शकत असल्यामुळे पनवेलला वाहतूक व व्यापारी केंद्राचे स्वरूप आले आहे. येथे तांदूळ, मीठ, मासे यांचा व्यापार चालतो. १५७० मध्ये हे गुजरातला काही महसूल देत असे तसेच एक यूरोपीय बंदर म्हणूनही याचा उल्लेख आढळतो.  इंग्रजांनी येथून मराठ्यांवर अनेक हल्ले केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. येथे पूर्वीपासून बैलगाडीची चाके बनविण्याचा उद्योग चालत असून मुंबईच्या सान्निध्यामुळे अनेक लहानमोठे कारखाने निर्माण होऊ लागले आहेत. पनवेलला ‘धूतपापेश्वर’ हा खाजगी क्षेत्रातील व ‘हिंदुस्थान ऑर्‌गॅनिक केमिकल्स’ (रसायनी) हा सार्वजनिक क्षेत्रातील असे औषध कारखाने आहेत. शहरात नगरपालिका (१८५५) असून गाडी नदीतून गावास पाणीपुरवठा होतो. अद्याप येथे जलनिकास योजना नाही. पूर्वी बाळाजीपंत बापटांनी बांधलेले अनेक तलाव येथे असून पार्वती, कृष्णाली, वडाळा हे त्यांपैकी प्रमुख होत. येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची सोय असून सरकारी मूलोद्योग प्रशिक्षण महाविद्यालयही आहे. येथे खारजमीन व भात संशोधन केंद्र आहे. गावाच्या वायव्येस तलावाकाठी करिमशाह नावाच्या मुस्लिम साधुपुरुषाची कबर आहे. पनवेलला माघ शुद्ध एकादशीस मोठी यात्रा भरते.

पाठक, सु. पुं.