पद्मक: (पद्मकाष्ठ हिं. पद्दम इं. हिमालयन वाइल्ड चेरी लॅ. प्रूनस पद्दम, प्रू. सेरॅसॉइडीस कुल-रोझेसी). हा मोठा पानझडी वृक्ष समशीतोष्ण हिमालयात गढवाल (९३०–१,८६० मी.) ते सिक्कीम व भूतान (१,५५०–२,४८० मी.) पर्यंत व कोडईकानल, ऊटकमंड इ. ठिकाणी जंगली अवस्थेत आढळतो त्याची लागवडही करतात. याची साल तपकिरी व गुळगुळीत, चकचकीत असून तिचे आडवे तुकडे सोलले जातात. पाने साधी, एकाआड एक, ७ – १२ सेंमी., चिवट, लांब व दातेरी असतात. नागा टेकड्यांत आढळणाऱ्या वृक्षांना मार्च-एप्रिलमध्ये पांढरी, लाल किंवा जांभळी फुले एकेकटी किंवा झुबक्यांनी येतात व त्यानंतर नवी पालवी येते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ रोझेलीझ गणात (गुलाब गणात) वर्णिल्याप्रमाणे असतात. दार्जिलिंग टेकड्यांत किरमिजी रंगाच्या फुलांचे मोठे (२७ मी.) वृक्ष व लालसर फुलांचे लहान (११ मी.) वृक्ष असे दोन प्रकार असावेत, असे इनग्रॅम यांचे मत आहे परंतु त्यापेक्षा फुले फक्त तशा बदलत्या रंगाची असावीत असे काही शास्त्रज्ञ मानतात. ह्याची आठळी फळे (अश्मगर्भी) लंबगोल, १·२५ सेंमी. लांब, लाल किंवा पिवळी, तुरट पण खाद्य व स्तंभक (आकुंचन करणारी) असतात फळाच्या बहाराच्या वेळी वृक्ष सुंदर दिसतो. फळातील आठळ्यांपासून माळा व लाकडापासून हातातल्या काठ्या बनवितात. तसेच ते कातीव कामासही उपयुक्त असते. खोडापासून ‘चेरी डिंक’ मिळतो. तो ट्रॅगॅकांथ डिंकात [⟶ डिंक] भेसळ करतात. सालीत ॲमिग्डॅलीन आणि लहान फांद्यांत डायड्रोसायानिक अम्ल असते. बियांतील मगज (गर) मुतखडा (अश्मरी) व रेती यांवर देतात. फळांपासून दारू करतात. पद्मक नावाने बाजारात मिळणारे फांद्यांचे लहान तुकडे औषधी असतात. बोटाने त्यांवर घासल्यास सुगंध येतो. त्यांतील सत्त्व विषारी, कडू, पौष्टिक, स्तंभक (ओकारी थांबण्यावर) असून वेदनाहारक असते. हे काष्ठ थंड पाण्यात उगाळून सुक्या कंडूवर लावतात. साल कातडी कमाविण्यास वापरतात. कोवळ्या फांद्या कुटून पाण्यात टाकून ते पाणी पोटात घेतल्यास वंध्यत्व कमी होते. नवीन लागवड बिया व कलमे लावून करतात. निसर्गतः मुळांपासून निघणाऱ्या फुटव्यांपासून नवीन झाडे बनतात. बिया लवकर रुजतात वाढलेल्या रोपांचा वापर खुंटांप्रमाणे नवीन कलमांकरिता होतो. जरदाळू, चेरी, बदाम, सप्ताळू, अलुबुखार इ. वनस्पती पद्मकाच्या वंशातील आहेत.
परांडेकर, शं. आ.
“