पटेल, पन्नालाल : (७ मे १९१२ –) एक श्रेष्ठ गुजराती कांदबरीकार व कथाकार. त्यांचा जन्म राजस्थानमध्ये मांडली (जि. डुंगरपूर) या गावी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. आईवडील हिराबेन व नानालाल. राजस्थानात व गुजरातमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले तथापि मॅट्रिकची परीक्षा मात्र ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यांचे बालपण व पूर्वायुष्य वऱ्याच हालअपेष्टांत व विविध ठिकाणी नोकऱ्या करण्यात व्यतीत झाले. शिक्षणातही वारंवार खंड पडत होता. राजस्थान ही त्यांची जन्मभूमी असली, तरी त्यांची कर्मभूमी गुजरातच राहिली. उमाशंकर जोशी हे त्यांचे शाळेतील मित्र. त्यांच्याच प्रेरणेने व उत्तेजनाने पन्नालाल साहित्यक्षेत्रात प्रविष्ट झाले. उमाशंकरांच्या मदतीचा ते मोठ्या कृतज्ञतेने उल्लेख करतात. सुरुवातीस त्यांनी काही कविता लिहिल्या पण नंतर ते कथा-कादंबरीलेखनाकडे वळले. उमाशंकर जोशी व ‘सुंदरम्’ यांनी त्यांच्या सुरुवातीच्या लेखानाचे कौतुक करून त्यांना उत्तेजन दिले. ‘शेठनी शारदा’ ही त्यांची पहिली कथा १९३६ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक इ. प्रकारांत विपुल लेखन केले. मळेला जीव ही त्यांची कादंबरी राजकोट येथून प्रसिद्ध होणाऱ्या फूल छाव दैनिकातून क्रमशः प्रसिद्ध झाली आणि एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून त्यांना प्रतिष्ठा लाभली. सुमारे चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबऱ्या, ५ नाटके, आठवणी, बालसाहित्य यांसारखी विपुल साहित्यनिर्मिती त्यांनी केली. जनसत्ता ह्या दैनिकातून ते एक उपरोधपर सदर लिहीत असत. १९५० मध्ये त्यांना गुजराती साहित्याचा सर्वोच्च असा रणजीतराम सुवर्णचंद्रक मिळाला. वास्तव्य अहमदाबाद येथे. गुजरात सरकारकडून आतापर्यंत त्यांच्या १७ कृतींना पुरस्कार प्राप्त झाले.
ग्रामीण जीवनावर आधारित वास्तवावादी कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. उत्तर गुजरातच्या, विशेषतः साबरकांठा प्रदेशातील, ग्रामीण जीवनाचे हर्षशोकभरित, करुणगंभीर चित्रण त्यांनी समर्थपणे आपल्या कथा-कादंबऱ्यांतून केले आहे. दैनंदिन जीवनाच्या वस्यातून उच्च व विशाल मानवतेचे भव्योदात्त दर्शन त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून परिणामकारकपणे घडविले आहे. मळेला जीव (१९४१), मानवीनी भवाई (१९४७) सारख्या त्यांच्या कादंबऱ्यांतील प्रणयप्रसंग किंवा संघर्ष काही नवीन नाहीत तथापि मानवी जीवनाचा त्यांनी त्यांतून घेतलेला अंतर्बाह्य वेध व त्यांतील सूक्ष्म विश्लेषण जितके हृदयस्पर्शी आहे, तितकेच ते आदर्श, भव्योदात्त व कलात्मकही आहे. म्हणूनच त्यांच्या ह्या कादंबऱ्या गुजरातीत महत्त्वपूर्ण आणि लोकप्रियही ठरल्या आहेत. भीरू साथी (१९४२), ना छूटके (१९५५), भांग्या ना भेरू (१९५५), पडघा अने पडछाया (१९६०), मनखावतार (१९६१), करोळिया नु जाळ (१९६३), आँधी आषाढ नी (१९६४), मीणा माटी ना मानवी (१९६६), कुंकु (१९६८) ह्या त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्या होत. साचां शमणां (१९४९), वात्रक ने कांठे (१९५१), दिल नी वात (१९५६), तिलोत्तमा (१९६०), धरती आभ ना छेटां (१९६२), त्यागी अनुरागी (१९६३) इ. त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह होत. चांदो शें शामको (१९६०), ढोलिया साग सीसम ना (१९६४), सपना ना साथी (१९६७) इ. त्यांची नाटके असून जमाई राज (१९५१) हा त्यांच्या एकांकिकांचा संग्रह होय. अलप-झलप (१९७३) मध्ये त्यांच्या आठवणी संगृहीत केलेल्या आहेत. त्यांनी किशोर आणि बालसाहित्यही विपुल लिहिले आहे. त्यांत एक खोवायेलो छोकरो (१९६९), बाळ किल्लोल (१९७२), वार्ता किल्लोल (२ भाग, १९७२-७३), महामारत किशोर कथा (१९७६) इ. उल्लेखनीय होत. मळेला जीव ह्या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीवर उलझन नावाचा हिंदी चित्रपटही निघाला. मराठीत ही कादंबरी जीवी नावाने भाषांतरित झालेली आहे. इतर भाषांतूनही त्यांच्या या व इतर काही कादंबऱ्यांचे अनुवाद झाले आहेत.
गुजरातच्या ग्रामीण जीवनाचे वास्तव व प्रामाणिक चित्रण आपल्या कथा-कादंबऱ्यांतून समर्थपणे करणारे पन्नालाल पटेल हे आद्य लेखक होत. गुजराती लोकभाषेच्या सामर्थ्याची साक्ष त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून पटते. गुजराती साहित्यात त्यांनी घातलेली ही मोलाची भर म्हणावी लागेल.
सुर्वे, भा. ग.