पंप, महाकवि : (९०२ – ?). कन्नडमधील आद्य महाकवी. ‘आदिपंप’ म्हणून तो ओळखला जातो. त्याची चरित्रपर काही माहिती त्याच्या ग्रंथांत आली आहे. वेंगीमंडलातील वेंगीपळू नावाच्या गावी एका सधन व प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबात त्याचा जन्म झाला. जातीने तो देवराय ब्राह्मण होता. पित्याचे नाव अभिराम. गुरूचे नाव देवेंद्रमुनी. तत्कालीन पद्धतीनुसार त्याचे शिक्षण झाले. वेदाध्ययन त्याने केले होते. संस्कृत, प्राकृत, जैन धर्म, गायन-नृत्यादी कला, अर्थशास्त्र, राज्यशास्त्रादींचा त्याचा उत्तम व्यासंग होता. त्याचा जन्म वेंगीमंडलात झाला असला, तरी त्याचे बरेच आयुष्य पुलिगेरेच्या (धारवाड जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर) वयलुसीमेत व बनवासीच्या ‘मल्नाड’ प्रदेशात व्यतीत झाले. निसर्गसौंदर्यसंपन्न बनवासीवर तर त्याचे उत्कट प्रेम होते. वडिलांनी पंपाच्या जन्मापूर्वीच वैदिक धर्म सोडून जैन धर्माचा स्वीकार केला होता तथापि वैदिक धर्माविषयीही त्यांना आदर वाटत होता. पंपावरही लहानपणी हा सर्वधर्मसहिष्णुतेचा खोल संस्कार झाला. कन्नड भाषेवरही पंपाचे प्रभुत्व होते. वैदिक व जैन या दोन्हीही धर्मांतील सारभूत तत्त्वे वस्तुनिष्ठ भूमिकेतून समजावून घेऊन त्यांचा अधिक व्यापक अशा मानवतावादी धर्मात समन्वय करण्याची बौद्धिक परिपक्वता त्याच्या ठिकाणी होती.
पंप केवळ कवीच नव्हता, तर शूर व कुशल योद्धाही होता. चालुक्यवंशी राजा दुसरा अरिकेसरी याच्या दरबारात पंप राजकवी व सेनापती म्हणून होता. राजाचीही त्याच्यावर विशेष मर्जी होती व त्यालाही राजाविषयी कमालीचा आदर वाटत होता. अरिकेसरी ह्या आपल्या आश्रयदात्या राजास अमर कीर्ती प्राप्त करून देण्यासाठी पंपाने त्याला आपल्या विक्रमार्जुनविजय अथवा पंपभारत ह्या महाकाव्याचा अर्जुनाच्या रूपातील नायक मानले आहे.
आदिपुराण व विक्रमार्जुनविजय ही त्याची दोन प्रसिद्ध चंपूकाव्ये होत. ती त्याने ९४१ मध्ये रचली. ‘पंप’ हे नाव त्याला कसे प्राप्त झाले याबाबत त्याच्या कृतींत निर्देश आढळत नाही तथापि ‘हम्प’ ह्या रूपात हे नाव आजही कर्नाटकात रूढ आहे. पंपाचे जीवन समृद्ध व समन्वयशील होते. सत्ता, संपत्ती, कीर्ती इ. लौकिक सुखे त्याला सहज प्राप्त झाली तथापि त्यात तो कधीच फारसा रमला नाही. त्याच्या चिंतनशील वृत्तीचा प्रत्यय त्याच्या काव्यांत येतो. राजाने दिलेले ऐश्वर्य व सुखोपभोग दूर सारून तो लंबून्नपाटक नावाच्या एकांतस्थळी कुटी उभारून तेथे राहू लागला. वैराग्य व रसिकता यांचे सुरेख संतुलन त्याच्या व्यक्तिमत्त्वात झाल्याचे दिसते.
आपल्या पंपभारतात त्याने ‘मी येथे लौकिकास उजाळा देईन व तेथे (आदिपुराणात) आगमिक म्हणजे धार्मिक विषयास उजाळा देईन’ असे जे म्हटले आहे ते सार्थ करून दाखविले. धार्मिक व लौकिक अशा दोन्ही प्रकारचे ग्रंथ लिहिण्याची परंपरा कन्नडमध्ये पंपापूर्वीही असल्याचे (उदा., गुणवर्मा पहिला याचे हरिवंश वा नेमिनाथपुराण व शूद्रक हे ग्रंथ) दिसते तथापि असे ग्रंथ आज तरी पूर्णपणे उपलब्ध नाहीत. पंपाचे या दोन्हीही प्रकारांतील ग्रंथ मात्र संपूर्णपणे उपलब्ध आहेत.
आदिपुराण हे पहिले तीर्थंकर आदिनाथ यांच्या बाबतचे पुराण असून त्यात आदिनाथांसोबतच त्यांचा पुत्र चक्रवर्ती भरतेश्वर याचेही चरित्र वर्णिले आहे. ⇨ आचार्य जिनसेन (सु. नववे शतक) याचा पूर्वपुराण नावाचा संस्कृत ग्रंथ पंपाच्या आदिपुराणाचा आधार आहे. कथानक, क्रम इत्यादींबाबत पंपाने मूळ आधारग्रंथाचे अनुकरण केले असले, तरी आदिपुराणात पंपाच्या स्वतंत्र प्रतिभेचाही प्रत्यय येतो. पूर्वपुराणात काव्यापेक्षा पुराणकथनावर, तर आदिपुराणात पुराणापेक्षा काव्यदृष्टीवर अधिक भर दिला आहे. आदिपुराण हे संपूर्णपणे चंपूकाव्याच्या शैलीत लिहिले असून मूळ पूर्वपुराणातील विस्तार त्यात टाळला आहे. संक्षेपाचा व एकसंध कथानकाचा त्यात कटाक्षाने अवलंब केला आहे. ‘आदिपुराणातील काव्यधर्म व धर्म ह्या दोहोंनाही समजून घ्या,’ असे पंपानेच त्यात (१·३८) म्हटले आहे. यात काही ठिकाणी संस्कृतप्रचुर शैली आढळत असली, तरी कथानक व व्यक्तिरेखा यांबाबत काव्यगुणांचा आणि धार्मिक भावनेचा सुंदर समन्वय कवीने साधला आहे. या काव्यातील अनेक प्रसंग अत्यंत सरस उतरले आहेत. धर्म, अर्थ, कामादी पुरुषार्थ, वर्णव्यवस्था इ. बाबतचे कवीचे काव्यरूप घेतलेले विचार विशेष प्रभावी आहेत. पूर्वपुराणाचा आधार घेऊनही कवीने आदिपुराणास आपल्या प्रतिभासामर्थ्याने स्वतंत्र व अलौकिक अशा काव्याची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. कन्नडमधील एक उत्कृष्ट काव्य म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. पंपभारत वा विक्रमार्जुनविजय ह्या त्याच्या लौकिक काव्यासही कन्नड साहित्यात अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले आहे.
सुर्वे, भा. ग.