पंडक : (पँडा). मांसाहारी गणातील प्रोसिऑनिडी कुलात ⇨ रॅकूनांच्या बरोबर यांचाही समावेश होतो. यांच्या दोन जाती असून दोन्हीही आशियात आढळतात.
लहान पंडक : याला तांबडा पंडक असेही म्हणतात. याची एकच जाती असून तिचे प्राणिशास्त्रीय नाव आयल्युरस फुलगेन्स हे आहे. हे प्राणी हिमालयाच्या समशीतोष्ण अरण्यमय भागात १,५२५ मी. पेक्षाही जास्त उंचीवर राहतात. याशिवाय ते नेपाळ, सिक्कीम, उत्तर ब्रह्यदेश व दक्षिण चीन येथेही सापडतात. ते बांबूच्या जंगलांत राहतात.
याची डोक्यासकट शरीराची लांबी ६० सेंंमी. असते. शेपूट ४० सेंमी. लांब असते आणि वजन ३-४ किग्रॅ. असते. अंगावरील केस मऊ, लांब व दाट असतात. शेपूट केसाळ असते. अंगाचा रंग तक तकीत तांबूस पिंगट असतो. शेपटीवर फिक्कट तपकिरी रंगाची वलये असतात. चेहरा व खालचा ओठ पांढरा असतो. प्रत्येक डोळ्यापासून मुखाच्या कोपऱ्यापर्यंत गेलेला एक तांबडा पट्टा असतो. कानांची मागची बाजू, पाय आणि शरीराची खालची बाजू गडद तांबूस तपकिरी किंवा काळ्या रंगाची असते. डोके गोलसर, कान मोठे, उभे व टोकदार, मुस्कट आखूड व जाड आणि पाय आखूड असतात. पायांचे तळवे केसाळ असतात आणि बोटावरील नखर (नखे) अर्धवट आत ओढून घेता येतात.
हा प्राणी अंगाचे वेटोळे करून व केसाळ शेपटी डोक्याभोवती गुंडाळून दिवसभर झाडाच्या शेंड्यावरील फांद्यांत झोपून राहतो. संध्याकाळी भक्ष्य शोधण्याकरिता तो जमिनीवर उतरतो आणि सकाळी पुन्हा झाडावर चढून बसतो. यांची जोडपी किंवा कौटुंबिक गट असतात. यांची दृष्टी व श्रवणशक्ती मंद असते आणि घ्राणेंद्रियदेखील विशेष तीव्र नसते.
वनस्पतींची मुळे, बांबूचे कोंब, हिरवे गवत, पाने, गळून पडलेली फळे आणि धान्य हे यांचे भक्ष्य असले, तरी ते अंडी, किडे आणि सुरवंटदेखील खातात.
यांच्या कौटुंबिक जीवानाविषयी फारशी माहिती नाही. हळू शीळ घालून किंवा ची ची करून हे आपले मनोगत एकमेकांना कळवितात. क्षुब्ध मनःस्थितीत गुदद्वाराजवळ असलेल्या एका ग्रंथीच्या स्त्रावाने ते एक प्रकारचा कस्तुरीसारखा उग्र दर्प सोडताता. या उग्र दर्पाचा उपयोग स्वसंरक्षणाकरिता होत असावा.
९०–१५० दिवसांच्या गर्भावधीनंतर मादीला वसंत ऋतूत सामान्यतः एक किंवा दोन पिल्ले होतात. ती आंधळी असून सु. २१–३० दिवसांनी त्यांचे डोळे उघडतात. पिल्ले ठेवण्याकरिता झाडाच्या ढोलीचा किंवा खडकातील फटीचा उपयोग केला जातो. एक वर्षाची होईपर्यंत पिल्ले आईबरोबर किंवा आईबापाबरोबर असतात. तांबडा पंडक सहज माणसाळतो.
मोठा पंडक : याची एकच जाती असून तिचे शास्त्रीय नाव आयल्युरोपोडा मेल्लॅनोल्यूका असे आहे. हे प्राणी चीनच्या सेचवान, सिंक्यांग-उईगुर, कान्सू इ. प्रांतांतील पर्वतावरील अरण्यात आढळतात.
याची डोक्यासकट शरीराची लांबी १·२–१·५ मी. असते शेपटी सु. १२·७ सेंमी. आणि वजन ७५·१६० किग्रॅ. असते. शरीरावर दाट लोकरीसारखे केस असतात त्यांचा रंग काळा व पांढरा अथवा तांबूस असतो. डोळ्यांची जागा, कान आणि पाय काळ्या रंगाचे असतात. खांद्यांवरून एक रुंद काळा पट्टा गेलेला असतो. शरीराचा बाकीचा भाग पांढरा असतो. याचे एकंदर स्वरूप अस्वलासारखे असते.
काही शास्त्रज्ञांच्या मताने हा प्राणी ‘विपथगामी (मूळ नमुन्याच्या लक्षणांशी न जुळणारी लक्षणे असलेला) अस्वल’ आहे, तर इतर काहींच्या मताप्रमाणे तो रँकून आणि त्यांचे संबंधी (प्रोसिऑनिडी कुल) यांचा जवळचा नातेवाईक आहे. डोके सापेक्षतेने अवजड असते. बांबूचे धुमारे, लांब कोंब वगैरे पकडण्याकरिता पुढच्या पायांच्या पंजांचे विशेष प्रकारे परिवर्तन (बदल) झालेले असते. यामुळे पुढच्या पायांचा हातांसारखा उपयोग करता येतो. शेपटीच्या खाली गंध ग्रंथी असतात.
प्रजोत्पादनाचा काळ सोडून इतर वेळी हे एकेकटेच असतात. सबंध वर्षभर हे प्राणी कार्यप्रवण असतात. हिवाळ्यात ते शीतसुप्ती (हिवाळ्यात येणारी अर्धवट वा पूर्ण गुंगीची स्थिती) घेत नाहीत. कुत्र्यांनी किंवा इतर शत्रूंनी पाठलाग केला, तर ते चटकन झाडावर चढतात पण ते मुख्यतः जमिनीवरच राहणारे आहेत. झाडांच्या ढोल्या, खडकांतील फटी व गुहा यांचा ते कधीकधी निवाऱ्यासाठी उपयोग करतात.
दिवसाचे १०–१२ तास ते चरण्यात घालवितात. बांबूचे कोंब व मुळ्या हे जरी त्यांचे मुख्य भक्ष्य असले तरी ते इतर वनस्पती, गवत आणि लहान प्राणी खातात.
प्रजोत्पादनाचा काळ बहुधा वसंत ऋतू हा असतो. त्याच्या पुढच्या जानेवारी महिन्यात मादीला एक किंवा दोन पिल्ले होतात. प्रत्येक पिल्लाचे वजन सरासरी २ किग्रॅ. असते.
मोठा पंडक सहज माणसाळतो. प्राणिसंग्रहालयामध्ये ठेवलेल्या पंडकांच्या माकडचेष्टा पाहून बघणाऱ्यांची करमणूक होते.
यार्दी, ह. व्यं.
“