पंजाबी साहित्य : बहुसंख्य आधुनिक भारतीय भाषांसारखाच पंजाबीचाही उगम सु. नवव्या – दहाव्या शतकापर्यंत मागे जातो. बाराव्या-तेराव्या शतकांत स्वतःची अशी खास अस्मिता, लकब व वैशिष्ट्ये प्राप्त झालेल्या विकसित भाषेचे स्वरूप तिला लाभलेले दिसते. अरिदेहमानचा (अब्दुल रेहमान) स्नेहरसक हा ग्रंथ नवव्या किंवा दहाव्या शतकातील मानला जातो. त्याच्या अपभ्रंश भाषेत आधुनिक पंजाबीत आढळून येणारे कित्येक पंजाबी शब्द सरमिसळ झालेले दिसतात. पुष्य, चंद बरदाई, गोरखनाथ, चर्पटीनाथ इत्यादींंच्या रचनांतदेखील प्राचीन पंजाबीचे अनेक विशेष दृष्टीस पडतात. ख्यातनाम पंजाबी पंडित मोहनसिंग सांगतात, की अकराव्या ते पंधराव्या शतकांतील प्राचीन पंजाबीवर अपभ्रंश भाषेचे वर्चस्व दिसून येते.

काव्य : पंजाबी साहित्याची समृद्ध परंपरा इतिहासातील मध्ययुगात सुरू होऊन विकसित झाली. पंजाबी साहित्याचा आज उपलब्ध असलेला सर्वांत प्राचीन पुरावा म्हणजे बाबा फरीद शकरगंज (११७३–१२६६) यांची रचना. पंजाबी साहित्याच्या काही इतिहासकारांच्या मते पंजाबी साहित्याचा उगम फरीद शकरगंज यांच्यापूर्वीच झालेला असावा. कारण फरीद यांच्या काव्यात दृग्गोचर होणारी उत्कृष्ट अभिव्यक्ती व प्रभावी प्रतीकयोजना ही आधीच्या साहित्यनिर्मितीची प्रदीर्घ परंपरा अस्तित्वात असल्याविना साधण्यासारखी नाही. पण उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यापुरते बोलायचे, तर फरीद यांचे काव्यच प्राचीनतम मानावे लागते. फरीदनंतरदेखील पंजाबी साहित्याची तीन शतके निर्मितीच्या दृष्टीने वैराणच गेलेली आढळतात. ही विलक्षण अशी तीन शतकांची पोकळी भरून काढायलाच जणू पंधराव्या शतकाच्या तिसऱ्या चरणात पंजाबी साहित्यसृष्टीच्या क्षितिजावर गुरू ⇨नानकदेव (१४६९–१५३९) यांचा उदय झाला. सारांश, पंजाबी काव्यपरंपरेच्या अगदी दूरवरच्या भूतकालीन टोकावर उभ्या ठाकलेल्या फरीदनी घालून दिलेल्या मानदंडांच्या आधारेच पंजाबची काव्यप्रतिभा स्वतःची खास वैशिष्ट्ये प्राप्त करून घेऊ शकली. पंजाबच्या साहित्यिक इतिहासावर दृष्टिक्षेप टाकताच ध्यानी येते, की पंजाबी काव्यसृष्टीत पुनःपुन्हा अवतरणारे काही आकृतिबंध फरीद यांच्याच रचनेत प्रथम साकारलेले होते. साहित्यनिर्मितीचे एक मूलभूत तत्त्व म्हणून भाषाबाहुल्याचा स्वीकार बुद्धिपूर्वक केला, तो पंजाबी साहित्याचे खरेखुरे प्रतिनिधी असलेल्या फरीद यांनीच. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि अभूतपूर्व आशय व दिशा यांची जोड पंजाबी साहित्याला लाभली. फरीद यांना स्वाभाविकपणे साधणारी भाषा म्हणजे पंजाबी (लहेंदी किंवा मुलतानी) पण त्यांना शिक्षण मिळाले ते फार्सी व अरबी या भाषांतून. व्रज व फार्सी भाषांत श्लोक रचण्याचा प्रयत्न त्यांनी केला असला, तरी ते पंजाबीचेच सिद्धहस्त सूफी कवी होते. सर्वसाधारण माणसाला आवाहन करण्याच्या दृष्टीने फरीदनी स्थानिक बोलभाषेचीच निवड केली आणि त्यांच्या व इतर मुसलमान सूफी संतांच्याही अनुयायांनी काव्यरूप संवादाचे माध्यम या नात्याने बहुजन समाजाचीच भाषा स्वीकारली याचे दूरगामी परिणाम झाले. उत्तर भारतात मुसलमानी राजवटीच्या वाढत्या वर्चस्वाच्या काळाशी समांतर असलेल्या साहित्यिक मध्ययुगात, पंजाबीचा एक आधुनिक भारतीय भाषा म्हणून उदय होण्याच्या संदर्भात, हा परिणाम विशेष लक्षणीय म्हणावा लागेल. पंजाबीत साहित्यरचना करून एकीकडे फरीद बहुजन समाजाशी जिव्हाळ्याचा संपर्क साधू पाहत होते आणि त्याबरोबरच दुसरीकडे उर्वरित भारतातील जनतेशी वैचारिक संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्नही त्यांनी चालविला होता. त्यासाठी त्यांनी व्रज व फार्सी भाषांचे माध्यम योजिले होते. पंजाबी साहित्याच्या इतिहासातील नंतरच्या काळातही भाषाबाहुल्याची ही परंपरा उत्तरकालीन कवींनी काळजीपूर्वक जोपासल्याचे आढळून येते.

पंजाबची साहित्यपरंपरा नव्याने साकार होत असतानाच तद्देशीयांच्या अस्मितेवर इस्लामी संस्कृतीची छाप पडू लागल्याने गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली. तिच्यातून नाना प्रकारचे तणाव उत्पन्न झाले व त्यांचा अपरिहार्य परिणाम मध्ययुगीन पंजाबी साहित्याच्या विकासावरही घडून आला. भारताच्या सर्वसमावेशक व सर्वसहिष्णू प्रवृत्तीला तर हे मोठे आव्हानच ठरले. इस्लाम व हिंदू धर्म यांचा मेळ तर सुतराम् अशक्य होता आणि मुसलमानांचा पवित्रा तर जबरदस्तीने बाटवाबाटबीचा होता. साहजिकच आपल्या भारतीय परंपरेच्या रक्षणार्थ हिंदूंना कंबर कसावी लागली. मुसलमान आक्रमक व राज्यकर्ते हे अतिविस्तृत अशा जगाचे घटक होते आणि त्यांचे हितसंबंधदेखील अत्यंत व्यापक, जवळजवळ विश्वव्यापी बनलेले होते. हिंदूंचे विश्व त्या मानाने खूपच संकुचित होते. हालचालींची सुलभता आणि कडक शिस्त यांच्या बळावर त्या काळी जवळजवळ अद्वितीय ठरलेल्या सैनिकी सामर्थ्यानिशी मुसलमानांनी हिंदूंशी संघर्ष सुरू केला. ग्रंथप्रमाण्यवादी मुसलमानांचे ध्येय अखिल जगात साम्राज्य प्रस्थापित करणे हेच असून त्यांना इतिहासाची डोळस जाणीवही होती. त्यांचा आत्मविश्वास, अभिमान आणि आशावादही दुर्दम्य होता. थोडक्यात म्हणजे साम्राज्यवादी ध्येयनिष्ठेने भारलेला मुसलमान समाज आणि परंपराप्रेमी कूपमंडुक वृत्तीचा हिंदू समाज यांत दोन ध्रुवांइतके अंतर होते. दुर्दम्य आत्मविश्वासमुळे मुस्लिमांच्या अत्यंत क्रूर आणि कारस्थानी अशा आक्रमणांनाही चैतन्याचे तेजोवलय लाभले होते. गुरू नानकांनी चालू केलेल्या शीख धर्माच्या आंदोलनाने बलाढ्य इस्लामच्या सांस्कृतिक आक्रमणाला निकराचा विरोध केला. परिणामी एकीकडे विदेशी राज्यकर्ते आणि पंजाबचे भारतीय नागरिक यांच्यात, तर दुसरीकडे परकीय धर्म व संस्कृती आणि एतद्देशीय धर्मपंथ व संस्कृती यांच्यात अविरत व अव्याहत तणावाचे संबंध निर्माण झाले. त्यांतून सदैव अटीतटीचे सांस्कृतिक संघर्ष उद्‌भवत राहिल्याने कित्येक नवे काव्यप्रवाह उगम पावले. पंजाबी साहित्याच्या समग्र इतिहासात या भिन्न प्रवाहांचा संगम जवळजवळ कुठेच झालेला दिसत नाही. पंजाबच्या काव्यवाहिनीचे प्रमुख प्रवाह दोन : एक शीख गुरूंच्या प्रेरणेतून उगम पावलेला, तर दुसरा मुसलमान सूफी संतांनी आणि साक्षात्कारी पुरुषांनी समृद्ध केलेला. दोन्ही प्रवाह समांतर रेषांत वाहत राहिले परंतु परस्परसमन्वय मात्र ते साधू शकले नाहीत. याच्या नानाविध कारणांचा येथे विचार कारण्याचे प्रयोजन नाही. प्रेरणा व उद्दिष्टे काहीही असोत, एवढे सांगितले म्हणजे पुरे, की मध्ययुगीन पंजाबी काव्याचा स्रोत कधीच एकात्म आणि अखंडित बनू शकला नाही. अनेक सलग प्रवाहांच्या स्वरूपातच तो वाहत राहिला व विकास पावला. त्यांतील प्रत्येक सलग प्रवाहाला स्वतःची अशी खास सामग्री लाभलेली होती. त्यात शैली, वाक्‌संप्रदाय, प्रतीकाकृती, वृत्तानुप्रास, संदर्भपरंपरा, काव्यालंकार, साहित्यप्रकार, लिपी इत्यादींचा समावेश होतो.

इस्लाम धर्म व संस्कृती घेऊन आलेल्या मुसलमानी राजनीतीच्या आव्हानाला गुरू नानकांनी समर्थ पुरुषार्थानिशी तोंड दिल्याचे मागे ध्वनित केलेच आहे. भारतात स्थायिक झालेले मुसलमान अगदी मोगल राजवटीतदेखील स्वतःला भारतबाहेरचे व सार्वभौम नागरिक मानीत आणि विजेत्याचीच आढ्यता बाळगीत. वस्तुतः भारत पादाक्रांत करण्याचा मुसलमानांचा प्रयत्न हा विस्तारवादाचा तर होताच, शिवाय तलवारीच्या बळावर धर्मप्रचार करण्याच्या सिद्धांताशीही तो निगडित झालेला होता. परकीय आक्रमणाचा हा एक नवाच पैलू म्हणायला हवा. आक्रमक व राज्यकर्ते मुसलमान यांच्या निर्घृण अत्याचारांविरुद्ध गुरू नानकांनी प्रतिकारात्मक आंदोलन उभारले. स्वतःच्या गटाला सर्वस्वी अलिप्त ठेवून जनतासंपर्क सर्वतोपरीने टाळणाऱ्या लब्धप्रतिष्ठित परकीय राज्यकर्त्यांच्या ह्या वृत्तीकडेही त्यांनी जनतेचे लक्ष वेधले व ह्या वृत्तीवर कठोर प्रहारही केले. राज्यकर्त्या वर्गाचे चित्रण करताना त्यांनी अशी काही प्रतीके योजिली, की ते क्रूर व रक्तपिपासू लांडगेच भासावेत. ह्या दृष्टीने त्यांची ग्रंथसाहिबातील रचना विशेष उल्लेखनीय आहे.


गुरू नानकांनी राज्यकर्ते, अधिकारी आणि शेवटी त्यांचे हुजरेदेखील अत्यंत क्रूर अशा पशूंच्याच रूपांत चित्रित केले आहेत. राज्यकर्ते निष्पाप प्रजेला पंजाने घायाळ करून वाघासारखे शोषतात, तर अधिकारी कुत्र्यासारखे, असे त्यांनी म्हटले आहे.

भारतातील धार्मिक परंपरेचा नायनाट करण्यासाठी टपलेल्या परकीय राज्यकर्त्यांच्या अरेरावी सत्तेविरुद्ध प्रतिकाराचा आणि बंडाचा झेंडा गुरू नानकांनी उभारला तो याचमुळे. पुढे या उठावाला जोर येऊन मोगलांच्या सामर्थ्याविरुद्ध शिखांनी पुकारलेल्या सैनिकी संघर्षाचे स्वरूप त्याने धारण केले.

गुरू नानाकांच्या कवितेला विशेष स्वरूपाच्या गुणवत्तेची जोड देणाऱ्या त्यांच्या या निषेधपर उठावाला आणखीही एक पैलू आहे. पंथोपपंथांचा बुजबुजाट, कठोर विधिनिषेध, मंत्रतंत्र आणि कल्पनांचे जंजाळ, कर्मकांड व धार्मिक संस्कारांचे आडंबर इ. थोतांडे त्यांना मुळीच सहन होत नसत. परंपरावाद्यांनी चालविलेल्या निर्घृण छळवादाचा तसेच किडलेल्या, कर्मठ ब दुराग्रही ब्राह्मणप्रधान समाजव्यवस्थेने माजविलेल्या हुकूमशाही पद्धतीच्या बाह्योपचारप्रधान कर्मकांडाचा त्यांनी धिक्कार केलेला आहे. विशिष्ट पंथातील अर्थशून्य कर्मकांड व त्यांनी माजविलेले पूजाअर्चांचेआडंबर यांचे अत्यंत मार्मिक विश्लेषण करून, त्यांनी बहुजन समाजाच्या मनात वसणाऱ्या स्वतःच्याच केविलवाण्या अवस्थेविषयी तसेच निराशाजन्य उपेक्षावृत्तीबद्दल खेदही व्यक्त केला आहे. त्यांनी साऱ्या पुरोहितवर्गाचे चित्र अत्यंत तिटकाऱ्याने आणि विदारकपणे रेखाटले आहे.

तात्पर्य, धार्मिक मतामतांचा गलबला, कर्मकांडाचे आडंबर आणि आंधळे धर्मवेड यांच्यावर गुरू नानकांनी व त्यांच्या शीख अनुयायांनी स्वतःच्या काव्यात कठोर टीकेची झोड उठवली आहे. इकडे भारतातील पुराणमतवादी इस्लामविरुद्धही पंजाबमधील सूफी संतांनी निषेधपर चळवळ चालविली होती. धार्मिक कर्मकांड, धर्मशास्त्र, ग्रंथप्रामाण्यवाद, भटाभिक्षुकांचे वर्चस्व तसेच अर्थशून्य धार्मिक आचार यांचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या दृष्टीने पाहता पंजाबी साहित्यातील सूफी परंपरेची कविता आणि शीख गुरूंची कविता यांत विलक्षण साम्य आढळते.

मागे ध्वनित केल्याप्रमाणे गुरू नानकांनी व त्यांच्या अनुयायांनीही फरीदच्या कवितेत प्रथमच दृग्गोचर झालेल्या भाषाबाहुल्याच्या सिद्धांताचे बुद्धिपूर्वक नवनवे प्रयोग करून पंजाब व उर्वरित भारत यांत जिव्हाळ्याचा हृदयसंवाद प्रस्थापित केला. इस्लामच्या सांस्कृतिक आक्रमणाला समर्थपणे तोंड देण्यासाठी नानकांनी व इतर शीख गुरूंनी विदेशी राज्यकर्त्यांशी युद्ध पुकारले आणि स्वतःच्या सांस्कृतिक वारशाची स्वतंत्र अस्मिता टिकविण्याकरिता भारतातील इतर धार्मिक आणि सांस्कृतिक संप्रदायांशी समजूतदारपणाचे व सदिच्छेचे नाते जोडले. त्या दृष्टीने भारताच्या महान परंपरेशी नव्याने अनेकमुखी संबंध जोडून त्यांनी विभिन्न पातळ्यांवर वैचारिक देवाणघेवाणही आरंभिली. उर्वरित भारतातून येणाऱ्या कल्पना, अनुभूती व विचारप्रणाली यांच्यासाठी पंजाबची दारे त्यांनी सताड उघडून दिली. भारतभूमीतील साऱ्याच भाषांचा अंगीकार करून गुरू नानकांनी एक अभिनव साहित्यिक शैली सिद्ध केली. मध्ययुगीन भारतातील परस्परविरोधी पंथोपपंथांचा समन्वय साधून त्यांना सुसंगत आणि एकात्म स्वरूप देण्याच्या दृष्टीने ही शैली अत्यंत सोयीची ठरली. वैचारिक अभिव्यक्तीची ही शैली स्वयंसिद्ध असून तिचे महत्त्व केवळ अभिव्यक्तीचे माध्यम एवढ्यापुरतेच नव्हते, तर स्वतःच्या निष्ठांना तिळमात्र धक्का न लावताही ती उत्कट देशभक्तीला शब्दरूप देण्यासही समर्थ ठरली. या शैलीला ‘पंजाबी’ प्रमाणेच ‘भारती’ ही म्हणावेसे वाटते. एकात्मतेच्या स्वरूपात अवतीर्ण झालेली ही शैली म्हणजे एक चमत्कारच म्हणायला हवा. आक्रमकांचे काही गुणविशेष गुरू नानकांच्या ठायी होते. भाषिक सीमारेषा त्यांनी कधीच अनुल्लंघ्य मानल्या नाहीत. शब्द व पदसंहती या दोहोंनाही त्यांनी परंपरागत आशयाची सांकेतिक क्षेत्रे उल्लंघून नवे नवे अर्थसंदर्भ जोडण्याची, नव्या नव्या दिशा चोखाळण्याची आणि अर्थसघनतेच्या नवनवीन छटा साधण्याची वाट मोकळी करून दिली. गुरू नानकांमागून त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांपैकी गुरू अर्जुनदेव व गुरू गोविंदसिंग यांनी भाषाबाहुल्याचा हा प्रयोग पुढे चालू ठेवला आणि त्यामुळे पंजाब व उर्वरित भारत यांत अविरत वैचारिक संवाद चालू राहून त्यातून अत्यंत प्रौढ असे काव्यशैलीचे माध्यम विकसित झाले. भाषिक साम्राज्यवादाच्या या आंदोलनाची परिसीमा  ⇨ ग्रंथसाहिबाच्या वा आदिग्रंथाच्या निर्मितीत झाली (१६०४). पंजाबी काव्याचा हा अशा प्रकारचा पहिलाच संग्रह होय. त्यात खऱ्या अर्थाने पंथोपपंथ एकमेकांत विरून जातात वर्गभेद पुसट होतात राजकीय दृष्ट्या खंडविखंड झालेले व भौगोलिक दृष्ट्या विलग होऊन पडलेले समाज समन्वित करून एकसंध अशी बुद्धिनिष्ठ आणि कलात्मक संस्कृती सिद्ध करण्याचा प्रयत्न दिसून येतो. भारतीय साहित्यपरंपरांच्या मूलभूत एकात्मतेची जाणीव करून देऊन समाज सुसंघटित व्हावा, या दृष्टीने पुरश्चरण करण्याची अभिनव सवय अंगी बाणविण्याचा हा प्रयत्न सहेतुकपणे केलेला होता.

शीख गुरूंची काव्यपरंपरा पुढे अंगद, अमरदास, रामदास अर्जुनदेव,  ⇨ तेगबहादुर (१६२१–७५) आणि गोविंदसिंग या गुरूंनी अधिक विकसित केली. साऱ्या उत्तरकालीन शीख गुरूंत अर्जुनदेव व गोविंदसिंग यांनी शीख धर्मग्रंथांत मोलाची व लक्षणीय भर घातली. गुरू नानकांसारख्याच उत्कट भावना अभिव्यक्त करीत गुरू  ⇨ अर्जुनदेवांनी (१५६३–१६०६) आदिगुरूंच्या शिकवणीचे विवरण, संरक्षण आणि प्रसारकार्य करण्याचा प्रयत्न चालविला. त्यांच्या कवितांतील अलंकारप्रचुर पदसंहती, अनुप्रास आणि पदपुनरावृत्ती यांतून स्रवणाऱ्या मधुर संगीतामुळे भान हरपून जाते. सुखमणी या अर्जुनदेवांच्या तत्त्वज्ञानपर दीर्घकाव्याचा शीख धर्म़ग्रंथांत समावेश असून प्रातःप्रार्थनेत त्याचे पुरश्चरणही केले जाते. त्यांची ही रचना अत्यंत लोकप्रिय ठरली असून सर्वाधिक प्रमाणात आळविली जाण्याचा बहुमानही तिला लाभला आहे, यात संदेह नाही. परंतु अर्जुनदेवांनी पंजाबी साहित्याला दिलेली विशेष महान देणगी म्हणचे पंजाबी साहित्यातील सर्वश्रेष्ठ ग्रंथाचे–आदिग्रंथाचे–संकलन व संपादन. या प्रचंड ग्रंथात कित्येक सहस्र श्लोक आहेत. शीख गुरूंनी केलेल्या रचनांच्या भरीला त्यात भक्तिपंथांशी निगडित झालेल्या अनेक संतकवींच्या निवडक कविताही समाविष्ट केलेल्या आहेत. भारताच्या इतिहासात अशा प्रकारचा पंजाबी कवितासंग्रह सिद्ध करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. प्रमाणभूत भारतीय ग्रंथांची ही पहिलीवहिली सूचीच म्हणावी लागेल. यातील कवींची मांडणी कालक्रमानुसारी वा स्थाणुवत् अलगपणाने केलेली नाही कारण प्रत्येकाचे व्यक्तिगत काव्यकर्तृत्व तेवढे उठून दिसावे हा या ग्रंथाचा उद्देशच नाही. उलट, यातील कवी परस्परांसमवेत एकाच व्यासपीठावर विराजमान होऊन अविभाज्य असा विश्वव्यापी आशय प्रकट करताना आढळतात.

गुरू ⇨गोविंदसिंग (१६६६–१७०८) हे शीख गुरूंतील सर्वांत बहुश्रुत गुरू होत. हिंदूंचे प्राचीन धार्मिक साहित्य तसेच संस्कृत, अरबी व फार्सी वाङ्मय आणि इस्लामी धर्मशास्त्र यांचा त्यांनी उत्तम अभ्यास केलेला होता. व्रज, फार्सी व पंजाबी या तीनही भाषांत त्यांनी काव्यरचना केली. कला व साहित्य यांचे ते उदार आश्रयदाते होते. त्यांच्या राजसभेत बावन्न राजकवी होते. त्यांच्या व त्यांच्या आश्रयाखालील कवींच्या रचनांचा समावेश दसम ग्रंथात झालेला आहे, असे मानले जाते.


सूफींचे उत्थान मुसलमानांच्या भारतावरील आक्रमणामागोमाग झालेले असले, तरी त्यांनी भारतीयांची भाषा व आचारपद्धती जोवर आत्मसात केली नव्हती, तोवर त्यांची छाप भारताच्या जीवनावर वा साहित्यावर पडू शकली नाही. पंजाबी काव्याला सूफींकड़ून लाभलेली लक्षणीय देणगी म्हणजे त्या काव्यात ठळकपणे आढळणाऱ्या श्लोकरचनेच्या काही प्रकारांना लाभलेली लोकप्रियता. उदा., ‘काफी’, ‘बारा माह’ आणि ‘सी–हर्फी’ हे प्रकार. पंजाबच्या भावनिक ताण्याबाण्यात सूफी परंपरा गुंतली गेली, ती पंजाबी काफीद्वाराच. शाह हुसेन (१५३८–९३), बुल्लेशाह (सतरावे शतक), सुलतान बाहू (१६३१–९१) व शाह शरफ (सु. १७२४) हे विख्यात पंजाबी सूफी कवी होत. या सूफी कवींच्या काफी म्हणजे धृपदयुक्त श्लोकांत रचलेल्या लहान लहान कविता. ह्या काफी नृत्यगीतस्वरूपाच्या असून परंपरेनुसार त्या संगीतनिबद्धही केलेल्या आढळतात. बहुतेक काफी दैनंदिन अनुभूतींना शब्दरूप देणाऱ्या लोकगीतांची आठवण करून देतात. उदाहरण म्हणून बुल्लेशाहच्या एका काफीचा गद्यानुवाद खाली दिला आहे :

‘आपल्या सूतकताईकडे लक्ष दे पोरी. तुझी समजूत तरी काय आहे? मातापित्यांच्या घरात तू कितीसे दिवस रहायची आहेस? लाड करणाऱ्या आईच्या आसऱ्याला किती काळ विसावणार आहेस? थरकाप करून सोडणारी चिरवियोगाची वेळ कधीतरी येणार, हे निश्वित आहे आणि मग तर तुला आपल्या कडक आणि क्षमाहीन सासूसासऱ्यांच्या भडिमाराला तोंड द्यावे लागणार आहे! सूत कातण्यावर लक्ष ठेव पोरी, सूत कातण्यावर! सुखद साखरझोपेत वेळ नकोस गमावू. पुन्हा तुला अशी संधी नाही मिळायची. चुका सुधारायला तू फिरून कधीच इथे येणार नाहीस. समवयस्क खेळगड्यांसमवेत नेहमीच बसून राहता येईल, असे का वाटते तुला? सूत कातण्यावर लक्ष ठेव पोरी, सूत कातण्यावर!’

मध्ययुगात सूफी काव्याबरोबरच ‘किस्सा’ व ‘वार’ प्रकारांतील काव्याचाही चांगला विकास झाला. हे दोन्ही प्रकार श्रोतृवर्गापुढे गाइले जात. त्यातही बहुतांश किस्सेच रचले जात कारण ते प्रणयरम्य असत. पण कधीकधी एखादा धार्मिक उद्देश वा नैतिक उपदेश यांसाठीही किस्से रचीत. हीर रांझा, सोहनी महीवाल, सस्सी पुन्नूँ आणि मिर्झा साहिबाँ ही पंजाबातील प्रणयप्रधान कथाकाव्ये प्रसिद्ध आहेत. कादिर यारकृत पूरन भगत आणि कालिदासकवी गुजरानवालारचित नलदमयंती, रूपवसंतभर्थरी हरी हे नैतिक पण प्रणयपर किस्से होत. हीर-रांझाची अपूर्व प्रणयगाथा ⇨ वारिस शाह (१७३०–९०) याच्या रचनेद्वारा अमर होऊन राहिली आहे.

वार या दुसऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पंजाबी काव्यप्रकारात वीरगाथा अथवा पोवाडे रचले जात. स्थानिक वीरांनी गाजविलेल्या पराक्रमाच्या कथा त्यात गुंफलेल्या असत. त्यात नजहत याची नादरशाह दी वार अत्यंत विख्यात आहे.

दहा शीख गुरूंच्या निर्याणानंतर त्यांच्या–विशेषतः गुरू नानकांच्या – चरित्रांवर कवने रचण्याची एकच लाट उसळली. गुरू नानकांच्या जीवनावर आधारलेल्या साहित्यात वास्तवाच्या जोडीला कल्पिताचाही समावेश झालेला आहे. या काव्यांना ‘जनम साखी’ म्हणतात. व्रज भाषेत रचलेले परंतु गुरुमुखी लिपीत लिहिलेले विपुल साहित्य शीख गुरूंच्या इतिहासावर रचले गेले. या युगातील विशेष प्रसिद्ध ऐतिहासिक कवी सेवा राम, भाई संतोखसिंग, रत्तनसिंग भंगू आणि ग्यानी ग्यानसिंग हे होत. गुरूंच्या नंतर रचलेल्या शीख साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे या कवींनी भारतीय संस्कृतीच्या विशाल क्षेत्राचे आलोडन करून त्यातील आशय व अभिप्राय आत्मसात करून घेणे होय. दसम ग्रंथ हा प्रचंड ग्रंथ दहावे गुरू गोविंदसिंग यांच्या नावे व त्यांच्याच आश्रयाखली रचला गोला. त्यात ‘मत्स्या’ पासून तो थेट ‘कल्की’ पर्यंत एकही विषय वगळला गेलेला नाही. या ग्रंथराजाचे लेखक होते तरी कोण, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. वस्तुतः या ग्रंथात महत्त्व लेखकाला नसून मूळ ग्रंथालाच आहे. गुरू गोविंदसिंगांच्या राजसभेतील बावन्न कवींच्या रचना या ग्रंथात समाविष्ट केलेल्या आहेत, असे काही अभ्यासक मानतात. परंतु प्रत्येक रचनाकाराच्या प्रादेशिक रंगच्छटा पुसून टाकून ग्रंथाला अखिल भारतीय स्वरूप देण्याचा प्रयत्न बुद्धिपूर्वक केल्याचे यात जाणवते. संस्कृती म्हणजे उत्क्रांतीची प्रक्रिया, ही भूमिका घेऊन मुळातील पूर्वपक्ष-उत्तरपक्ष करून सत्यान्वेषण करण्याच्या पद्धतीला या ग्रंथात विशेष उठाव दिला आहे. स्वतःच्याच परंपरागत वारशातील काही भाग खोडून काढून त्याबरोबरच उर्वरित अंशाचा विकास साधणारी संस्कृति-उत्क्रांतीची ही सत्यकथा न्याय्य व वस्तुनिष्ठ भूमिकेवरून, पण तादात्म्याने सांगितली आहे. उदा., रामावतारातील व कृष्णावतारातील घटना प्रस्थापित आर्ष महाकाव्याच्या स्वरूपात प्रामाणिकपणे ग्रथित केल्या आहेत. पण त्यातूनच विभूतिपूजेच्या भावनेचा निषेध करणाऱ्यांचा विरोधी सूरही स्पष्ट ऐकू येत राहतो. रामावताराच्या उपसंहारात पुढील कथन आढळते :

‘परमेश्वरा, तुझ्या चरणांशी शरणागती पतकरल्यापासून मला दुसरी कोणतीच देवता पूजनीय भासलेली नाही. राम आणि रहीम पुराणे आणि शास्त्रेदेखील. किती परोपरीची ही तुझी अभिधाने! पण परमेश्वरा, माझी मात्र तुझ्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणावरही श्रद्धा नाही. न्यायाचे खड्ग धारण करणाऱ्या तेजस्वी परमात्म्या, तुझ्याच कृपेने मी हे रामाचे महाकाव्य रचिले आहे’.

भाषा व लिपी यांच्या बाबतींतही व्रज भाषेचा व गुरुमुखी लिपीचा उपयोग करून गुरूत्तरकालीन शीख साहित्याने जीवनाच्या अधिक व्यापक अशा मीमांसेत सहभागी होण्याची ओढ प्रकट करणारी अपूर्व वस्तुस्थिती निर्माण केली आहे. पंजाबची वैशिष्ट्यपूर्ण वाक्‌प्रणाली जगवण्याचा प्रयत्न करतानाच त्यांनी तीत व्रज बोलीचेही वाक्‌प्रचार कौशल्याने गुंफले आहेत. त्यामुळे गुरुमुखी वर्णमालेत लिहिलेल्या व्रज शब्दसंहतीला वैशिष्ट्यपूर्णता लाभल्यासारखे वाटते. पंजाबी बोलण्याच्या धाटणीला अनुरूप अशी व्रजची घडण बनवून तिला ध्वनितत्त्व आणि वाक्यरचना या दोन्ही दृष्टींनी आगळे वैशिष्ट्य त्यांनी प्रदान केले आहे. गोपाळकृष्ण, बाळकृष्ण व राधिका यांच्या प्रणयकथा रचणे व्रज कवींना अत्यंत प्रिय असले, तरी त्यांना पंजाबच्या आध्यात्मिक भूमीत खोलवर रुजू देणे इष्ट नव्हते. शेजारच्या प्रदेशांतील विषय आत्मसात करताना शीख साहित्यकारांनी योग्य निवड करण्याची विवेचक सारासार बुद्धी वापरली. इतकेच नव्हे, तर स्वतःच्या खास विषयांवरही व्रज भाषेमध्ये रचना केली. परिणामी भाई गुरदास (कथाही राजां की), रत्तनसिंग भंगू (प्राचीन पंथप्रकाश), भाई संतोखसिंग (गूर प्रताप सूरज), ग्यानी ग्यानसिंग (पंथप्रकाश), प्रेम सैश संत्रेण (गुरपूर प्रकाश) यांसारख्या कवींनी मध्ययुगीन व्रज भाषेतील अखिल भारतीय कथाशृंखलांत पंजाबचे खास स्थानिक विषयही गुंफून टाकले.


गुरूत्तरकालीन शीख साहित्य हे व्रज भाषेत पण गुरुमुखी लिपीत लिहिले जात होते, तर तिकडे पंजाबचे मुसलमान सहित्यिक मात्र पंजाबी लोकांच्या निर्भेळ पंजाबी बोलीतील वाक्‌प्रणालींचा उपयोग किस्से व काफी रचताना करीत होते तथापि वर्णमाला मात्र फार्सीच वापरीत होते. पंजाबच्या मध्ययुगीन साहित्याचे गुरुमुखीत वा फार्सीत लिप्यंतर करताना त्यांनी भाषेच्या देशी तद्‌भव स्वरूपाला मात्र धक्का लावला नाही उलट, नवीन परिस्थितीला उत्कट व सक्रिय प्रतिसाद देण्याजोगे सामर्थ्य तिला प्राप्त करून दिले. प्रदेशबाह्य साहित्यविषय आत्मसात करण्यासाठी प्रादेशिक लिपीचा व स्थानिक आशय अभिव्यक्त करण्यासाठी परकीय लिपीचा अवलंब करून पंजाबच्या मध्ययुगीन लेखकांनी साहित्यिक आदानप्रदानाचा व विस्ताराचा मार्ग अप्रतिहत अनुसरला. आजदेखील भारतीय पंजाबचे लेखक गुरुमुखीचा आणि सीमेपलीकडचे पंजाबी लेखक फार्सी लिपीचा उपयोग साहित्यिक अभिव्यक्तीसाठी करताना दिसतात.

पंजाबचे गौण धर्मग्रंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साहित्याचाही निर्देश केल्यावाचून पंजाबच्या मध्ययुगीन साहित्यसृष्टीचे चित्र परिपूर्ण होणार नाही. गोसावी पंथाच्या संतकवींनी बाबा फरीद व नानक घराणे यांनी विकसित केलेल्या भाषेत व शैलीत पद्यरचना केली आहे. गोसाव्यांचे साहित्य म्हणजे पंजाबी साहित्यपरंपरेचा खालचा थर होय. पाचवे शीख गुरू अर्जुनदेव यांचे समकालीन हरिया (१५५६–१६६५) यांना तितकीशी प्रसिद्धी लाभली नसली, तरी त्यांचे काव्यकौशल्य लक्षणीय असून उत्तर भारतात प्रचलित असलेल्या जवळजवळ प्रत्येक प्रकारात साहित्यनिर्मिती करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. भाषाशास्त्रीय दृष्ट्या त्यांच्या रचनांत (६९४ हस्तलिखित पृष्ठांच्या) सामाजिक, भाषाशास्त्रीय व ऐतिहासिक संशोधनासाठी  भरपूर आणि अपूर्व असा पुरावा आज उपलब्ध होतो. संत रेण (ज. १७४१) यांनी गुरू नानकांच्या जीवनावर नानकविजय हे महाकाव्य रचले आहे. साहित्याच्या इतिहासकारांनी उपेक्षिलेले हे कवी पंजाबच्या सांस्कृतिक इतिहासाचे सामग्रयाने दर्शन घडविण्याच्या दृष्टीने खासच उल्लेखनीय आहेत.

शीख गुरू, सूफी संत व किस्साकवी यांच्यात एक समान प्रवृत्ती दिसते. धार्मिक पंथोपपंथ आणि दुराग्रह, सिद्धांत व धारणा, कर्मकांड व धर्मविधी, धार्मिक भेदाभेद माजविणाऱ्या सर्वच गोष्टी यांविषयी तीव्र प्रतिकाराची भावना ही ती प्रवृत्ती होय. किस्साकाव्यातील प्रेमिक सर्व प्रकारचे सामाजिक औचित्य, कौटुंबिक लागेबांधे, परंपरागत मानमर्यादा यांचे उल्लंधन करून परस्परांचे मीलन घडवून आणू पाहताना दिसतात.

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी ध्यानात येते, की शीख गुरूंची व सूफी संतांची परंपरा पंजाबी लोकसाहित्याच्या प्रवाहापासून बुद्धिपूर्वक दूर सारलेली आहे. गुरू अर्जुनदेवांपासून थेट भाई संतोखसिंग (१७८५–१८४३) यांच्यापर्यंत शिखांचे काव्य संस्कृत काव्यपरंपरेच्या अधिकाधिक निकट गेलेले दिसते. शिखांची काव्यपरंपरा पंजाबी भाषेच्या बाहेरच वृद्धिंगत झाली एवढेच नव्हे, तर ती विकास पावली ती अत्यंत रूढिनिष्ट व संप्रदायबद्ध अशा स्वरूपाचे परंपरागत साहित्यप्रकार उत्क्रांत करीत आणि तेही अत्यंत शैलीदार अशा अभिव्यक्तिमाध्यमाद्वाराच. त्याचप्रमाणे पंजाबची सूफी व किस्सापरंपरा ही हशिम, अली हैदर, सुलतान बाहू यांसारख्यांच्या हस्ते जी विकसित झाली, ती साचेबंद अशा फार्सी काव्यशास्त्राच्याच अनुरोधाने. वारिस शाहच्या काव्यात ही प्रवृत्ती स्पष्टपणे दृग्गोचर होते हशिम शाह (१७२९–१८४०) व अहमेद यार (१७६८–१८५५) यांनी तिला अधिक प्रगल्भ रूप दिले. या परंपरेतील शेवटचा महत्त्वाचा कवी मोहंमद बक्ष (१८२९–१९०६) याच्या काळात तर ती पराकाष्ठेची साचेबंद, रूढिनिष्ठ आणि रीतिवादी बनली.

ब्रिटिश राजवटीतील प्रारंभीच्या अर्धशतकात पंजाबीत फारच थोडे साहित्य निर्माण झाले. राजनैतिक परिवर्तनाच्या दुष्परिणामांतून सावरायला आणि प्राश्चात्त्य जीवनमूल्यांचे मोजमाप घ्यायला त्या समाजाला बराच अवधी लागला. त्यामुळे पंजाबी साहित्याचे आधुनिक युग हे ‘सिंग सभे’ ची चळवळ व तीमागून अकाली आणि नंतर समाजवादी      जवळजवळ समांतर असल्याचे दिसते. पंजाबीविषयीच्या आस्थेचे पुनरुज्जीवन करणारे आधुनिक युगाच्या सुरवातीचे कवी à भाई वीरसिंग (१८७२-१९५७) हे त्या भाषेच्या इतिहासातील एक युगनिर्माते कवी ठरतात. कदाचित त्यांची साहित्यनिर्मिती इतर कोणाही भारतीय लेखकाहून अधिक भरेल. कांदंबऱ्या, नाटके, काव्ये, इतिहास, चरित्रे, धर्मग्रंथांवरील भाष्ये, मध्ययुगीन शीख साहित्याच्या हस्तलिखितांवरील टिपणे इ. नानाविध प्रकारचे लिखाण त्यांनी केलेले आहे. सुंद्री (१८९८), बिजयसिंग (१८९९), सत्‌षंत कौर (१९००) आणि बाबा नौध सिंग (१९२१) या त्यांच्या कादंबऱ्या शिखांचे शौर्य व दाक्षिण्य तसेच त्यांच्या धर्माची नैतिक श्रेष्ठता यांभोवती गुंफलेल्या आहेत. वीरसिंगांनी खरे कर्तृत्व गाजवले ते काव्याच्या क्षेत्रांत. १९०४ मध्ये राणा सूरत सिंग हे दीर्घकाव्य मुक्तच्छंदात रचण्याचा प्रयोग त्यांनी केला. आजवर पंजाबी कवींनी न हाताळलेल्या एका लघुच्छंदात रचलेल्या त्यांच्या कवितांचे अनेक संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. वास्तविक या काळातील पंजाबी साहित्यसर्जनाचा काव्य हा मुळी गाभाच होता आणि आजदेखील त्याला प्रशंसा व प्रतिष्ठा लाभलेली आहे. भाई वीरसिंगाच्या साहित्यकृतींत नेहमीच नव्या विषयांचा व अभिव्यक्तिप्रकारांचा मागोवा घेण्याची ओढ दिसून येते. लहरहुलारे (१९२८) ही त्यांची सर्वोत्कृष्ट काव्यरचना होय. पंजाबी कवितेला परंपरागत साचांच्या बंधनातून मुक्त करून तिच्यासाठी एका नवीन धर्तींची शैली सिद्ध करणे तसेच छंद आणि प्रतिमा या दोन्हीही अंगांनी तिचा विकास करणे, ही त्यांची पंजाबी कवितेला सर्वांत महत्त्वाची देणगी. त्यांच्या मेरे सैंयां जीओ (१९५३) ह्या काव्यसंग्रहास १९५५ चा साहित्य अकादेमीपुरस्कार मिळाला. श्री कलगीधर चमत्कार (१९२५) हे गुरू गोविंदसिंगाचे आणि श्री गुरुनानक चमत्कार (१९२८) हे गुरू नानकांचे अशी दोन महान चरित्रेही त्यांनी लिहिली. यांव्यतिरिक्त शिखांच्या ग्रंथभांडारात मोलाची भर घालून त्यांच्या पांडित्यालाही त्यांनी सातत्याने हातभार लावला. मध्ययुगीन अक्षर साहित्याच्या सटीप आवृत्त्या त्यांनी संपादित केल्या व सन्थ्या श्री गुरू ग्रंथसाहिब या नावाने आदीग्रंथाचा एक शब्दकोशही सिद्ध केला.

भाई वीरसिंगाचे समकालीन व निष्ठावंत भक्त लाला à धनीराम चात्रिक (१८७६-१९५४) यांच्या अनेक काव्यसंग्रहांपैकी केसर किआरी (१९४०), नवाँ जहाँ (१९४५), चंदनवाडी (१९४९) व सूफीखाना (१९५०) हे विशेष प्रसिद्ध आहेत. पंजाबच्या साहित्यिक व लोकसाहित्यरूप परंपरांचा अपूर्व संगम त्यांच्या काव्यात झालेला दिसून येतो.

प्रभावी वक्तृत्वाच्या बळावर प्रमाथी भावनेचा आविष्कार करणारे आणखी एक कवी à पूरनसिंग (१८८१-१९३१) हे होत. समकालीन टीकाकारांनी आशयाचा विपर्यास करून त्यांच्यावर घोर अन्याय केला आणि त्यांच्या प्रतिभेलाही पुरेसा न्याय दिला नाही. खुले मैदान (१९२२) ही त्यांची काव्यरचना आजही अपूर्व ठरते. वॉल्ट व्हिटमनचे ते चहाते होते व त्यांनी पंजाबीत मुक्तच्छंदाला लोक प्रियता प्राप्त करून दिली. त्यांच्या विपुल व विविध रचनांपैकी बराच मोठा भाग अद्याप अप्रकाशित राहिला आहे. त्यांतील काही आशयगर्भ असे समीक्षापर ग्रंथ, कादंबऱ्या आणि काव्येही आहेत. त्यांची कित्येक पुस्तके इंग्रजीमधून विदेशात प्रकाशित झालेली आहेत. त्यांतील पुढील उल्लेखनीय होत : द सिस्टसं ऑफद स्पिनिंग व्हील (१९२१), स्पिरिट ऑफ ओरिएंटल पोएट्री (१९२६), सेव्हन बास्केट्स ऑफ प्रोज पोएम्स (१९२८) इत्यादी. १९०१-०३ या तीन वर्षांच्या जपानमधील वास्तव्यात पूरनसिंगांवर जपानी जीवनात दृढमूल झालेल्या बौद्धांच्या धार्मिक व कलाविषयक विचारप्रणालीचे अपरिहार्य संस्कार झाले व ते त्यांच्या मृळ  भारतीय संस्कारांशी सहज एकरूपही होऊन गेले. पूरनसिंगांनी आधुनिक पंजाबी कवितेला जीवनातील निष्ठा, वास्तवता आणि मूल्ये यांची जाणीव करून दिली.


पंजाबच्या सामाजिक आणि राजकीय चळवळींना प्रतिसाद देणाऱ्या à मोहनसिंग ‘माहिर’ (१९०५-७८) व à अमृता प्रीतम (१९१९- ) यांच्या कवितेचे क्षेत्र हे विषय व आविष्कारपद्धती या दोन्ही दृष्टींनी खूपच व्यापक व बहुविध आहे. सुनेहडे (म. शी. संदेश) हे अमृता प्रीतम यांचे आणि सावे पत्तर (१९३६, म.शी. हिरवी पाने) हे मोहनसिंगांचे उत्कृष्ट काव्यसंग्रह होत. समकालीन घटनांच्या आघातांमुळे त्यांच्या जाणिवा तीव्रतर होऊन जीवनातील वास्तवतेच्या आकलनामुळे त्यांची प्रतिभा अधिकाधिक सर्जनशील होत गेली. प्रारंभकाळी मोहनसिंगांवर शाह हुसेन, बुल्लेशाह, अली हैदर व हशिम शाह यांसारख्या मध्ययुगीन सूफी कवींची दाट छाप पडली होती. रूढ परंपरेला विरेध करण्याचे धैर्य त्यांना यामुळेच लाभले. फाळणीनंतर मोहनसिंग व अमृता प्रीतम या दोघांवरही प्रागतिक चळवळीचा प्रभाव पडला. काव्याचा बाह्य आकार आणि आंतरिक आशय यांत सवता सुभा प्रस्थापित होऊन कवीच्या इष्ट प्रतिपाद्याच्या मानाने आकाराला गौण स्थान प्राप्त झाल्याचे दोघांनाही जाणवले होते. सामाजिक रूढींचा निषेध करण्यात आघाडीवर असलेल्या या कवींनी ग्रामीण लोकसाहित्य व दंतकथा यांचे बुद्धिपूर्वक आलोडन करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या रचनांवरून निदर्शनास येते. जुन्या दंतकथांतच नवी प्रतिपाद्ये समाविष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. प्रगतिवादी चळवळीच्या प्रभावातून ‘गझल’ रचण्याचा प्रयन्त मोहनसिंगांनी करून पाहिला. काव्यरचनेचा हा नवा प्रकार पंजाबी वाक्‌संप्रदायात रुळविण्याचाही प्रयत्न त्यांनी चालविला तसेच इंग्रजी स्वच्छंदतावादी कवींचे भावगीत, पंजाबी सूफी संतकवींची काफी व फार्सी आणि उर्दू काव्यांतीर ‘रुबाई’ या काव्यप्रकारांनाही त्यांनी पंजाबी साज चढविला. आपल्या काही कवितांत तर त्यांनी पंजाबचा खास पोवाडा – वार – व तद्देशीय लोककाव्य यांतूनही उसनवारी केल्याचे दिसते. नानकायन या त्यांनी काव्यबद्ध केलेल्या गुरू नानकदेवांच्या चरित्राचा विस्तार तर महाकाव्यएवढा आहे. त्यांच्या वड्डा वेला ह्या काव्यसंग्रहास १९५९ चा अकादेमीपुरस्कार प्राप्त झाला. अमृता प्रीतम ह्याही प्रगतिवादी चळवळीच्या प्रवक्तया बनल्या, प्रणयभावनेतील व्यथावेदना आणि लयबद्ध आरोहावरोहांचे सौंदर्य यांमुळे संस्मरणीय ठरलेली भावगीते रचण्यात तर त्या सिद्धहस्त आहेत. त्यांच्या सुनेहडेला १९५६ मध्ये साहित्य अकादेमीपुरस्कार लाभला. मे तवारीख हाँ हिंद दी (१९४९) या संग्रहात आणि आणखीही काही कवितांत त्यांनी लोकसाहित्य व परंपरागत रचनाप्रकार योजून लक्षणीय प्रयोग केले आहेत. पुढे पुढे मुक्तच्छंदरचनेच्या आहारी गेल्यामुळे मात्र त्यांची सारी काव्यप्रतिभाच लोप पावल्यासारखी भासते. नुसते शब्दजंजाळ आणि दिखाऊ रचनाकौशल्यच आता त्यात दिसते.

उपर्युक्त कवींसोबतच प्रीतमसिंग ‘सफीर’ (१९१६- ) आणि बाबा बलवंत (१९१५-?) यांचा निर्देश करायला हवा. सफीरांच्या काव्यात शिखांच्या इतिहासातील घटना व अध्यात्मशास्त्र यांचा सुंदर आविष्कार झालेला आहे. त्यांनी आत्मनिष्ठ प्रेमगीतांतून स्वतःच्या प्रेयसीने दाखविलेल्या उपेक्षावृत्तीविषयी खेद प्रकट केला आहे. सार्वजनिक चळवळींना पाठिंबा देताना मात्र त्यांच्या कवितांना पोकळ घोषणांचे किंवा ब्रीदवाक्यांचे स्वरूप आलेले दिसते. कत्तक कूं जाँ (१९४९) व आदि जुगादि हे त्यांचे प्रतिनिधिक संग्रह होत. बाबा बलवंत या बहुप्रसव व कुशल कवीनेही प्रागतिक चळवळीला पाठिंबा देऊन बहुजनसमाजाने दारिद्य, दास्य व लुबाडणूक यांविरुद्ध केलेल्या उठावाचे चित्रण केले आहे. त्यांनी उर्दू ‘नज्‌मा’च्या घाटणीवर कविता लिहिल्या. उर्दू गझलांचे माधुर्य आणि लावण्य लाभलेल्या त्यांच्या काही गझला अविस्मरणीय आहेत. प्रभजोत कौर (१९२७- ) ह्या लोकप्रिय पंजाबी कवयित्री असून त्यांचे लाट लाट जोत जगे (१९४३), मेरी चोनवीं कविता (१९४९), पब्बी (१९६२) इ. उल्लेखनीय संग्रह होत. त्यांच्या पब्बी संग्रहास १९६४ चा अकादेमी पुरस्कार लाभला.

प्रयोगवादी म्हणून ख्याती पावलेला दुसरा एक गट जसवीरसिंग अहलूवालिया यांना मार्गदर्शक मानी. प्रगतिवादी पंजाबी लेखकांविरुद्ध आघाडी उघडून त्यांनी मोहनसिंग व अमृता प्रीतम यांच्या युतीविरुद्ध टीकेची झोड उठवली. मार्क्सवादी कलासिद्धांतांच्याच काटेकोर चौकटीतून प्रागतिक कवींचा समाचार घेत त्यांनी त्यांच्यावर एक प्रकारे समाजवादी स्वच्छंदवादाच्या नादी लागल्याचा आरोप केला. त्यांची मागणी होती संपूर्ण कामगार क्रांतीची. कवीच्या व्यक्तिगत व आत्मनिष्ठ अनुभूतीचे अगत्य जाणून बाह्याकारविषयक कलामूल्यांनी विकसित केलेल्या सर्जनशील व कलात्मक सौंदर्याला योग्य ते महत्त्व त्यांनी दिले. मानवाचे व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि कलेची स्वायत्तता ही त्यांच्या तत्त्वज्ञानातील गृहीत कृत्ये होत. कागज दा रावण आणि कूड राजा कूड परजा हे जसबीरसिंगांचे संग्रह या पंथाचे प्रातिनिधिक संग्रह होत. कवीच्या चिकित्सक वास्तववादाला अत्यंत साजेशी अशी उपहासप्रचुर शैली विकसित करणे, हेच या काव्याचे खास वैशिष्ट्य होय.

काव्याच्या आकृतिबंधाची कलात्मक अपूर्वाई पहिल्या प्रथम ध्यानी घेऊन नवीन मार्ग चोखाळण्याचे धैर्य आणि मौलिकता प्रकट करणारे हरभजनसिंग हे आधुनिक कवींतील एक श्रेष्ठ कवी होत. त्यांच्या प्रारंभीच्या कवितांतून कधीकधी सौंदर्यवाद आणि समाज यांच्यातील द्वैत डोकावताना दिसते. परंतु सौंदर्यग्राही संवेदनशीलतेला अनुरूप आकृतिबंध देण्याचा विचार करून त्यांनी यथावकाश आपले ध्येय साध्य केले. आशयाशी संलग्न झालेली अर्थगर्भता त्यांच्या रचनेच्या आकृतिबंधातच सामावून राहते. कलादृष्ट्या अर्थगर्भ ठरणाऱ्या संवेदना त्यांनी जाणीवपूर्वक प्राप्त करून घेतल्याची साक्ष अधरैणी या संग्रहातील त्यांच्या कवितांत पटते. कविसुलभ संवेदनशीलता आणि काव्यत्त्व यांचा यथोचित समन्वय साधला गेल्यामुळे त्यांच्या कवितांत सांगोपांग एकात्मता अवतरल्याचे जाणवते. हरभजनसिंग कवी आहेत तसेच ते पंजाबचे एक ज्येष्ठ समीक्षकही आहेत. स्वतःच्या कलेतील लक्षणीय व्यापकतेची जाण त्यांना करून दिली, ती त्याच्या समीक्षाशील संस्कारांनीच. जाणवण्याजोगी व्याप्ती व प्रतीकानुरूप संवेदना यांचा काव्यरूपाने कलात्मक समन्वय झाल्याचे त्यांच्या ना धुप्पे ना छावेंमध्ये स्पष्ट दिसते. त्यांच्या या काव्यास १९६९ चा साहित्य अकादेमी-पुरस्कार मिळाला. निखळ भावगीतरचनेच्या पलीकडे जाऊन ते मानवी जीवनातील वास्तवाच्या संकीर्ण व भीषण अंगांचे दर्शन उठावदारपमे घडवितात. अलफ दुपहर या संग्रहात बांगला देशाच्या भीषण वाताहतीवरील त्यांच्या कविता संकलित आहेत. परिचितांशी ताटातूट झाल्यामुळे पार पालटून गेलेल्या त्यांच्या संवेदनशीलतेला त्या वाताहतीमागील करुण-भयण वास्तवाचे समग्र आकल झाल्याचे स्पष्टपणे त्यांतून जाणवते. आणीबाणीच्या कालखंडावर रचलेल्या कवितांचा टुटियाँ जीमाँवाले हा त्यांचा अगदी ताजा संग्रह. कलात्मक परिणाम साधण्याचा त्यांचा प्रयत्न यातही सफल झालेला आहे.


शिवकुमार बटालवी यांच्या भावकाव्याला अपूर्व लोकप्रियता आणि प्रसिद्ध लाभली. त्यांचे काव्य भावगीतरूप व अकृत्रिम जिव्हाळ्याने युक्त असल्याने ते आकर्षक व प्रत्ययकारीही झाले आहे. पंजाबच्या लोकसाहित्यातून त्यांनी अत्यंत हृदयंगम प्रतिमा व प्रतीके वेचली आहेत. मागच्या एका पिढीत लोकप्रिय झालेल्या स्वच्छंदतावादी आदर्शाने त्यांच्या कवितेत फिरून डोके वर काढल्याचे जाणवते. लूणाँ या त्यांच्या गीतनाट्याला तर पंजाबी वाचकांत पराकाष्ठेची लोकप्रियता लाभली व १९६७ मध्ये साहित्य अकादेमीपुरस्कारही लाभला. या काव्यात त्यांनी ‘पूरन भगत’ च्या कथेवर नवीन प्रकाश टाकला आहे. सापत्न माता-पुत्रांच्या परस्परसंबंधांतील निषिद्ध, परंतु कोमल भावबंधात डोकावण्याचा प्रयत्न त्यात त्यांनी केला आहे. आजच्या जगातील अनुभूतींच्या आविष्काराची समर्पक साधने म्हणून लोकसाहित्याचे प्रकार व छंद परिवर्तित स्वरूपात योजण्यातच त्यांचे खरे सामर्थ्य सामावलेले आहे.

जसवंतसिंग ‘नेकीं’ नीही अभिव्यक्तीचे नवीन आडाखे बसविले आहेत (असले ते ओहले). शास्त्र व तंत्रज्ञान यांमधील कल्पनांचे आवाहन त्यांच्या मनाला विशेष ओढ लावताना दिसते. स्वतःची आगळी जाणीव आणि जीवनविषयक स्वतंत्र तत्त्वज्ञान यांचे एकात्म पण व्यापक असे दर्शन घडविणारी कलात्मक अभिव्यक्ति साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या काव्यात अंतरंगाती अनुभूतींवर अधिक भर दिलेला असून त्यातील अभिव्यक्तीचा साधेपणाही लक्षणीय आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेले त्यांचे समृति दे किरन तो पहलाँ हे दीर्घकाव्य पंजाबी काव्याचे अमोल भूषण आहे. त्यात त्यांनी भारताच्या पुराणप्रिय जाणिवेशी स्वतःच्या वैयक्तिक, मानसिक अनुभूतींची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे.

काव्यनिर्मितीची साधने व अभिव्यक्तीच्या पद्धती यांत अधिक सूक्ष्म अर्थवाहकता आणण्याच्या कामाला हातभार लावणारे पंजाबी कवी एस्. एस्. मिशा हे होत. स्वतःच्या रचनांसाठी रोजच्या गद्य संभाषणातून साधी, सोपी लयबद्धता शोधून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचे वैशिष्ट्य त्यांच्या कवितेच्या रचनेतील उपरोधगर्भतेत सामावलेले आहे. कधीकधी साध्या शाब्दिक विधानांपलीकडे त्यांचे काव्य जात नाही. कच्च दे वस्तर हा त्यांच्या अलीकडील रचनांचा संग्रह होय.

अगदी निराळ्या प्रकारची रचना करणारे कवी हरनाम हे इतक्या सर्वस्वी अपरिचित अशा प्रतीकांची व प्रतिमांची योजना करतात, की कधीकधी त्यांची कविता वाचकांना समजूंही शकत नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नेतर कंकाल या त्यांच्या काव्यसंग्रहातील कवितांत त्यांनी मागच्या पिढीहून अगदीच निराळा मार्ग चोखाळल्याचे जाणवते. रविंदर रवी, मोहनजीत, सतिकुमार, वरियाम अस्सर, निर्मल अर्पण, परमिंदरजीत इ. कित्येक नव्या कवींनी साहित्यपरंपरेतील अनेकविध रंगछटा आत्मसात करून शैली आणि अभिव्यक्ती या दोन्ही  क्षेत्रांत विविध प्रकारचे प्रयोग चालविले आहेत. त्यांतील मोहनजीत खूपच होतकरू दिसतात. चलदे फिरदे मस्खरेमध्ये त्यांनी रेखाटलेल्या विख्यात साहित्यिकांच्या व कलावंतांच्या व्यक्तिरेखांचे पंजाबी वाचक वर्गाने चांगले स्वागत केले, इतरांनीही अधूनमवून अभिनव दृष्टिकोन व रचनाकौशल्य प्रकट केलेले असले, तरी समकालीन पंजाबी काव्यावर त्यांचा म्हणण्यासारखा प्रभाव पडलेला नाही.

चालू शतकाच्या सातव्या दशकातील काही नक्षलवादी कवी आपल्या जीवनदृष्टीच्या मूळ उगमस्थानाचे काही अंश आत्मसात करून कलादृष्ट्या समृद्ध अशा नवनिर्मितीची प्रसादचिन्हे सूचित करताना दिसतात. पाशची लोककथा, लालसिंग ‘दिल’ ची सतलज दी हषा, अमरजीत चंदन यांनी संपादित केलेला मट्टी दा रंग, मोहनजीत यांनी संपादिलेला आरंभ, जगतार यांचा लहू दे नकश, दर्शन खटकर यांचा संगी साथी, पाश यांचा उडदे बाजाँ मगर, अमरजीत चंदनरचित कौन नही चाहेगा इ. रचना उल्लेखनीय आहेत. आपल्या काव्यात नक्षलवादी चळवळीचे वैचारिक सिद्धांत अभिव्यक्त करण्यावर ते भर देत असल्यामुळे त्यांच्या भावनिक विस्फोटाचा सूर आवेशपूर्ण व वक्तृत्वसंपन्न भासतो. या चळवळीच्या पहिल्या चरणातील काव्यात ओजस्वी वक्तृत्वाचा सूर, सर्वंकष कल्पना व वैश्विक सिद्धांत अवतरले ते यामुळेच. नंतरच्या काव्यात मात्र भोवतालच्या संकीर्ण जीवनाची होळस जाणीव आणि त्याचे विश्लेषण करण्याची प्रवृत्ती दृग्गोचर होते. घटना व भावना यांतील अस्सल राकटपणाचे आणि रांगडेपणाचे प्रत्यक्ष दर्शन घडविणाऱ्या आविष्कारपद्धतीमुळे पाश यांचा या कवींमध्ये अधिक बोलबाला झाला. नव्या पिढीतील आणखी काही विवाद्य कवी म्हणजे सूरजीत पट्टर, अमितोज व हलभजन हलवरवी हे होत.

गद्यसाहित्य : पंजाबच्या वैचारिक गद्यात फारसे वैविद्य आढळत नाही. निरगुणियारा नावाची लेखमाला लिहून भाई वीरसिंगांनी पंजाबी गद्यसाहित्याचा शुभारंभ केला. त्यांच्या मागून पूरनसिंगांनी खुले लेख या निबंधसंग्रहाद्वारे मोलाची मर घातली. à तेजासिंग (१८९४-१९५४) यांनी आपल्या निबंधांतून साधीसुधी घरगुती गद्यशैली साकार केली (सभ्याचार, गुस्लखाना ते होर लेख). àगुरबक्षसिंग (१८९५-  ) हे कदाचित आजचे सर्वश्रेष्ठ गद्यशैलीकार ठरतील. भावनात्मक सामग्रीचा उपयोग करून त्यांनी पंजाबी गद्यलेखनात कोवळी भावमयता आणि मनोज्ञ चमक आणली. अत्यंत कल्पनारम्य अशी गद्यशैली त्यांनी विकसित केली. मेरिआँ अमूल यादी (१९४७), नषाँ शिवाला (१९४७), सावी पधरी जिंद्‌गी (१९४९), मंजिल दिस पई यांसारख्या त्यांच्या ग्रंथांचा पंजाबी गद्याची शैली घडविण्यात खूपच हातभार लागला आहे. निबंधांव्यतिरिक्त टीकाकाराचे लक्ष वेधून घेणारे दोन गद्यसाहित्यप्रकार म्हणजे प्रवासवर्णन व समकालीन साहित्यकारांची वाङ्मयीन व्यक्तिचित्रे. à बलवंत गार्गी (१९१६ – ) यांनी अशी सुंदर व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. त्यांची नावे निम दे पत्ते, सुमेंवाली अख आणि कौडियाँवाला सप ही होत. बलराज साहनी हे उत्कृष्ट प्रवासवर्णनकार आहेत. पाकिस्तानमधील आपल्या पूर्वजांच्या ठिकाणाला दिलेल्या भेटीचे मोठे हळवे पण औदार्ययुक्त वर्णन त्यांनी मेरा पाकिस्तानी सफरनामामध्ये केले आहे. ग्यानी गुरदितसिंग यांनी मेरा पिंड या ग्रंथात अगदी हुवेहुब रेखाटलेले एका नमुनेदार पंजाबी खेड्याचे चित्र पंजाबच्या ग्रामीण जीवनातील संस्कार व नीतिकल्पना यांविषयी कुतूहल निर्माण करून जाते. सुबहसिंग हे आपल्या गद्यलेखानात विनोदाची व कोट्यांची पखरण करतात. पंजाबी लोकसाहित्यात उल्लेखिलेल्या, पण आता नष्टप्राय होत चाललेल्या काही करमणुकीच्या प्रकारांचे त्यांनी रेखाटलेले चित्र विशेष उल्लेखनीय आहे. तेजासिंग यांचे आरसी, निरंजनसिंग यांचे जीवन जाच, हीरासिंग ‘दर्द’ (१८८९-१९६०) यांचे मेरिआँ कुछ इतिहासिक यादाँ यांसारखी काही आत्मचरित्रेही त्यांतील मानवसुलभ भावभावनांच्या आविष्कारामुळे लक्षवेधक ठरतात. तरी पण एकंदरीत परिपक्वतेची चिन्हे  पंजाबी गद्यात अजून तरी विशेषत्वे दिसत नाहीत. अजून त्याला पुष्कळच वाटचाल करायची आहे.


कादंबरी : कथा-कादंबऱ्या पंजाबात अत्यंत लोकप्रिय आहेत. शेवटच्या मोगल राजांच्या अत्याचारी राजवटीविरुद्ध अठराव्या शतकात शीख संतांनी चालविलेल्या युद्धावर ऐतिहासिक-पौराणिक स्वरूपाच्या कादंबऱ्या लिहून भाई वीरसिंगांनी पंजाबी कादंबरीचा पाया घातला. कादंबरीला त्यांनी धार्मिक आणि नैतिक ध्येयवादाचे माध्यम बनविले. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास त्यांच्या कादंबरीलेखनाचे प्रयोजन शीख समाजाच्या जीवनप्रवाहाची सुधारणा, दास्यविमोजन आणि पुनरुज्जीवन हे होते. संवेदनांचा आविष्कार हे त्यांच्या साहित्यसर्जनाचे, विशेषतः कथालेखनाचे, मुख्य प्रयोजन कधीच नव्हते. उपयुक्ततावादी व प्रचारकी कार्याचे ते एक गौण साधन होते एवढेच. परमेश्वराची अनंत आपत्तीत सापडलेल्या धर्मनिष्ठ भक्तांच्या सहायाला कशी धावून येते, हे सुंद्री, बिजयसिंग, सत्‌वंत कौरबाबा नौध सिंग या कादंबर्‍यांद्वारा श्रद्धाळू सिखांच्या मनावर बिंबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सामाजिक पुनर्जागृतीच्या या निर्धारामुळे भाई वीरसिंग आपल्या कादंबर्‍यांत धार्मिक चौकटीतील जीवनापलीकडे काहीच साकार करू शकले नाहीत. या धार्मिक सीमारेषा विस्तारून साहित्यिक कादंबरीच्या क्षेत्राला गवसणी घालणे क्वचितच शक्य होते. मानवी जीवनाच्या एखाद्या पैलूवर प्रकाश टाकून मानवी शक्ती व कर्तृत्व यांचे पुरेशा प्रमाणात दर्शन घडवू शकणारे मानवी जीवनातील भावनाट्याचे प्रसंग त्यांत साकार करणे कठीणच जाते.

पाश्चात्त्य कादंबरीच्या उदयाचे युग हे मानवी सामर्थ्याला आणि कर्तृत्वाला वाव देणारे असले, तरी पंजाबी साहित्याच्या उदयकाली मात्र मानवी सामर्थ्य व कर्तृत्व यांची जाण बाळगण्याऐवजी ते निष्ठुरपणे चिरडले जावे, हा एक दैवदुर्विलासच म्हणायला हवा. परिणामी पंजाबी लेखकांनी देवाधर्माविषयी निष्ठा व आस्था यांच्या जोरावर या परिस्थितीवर प्रकाश टाकण्याच्या प्रयास चालविला होता. प्रारंभावस्थेतील पंजाबी कादंबरीला साहजिकच या परिस्थितीने मारून व सीमितही करून टाकले. भाई वीरसिंग, त्यांचे समकालीन मोहनसिंग ‘वैद’ (१८८१-१९३६) आणि भाई चरनसिंग ‘शहद’ (१८९१-१९३५) यांच्या कादंबरीविश्वातील मानवी व्यक्ती या ईश्वरी योजनेवर दुर्दम्य निष्ठा आणि दृढ विश्वास प्रकट करताना आढळतात, यात संदेह नाही.

मान्यता पावलेले पहिले पंजाबी कादंबरीकार à नानकसिंग (१८९७-१९७१) हेही या परिस्थितीत फारसा बदल करू शकले नाहीत. तेही आपल्या कादंबर्‍यांतून प्रगत जीवनदृष्टी किंवा साहित्यिक कादंबरीचा आकृतिबंध साध्य करू शकले नाहीत. कर्मठ आणि सुधारणावादी निष्ठांच्या काटेकोर चौकटीत घरगुती जीवन रेखाटण्यावरच त्यांनी समाधान मानले. त्यांना आस्थ्या होती ती कथेच्या उत्कृष्ट निवेदनाची आणि ते त्यांनी केलेही बऱ्याच कौशल्याने. हे खरे, की नानकसिंग व त्यांचे समकालीन यांच्यापुढे एक मोठीच अडचण होती. त्यांचे साहित्यिक अस्तित्वच मुळी अर्धशिक्षित शीख मध्यमवर्गाच्या आश्रयावर अवलंबून होते. या निर्बधापायी विषयाच्या सूक्ष्मतेला त्यांच्या साहित्यात फारच थोडा वाव मिळाला. त्यांच्या कथांनकांचे आराखडे बहुधा योजनापूर्वक आखलेले असत व पात्रांना रम्याद्‌भुत वा भयानक घटनांमधून निःसंकोचपणे अक्षरशः ओढून काढले जाई. घटना व रहस्य यांची सर्वसाधारण शीख वाचकांची भूक भागविण्यासाठीच नानकसिंगानी कादंबऱ्यालिहिल्या. चिट्टा लहू (१९३२), पवित्तर पापी (१९४१), हक म्यान बिच दो तरवाराँ (१९६०) या त्यांच्या काही लोकप्रिय कादंबऱ्या होत. यांतील शेवटच्या कादंबरीस १९६१ चा साहित्य अकादेमीपुरस्कार लाभला.

जसवंतसिंग ‘कंवल’ (१९११- ) यांनीही नानकसिंगाचाच आराखडा उचलला आणि कर्मठ भावनाशीलतेचे तुणतुणे वाजविणाऱ्या सरधोपट कथानकांची रचना केली. मात्र शहरवासी मध्यमवर्गीय हिंदूंच्या ऐवजी त्यांनी यासाठी पंजाबच्या ग्रामीण जीवनाचे क्षेत्र निवडले. त्यांनी रेखाटलेल्या शेतकरी जीवनाच्या जादूभरल्या चित्रांतील नायकनायिका रम्याद्‌भुत प्रणयभावनेत गुरफटलेल्या दिसतात. पूरनमासी (१९५०) ही त्यांची या धर्तीची उत्कृष्ट कादंबरी. रात बाकी है, हाणी आणि सिविल लाइन्स यांसारख्या उत्तरकालीन कादंबर्‍यांच्या कथानकांवर त्यांनी मार्क्सवादी राजकारणाच्या दिशाहीन चर्चेचेही कलम बांधले आहे. मेजर नरेंद्रपालसिंगांनीही नानकसिंगाच्या भावशबल स्वच्छंदतावादाचाच कित्ता गिरवीत ऐतिहासिक कांदबर्‍यांच्या सांगाड्यांतून भारतीय ध्येयवादाचा पुरस्कार करण्याचा कंटाळवाणा प्रयत्न केला. सेनापति (१९४९), शक्ति (१९५२), एक राह इक पडा इ. त्यांच्या लोकप्रिय कादंबऱ्या होत. साचेबंद स्वच्छंदतावादाने काठोकाठ भरलेल्या त्यांच्या कादंबऱ्या बहुजन समाजालाच केवळ रिझवू शकतात.

पंजाबी कादंबरीन स्वतःची स्वतंत्र अस्मिता प्रस्थापित केली, ती गुरदियालसिंग यांच्या द्वारा. मढी दा दीषा, अनहोये, अधतानणी रात, आथण उग्गण, अन्हे घोडे दा दान ह्या त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्या. आपल्या कादंबर्‍यांत ते ग्रामीण पंजाबच्या नीतिकल्पना काटेकोरपणे वास्तववादी शैलीत साकार करतात. ग्रामीण पंजाबच्या वास्तवाला से जादूभरे रूपही देऊ पहात नाहीत किंवा पंजाबी कादंबरीला शापभूत होऊन बसलेल्या भावशबलतेच्याही आहारी जात नाहीत. पंजाबीमध्ये प्रादेशिक कादंबऱ्या लिहून त्यांनी एक नवापायंडा पाडला. पंजाबमघील मालवा या भागात राहणाऱ्या पददलित समाजाचे ते शब्दचित्रकार होत. त्यांची पात्रे या जगात जणू अस्थित्वशून्य जिणे कंठीत असतात. आथण उग्गणमधील त्यांचा नायक निष्कांचन वर्गातला नसूनही अस्तित्व आणि अस्तित्वशून्यता यांच्या सीमारेषेवरच जगताना दिसतो. श्रीमती दलीप कौर टिवानांच्या कादंबर्‍यांत इह हमारा जीवना ही कादंबरी उत्कृष्ट मानली जाते. तिला १९७१ चा अकादेमीपुरस्कारही मिळाला. मानवाच्या यासनेला बळी पडल्यानंतरदेखील जगण्याची हौस न फिटलेल्या एका शेतकरी स्त्रीची शोकांतिका तीत त्यांनी रंगविली आहे. समीक्षकांचे लक्ष वेधणारे दुसरे एक लेखक मोहन कहलों हे असून मछली इक दरिया दी, बेडी ते बरेता, परदेशी रुख इ. त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्या होत. बेडी ते बरेतामध्ये त्यांनी हिमालयातील गुराख्यांचे (गुज्जर) व रावीच्या पश्चिम तीरावरील नावाड्यांच्या जीवनाचे दर्शन घडविले आहे. परदेसी रुखमधील चित्र फाळणीनंतर सीमाभागात वास्तव्य करीत असलेल्या समाजाचे आहे. तीत त्यांनी सीमो नावाच्या मुसलमान मुलीला पकडून तिच्यावर अनेकांनी केलेल्या बलात्काराचे प्रक्षोभक वर्णन केले आहे. परंतु त्यातून उद्‌भवणाऱ्या मानसशास्त्रीय किंवा सामाजिक समस्यांना मात्र स्पर्शही केलेला नाही. हाल मुरीदाँ दा या कादंबरी-त्रयीत (ट्रिलॉजी) à कर्तारसिंग दुग्गल (१९१७- ) यांनी सामाजिक मानसशास्त्रीय वास्तववादाच्या साहाय्याने ग्रामीण समाजाचे बहुढंगी दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. नाट्यपूर्ण संवाद, प्रभावी निवेदन, संज्ञाप्रवाह, घटनांची क्रमशः वर्णने इ. विविध क्लृप्त्यांचा एकसंध आणी साकल्यात्मक उपयोग त्यांनी कौशल्याने करून घेतला आहे. रेगिस्तान दा सफर आणि प्रीतो या परगतसिंग सिंधूच्या कादंबऱ्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या. पहिलीत त्यांनी एका सैनिकाची वैराण जीवनयात्रा चित्रित केली आहे. सैनिकाच्या जीवनाचे हे चित्रण पंजाबी कादंबऱ्यातच सर्वांत प्रमाणभूत मानले जाते. प्रीतोमध्ये आघाडीवर असलेल्या पतीविषयी एकनिष्ठ प्रेम आणि दुसऱ्या पुरुषाच्या समागमाची लागलेली अनिवार ओढ यांच्या कैचीत सापडलेल्या एका तरुणीच्या मनाची ससेहोलपट साकार झाली आहे. शेवटी दुरंत वासनेपुढे हार खाऊन ती विवाहबाह्य संबंध स्वीकारते. प्रीतोच्या या लहानशा अनुभवखंडाचा एका प्रभावी कादंबरीएवढा विस्तार करणे, हेच या कादंबरीचे यश. सिधूंच्या शैलीचे वैशिष्ट्य हे, की शुष्क शब्दांचा निरुपयोगी पालापचोळा फेकून देऊन ते अपरिहार्य तेवढेच शब्द वापरतात आणि परिणामी पात्राच्या मनाचे सूक्ष्मतिसूक्ष्म झंकार शब्दाशब्दांतून प्रकट करतात.


जुन्या कादंबरीकारांपैकी केसरसिंग यांनी कौटुंबिक जीवनचित्रणाच्या आहारी जायचे टाळून आपल्या कादंबर्‍यांतून एक परिपक्व जीवनदृष्टी प्रकट केल्यामुळे ते उल्लेखनीय ठरतात. जंगी कैदीत त्यांनी दुसऱ्या महायुद्धातील एक युद्धकैद्याचे अनुभव आकर्षकपणे वर्णिले आहेत. महायुद्धासारख्या दारुण आपत्तीत केवढी प्रचंड मनुष्यहानी होते याचे दर्शन घडवून त्यांनी युद्धाचा फोलपणा यथार्थपणे रेगविला आहे. काव्यरचनेबरोबरच कादंबऱ्याही लिहिणाऱ्या सोहनसिंग ‘सीतल’ (१९०९- ) यांच्या काही अलीकडच्या कादंबर्‍यांत उत्कृष्ट कादंबरीचे गुण आढळून येतात. उदा. तूतांवाला खूह, जंग की आमन आणि जुग बदल गया त्यांच्या कादंबऱ्या परिपक्व अशा मानवी संवेदनशीलतेचाच परिपाक होत. प्रायोगिक कादंबरीकार म्हणून समीक्षकांनी दखल घेतलेले आणखी काही कादंबरीकार सूरजीत हंस (मिट्टी दी ढेरी), सूरजीतसिंग सेठी (इक खाली प्याला, आदरा कदाबरा, कल वी सूरज नहीं चढेगा) आणि जगजीत ब्रार (धुप दरियाँ दी दोस्ती) हे होत. कादंबरीलेखनाच्या तंत्रात यांनी केलेल्या प्रयोगांना लक्षणीय यश लाभले आहे.

लघुकथा : गेल्या काही वर्षात पंजाबी कादंबरीप्रमाणेच पंजाबी लघु  कथेतही बरेच परिवर्तन घडून आलेले आहे. काही टीकाकारांच्या व कथालेखकांच्या मते, तर लघुकथा या साहित्यप्रकाराची अधोगतीच होत आहे. कथा लिहिल्या जात नाहीत असे नाही. वस्तुतः नियितकालिके व मासिके यांमुळे त्यांच्या वाट्याला खूपच लोकप्रियता आलेली आढळते. आकृतिबंध ब निवेदनतंत्र या दोन्ही क्षेत्रांत नवीन कथाकार परोपरीचे प्रयोग करीत आहेत. तिला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव झाल्यामुळे तिचा विस्तार कमी होऊन ती अधिक सखोल व प्रभावी बनली आहे. आधुनिक कलात्मक लघुकथेचा जन्म विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात संतसिंग सेखाँ (१९०८- ) यांच्या कथांनी झाला. ते पक्के मार्क्सवादी असूनही प्रारंभी तरी त्यांनी आपल्या कथांना प्रचाराचा स्पर्शदेखील होऊ दिला नव्हाता. त्यांच्या जोडीला गुरबक्षसिंग, सुजानसिंग (१९०९- ), कर्तारसिंग दुग्गल यांनीही या क्षेत्रात पदार्पण करून वाचकांच्या अपेक्षा बऱ्याच उंचावल्या. परंतु एकट्या दुग्गलनीच तेवढा या साहित्यप्रकाराला सावकाश पण निश्चित आकार देण्याचा प्रयत्न केला. लैंगिक बाबतीत शिथिल य सहिष्णू  असलेल्या उच्छमध्यमवर्गाचे जीवनचित्र त्यांनी रेखाटले. त्यांनी फाळणीवर लिहिलेल्या मोजक्याच कथा (उदा., ‘तूँखा’, ‘नवाँ घर’ इ.) त्या विषयावरच्या सर्वांत हृदयस्पर्शी कथा म्हणून गणल्या जातात. इक छित चनाँ दी या त्यांच्या कथासंग्रहाला १९६५ चा साहित्य अकादेमीपुरस्कार मिळाला. दुग्गलनंतरचे कथाकार कुलवंतसिंग विर्क यांची प्रतिपाद्याविषयी उत्स्फूर्त संवेदनशीलता आणि प्रतिसादाचा लवचिक खेळकरपणा, ही खास वैशिष्ट्ये होत. नवें लोक या संग्रहात त्यांनी नागरिकरणसमस्येच्या विविध अंगांचे हळुवार पण सुजाण व डोळस चित्रण केले आहे. या त्यांच्या संग्रहास १९६८ चा साहित्य अकादेमीपुस्कार लाभला. प्रागतिक चळवळीला वाहून घेणारे कथाकार संतोखसिंग ‘धीर’ (१९२२- ) हे सिद्ध्हस्त लेखक व भाषाप्रभू असून चिकित्सक वास्तववादाची त्यांना नेटकी जाणीवही आहे. १९५० ते ६० ह्या दशकात पुढे आलेल्या अमरसिंग, नवतेजसिंग, लोचन बक्षी देविंदर, मोहिंदरसिंग ‘सरना’ उ. कथाकारांनी पंजाबी कथासाहित्याला अधिक प्रौढ व तंत्रदृष्ट्या प्रगत असे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.

 

त्यांच्यामागून उदय पावलेल्या गुलजारसिंग संधू (१९३५–  ), मोहन भंडारी, गुरदियालसिंग या लेखकांनी नागरी जीवनाकडून ग्रामीण जीवनचित्रणाकडे मोर्चा वळविला. स्त्रीपुरुषांच्या नरमादी स्वरूपाच्या मूलभूत नात्याचा विषय नव्याने हाताळून अजित कौर यांनी कथासाहित्याला कलात्मकतेचे एक अभिनव परिमाण प्राप्त करून दिले. या विषयाची मीमांसा त्या अत्यंत मनमोकळेपणाने आणि काटेकोरपणाने करतात. गेल्या काही वर्षात गुरबचनसिंग भूलर, गुरदेवसिंग रूपाना व नवतेज पुआधी यांनी सर्वसामान्य माणसाच्या दिवास्वप्नांना आणि आशाआकांक्षांना शब्दरूप देण्याचे लक्षणीय कौशल्य दाखवले आहे. रविंदर रवींनी आपल्या कथांतून देशाबाहेरील स्थळे व व्यक्ती यांचे आगळे दर्शन पडविले आहे. शहर विच्च जंगल हा त्यांचा कथासंग्रह वाचनीय असला, तरी विदेशांतील स्थळे व व्यक्ती यांविषयीच्या व्यक्तिगत धारणा ते अजूनही पचनी पाडू शकले नसावेत, असे जाणवते. अमरजीतसिंगांनीही (काफी हाउस दे बाहर खडा आदमी) परंपरा सोडून निराळा मार्ग चोखाळल्याचे जाणवते. ते परंपरागत पद्धतीने कथा संगत बसत नाहीत, तर ती प्रत्यक्ष पात्रांच्या द्वारे साकार करून दाखवितात.

गुल चौहान, प्रीतम, जोगींदर कैराँ आणि प्रीतम ब्रार हे समीक्षकांचे लक्ष वेधून घेणारे आणखी काही कथालेखक. नवोदित तरुण लेखकांत प्रेम गोरखींचे नाव बहुजन समाजाचा लाडका लेखक म्हणून गाजते आहे. मिट्टी रंगे लोक या संग्रहात त्यांनी या लोकांच्या व्यथावेदनांना शब्दरूप दिले आहे. नवे शोधण्याचे सामर्थ्य, सूक्ष्म विश्लेषण आणि धाडसी प्रयोग करून पहाण्याचे धैर्य यांच्या आधारे नवोदित लेखक स्वतःच्याच अंतरंगात खोलवर डोकावू पहात आहेत. अशा प्रकारे स्वतःच्या नवीन अस्मितेचा शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पंजाबीतील नवकथेची अमाप निर्मिती ध्यानी घेता, पंजाबी कथाकार कादंबरी काराहून अधिक बुद्धिमान असा कलावंत असून त्याने कलेला सर्वस्वी वाहून घेतलेले आहे, असे अनुमान करण्यास प्रत्यवाय नाही.

नाटक : पंजाबी नाटकाला अजून पुष्कळच वाटचाल करायची आहे. फाळणीपूर्वी लाहोर हेच पंजाबच्या रंगभूमीचे केंद्रस्थान होते. १९४७ च्या फाळणीनंतर मात्र तिचे स्थानांतर सिमला व दिल्ली या शहरी झाले. प्रारंभी पंजाबी नाट्यक्षेत्रात अभिमान बाळगण्याजोगे काहीदेखील नव्हते आणि त्याची सुरुवात होऊन पुरी चार दशके उलटल्यावरही काही नेत्रदीपक कर्तृत्व गाजविल्याचा दावा ते करू शकत नाही. फाळणीनंतर लगेच अमरीकसिंग व जी. डी. सोंधी यांनी ‘लिट्ल गेइटी थिएटर’ च्या विद्यमाने पंजाबच्या अभिनयकलेला उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. दिल्लीमध्ये गुरदियालसिंग खोसलांनी पंजाबच्या रंगभूमीविषयीची आस्था नव्याने जागृत करून स्वतःची काही नाटके दिल्लीच्या रंगभूमीवर प्रेक्षकांना करून दाखविली. फाळणीपूर्वीदेखील आय्. सी. नंदा, संदसिंद सेखाँ, हरचरणसिंग व बलवंत गार्गी हे चार नाटककार नाटके लिहिणे, प्रकाशित करणे व ती रंगभूमीवर आणणे अशा तिहेरी प्रयत्‍नांत सदैव गुंतलेले होते. त्यासाठी ते मुख्यतः अननुभवी कलाकार म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थाचे साहाय्य घेत. आजही तेच प्रमुख नाटककार म्हणून मान्यता पावलेले आहेत. त्यांच्या जोडीला काही थोडीच नावे सांगता येतील पण त्यांना अजून आपले कर्तृत्व पुरतेपणी सिद्ध करावयाचे आहे.

आय्. सी. नंदा (१८९२- ) हे पंजाबचे पहिले मान्यता पावलेले नाटककार. त्यांनी आपल्या सुखात्मिकांची मांडणी शेक्सपिअरच्या धर्तीवर केली. सुभदरा (१९२८), घर घर जां आणि लिल्ली दा व्याह ही त्यांनी मोठी नाटके म्हणजे पंजाबच्या लोकसाहित्यातील विविध विषयांवर चढविलेला नाट्यकलेचा साज होय. त्यांच्या नाटकांचे प्रयोजन समाजसुधारणा हे होते. संतसिंग सेखाँचा पहिला एकांकिकासंग्रह छे घर १९४१-४२ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांनी अनेक पौराणिक-ऐतिहासिक नाटके लिहिली उदा., वारिस (हीर-रांझाच्या प्रणयकथेला अमरत्व मिळवून देणाऱ्या वारिस शाह यांच्या कथेवर आधारित), मित्र प्यारा (लेनिनच्या जीवनवरील), मोइयाँ सार ना काई (महाराजा दलीपसिंहाचे निर्वासन व पंजाबी राष्ट्रवादाची शोकांतिका यांचे नाट्यरूपांतर), दमयंती (नलदमयंतीच्या प्रणयकथेचे मार्क्सवादी नाट्यरूप विवरण) इत्यादी. कलाकार (१९४६) हे मोठे नाटक त्यांच्या कृतींत सर्वोत्कृष्ट ठरते. सेखाँच्या दृष्टीने नाटक हा साहित्यप्रकार म्हणजे प्रचारात्मक बौद्धिक चर्चा करण्याचे माध्यम होय, मध्ययुगीन पंजाबच्या व शिखांच्या इतिहासावर आधारलेली त्यांची नाटके पूर्वपक्ष-उत्तरपभ करून केलेल्या सैद्धांतिक वादविवादातील चटकदारपणामुळेन लोकप्रिय झाली आहेत, नाट्यकलेच्या यशस्वी आविष्कारामुळे वा रसाळतेमुळे नव्हेत. त्यांच्या मित्र प्यारा नाटकास १९७२ चा साहित्य अकादेमीपुरस्कार लाभला.


हरचरणसिंग (१९१५- ) हेही मुख्यतः पंजाबच्या महाविद्यालयांतील विद्यार्थी वर्गाकरिता उत्साहाने नाट्यलेखन करीत आहेत. पंजाबी रंगभूमीला त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली यात संदेह नाही पण आपल्या नाटकांत कलागुण आणण्याची वा त्यांवर बौद्धिक संस्कार करण्याची महत्त्वाकांक्षा मात्र ते बाळगताना दिसत नाहीत. प्रेक्षकांची अभिरुची दृष्टीपुढे ठेवूनच ते नाटके लिहितात. परिणामी नाट्यकलेवर प्रतिकूल परिणाम होत राहतो. व्यावसायिक हिंदी बोलपटांचा खास नमुना समोर ठेवून, साऱ्या ठराविक घटकांचे नेमक्या प्रमाणात मिश्रण करून ते साचेबंद नाटके लिहीत असतात. विषमविवाहाचे दुष्परिणाम दाखविणारे अनजोड (१९४१) हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय नाटक होय. त्यांची भडक आणि भावशबल नाटके फारसा तग धरतीलसे वाटत नाही. गुरदियालगिंग खोसला (बूहे बैठी धी), गुरदियालसिंग ‘फुल्ल’व कपुरसिंग घुम्मन यांचाही हातभार पंजाबच्या व्यावसायिक रंगभूमीच्या विकासाला लागलेला आहे.

पंजाबी नाट्यलेखनाला व नाट्यप्रयोगांना नवीन परिमाण दिले ते बलवंत गार्गी (१९१६–) यांनीच. त्यांनी निरनिराळे साहित्यप्रकार हाताळले असले, तरी त्यांना खरे वेड आहे ते नाटकाचेच. भारतीय रंगभूमीच्या इतिहासाचे व विकासाचे समग्र दर्शन घडविणारा रंगमंच हा ग्रंथ त्यांनी लिहिला असून त्याला १९६२ चा साहित्य अकादेमीपुरस्कारही लाभला. बराच काळपर्यंत त्यांच्या लेखनावर प्रागतिक चळवळीचा प्रभाव पडलेला होता. त्यामुळेच ते नाटकांसाठी शांति-आंदोलन (घुग्गी १९५०), सामूहिक सुधारणा (बिश्वेदार) आणि ग्रामीण पुनर्रचना (केस्रो १९५२) यांसारखे विषय निवडीत. सैल – पत्थर (१९४९) या प्रदीर्घ नाटकात भांडवलशाही समाजातील ध्येयवादी कलाकाराचे कर्तव्य आणि भूमिका यांविषयी बुद्धिनिष्ठ वादविवाद आढळतात, ते या प्रभावामुळेच. धूनी दी अग्ग या नाटकात मानवी स्वभावातील मूलभूत प्राथमिक प्रवृत्तींना नाट्यरूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. भाषाप्रभुत्व, आशयगर्भ प्रतिमा आणि चटकदार व स्फोटक संवाद यांमुळे हे नाटक वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. सुलतान रझिया या आपल्या अलीकडच्या नाटकात मध्ययुगीन इतिहासाच्या एका कालखंडाची, समकालीन राजकीय परिस्थितीशी यथार्थ सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अमरीकसिंग, हरचरणसिंग, सूरजीतसिंग सेठी, गुरचरणसिंग जसुजा यांसारखे नाटककार फाळणीनंतर उदयास आले. परछावियाँ दी पकड या अमरीकसिंगाच्या नाटकाचा नायक परिस्थितीचा बळी असून त्याचे उद्‌ध्वस्त जीवन हा त्या नाटकाचा विषय आहे. उत्कट उत्कर्षबिंदू गाठण्याच्या दृष्टीने नाटककाराने प्रसंगमालिकेचे तंत्र योजले आहे. जिगरा, लमे समय दा नरकउदास लोक या नाटकांत हरचरणसिंगांनी प्रकट केलेल्या कलागुणांमुळे अपेक्षा उंचावल्या असल्या, तरी त्यांच्या कृतींत अशी गुणवत्ता सातत्याने मात्र आढळत नाही. कंधां रेत दियाँ, अंधकारइक हीरो दी तलाश या नाटकांत गुरचरणसिंग जसुजांनी आपल्या रोखठोक व्यवहारचातुर्याची साक्ष पटविली आहे. परंपरागत सिद्धांत आणि लोकप्रिय प्रणाली यांपासून संपूर्ण मोकळीक तसेच उत्स्फूर्तता हीच त्यांची आगळी वैशिष्ट्ये ठरतात. सामान्यतः नागरी मध्यमवर्गाच्या जीवनातील क्षुल्लक संघर्ष व समस्या यांना त्यांनी नाट्यरूप दिले आहे.

जुन्या पिढीतील दुग्गल यांनी आकाशवाणीसाठी श्रुतिका लिहिण्यात नैपुण्य मिळविले, तर हरिभजनसिंग व सूरजीत हंस यांनी अनुक्रमे तार तुपका आणि पुशताँ ही उत्कृष्ट गीतिनाट्ये रचली. परंतु त्यांचा समावेश काव्यात करणे अधिक उचित होईल.

सीमेपलीकडे पश्चिम पंजाबातही नाट्यसाहित्य व रंगभूमी या दोन्ही क्षेत्रांत खूपच निर्मिती व प्रयोग होत आहेत. दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या फकर जमाँ व इष्क यांच्या नाटकांनी रसिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. दुल्ला-भट्टी या एका आख्यायिकेतील नायकाच्या जीवनावर आधारलेल्या तखत लाहौर व कुकनूस ह्या अनुक्रमे नज्महुसैन सय्यद व इष्क यांनी रंगभूमीसाठी लिहिलेल्या नाटकांचाही उल्लेख अवश्य करायला हवा. मोगल राजवटीच्या आरंभी या दुल्ला-भट्टीने अकबराविरुद्ध उठाव केला होता.

पंजाबी नाटकांत वा रंगभूमीवर फारसे नावीन्य आढळत नसले, तरी रंगभूमीविषयीची आस्था पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टीने काही उत्साही नाट्यसेवक मंडळी पुढे सरसावत आहे. पतियाळात हरपाल टिवाना व त्यांच्या पत्नी तसेच अमृतसरमध्ये ‘गुरशरणसिंग नाटक कला केंद्र’ या संस्थेने या दिशेने प्रशंसनीय प्रयत्न चालविले आहेत. गेल्या उण्याअधिक पाच वर्षांत दिल्लीतदेखील एक पंजाबी नाट्यगृह भरभराटीस आले आहे. चुरचुरीत हास्य आणि सूचक कोट्याप्रतिकोट्या यांनी भरलेली नाटके पाहण्यासाठी शहरातील मध्यमवर्गीय प्रेक्षकांची ‘सप्रू हाउस’ मध्ये प्रचंड गर्दी लोटते. सवंग विनोद व उथळ लैंगिक सूचकता यांमुळे ही व्यावसायिक नाटके खूपच लोकप्रिय झाली आहेत परंतु त्यांवर सवंगतेचा व अश्लीलतेचा शिक्का मात्र न चुकता मारला जातो.

सर्वसाधारणपणे समजले जाते तसे पंजाबी नाट्यसाहित्य अत्यल्प वा दरिद्री नाही हे उघड आहे पण हेही तितकेच खरे, की त्याला अजून खूपच वाटचाल करायची आहे. पंजाबी लोकांच्या साहित्यप्रणालीत त्याला अजून आपले निश्चित स्थान प्राप्त करून घ्यावयाचे आहे. नवे नवे प्रयोग, अभिनव संवेदना, आशयघनतेचा अधिक सखोल मागोवा, मानवाच्या वास्तव परिस्थितीचे सूक्ष्मतर आलोडन इत्यादींचा प्रवेश अजून पंजाबी नाटकांत झालेला नाही.

साहित्यसमीक्षा : विसाव्या शतकाच्या उदयापूर्वी पंजाबीत कोणत्याच प्रकारची साहित्यसमीक्षा नव्हती. मौला बक्ष खुश्त यांचा पंजाबी दे हीरे हा सुव्यवस्थित समीक्षेचा पहिला प्रमाणभूत ग्रंथ होय. त्यात पंजाबमधील मुसलमानांच्या मध्ययुगीन पंजाबी कवितेचे मूलभूत स्वरूपाचे मूल्यमापन व चरित्रात्मक टीपा समाविष्ट आहेत. बनबीता बोल कोयल कू हंस चोग या दोन ग्रंथांत बावा बुधसिंगांनी कवी आणि त्यांच्या रचना यांचे कौतुक करून भरपूर अवतरणेही उद्‌धृत केली आहेत. त्यांनाच पंजाबच्या आधुनिक साहित्यसमीक्षेचे जनक व आद्य प्रवर्तक म्हणता येईल. खुले लेख या आपल्या निबंधसंग्रहातील ‘कविता’, ‘कवि दा दिल’, ‘आर्ट’, ‘इक जापानी नायिका दी कहानी’ इ. लेखांत साहित्याचे असे खास तत्त्वज्ञान मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांची ही मीमांसा प्रतिभाशाली, स्फूर्तिप्रद आणि काहीशी आध्यात्मिकही आहे. इंग्रजी साहित्य व पाश्चात्त्य साहित्यसमीक्षा यांच्या निकट परिचयाच्या बळावर तेजासिंगांनी समकालीनांच्या साहित्याचे पाश्चात्त्य निकषांवर मूल्यमापन केले आहे. पंजाबी साहित्यसमीक्षेस त्यांनी काहीशी अलिप्त, वस्तुनिष्ठ दृष्टीही दिली. त्यांनी बव्हंशी पंजाबी पुस्तकांना प्रस्तावना वा पुरस्कार लिहून पंजाबी वाचकांना त्यांचा परिचय करून देण्याचे काम केले. यानंतर लिहिलेल्या साहितदर्शन या ग्रंथात त्यांनी स्वतःचे साहित्यविषयक तत्त्वज्ञान वा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला.


लाहोरच्या पंजाब विद्यापीठातील पंजाबीचे पहिले तज्ञ व उच्चशिक्षित प्राध्यापक मोहनसिंग यांनी पंजाबी साहित्याचे पहिले सुसूत्र इतिहास पंजाबी व हिंदी दोन्ही भाषांत लिहिले. साहित्यसमीक्षेविषयी वेळोवेळी केलेले विवेचन त्यांनी साहितसरोवर या नावाने प्रकाशित केले आहे. यांवरून स्पष्ट दिसून येते, की ते परंपरानिष्ठ व अभिजाततावादी भूमिकेवरूनच साहित्याचे मूल्यमापन करीत असतात.

गोपालसिंगांनी डॉक्टरेटसाठी लिहिलेला प्रबंध वाढवून व सुधारून पुढे रोमँटिक पंजाबी कवि या नावाने प्रसिद्ध केला. त्यावरून त्यांच्या समीक्षात्मक व संशोधनपर लेखनाविषयी बऱ्याच अपेक्षा निर्माण झाल्या. पंजाबी साहित दा इतिहाससाहित दी परख हे त्यांचे ग्रंथही त्या काळी चांगले मान्यता पावले होते.

फाळणीनंतर पंजाब विद्यापीठात पंजाबीचे पदव्युत्तर शिक्षण दिले जाऊ लागले. संतसिंग सेखाँनी पंजाबी साहित्याचे विवरण व मूल्यमापन करण्याचा उपक्रम मनःपूर्वक हाती घेतला. साहित्यशास्त्राच्या सिद्धांतांचाही आराखडा आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि तरुण प्राध्यापकांच्या मार्गदर्शनासाठी सिद्ध करण्याचे कार्य त्यांनी अंगावर घेतले. प्रारंभी त्यांनी टी. एस्. एलियट व आय्. ए. रिचर्ड्‌स यांचे आदर्श पुढे ठेवले होते. मार्क्सवादी समीक्षक या नात्याने सेखाँची अशी श्रद्धा होती, की साहित्य हा समाजाच्या जडणघडणीचाच एक घटक असून त्यात त्या त्या वर्गाचे विशिष्ट गुणधर्म अनुस्यूत असतात. त्यामुळे स्वतःच्या समीक्षाप्रणालीत एलियटचा अभिजाततावाद, रिचर्ड्‌सची मानसशास्त्रीय पद्धती व वर्गकलहाचा मार्क्सवादी सिद्धांत यांची सांगड घालून त्याच निकषांवर त्यांनी पंजाबी साहित्याचे मूल्यमापन केले. साहित्याचा अर्थ कसा लावावा, यावर त्यांनी साहित्यार्थ या नावाचा प्रबंधही लिहिला.

जसबीरसिंग अहलूवालिया आणि अत्तरसिंग या नव्या पिढीतील समीक्षकांनीही संतसिंग सेखाँच्या पावलावर पाऊल टाकून समीक्षा  करण्यास प्रारंभ केला. अहलूवालियांनी मोहनसिंग व अमृता प्रीतम यांच्या संप्रदायातील प्रागतिक पंजाबी कवितेचे अर्थग्रहण १९५५ च्या सुमारास करून दाखविले. अत्तरसिंगांच्या समीक्षापर लेखांचे तीन संग्रह आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहोत : काव्य-अध्ययन, दृष्टिकोणसंदर्शन ही त्यांची नावे. साहित्यविषयक मार्क्सवादी भूमिकेचे ते प्रमुख प्रवर्तक होत. तथाकथित डोळस प्रागतिक समीक्षेचे ते समर्थन करतात. खऱ्याखुऱ्या प्रागतिक ललित साहित्याने सामाजिक शक्तींना वैचारिक मार्गदर्शन करून सामाजिक सुव्यवस्थेचा आदर्श म्हणजेच समाजवाद प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी निर्माण केले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या दृष्टीने कमीअधिक प्रमाणात सामाजिक धारणांचा इतिहास हीच ललित साहित्याची व्याख्या ठरत असल्याने, त्यांनी साहित्याची मीमांसाही सामाजिक इतिहासाचे एक अंग म्हणूनच केली आहे अनुभूतींचा कलात्मक आविष्कार या नात्याने नव्हे.

आधुनिक पंजाबी समीक्षेत विख्यात असलेले आणखी एक समीक्षक हरभजनसिंग हे होत. त्यांच्या सर्वगामी प्रतिभेने प्रथम काव्यरचनेचा प्रपंच मांडला होता परंतु गेल्या काही वर्षांत मात्र त्यांनी आपले लक्ष प्रामुख्याने समीक्षालेखनाकडेच वळविले आहे. विशुद्ध अशा साहित्यिक मूल्यांवर आधारलेल्या समीक्षेला अनुकूल ठरणारे वातावरण त्यांनी प्रथमच निर्माण केले या अर्थी त्यांची समीक्षा अपूर्व ठरते. त्यांच्या पूर्वीची मार्क्सवादी समीक्षा व मीमांसाही नानापरींच्या साहित्यबाह्य निकषांवर आधारलेली असे. परंतु हरभजनसिंगांनी आधुनिक पाश्चात्त्य साहित्यसमीक्षेतील नानाविध प्रवाहोपप्रवाहांचे प्रगाढ अध्ययन केले. प्रागचा सौंदर्यवादी संप्रदाय, पॅरिसचा आकृतिवाद (स्ट्रक्चरॅलिझम), अमेरिकेची नवसमीक्षा रशियातील आकारवाद (फॉर्‌मॅलिझम), भाषाशैलीशास्त्रातील नवे विचार इत्यादींचा मागोवा घेत व चरित्राधिष्ठित, सामाजिक आणि त्यांसारख्याच इतर साहित्यबाह्य निकषांना फाटा देऊन साहित्यिक कलाकृतींचे विश्लेषण करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. त्यांच्या दृष्टीने साहित्यिक कलाकृती म्हणजे एक तर्कशुद्ध असा आकृतिबंध असून तिला स्वतःचा असा पोतही असतो. त्यांच्या मते साहित्यसर्जन म्हणचे स्वतःच्या माध्यमांच्या पलीकडे जाणे. रोलाँ बार्थ यांच्या ‘राइटिंग्ज डिग्री झीरो’ या लेखाच्या आधारे लिहिलेल्या निबंधात ते म्हणतात, की भाषेवाचून साहित्याचे सर्जन अशक्य असले, तरी भाषा हा त्याचा बाह्याकारही नव्हे आणि आंतराशयही नव्हे. साहित्याचा आकृतिबंध हा भाषेच्या रचनाकृतीपेक्षा सर्वस्वी भिन्न असतो. अर्थातच भाषेचे माध्यम घेऊन निर्माण केलेली साहित्यकृती भाषेच्या मर्यादा ओलांडून विस्तार पावत असते. मूल ते मूलांकन, साहित ते सिधांत, साहित शास्त्र, परगामी, रूपकी आणि रचना – संरचना हे त्यांच्या समीक्षालेखांचे संग्रह सर्वमान्य झालेले आहेत. समीक्षालेखांच्या नव्या संग्रहांत त्यांनी साहित्याच्या सुव्यवस्थित अध्ययनाची साधने व पद्धती साकार करण्याचा प्रयत्न केला आहे.

किसनसिंग हे साहित्यिक चर्चेच्या गदारोळात भरपूर मतभेद निर्माण करणारे आणखी एक मार्क्सवादी समीक्षक. साहित दी समझ या अगदी अलीकडच्या पुस्तकात त्यांनी मार्क्सवादी समीक्षकांचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. या समीक्षकांना साहित्यकृतीतील वैयक्तिक पेचप्रसंगांत मुळीच रस नसतो. कारण ते सामाजिक मूल्यांच्या निकषावरच त्यांची मीमांसा करीत असतात. तरलोकसिंग कंवर आणि तेजवंतसिंग गिल या उदयोन्मुख समीक्षकांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. बदलदे परिपेख आणि मान – प्रतमान या दोन समीक्षालेखांच्या संग्रहांत तरलोकसिंगांनी हरभजनसिंगांच्या रचनाकृतिप्रधान भूमिकेचे विवरण केले आहे, तर संतसिंग सेखाँनी पुरस्कारलेल्या मार्क्सवादी दृष्टिकोनाची मीमांसा तेजवंतसिंगांनी केली आहे.

संदर्भ : 1. Harban Singh, Aspects of Punjabi Literature, Ferozepore, 1961.

    2. Harbhajan Singh, Punjabi Literature : A New Perspective, Delhi, 1968.

    3. Kohli, M. P. The Influence of the West on Punjabi Literature, Ludhiana, 1969.

    4. Mohan Singh, A History of Punjabi Literature, Amritsar, 1953.

    5. Serebyakov, I. Punjabi Literature, Moscow, 1968.

    6. Srinivasa Iyengar, K. R., Ed. Indian Literature since Independence : A Symposium, Delhi, 1973.

    7. Syed, Najm Hosain, Recurrent Patterns in Punjabi Poetry, Lahore, 1968.

हरभजनसिंग (इं.) करंदीकर, शैलजा (म.)