पंजाब विद्यापीठ : भारताच्या विभाजनानंतर पंजाब राज्यात १९४७ मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ. सुरुवातीस सिमला व नंतर सोलोन येथे विद्यापीठाचे तात्पुरते कार्यालय होते. विभिन्न अध्यापन विभाग निरनिराळ्या शहरी ठेवण्यात आले होते. १९५७ मध्ये मात्र विद्यापीठ चंडीगढ येथे हलविण्यात येऊन सर्व अध्यापन विभागही तेथे नेण्यात आले. विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक असून त्याच्या कक्षेत पंजाबी, पंजाब कृषि व गुरू नानक या विद्यापीठांच्या कक्षेत असलेल्या महाविद्यालयांव्यतिरिक्त पंजाब राज्य व चंडीगढ केंद्रशासित प्रदेश यांतील महाविद्यालये येतात. एक घटक महाविद्यालय, ४० अध्यापन विभाग, एक प्रादेशिक केंद्र आणि ८१ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत (१९७३-७४).
विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू व कुलसचिव हे सवेतन सर्वोच्च अधिकारी सर्व प्रशासनव्यवस्था पाहतात. कुलपती कुलगुरूची नेमणूक करतो.
विद्यापीठाने एम्.कॉम., एल्एल्.बी., एम्.बी.ए., बी.एस्सी. (नर्सिंग) इ. पदवी परीक्षांकरिता षण्मास पद्धतीचा अवलंब केला आहे. मानव्यविद्या वा वाणिज्य पदवी-अभ्यासक्रमांसाठी शिक्षणाचे माध्यम हिंदी, उर्दू किंवा पंजाबी असून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी इंग्रजी हेच माध्यम आहे. विज्ञान व तंत्रविद्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीही इंग्रजीच माध्यम आहे. विद्यापीठाच्या भूविज्ञान व गणित या विषयांच्या प्रगत अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिली आहे. यांशिवाय विद्यापीठात पत्रद्वारा शिक्षण देणारे एक संचालनालय आहे. विद्यापीठाचे चंडीगढ येथे एम्.ए.पर्यंत शिक्षण देणारे एक सायंमहाविद्यालय आहे.
शिक्षक, ग्रंथपाल, स्त्रिया व इतर कर्मचारी तसेच अंध, बहिरे, अपंग इ. विशिष्ट लोकांना मानव्यविद्यांतर्गत विषयांत बहिःस्थ विद्यार्थी म्हणून परीक्षेस बसता येते. विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी एक स्वतंत्र विभाग असून, परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांकरिता एक माहितीकेंद्र आहे.
विद्यापीठाने सांख्यिकी व गांधी तत्त्वज्ञान यांचा, त्याचप्रमाणे इतर काही विषयांकरिता एक वर्षाचा पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. तसेच रसायन, स्थापत्य, विद्युत् व यांत्रिक अभियांत्रिकीकरिता एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही सुरू केला आहे.
विद्यापीठाचे ग्रंथालय सुसज्ज असून त्यात सूक्ष्मपटाची व्यवस्था आहे. १९७५-७६ साली ग्रंथालयात ३,२०,४८६ ग्रंथ होते. विस्तार ग्रंथालय लुधियाना येथे व प्रादेशिक केंद्र ग्रंथालये रोहटक आणि होशियारपूर येथे आहेत. विद्यापीठाचे उत्पन्न ३५६·४६ लाख रु., तर खर्च ३६२·१८ लाख रु. होता (१९७३-७४). या उत्पन्नापैकी राज्य सरकार ७०% अनुदान देते आणि उरलेले उत्पन्न विद्यार्थ्यांचे शुल्क व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानाद्वारे मिळते. विद्यापीठाची एकूण विद्यार्थि संख्या १,४८,७३३ होती (१९७६).
घाणेकर, मु. मा.