पंचाल : पांचाल. उत्तर भारतातील एक प्राचीन देश. याचे जुने नाव क्रिवी असल्याचा शतपथ ब्राह्मणात उल्लेख सापडतो. हिमालयाच्या पायथ्यापासून चंबळ नदीपर्यंतचा, दिल्लीच्या उत्तरेकडील व पश्चिमेकडील प्रदेश यात होता पुढे गंगेच्या उत्तरेचा तो उत्तर पंचाल आणि दक्षिणेचा तो दक्षिण पंचाल असे दोन भाग करून, त्यांच्या राजधान्या अनुक्रमे अहिच्छत्र व नंतर बुद्धकाली कनौज आणि कांपिल्य व नंतर माकंदी अशा करण्यात आल्या. भारतीय युद्धकाळात द्रुपद हा या देशाचा राजा होता. द्रोणाचार्यानी अर्जुनाच्या मदतीने द्रुपदाचा पराभव करून उत्तर पंचाल आपल्या ताब्यात घेतला, असा महाभारतात उल्लेख सापडतो. पांडवपत्नी द्रौपदी (पांचाली) ही द्रुपद राजाचीच मुलगी. पंचालाच्या जोडीने कधीकधी कुरु-पांचाल या प्रदेशाचा उल्लेख येतो. या दोन प्रदेशांतील यज्ञसंस्था, भाषा, आचार इ. आदर्शवत् मानले जात. विद्यमान रोहिलखंडाचा पुष्कळसा भाग यात समाविष्ट होतो.
खरे. ग. ह.