पंचशील – १ : बौद्ध धर्मातील मूलभूत महत्त्वाची एक सदाचार संकल्पना. शील म्हणजे सदाचार. सदाचाराचे हे पाच नियम बौद्ध धर्मात मूलभूत आणि आवश्यक मानले आहेत. गौतम बुद्धाने ह्या पाच सदाचार व्रतांचे पालन प्रत्येक गृहस्थ बौद्धानुयायास आवश्यक म्हणून उपदेशिले. महत्त्वाच्या सर्व बौद्ध धर्मग्रंथांतही शीलाचे महत्त्व सर्वोच्च मानले आहे. ही पाच व्रते अशी : (१) प्राण्यांची हत्या करणार नाही, (२) न दिलेली वस्तू घेणार नाही, (३) वैषयिक मिथ्याचार करणार नाही, (४) खोटे बोलणार नाही व (५) मादक पदार्थांचे सेवन करणार नाही.
बौद्ध धर्माची दीक्षा घेताना प्रतिज्ञापूर्वक आणि जाहीरपणे ह्या पंचशीलाचा स्वीकार करावयाचा असतो.
बुद्धाने भिक्षूंसाठी यांव्यतिरिक्त आणखी पाच शीले वा व्रते सांगितली आहेत. ती अशी : (१) ठराविक वेळेशिवाय आहार न घेणे, (२) नृत्यगाननाट्यादींत भाग न घेणे व अशा कार्यक्रमांना हजरही न राहणे, (३) फुले, सुगंधी द्रव्ये, अलंकारादी चैनीच्या बाबींपासून दूर राहणे, (४) उंच शय्या व आसन न वापरणे, (५) सुवर्ण-रजताची अभिलाषा न बाळगणे. ह्या दहा व्रतांना ‘दशशील’ म्हटले जाते. दशशीलाच्या आचरणाने माणूस खात्रीने निर्वाण प्राप्त करून घेतो, असे बुद्धाने सांगितले. बौद्ध धर्माच्या प्रासाराबरोबर भारतबाहेरही ह्या पंच व दशशील कल्पनेचा प्रसार झाला.
बापट, पु. वि.