हिमनग : (हिमशैल). भर समुद्रात तरंगणारा, अशक्त उथळ पाण्यात किनाऱ्याला लागलेला जमिनीवरील बर्फाचा तुटून निघालेला मोठा खंड (राशी) म्हणजे हिमनग होय. हा गोड्या पाण्याच्या बर्फाचा खंड सामान्यपणे हिमनदीच्या समुद्राकडील टोकापासून किंवा ध्रुवीय हिमस्तरापासून तुटून निघालेला असतो. हिमनग विशेषतः ग्रीनलंड किंवा अंटार्क्टिका यांच्या भोवताली उघड्या समुद्रात आढळतात. हिमनग बहुधा वसंत ऋतू व उन्हाळ्यात निर्माण होतात. या काळात ग्रीनलंड व अंटार्क्टिका हिमस्तर आणि अधिक लहान दूरस्थ हिमनद्या यांच्या सीमांलगतच्या भागांत अधिक उबदार हवामानामुळे हिमनग अलग होण्याची त्वरा वाढते. उत्तर गोलार्धात ग्रीनलंडच्या पश्चिम भागातील हिमनद्यांपासून दर वर्षी सु. दहा हजार हिमनग निर्माण होतात. यांपैकी सरासरी ३७५ हिमनग न्यू फाउंडलंडच्या दक्षिणेकडे उत्तर अटलांटिक महासागरातील जहाजांच्या वाहतुकीच्या मार्गात वाहत जातात. ते हिमनग नौकानयन व जहाज वाहतुकीतीलमार्गनिर्देशन यांच्याबाबतीत धोकादायक ठरतात.

 

हिमनगांचा आकार, आकारमान व रंग भिन्न असतात. बर्फ स्वच्छ असला, तरी बहुतेक हिमनग पांढरे दिसतात. बर्फात सर्वत्र विखुरलेल्या लक्षावधी सूक्ष्म बुडबुड्यांमुळे ते पांढरे दिसतात कारण हे बुडबुडे त्यांच्यातून जाणारा प्रकाश खिरून टाकतात. काही हिमनगांत बुडबुडेरहित बर्फाच्या शिरा असतात. असे हिमनग गडद निळे दिसतात. काही हिमनग हिरवेही दिसतात. हिरवी शैवलेयुक्त पाणी गोठून हिरवा बर्फ तयार होतो.जेथे हिमनद्या किंवा हिमतट समुद्राला मिळतात, तेथे हिमतटाखालीलकिंवा हिमनदीच्या जिव्हेखालील पाण्याच्या दाबाची बाह्य दिशेत वाहणाऱ्या हिमनदीशी आंतरक्रिया होते. आर्क्टिकमधील ६ मी.पर्यंत अंतराचा पल्ला असणारी भरती-ओहोटी, तसेच पारा व फुगवटा यांच्याशी निगडित असलेले समुद्रपातळीतील लहान बदल यांच्यामुळे हिमनदीच्या वा हिमतटाच्या पुढे आलेल्या टोकावरील प्रेरणेमध्ये राहूनराहून चढउतार होत असतात. यामुळे वाहत्या बर्फाचा एक मोठा खंड निर्माण होतो. दुसऱ्या प्रकारेही हिमनग निर्माण होतो. हा प्रकार हे दक्षिण ग्रीनलंडमधील हिमनद्यांचे गुण-वैशिष्ट्य आहे. या प्रकारात हिमनदीच्या टोकाजवळील पृष्ठभागापाशी बर्फ वितळतो वा त्याचे बाष्पीभवन होते. या क्रियेची त्वरा हिमनदीच्या खालील बाजूवर पाण्याने होणाऱ्या झिजेपेक्षा जास्त असते. यामुळे पाण्याखालील हिमतट निर्माण होतो. अखेरीस पाण्याने अखंडपणे होणारी झीज, पाण्यात बुडालेल्या बर्फाची नैसर्गिक उत्प्लावकता, नियतकालिक वेळीय (भरती-आहोटीच्या) व इतर जलीय प्रेरणा यांच्यामुळे हिमतट तुटतो व हिमनग पृष्ठभागी तरंगू लागतो. बहुतेक अंटार्क्टिक हिमनग अंटार्क्टिक खंडीय हिमस्तर सावकाशपणे तुटून तयार होतात कारण हा हिमस्तर किनाऱ्याकडे पातळ होत गेलेला आहे आणि शेकडो किमी. लांबीचे पुरोभाग असलेल्या प्रचंड हिमतटाच्या रूपात महासागरात त्याचा निर्यास होतो.

 

हिमनग तयार होण्याची वार्षिक त्वरा आर्क्टिकमध्ये सु. २८० घ. किमी., तर अंटार्क्टिकामध्ये सु. १,८०० घ. किमी. एवढी आहे. उत्तर गोलार्धात पश्चिम ग्रीनलंड हिमनगनिर्मितीचे प्रमुख क्षेत्र आहे. पूर्व ग्रीन-लंडमधील हिमनगांची प्रवृत्ती उत्तरेकडे वाहत जाण्याची असून ते लहान आणि संख्येने कमी आहेत. खुद्द आर्क्टिक द्रोणीतही थोडे हिमनगअसतात. बॅरेंट्स समुद्रातील बहुतेक हिमनगांचे उद्गम क्षेत्र हे फ्रान्झ जोसेफ लँड हे आहे. उत्तर पॅसिफिक महासागरात हिमनग आढळत नाहीत तथापि ५५ ते ६० अक्षांशांदरम्यान अलास्कन-कॅनडियन समुद्र किनाऱ्यालगच्या सामुद्रधुन्या याला अपवाद असून तेथे हिमनग आढळतात. दक्षिण गोलार्धात सु. ६० दक्षिण अक्षांशाजवळील अंटार्क्टिक प्रवाह केंद्राभिमुखतेच्या(एका केंद्राकडे वळण्याच्या) ठिकाणी एकवटलेले आढळतात.

 

आर्क्टिकमधील हिमनगांचे आकारमान मोठ्या पिआनोपासून ते दहा मजली इमारतीपर्यंत मोठे असे बदलणारे असते. बहुतेक हिमनगांचे वि. गु. ०.९ असते व अशा रीतीने त्यांचे सहा सप्रमांश द्रव्यमान समुद्रपृष्ठाखाली असते. हिमनगात अडकलेल्या हवेच्या प्रमाणावर पाण्यावरचे त्याचे द्रव्यमान अवलंबून असते. आर्क्टिकमधील पुष्कळ हिमनग ४५ मी. उंच व १८० मी. लांब असतात. अंटार्क्टिकामधील हिमनग सपाट पृष्ठभाग असलेले असून आर्क्टिकमधील हिमनगांपेक्षा त्यांची संख्या जास्त आहे आणि ते प्रचंड आकारमानाचेही असतात. त्यांची लांबी सामान्यपणे ८ किमी. व त्यांचा बर्फ पाण्याच्या ४५ मी. वरपर्यंत आलेला दिसतो. मार्च २००० मध्ये बी-१५ नावाचा एक सर्वांत मोठा हिमनग रॉस आइस सेल्फपासून अलग झाला. त्याचे पृष्ठीय क्षेत्रफळ ११,००० चौ. किमी.हून जास्त व जाडी ३०० मी.पेक्षा अधिक होती.

 

ग्रीनलंडवरील वर्षणाचे ज्ञात प्रमाण, आताच्या बर्फाचे घनफळ आणि वर्षणाची त्वरा या बाबी जवळजवळ अनेक वर्षांपूर्वीच्या बाबींएवढ्याच असल्याचे गृहीत धरले, तर त्यांवरून हिमनगांतील बर्फाचे वय ५,००० वर्षे असल्याचे गणित करून काढता येऊ शकते. आर्क्टिक बर्फाची बेटे व अंटार्क्टिक राक्षसी हिमनग उच्च अक्षांशाच्या भागात १० वर्षांपर्यंत टिकून राहतात. जनक हिमनदीपासून अलग झाल्यावर पश्चिम ग्रीनलंडमधील बहुतेक हिमनग दोन वर्षांमध्ये वितळतात. आइस आयलंड-३ हा उत्तर गोलार्धातील एक सर्वांत मोठा हिमनग १९५० मध्ये आढळला. त्याचे क्षेत्रफळ सु. ९३ चौ. किमी. होते व त्यावर उभारलेल्या वैज्ञानिक केंद्रात अनेक वैज्ञानिक २० वर्षे कार्य करीत होते. उत्तर ग्रीनलंडमधील पीटरमन हिमनदीतून अलग झालेल्या हिमनगाचे क्षेत्रफळ २५१ चौ. किमी. होते.

 

आर्क्टिक महासागरातील हिमनग एकदा का अलग झाला आणि उघड्या समुद्रात गेला की, तीन महिने ते २ वर्षे या काळात तो बहुधा बॅफीन उपसागरात जातो. या काळात वितळणे व परिमितीच्या भागातून लहान बर्फराशी अलग होऊन हिमनगांचे विघटन होते. यामुळे हिमनग न्यू फाउंडलंडच्या किनाऱ्यापर्यंत व उत्तर अटलांटिकमधील ग्रँड बँक्सपर्यंत जाईपर्यंत त्याचे सु. ९० टक्के द्रव्यमान कमी होते. जेव्हा हिमनग ग्रँडबँक्स प्रदेशात प्रविष्ट होतो, तेव्हा तेथे गल्फ स्ट्रीम प्रवाहाचे गरम पाणी व लॅब्रॅडॉर प्रवाहाचे अधिक थंड पाणी एकमेकांत मिसळत असल्याने हिमनग थोडेच दिवस टिकून राहतो. सौम्य सागरी परिस्थितीत हिमनगाची उंची दर दिवशी ०° ते ४° से. तापमानात सु. २ मी., तर ४° ते १०° से. तापमानात ३ मी. या त्वरेने कमी होते.

 

उत्तर गोलार्धातील बहुतेक हिमनग पाण्यात विसर्जित होणाऱ्या हिमनद्यांपासून तयार होतात. हे हिमनग पाण्यात शेकडो मी. खोलीपर्यंत डुबकी घेतात किंवा पाण्याखालून त्याच्या पृष्ठभागापर्यंत उसळी मारू शकतात. त्यांमुळे देखण्या वैशिष्ट्यपूर्ण लाटा आणि बर्फ फुटण्याचे व एकत्रित मोठे तुटण्याचे आवाज ऐकू येतात. असे हिमनग शेकडो मीटर व्यापाचे असतात व रोज असे शेकडो हिमनग तयार होत असतात. 


 

हिमनगाचे दैनिक गतीचे नियंत्रण त्याचे आकारमान व आकार, आधीचा व तत्कालीन वारा, पृष्ठीय वायुप्रवाह व सर्वसाधारण सागरी प्रवाह यांद्वारे होते. यांपैकी हिमनगाचे आकारमान व आकार हा महत्त्वाचा घटक आहे. मध्यवर्ती राशीभोवती शिडासारखी शिखरे असलेल्या पक्षधारी हिमनगांवर वाऱ्यांचा मोठा परिणाम होतो व ते ३० नॉट गतीच्या एकसारख्या वाऱ्यात दिवसाला १ नॉट (सु. ४४ किमी.) गतीने हलतात. हिमनद्यांचा संवेग खूप जास्त असतो. त्यामुळे एकदा का त्यांना गती प्राप्त झाली की, वारा थांबल्यावरही ते अनेक तास गतिशील राहतात. तथापि एकूणच हिमनगाचे वहन हे सागरी प्रवाह व वारा यांचा एकत्रित परिणाम असतो. जेव्हा वाऱ्याची गती बदलणारी असते किंवा ३२ नॉटपेक्षा कमी असते व सागरी प्रवाह ०.५ नॉट पेक्षा अधिक गतीचा असतो, तेव्हा प्रवाहाचा परिणाम महत्त्वाचा ठरतो परंतु जेव्हा १२ तासांहून अधिक काळ ३० नॉट गतीचा वारा एकसारखा वाहत असतो, तेव्हा जेथे सागरी प्रवाह १ ते २ नॉट गतीने वाहत असतात, तेथे वाऱ्याचा परिणाम महत्त्वाचा ठरतो.

 

उघड्या (भर) महासागरात रडारच्या मदतीने बहुतेक बर्फ पाहिला(निरखिला) जातो व त्याचे निरीक्षणाच्या अंतराचे पल्ले त्याच्या हवे-खालील तिमिरचित्राच्या आकारमानावर अवलंबून असतात परंतु अधिक लहान किंवा मोठ्या पिआनोएवढे हिमनग समुद्राचा पृष्ठभाग शांत असतो आणि ते फक्त १.६ किमी. अंतरापर्यंतच्या पल्ल्यात असतात तेव्हाच ओळखता येऊ शकतात. सोनार तंत्र [→ सोनार व सोफार] हिमनग ओळखण्यासाठी प्रभावी ठरते. तथापि त्याचा ओळखण्यासाठीचा अंतराच्या पल्ल्यावर पुष्कळदा पाण्याची परिस्थिती व व्यापारी जहाजांची गती यांच्यामुळे मर्यादा पडते. उत्तर गोलार्धातील हिमनगांपासून रक्षणकरणे ही समस्या आहे कारण लॅब्रॅडॉर प्रवाहातून बाहेर पडल्यावरत्याचे मार्गनिरीक्षण करावे लागते आणि या तरंगणाऱ्या अरिष्टांचा ठाव-ठिकाणा उत्तर अटलांटिक महासागरातील जहाजांना दिवसातून दोन वेळा कळवावा लागतो.

 

उत्तर गोलार्धातील अनेक हिमनग ग्रीनलंडमधून निघून अखेरीस उत्तर अटलांटिक महासागरात वाहत जातात. उत्तर अमेरिका व यूरोप यांच्यातील जहाज वाहतुकीला ते धोकादायक ठरू शकतात. अशाच एका हिमनगामुळे प्रसिद्ध टायटॅनिक जहाज १४-१५ एप्रिल १९१२ ला बुडाले होते. म्हणून इंटरनॅशनल आइस पेट्रोल ही हिमनगांची टेहळणी करणारी संघटना स्थापना करण्यात आली. ती उत्तर अटलांटिक महासागरातील जहाज वाहतुकीच्या मार्गांतील हिमनगांवर नजर वा लक्ष ठेवून असते. ही संघटना हिमनगांची माहिती संबंधितांना कळवते आणि त्यांच्या मार्गाविषयी (हालचालींविषयी) अंदाज जाहीर करते. अशा टेहळणीसाठी वा पहाणीसाठी विमाने, जहाजे व कृत्रिम उपग्रह यांचा उपयोग करतात. हिमनग नष्ट करण्यासाठी माणूस विशेष काही करू शकत नाही. सूर्य, लाटा व गरम पाणी यांच्या एकत्रित प्रभावामुळे हिमनगाचे अखेरीस तुकडे होतात किंवा तो वितळतो.

 

ध्रुवीय पर्यावरणीय प्रणालीत हिमनगांचे कार्य लक्षणीय असते. तो वितळल्यामुळे प्लवकांसारख्या महासागराच्या वरच्या थरांमध्ये राहणाऱ्या सजीवांना थोडे पाणी मिळते. हिमनग हे पक्ष्यांसाठी प्रजनन, शिकार व विश्राम यांसाठीची जागा म्हणून उपयुक्त ठरतात. याउलट हिमनग सील व पेंग्विन हे प्राणी वापरत असलेल्या अन्नमार्गात अडसर ठरू शकतात.

 

पहा : हिमनदी व हिमस्तर.

 

ठाकूर, अ. ना गायकवाड, सत्यजित