ज्ञानसंपादन : (लर्निंग) . ज्ञानसंपादनाची सुरुवात लहान मूलआणि सभोवतालचे पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियेतून होत असते. काही नवीन दिसले की, मूल त्या दिशेने स्वत:चे डोळे फिरवते. तसेच आवाज आला की, त्या बाजूने लक्ष देते. चव समजावी म्हणून दिसेल ती वस्तू तोंडात घालते. थोडक्यात, ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्ञानसंपादनाला गती मिळते. परंतु केवळ ज्ञानेंद्रियांमुळेच आपले ज्ञानसंपादन होते असे नाही. ज्ञानसंपादनात मानसिक ज्ञानयोजना आणि मानसिक ज्ञानरचना यांचाही बहुमोल वाटा असतो. याशिवाय आपल्या बोधनिक प्रक्रिया यादेखील ज्ञानसंपादनाकरिता मदत करतात. प्रत्येक संस्कृतीमधील कार्याचे व घटनांचे ज्ञान हे त्या संस्कृतीमधील वरिष्ठ व्यक्ती, सामाजिकीकरण प्रक्रिया, भाषा, शिक्षण व इतरांकडून मिळालेली माहिती यांच्या माध्यमातून पुढील पिढीत संक्रमित होते. एकंदरीत प्रत्येक व्यक्ती, तिची ज्ञानेंद्रिये, तिचा सांस्कृतिक ठेवा व व्यक्तिगत अनुभव आणि स्वतःची बोधनिकप्रक्रिया – विचारप्रक्रिया, निर्णयप्रक्रिया, समस्या निवारणप्रक्रिया इ.– इत्यादींचा उपयोग करून ज्ञान-संपादन करीत असते.

(१) ज्ञानेंद्रिये व ज्ञानसंपादन : डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा ही मानवाची पाच प्रमुख ज्ञानेंद्रिये होत. त्वचेच्या माध्यमातून आपल्याला शीत, उष्ण, स्पर्श, दु:ख असे चार वेगवेगळे वेदनानुभव मिळतात. त्याचप्रमाणे शरीराच्या निरनिराळ्या भागांत जे असंख्य स्नायू आहेत त्यांच्यापासून मिळणारे वेदन हाही एक वेगळा वेदनानुभव समजला जातो. त्यामुळे दृष्टिवेदन, गंधवेदन, श्रुतिवेदन, रुचिवेदन, शीतवेदन, उष्णवेदन, स्पर्श किंवा भारवेदन, दु:खवेदन आणि स्नायविकवेदन असे नऊ वेदनानुभव आपल्याला प्रत्ययास येतात. यांशिवाय दोन्ही कानांमधील द्रायूमध्ये शारीरिक समतोल वेदन आहे. आपला शारीरिक समतोल योग्य आहे की नाही, याची जाणीव त्यामुळे होते. तसेच शरीराच्या जठर, आतडी व आंतरेन्द्रियांमध्येही वेदनानुभव होत असतो. याप्रमाणे आपल्यालाअकरा ज्ञानेंद्रिये आहेत.

वस्तुत: ज्ञानेंद्रिये म्हणजे वेदनेंद्रिये होत. ज्ञानसंपादनाच्या बाबतीत वेदनप्रक्रिया ही पहिली पायरी होय. यानंतरची दुसरी पायरी म्हणजे संवेदन. वेदनेच्या अनुपस्थितीत संवेदन होत नाही आणि परिणामी ज्ञानसंपादनदेखील होत नाही. आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात. त्या आपल्याला वेदनेंद्रियांमार्फत जाणवतात परंतु त्यांचा आपल्याला पूर्णत: बोध होत नाही. कारण आपल्या वेदनेंद्रियांची क्षमता मर्यादित असते. ही वेदनेंद्रिये विशिष्ट जाणीव देतात. नंतर ती जाणीव ग्राहक कोशिकांच्या (पेशींच्या) साहाय्याने मेंदूत पोहचते आणि त्या ठिकाणी त्या जाणिवेचे अर्थबोधन होऊन आपल्याला संवेदन होते. यालाच ज्ञानसंपादन असे म्हणतात. [→ वेदन संवेदन ज्ञानेंद्रिये].

(२) मानसिक ज्ञानयोजना आणि मानसिक ज्ञानरचना : ज्ञानसंपादनात मानसिक ज्ञानयोजना आणि मानसिक ज्ञानरचना यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या दोन्ही संकल्पना ज्ञानसंपादन कसे होते याचे विवरण करणाऱ्या आहेत.

पर्यावरणातील काही वस्तू किंवा घटना यांविषयी विचारप्रक्रियेत संघटित झालेली चौकट म्हणजे मानसिक ज्ञानयोजना होय. यात वस्तुसंकल्पना व वस्तूंचे वर्गीकरण यांचा समावेश होतो. तसेच त्यांचा इतर दुसऱ्या मानसिक ज्ञानयोजना तयार करण्याकरितादेखील उपयोग होतो. शिवाय मानसिक ज्ञानयोजनेत सर्व प्रकारच्या समस्या निवारणकौशल्यांचासुद्धा अंतर्भावहोतो. मानसिक ज्ञानरचना हीदेखील एक प्रकारची मानसिक योजना होय परंतु यात क्रमवारीला विशेष महत्त्व असते. उदा., ‘सोहन आणि मोहन सिनेमा पाहण्यास गेले’ या वाक्याने आपल्याला अनेक गोष्टी कळतात. ते घरातून निघाले, सिनेमागृहाजवळ गेले, त्यांनी तिकीट घेतले व सिनेमा पाहिला. वरील वाक्यात या चार गोष्टींचा क्रमाने अंतर्भाव होतो. एकंदरीत आपले ज्ञानसंपादन हे नवनवीन मानसिक ज्ञानयोजना, मानसिक ज्ञानरचना, संकल्पना यांच्या साहाय्याने वृद्धिंगत होत असते.

बुद्धिबळ खेळाडू, तज्ज्ञ, विचारवंत, शल्यविशारद, युद्धविशारद यांच्या डोक्यात शेकडो मानसिक ज्ञानयोजना व रचना असतात आणि परिस्थिती-नुसार ते योग्य त्या योजनेचा व रचनेचा उपयोग करत असतात. व्यक्तीची तज्ज्ञता जसजशी वाढते त्यानुसार तिच्या स्मृतीत मानसिक ज्ञानयोजनाव रचना यांचा साठा वाढत असतो. तज्ज्ञ व्यक्ती परिस्थितीला न घाबरता तिच्या स्मृतीमधून योग्य ती मानसिक ज्ञानयोजना किंवा रचना बोधस्तरावर आणून समस्येचे निराकरण करत असते. मानसिक ज्ञानयोजना व रचना यांचा निरनिराळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केल्यामुळे माणूस हळुहळू शहाणा होतो.

(३) शहाणपणाचे घटक : जर्मन मानसशास्त्रज्ञ पॉल बाल्ट्स (१९३९–२००६) यांच्या मतानुसार व्यक्तीला जीवन जगण्याचा अर्थआणि जीवनपद्धती यांविषयीचे ज्ञान तिने मिळविलेल्या तज्ज्ञतेमुळे प्राप्त होते आणि त्यालाच शहाणपण म्हणून संबोधण्यात येते. बाल्ट्स आणि यू. एम्. स्टॉडींगर यांनी उच्च ज्ञानसंपादनाचे म्हणजेच शहाणपणाचे पाच घटक सांगितले आहेत. ते खालीलप्रमाणे :

(१) आयुष्याविषयी या व्यक्तीला वस्तुनिष्ठ ज्ञान असणे : ही व्यक्ती सभोवतालच्या व्यक्तींचा स्वभाव सहजपणे जाणते. तसेच या व्यक्तीला व्यक्तिविकास, सामाजिक मानदंड, सामाजिक संबंध, आयुष्यात घडणाऱ्या घटना इत्यादींची उत्तम जाण असते.

(२) आयुष्यात आवश्यक अशा निरनिराळ्या प्रक्रियांची या व्यक्तीला जाण असणे : निर्णय कसे घ्यावेत, संघर्ष कसे सोडवावेत, इतरांना कशा प्रकारे सल्ला द्यावा, आयुष्यात ध्येय कसे साध्य करावे याची जाण या व्यक्तीला असते.

(३) आयुष्यातील निरनिराळ्या संदर्भांची जाण असणे : आयुष्य जगत असताना निरनिराळ्या संदर्भांची जाण ठेवावी लागते. ते संदर्भलक्षात घेऊन आपण वागत असतो. उदा., आपले कुटुंब, नातलग, शेजारी, मित्र, नोकरी, कामधंदा इत्यादी. शिवाय स्वतःचे गतायुष्य लक्षातठेवून वर्तमानकाळात जगणे व भविष्याकडे झेप घेणे इ. गोष्टी ही व्यक्ती सहजपणे करत असते.


(४) जीवनमूल्यांची व आयुष्यात कशाला प्राधान्य द्यावे याची जाण असणे : या व्यक्तींची जीवनमूल्ये निश्‍चित झालेली असतात. ती सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा वेगळी असतात. तसेच आपण काय करायचे याविषयी ते खूप विचार करतात आणि नंतर त्याविषयी ठरवितात. ते आयुष्यात भरकटत नाहीत.

(५) अनिश्चितता जाणणे व त्यावर मात करणे : कोणत्याही व्यक्तीचे जीवन हे सरळ-सरळ नसते. त्यात अनेक अडथळे व अनिश्चितता असतात. या व्यक्तींना ते अडथळे जाणून घेण्याची जाण असते. तसेच त्यावर कशी मात करावी ही क्षमता त्यांच्यात असते. भविष्यात काही गोष्टी आपल्याला करता येणार नाहीत, आपल्याला काही मर्यादा आहेत इ. या व्यक्तीच्या सहज लक्षात येते.

(४) बोधनिक प्रक्रियेतील व्यक्तिभिन्नता व ज्ञानसंपादन : अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट स्टर्नबर्गच्या मतानुसार मानसिक कौशल्यांच्या बाबतींत व्यक्तिभिन्नता आढळून येते. ही कौशल्ये निरनिराळ्या व्यक्तींत निरनिराळ्या प्रमाणांत असतात. तसेच निरनिराळ्या व्यक्ती त्यांच्यातील मानसिक कौशल्यांचा उपयोग वेगवेगळ्या तर्‍हेने करतात. मानसिक कौशल्यांच्या बाबतींत व्यक्तिभिन्नता असल्यामुळे व्यक्तींचे ज्ञानसंपादनदेखील वेगवेगळे असते. या मानसिक कौशल्यांचे प्रमुख घटक खालीलप्रमाणे : 

(१) वरच्या पातळीवरील प्रक्रिया : यात वरच्या स्तरावरील योजना व प्रक्रिया यांचा समावेश होतो. या सर्व प्रक्रिया मेंदूतील असतात. या प्रक्रियांमुळे व्यक्तीत समस्यानिवारणाची कौशल्ये निर्माण होतात. समस्यांचे विश्‍लेषण करणे, त्या सोडविण्याकरिता योग्य ते पर्याय शोधणे इ. या प्रक्रियांमुळे सहज शक्य होते. स्टर्नबर्गच्या मते ही वरच्या स्तरावरील कौशल्ये निरनिराळ्या व्यक्तींत भिन्नभिन्न प्रमाणांत असतात. त्यामुळे आपल्याला या प्रक्रियांच्या बाबतींत व्यक्तिभिन्नता आढळून येते. अशी कौशल्ये असलेल्या व्यक्ती ज्ञानसंपादनाच्या बाबतीत आघाडीवर असतात.

(२) निष्पादनात्मक घटक : यात प्रत्यक्ष कृती करण्याकरिता लागणाऱ्या मानसिक कौशल्यांचा अंतर्भाव होतो. उदा., संवेदनकौशल्ये, अनुभवाधिष्ठित कौशल्ये, मानसिक ज्ञानयोजनाकौशल्ये इत्यादी. ही कौशल्येसुद्धा निरनिराळ्या व्यक्तींत वेगवेगळ्या प्रमाणांत असतात. त्यामुळे या कौाशल्यांच्या बाबतींतदेखील व्यक्तिभिन्नता आढळून येते. परिणामी ज्ञानसंपादन एकसारखे होत नाही.

(३) विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता, व्यावहारिक आणि सर्जनशील बुद्धिमत्ता यांतील व्यक्तिभिन्नता : सर्व व्यक्तींची बुद्धिमत्ता सारखी नसते. कारण त्यांच्या विश्‍लेषणात्मक, व्यावहारिक आणि सर्जनशील बुद्धिमत्तेत व्यक्तिपरत्वे फरक असतो. काही व्यक्तींत या बुद्धिमत्ता प्रकर्षाने आढळून येतात. त्यामुळे त्यांची मानसिक कौशल्ये उच्च श्रेणीची असतात. त्यांचे ज्ञानसंपादन उत्तम असते. याउलट या बुद्धिमत्ता निम्नश्रेणीच्या असल्यास, व्यक्तींमधील मानसिक कौशल्येदेखील निम्नश्रेणीची असतात. परिणामी त्यांचे ज्ञानसंपादनदेखील जेमतेम असते. थोडक्यात, या बुद्धिमत्ता सर्व व्यक्तींत सारख्याच नसल्यामुळे, त्यांचे ज्ञानसंपादनदेखील वेगवेगळे असते.

(४) संस्कृतिभिन्नता व ज्ञानसंपादन : जगामध्ये निरनिराळ्या संस्कृती व धर्म आहेत. आपण ज्या विशिष्ट संस्कृतीत जन्माला येतो, त्या संस्कृतीत आपली जडणघडण होते. आपली भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी, आवडी–निवडी, पेहराव, धर्म, तत्त्वज्ञान, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इ. त्या संस्कृतीमुळे ठरत असते. इतर संस्कृतींच्या तुलनेत आपल्या संस्कृतीविषयी आपल्याला अभिमान वाटतो. थोडक्यात, व्यक्तीची संस्कृती ही तिच्या ज्ञानसंपादनाचे महत्त्वाचे साधन असते आणि तिचा ज्ञानसंपादनावर परिणाम होतो, हे आपण लक्षात ठेवावयास हवे.

(५) ज्ञानसंपादनातील अडथळे : ज्ञानसंपादनाकरिता तीन घटकांची नितांत आवश्यकता असते. एक, योग्य उद्दीपन दोन, ज्ञानेंद्रिय म्हणजेच वेदनेंद्रियाचे योग्य कार्य आणि तीन, मेंदूचे अपेक्षित कार्य. ज्ञानसंपादनाकरिता हे तीनही घटक योग्य रीतीने कार्यान्वित होणे आवश्यक असते. यांतील एखादा घटक जर कार्यान्वित नसेल, तर ज्ञानसंपादनात अडथळा उत्पन्न होतो.

पहिला अडथळा : दृष्टी, श्रुती, गंध इ. वेदनक्षेत्रांतील कार्य जरी वेगवेगळे असले, तरी साधारणतः त्यांच्या कार्यांची यंत्रणा सारखीच असते. प्रत्येक ज्ञानेंद्रियाकरिता पर्यावरणातील उद्दीपनशक्ती कार्यरत असते. उदा., एखादी वस्तू स्पष्टपणे दिसण्याकरिता प्रकाशलहरींची आवश्यकता असते. पुरेसा प्रकाश नसेल तर डोळा या ज्ञानेंद्रियाचे/वेदनेंद्रियाचे कार्य सुरूहोणार नाही. तसेच योग्य वारंवारतेचे ध्वनितरंग नसतील, तर कान या वेदनेंद्रियाचे कार्य सुरू होणार नाही. याचप्रमाणे स्पर्श, गंध, रुची अशा वेदनांचा अनुभव घेण्याकरिता विशिष्ट उद्दीपनशक्तीची आवश्यकता असते.

आपले शरीर हे कोशिकांचे, म्हणजे पेशींचे बनलेले असते व शरीराच्या तंत्रिकातंत्रातील पेशींना तंत्रिकाकोशिका म्हणतात. या कोशिका शरीरभर असतात. ग्राहक तंत्रिकापेशींचे उद्दीपन बरोबर झाले नाही, तर विशिष्ट ज्ञानेंद्रिये किंवा वेदनेंद्रिये उद्दीपित होत नाही. तेव्हा उद्दीपनशक्ती योग्य प्रमाणात नसणे हा ज्ञानसंपादनातील पहिला अडथळा होय. 


 

दुसरा अडथळा : समजा, उद्दीपनशक्ती योग्य प्रमाणात असेल परंतु वेदनेंद्रियाचे कार्य नीट नसेल तर त्यावेळीदेखील ज्ञानसंपादन होणार नाही. उदा., पर्यावरणात भरपूर प्रकाश आहे परंतु नेत्रगोल वा बुबुळ, दृक्पटल किंवा दृक्तंत्रिका यांचे कार्य नीट नसेल, तर ती उद्दीपनशक्ती मेंदूपर्यंत पोहोचणार नाही. याचा अर्थ हा, की वेदनेंद्रियाचे रचनात्मक कार्य योग्य प्रकारे असणे आवश्यक असते. हा मुद्दा समजण्याकरिता आणखी एक उदाहरण घेता येईल. श्रुति-उद्दीपन होण्याकरिता आवश्यक असा ध्वनितरंग असूनदेखील जर कानातील हाडे, कर्णशंबूक हा अंतकर्णातील भाग ह्यात काही बिघाड झाल्यास ध्वनितरंग हा उद्दीपक मेंदूपर्यंत पोहोचणार नाही आणि आपल्याला ज्ञानसंपादन होणार नाही. हा ज्ञानसंपादनातील दुसरा अडथळा होय.

तिसरा अडथळा : ज्ञानसंपादनातील तिसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे मेेंदूतील विशिष्ट ठिकाणी वेदनेंद्रियातून आलेल्या उद्दीपकाचा योग्य अर्थ लावणे. डोळे, कान, नाक, जीभ हे अवयव मेंदूच्या जवळ असल्याने तेथे निर्माण झालेले तंत्रिका आवेग मेंदूकडे प्रत्यक्षपणे जाऊ शकतात. त्वचाही शरीरभर पसरली असल्याने त्वचेच्या विविध भागांवर निर्माण होणारे तंत्रिका कोशिकांच्या साखळीमार्फत मेंदूकडे पोहोचविले जातात. एकंदरीत, सर्व ज्ञानेंद्रियांमधील उद्दीपनशक्ती ही त्या-त्या ज्ञानेंद्रियातील तंत्रिका आवेगांच्या साहाय्याने मेंदूपर्यंत पोहोचविणे आवश्यक असते. त्यामुळे मेंदूकडे तंत्रिका आवेग पोहोचल्यानंतर तो कोठून आला हे त्याच्या स्वरूपाहून मेंदूला कळते. शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडून आलेल्या तंत्रिका आवेगांचे नियंत्रण मेंदूच्या निरनिराळ्या भागांत होते.

मज्जारज्जू आणि मेंदू यांना जोडणाऱ्या भागाला लंबमज्जा असे म्हणतात. लंबमज्जेचे प्रमुख कार्य म्हणजे मज्जारज्जूमार्फत शरीराच्या विविध भागांकडून आलेले तंत्रिका आवेग मेंदूकडे पोहोचविणे व मेंदूकडून आलेले तंत्र आवेग शरीराच्या विविध भागांकडे मज्जारज्जूमार्फत पाठविणे. डोळा, कान, नाक, जीभ या ज्ञानेंद्रियांकडून आलेले तंत्रिका आवेगमेंदूकडे मज्जारज्जूमार्फत जातात. त्याचप्रमाणे मेंदूकडून आलेले तंत्रिका आवेग या इंद्रियांकडे पोहोचविले जातात. समजा तंत्रिका आवेग, मज्जारज्जू, लंबमज्जा व ज्याठिकाणी तंत्रिका आवेग मेंदूत पोहोचतो तो मेंदूचा भाग याचे कार्य नीट होत नसेल, तर व्यक्तीला ज्ञानसंपादन होणार नाही. हा ज्ञानसंपादनातील तिसरा अडथळा होय.

(६) सारांश : ज्ञानसंपादन ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत उद्दीपनशक्ती, ज्ञानेंद्रिये, मानसिक ज्ञानयोजना व रचना तसेच बोधनिक प्रक्रियांचा अंतर्भाव असतो. या प्रक्रियेत तीन घटक असतात आणि हे तिन्ही घटक साकल्याने ज्ञानसंपादनाकरिता आवश्यक असतात. त्यातील एक घटक जरी कार्यान्वित नसेल, तर ज्ञानसंपादनात अडथळा उत्पन्न होतो. ज्ञानसंपादन हे जीवनाला आवश्यक असल्यामुळे त्याची प्रक्रिया समजूनघेणे आवश्यक ठरते.

संदर्भ : 1. Passer, Michael, W. Smith, Ronald E., Psychology : The Science of  Mind and Behaviour, New Delhi, 2007.

         २. गोगटे श्री. ब. भागवतवार, प्र. आ. देशपांडे, चं. ग. सामान्य मानसशास्त्र, पुणे, १९७८.

देशपांडे, चंद्रशेखर