ज्ञानमार्ग : भारतीय तत्त्वज्ञानातील अनेक दर्शनांनी ⇨ मोक्षहे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय वा परमोच्च ध्येय मानले आहे. मोक्षम्हणजे जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणे. ही मुक्तावस्था प्राप्त झाल्या-नंतर शरीर, कर्म, सुख, दुःख इ. अनिष्ट बंधने नाहीशी होतात, असे या दर्शनांचे प्रतिपादन आहे. मोक्षाचे उद्दिष्ट वा ध्येय साधण्याचे मार्गही या दर्शनांनी सुचविलेले आहेत. मोक्षप्राप्तीचे मार्ग वेगवेगळ्या संप्रदायांतील तत्त्वप्रणालींनुसार बदलतात. तसेच एकाच संप्रदायामध्ये मोक्षाकडे जाणारे अनेक पर्यायी मार्गही सुचविले गेलेले दिसतात. या मार्गांना उद्देशून योग ही संज्ञाही वापरण्यात येते. उदा., कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग.
ज्ञानमार्गानुसार वा ज्ञानयोगानुसार असे मानले जाते, की जीव बंधनात पडतो, तो अज्ञानामुळे म्हणजेच सत्याचे यथार्थ ज्ञान नसल्यामुळे. हेअज्ञान वा विपरीत ज्ञान नष्ट होऊन जीवाच्या ठायी ज्ञानाचा प्रकाशउजळला, तर जीवाला मोक्ष प्राप्त होतो. ⇨ स्वामी विवेकानंदांनी ज्ञानमार्गावरील आपल्या भाषितात म्हटले आहे, की भक्तियोग, राजयोग ह्यांचे जे उद्दिष्ट तेच ज्ञानमार्गाचे आहे तथापि त्यांचे मार्ग वेगवेगळेआहेत. ज्ञानमार्ग हा प्रज्ञानिष्ठ (रॅशनल) मार्ग आहे. ज्ञानयोगी हा शुद्ध प्रज्ञानिष्ठेने ईश्वरसिद्धी प्राप्त करून घेतो. या वा अन्य कोणत्याही जगाची इच्छा तो धरत नाही. मुक्ती प्राप्त करून घेणे हाच त्याचा दृढ निश्चयअसतो. ज्ञानावाचून मुक्ती प्राप्त होत नाही. हे ज्ञान म्हणजे स्वतःची खरी ओळख करून घेणे.
भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाला ज्ञानकर्मसंन्यास योग असे नाव आहे. ज्ञानकर्मसंन्यास ह्याचा अर्थ ज्ञानाच्या साहाय्याने सर्व कर्मांचा त्याग करणे. मोक्ष मिळावयाचा, तर हे कर्माचे बंधन नष्ट झाले पाहिजे. गीतेत म्हटले आहे, की प्रदीप्त केलेला अग्नी जसा काष्ठांना भस्मसात करून टाकतो, तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मबंधनांचे भस्म करतो (४.३७) सर्व कर्मांचे पर्यवसान ज्ञानात होते. म्हणून ज्ञानमय यज्ञ अधिक श्रेष्ठ होय (४.३३). तत्त्ववेत्ते ज्ञानी, त्यांना प्रणिपात केल्याने व त्यांची सेवा केल्याने हे आत्मज्ञान सांगतात (४.३४). ज्ञानासारखे पवित्र असे दुसरे काहीही नाही (४.३८). अत्यंत पापी मनुष्यही ज्ञानरूपी नौकेने पापसमुद्र सहज तरून जातो (४.३६).
अद्वैत वेदान्तानुसार जीव आत्म्याहून भिन्न आहे, असे आपणास अज्ञानानेच भासत असते. त्यामुळे सुखदुःखादि जीवाचे भोग आत्म्यासच घडतात असा भ्रम होतो. हा भ्रम केवळ ज्ञानामुळेच नष्ट होतो. ज्ञानानेच मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे आत्म्याची शुद्धावस्था आत्म्याचे वास्तविक स्वरूप. अंतिम मोक्ष हा ज्ञानानेच मिळेल, भक्ती किंवा कर्म अशा अन्य मार्गांनी तो साक्षात मिळणार नाही. ज्ञान म्हणजे मी ब्रह्मरूप आहे याची खरीखुरी जाणीव, त्यासाठी चित्तशुद्धी हवी. निष्काम कर्म आणि भक्ती ह्यांमुळे चित्तशुद्धी होत असल्याने ह्या दोन गोष्टी दूरान्वयाने मोक्षासाठी उपयोगी पडतील पण मोक्षसाधनेतील अखेरचा दुवा ज्ञानच होय.
बौद्ध धर्मात निर्वाणाची संकल्पना आहे. राग, द्वेष यांचा संपूर्ण नाश म्हणजे निर्वाण आणि निर्वाणावस्था म्हणजे संपूर्ण सुख. पण असा नाश जिवंतपणीच झाला आणि जिवंतपणीच निर्वाण प्राप्त झाले, तरी शारीरिक आधिव्याधी असतातच. त्यामुळे संपूर्ण सुख प्राप्त होत नाही. ह्या जिवंतपणीच्या निर्वाणाला ‘सोपधिशेषनिर्वाण’ असे म्हणतात. हे अद्वैत वेदान्त्यांच्या जीवनमुक्तीप्रमाणे आहे. पुढे मृत्यू येऊन शरीर नष्ट झाले, म्हणजे संपूर्ण निर्वाण म्हणजेच परमसुख प्राप्त होते. ह्या निर्वाणाच्या साक्षात्कारा-साठी अष्टांग मार्ग उपयोग पडतो. त्याच्या आधारे शील, समाधी वप्रज्ञा संपादित करून भिक्षू संसाररूपी जटेचे विजटन करतो आणि मुक्तहोतो. [→ बौद्ध धर्म].
सांख्यमताप्रमाणे प्रकृती आणि पुरुष ह्यांच्या संयोगातूनच सर्ग म्हणजेजगाची उत्पत्ती वा सृष्टीचा पसारा निर्माण होतो त्यामुळे हे जग स्वभावतःच दुःखमय आहे. त्या दुःखाचा परिहार करायचा असेल, तर प्रकृती आणिसर्ग ह्यांच्यापासून आपण वेगळे आहोत हे पुरुषाने जाणले पाहिजे. पुरुष स्वतः अकर्ता असतो पण प्रकृतीशी संयोग झाल्यामुळे तो स्वतःलाकर्ता समजतो आणि म्हणून त्याला दुःख भोगावे लागते. प्रकृती वपुरुष ह्यांच्यापासून आपण वेगळे आहोत ही जाणीव होणे, हीच मुक्ती.[→ सांख्य दर्शन].
जैन धर्मात ⇨ कुंदकुंदाचार्यांनी (इ. स. सु. पहिले शतक) त्यांच्या समयसार या ग्रंथात शुद्ध आणि पूर्ण ज्ञानाचे प्रतिपादन केले आहे. त्यांच्यानंतर प्रचलित झालेल्या जैन परंपरेत ज्ञानमार्गाचा प्रभाव दिसून येतो.
संदर्भ : 1. Hiriyanna, M. Outlines of Indian Philosophy, London, 1968.
२. दीक्षित, श्रीनिवास, भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापूर, १९७३.
कुलकर्णी, अ. र. गोखले, प्रदीप
“