क्षार-१ : (अल्कली) . लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम व सीझियम या क्षारीय धातूंच्या पाण्यात विरघळणाऱ्या कोणत्याही हायड्रॉक्साइडाला क्षार म्हणतात. क्षार हे तीव्र क्षारक [→ अम्ले व क्षारक] असून त्यांच्या पाण्यातील विद्रावात हायड्रॉक्सिल आयनांचे(OH–) प्रमाण उच्च असून त्यांचे ⇨ पीएच मूल्य ७ पेक्षा जास्त असते. त्यांच्यामुळे लिटमस कागदाचा तांबडा रंग बदलून निळा होतो. त्यांची अम्लांशी विक्रिया होऊन उदासीन लवणे तयार होतात. त्यांची चवकटुतिक्त वा झोंबणारी असते. ते दाहक असून जास्त प्रमाणात असणाऱ्या संहत रूपात ते जैव ऊतकांचे (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांचे म्हणजे पेशीसमूहांचे) तीव्र संक्षारण (झीज घडविण्याची क्रिया) करतात. कॅल्शियम, स्ट्राँशियम व बेरियम यांसारख्या ⇨ क्षारीय मृत्तिका धातूंच्या पाण्यात विरघळणाऱ्या हायड्रॉक्साइडांनाही क्षार म्हणतात शिवाय अमोनियम हायड्रॉक्साइडही क्षार आहे. सोडियम व पोटॅशियम असलेल्या वनस्पती जाळून बनलेल्या राखेला मुळात अल्कली म्हणत. कारण अल्-किली या मूळ अरबी शब्दाचा अर्थ वनस्पतीची राख असा आहे आणि वनस्पतींची राख हा ⇨ क्षारीय धातूंच्या संयुगांचा पहिला स्रोत होता. या राखेपासून सोडियम व पोटॅशियम यांची ऑक्साइडे अपक्षालनाने(अपक्षालन ही वस्तुमानाच्या स्थानांतरणावर आधारलेली अलगीकरणाची औद्योगिक क्रिया आहे) मिळविता येतात.
सोडा ॲश (Na2CO3 सोडियम कार्बोनेट) व दाहक (कॉस्टिक) सोडा (NaOH सोडियम हायड्रॉक्साइड) यांच्या निर्मितीला बहुधाऔद्योगिक क्षारनिर्मिती म्हणतात. मात्र पोटॅशियम हायड्रॉक्साइड (KOH), पोटॅश (K2CO3 पोटॅशियम कार्बोनेट) व लाय (लाकडाच्या राखेच्या अपक्षालनाने मिळणारा क्षारीय विद्राव) हे इतर औद्योगिक क्षार आहेत. ग्राहकोपयोगी असंख्य वस्तूंच्या निर्मितीत कोणत्या तरी टप्प्यावर क्षार वापरावे लागतात. उदा., काच, साबण, संकीर्ण रसायने, रेयॉन व सेलोफेन, कागद व कागदाचा लगदा, स्वच्छताकारके व प्रक्षालके, कापड उद्योग, कातडी कमाविणे, पाणी मृदू करणारी द्रव्ये, विशिष्ट धातू (विशेषतः ॲल्युमिनियम), सोडियम बायकार्बोनेट तसेच गॅसोलीन व खनिज तेलापासून बनविण्यात येणारे इतर पदार्थ यांच्या निर्मितीत सोडा ॲशव दाहक सोडा हे आवश्यक असलेले क्षार आहेत.
क्षारांचा उपयोग माणूस शेकडो वर्षांपासून करीत आला आहे. वाळवंटा-तील विशिष्ट मातींच्या अपक्षालनातून प्रथम क्षार मिळविण्यात आले. अठराव्या शतकाच्या अखेरीस लाकडाच्या व सागरी तृणांच्या राखेचे अपक्षालन हा क्षारांचा मुख्य स्रोत बनला होता. क्षारनिर्मितीच्या नवीन पद्धतींसाठी १७७५ मध्ये फ्रेंच ॲकॅडेमी देस सायन्सेसने रोख पारितोषिके देऊ केली होती. सोडा ॲशसाठीचे पारितोषिक ⇨ नीकॉला लब्लां या फ्रेंच शास्त्रज्ञांना देण्यात आले. १७९१ मध्ये त्यांनी साध्या मिठाचे ( सोडियम क्लोराइडाचे) सोडियम कार्बोनेटात परिवर्तन करणाऱ्या प्रक्रियेचे एकस्व (पेटंट) मिळविले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत क्षारनिर्मितीमध्ये जगभर लब्लां प्रक्रियेचे वर्चस्व होते परंतु पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस या प्रक्रियेची जागा दुसऱ्या मीठ परिवर्तन प्रक्रियेने पूर्णपणे घेतली. ही नवीन प्रक्रिया बेल्जियन शास्त्रज्ञ ⇨ अर्नेस्ट सॉल्व्हे यांनी १८६०–७० या दशकात परिपूर्ण केली होती. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस दाहक सोडानिर्मितीच्या विद्युत् विच्छेदनीय पद्धती पुढे आल्या आणि त्यांचे महत्त्व जलदपणे वाढत गेले.
जगातील थोड्याच ठिकाणी सोडा ॲशचे खनिज निक्षेप आढळले आहेत या खनिज रूपाला नैसर्गिक क्षार म्हणतात. हे खनिज बहुधा सोडियम सेस्क्विकार्बोनेट (Na2CO3 NaHCO3 2H2O) किंवा ट्रोनाया रूपात आढळते. अमेरिकेत नैसर्गिक क्षाराचे पुष्कळ उत्पादन होते.हे उत्पादन वायोमिंगमध्ये ट्रोना निक्षेपांतील भूमिगत खाणींमधून व कॅलिफोर्नियामधील शुष्क सरोवरातील थरांमधून होते.
पहा : अम्ले व क्षारक उदासिनीकरण दाहक पोटॅश दाहक सोडा सोडा ॲश क्षारीय धातु क्षारीय मृत्तिका धातु.
ठाकूर, अ. ना.
“