रेमाँट, व्ह् ला डि स्ला व्ह : (७ मे १८६७–५ डिसेंबर १९२५). पोलिश कथा कादंबरीकार. जन्म कोबील व्हेलकी येथे. शालेय शिक्षण तो पूर्ण करू शकला नाही. रेल्वे अधिकारी, नट, धार्मिक मठातील कर्मचारी (ले ब्रदर), दुकानात काम करणारा उमेदवार असे विविध उद्योग त्याने केले. आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आरंभ त्याने कथालेखनाने केला. आपल्या लेखनात त्याने निसर्गवादी आणि संस्कारवादी तंत्रांचा वापर केल्याचे दिसते. द कॉमेडिअन (१८९६, इं. भा. १९२१) आणि द प्रॉमिस्ड लँड (१८९९, इं. भा. १९२७), द पीझंट्‌स (४ खंड, १९०४–०९, इं. भा. १९२५–२६) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या. द कॉमेडिअनमध्ये फिरत्या नाटकमंडळ्यांतील कलावंतांचे जीवन त्याने रंगविले. द प्रॉमिस्ड लँड ह्या कादंबरीत वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक नगराचे प्रत्ययकारी चित्र त्याने रेखाटले आणि कापडगिरण्यांच्या मालकांची मानसिकताही सशब्द केली. द पीझंट्‌स ही त्याची कादंबरी एखाद्या गद्य महाकाव्यासारखी असून तीत पोलिश कृषकांचे जीवन वास्तववादी दृष्टिकोणातून रंगविले आहे. ह्या कादंबरीसाठी त्याला १९२४ सालचे, साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. अठराव्या शतकाच्या अखेरचे, पोलंडमधले सामाजिक राजकीय चित्र चित्रित करणारी Rok 1794 (३ खंड, १९१४−१९) ही त्याची कादंबरी मात्र फारशी यशस्वी ठरली आहे.

वॉर्सा येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.