होळकर, यशवंतराव : (? १७७६? –२७ ऑक्टोबर१८११). होळकर घराण्यातील एक थोर शूर पुरुष. यशवंतराव हे महादजी शिंदे यांच्या खालोखाल मराठे सरदारांतील एक कर्तबगार वीरपुरुष होते. यशवंतराव हे तुकोजीराव होळकर यांना यमुनाबाई या दासीपासून झालेले पुत्र होते. त्यांना विठोजीराव हे सख्खे, तर काशीराव व मल्हारराव हे सावत्रभाऊ होते. तुकोजीरावांनंतर इंदूरच्या गादीसाठी तंटे सुरू झाले, तेव्हा काशीराव यांनी पेशव्यांचा, तर दुसऱ्या मल्हाररावांनी सर्जेराव घाटग्यांचा आश्रय घेतला. शिंदे यांच्याकडून दुसरे मल्हारराव यशवंतराव होळकरभांबुर्ड्याच्या लढाईत मारले गेल्यानंतर (१४ सप्टेंबर १७९७) यशवंतराव व विठोजी हे पुण्यातून उत्तरेकडे पळून गेले. तत्पूर्वी यशवंतरावांनीचिमाजीच्या दत्तक प्रकरणात परशुरामभाऊंचा जुन्नरजवळ पराभव केला(ऑक्टोबर १७९६). दुसरे मल्हाररावांचे पुत्र खंडोजी यांच्या नावे राज्यकारभार करण्याचे भासवून सर्व होळकरांना एकत्र येण्याचे आवाहन यशवंतरावांनी केले. यशवंतराव हे नागपूरच्या रघुजी भोसल्यांकडे आश्रयास गेले दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांनी रघुजी भोसल्यांस यशवंतरावांस कैद करण्यास भाग पाडले परंतु यशवंतराव मोठ्या चातुर्याने कैदेतून निसटले आणि धारच्या आनंदराव पवार यांच्याकडे तीनशे स्वारांसह चाकरीस राहिले. पुढे त्यांनी गनिमी काव्याने मध्य प्रांतातील मुलखात लुटालूट करून आसपासच्या संस्थानिकांकडून द्रव्य संपादन केले आणि त्यातून पेंढारी, भिल्ल, राजपूत, अफगाण वगैरेंची मोठी फौज तयार केली. दौलतराव शिंद्यांचा सूड घेऊन होळकरांची सत्ता पूर्ववत स्थापण्याचा त्यांचा कृतसंकल्प होता.
दौलतराव शिंद्यांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी यशवंतरावांनी दक्षिण मोहीम काढून घोरपडी, वानवडी, हडपसर व बारामती या लढायांत शिंदेव पेशवे यांच्या फौजांचा पराभव केला आणि मराठ्यांची राजधानी पुणे लुटली. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतला (१८०२). तेव्हाइतर मराठे सरदारांच्या मदतीने यशवंतरावांनी दुसऱ्या बाजीरावाचा भाऊ अमृतराव यास पेशवेपदी बसविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांनी इंग्रजांविरुद्ध शिंदे व नागपूरकर भोसले यांना मदतीचे आवाहन केले (१८०३) पण त्यांनी प्रत्यक्ष मदत केली नाही. इंग्रजांच्या पराभवानंतर यशवंतरावांनी गुप्त रीत्या एक संयुक्त दल उभारण्यासाठी जयपूर, जोधपूर, उदयपूर, बेगम समरू, रोहिल्याचा मुख्य गुलाम मुहम्मद व काहीशीख राजांना पत्रे पाठविली. तसेच दौलतराव शिंद्यांकडे वकील पाठवून इंग्रजांबरोबरची मैत्री संपुष्टात आणण्याचे आवाहन केले (५ फेब्रुवारी १८०४). त्याचा नेमका उलट परिणाम झाला व इंग्रजांनी यशवंतरावांस एकाकी पाडण्याचे व त्यांचे साथीदार फोडण्याचे धोरण अंगीकारले.
यशवंतरावांनी आपल्या पराक्रमाने होळकरांच्या दौलतीची मालकीमात्र सिद्ध केली. अहिल्याबाईंनी सर्व संपत्ती मिळविली. यशवंतरावानी अहिल्याबाईंचा महोवरचा खजिना हस्तगत करून फौज वाढविली.आपल्या नावाचा शिक्काही त्यांनी तयार केला. इंग्रजांना या भूमीतून उखडून टाकण्याचा एकच ध्यास त्यांना शेवटपर्यंत होता. तसेच त्यांच्या मागणीला – दोआब आणि बुंदेलखंडमधील प्रदेश द्यावा यास – ब्रिटिशांनी नकार दिला तेव्हा होळकरांच्या सैन्याने पुष्कर आणि अजमीर (अजमेर) लुटले. तसेच यशवंतरावांनी आपल्या सैन्यातील तीन ब्रिटिश अधिकाऱ्यांना( व्हिकर्स, डॉड व रियन) कंठस्नान घातले (१८०४). ब्रिगेडियर विल्यम मॉन्सनचा पराभव केला. यशवंतरावांनी गनिमी युद्धतंत्राने इंग्रजांना हैराण केले. त्यांच्याकडे ६०,००० घोडदळ, १६,००० शिपाई व १९२ बंदुका होत्या. त्यांचा सेनापती हरनाथ सिंग याने दिल्लीवर हल्ला केला पणयश आले नाही. फरुखाबाद येथे यशवंतरावांचा लेकने नोव्हेंबर १८०४ मध्ये पराभव केला. तेव्हा ते रणजित सिंगांकडे मदतीसाठी गेले आणि डिगच्या किल्ल्यात आश्रयार्थ राहिले तथापि यशवंतरावांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरून त्यांना ब्रिटिशांबरोबर अखेर तैनाती फौजेचा तह करावा लागला (डिसेंबर १८०५). त्यानुसार त्यांस बुंदी टेकड्यांच्या उत्तरेकडील प्रदेश व टोंक, रामपुरा व इंदूर मिळाले. स्थिरस्थावर झाल्यावर यशवंत-रावांनी सैन्यात सुधारणा करून निरुपयोगी फौज काढून टाकली. बाणपुरा येथे तोफा ओतविण्याचा कारखाना काढला (१८०७). सततचे युद्ध, अपेक्षा-भंग, तापट स्वभाव यांमुळे यशवंतरवांचा बुद्धिभ्रंश झाला. या व्याधीतच भानपुरा येथे त्यांचे निधन झाले. त्या काळात (१८०९–११) त्यांची उपस्त्री तुळसाबाई हीच सर्व राज्य चालवीत असे मात्र राज्य-कारभारात अनागोंदी माजली तेव्हा तिने यशवंतरावाचा औरस पुत्र तिसरे मल्हारराव (कार. १८११–३३) यांच्या नावे राज्य केले.
यशवंतराव हे विक्षिप्त, क्रूर, धाडसी व शूर होते. त्यांस दिल्लीच्या बादशहाने महाराजाधिराज राजराजेश्वर अलिबहादूर असा बहुमानाचा किताब दिला होता. रियासतकारांच्या मते मराठेशाहीच्या अखेरीस यशवंतराव होळकर हे एक असामान्य पुरुष निर्माण झाले, त्या वेळी त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी सेनानायक नव्हता.
संदर्भ : १. कुलकर्णी, अ. रा. खरे, ग. ह. मराठ्यांचा इतिहास, खंड ३ (पुनर्मुद्रण), पुणे, २००६.
२. गर्गे, स. मा. संपा. मराठी रियासत, खंड ८, मुंबई, १९९२.
३. घाटे, वि. द. यशवंतराव होळकर, मुंबई, १९६३.
भिडे, ग. ल. कांबळे, र. ह.
“