होळकर घराणे : मराठी अंमलातील मुख्यत्वे पेशवाईतील एक इतिहासप्रसिद्ध घराणे. या घराण्याने उत्तरेकडे राज्यविस्तार करून मध्य प्रदेशात स्वतंत्र संस्थान स्थापिले. त्यांचा मूळ पुरुष खंडुजी हे धनगर जातीचे असून ते शेतकरी होते. त्यांच्याकडे चौगुला वतन होते. प्रथम हे घराणे वडगाव (ता. खेड) येथे राहत होते. नीरा नदीच्या काठी होळ मुरुम येथे मालीबा नावाचा एक मराठा धनगर होऊन गेला. त्याच्या अकराव्या पिढीतील खंडुजी वा खंडोजी यांचा मुलगा मल्हारराव (१६९३–१७६६) यांनाच होळकर घराणे नावारूपास आणण्याचे श्रेय द्यावे लागेल. १७२५ मध्ये पहिल्या बाजीरावांनी त्यांस पाचशे स्वारांचा मुख्य नेमून माळव्यातील चौथवसुलीचे अधिकार दिले व माळवा प्रांताचा सुभेदार नेमले (१७३०). मल्हाररावांनी राणोजी शिंदे व उदाजी पवार यांबरोबर मराठी साम्राज्याच्या रक्षणासाठी व वृद्धीसाठी १७६६ पर्यंत अपरंपार कष्ट केले. उत्कृष्ट युद्धनेतृत्व व उत्तम राज्यव्यवस्था ह्यांमुळे बाणेदार व निधड्या छातीचे मल्हारराव हे धामधुमीच्या काळात मराठ्यांचे ज्येष्ठ व श्रेष्ठ सुभेदार ठरले. 

 

मल्हाररावांचे एकुलते एक पुत्र खंडेराव (१७२३–५४) यांचा विवाह अहिल्याबाईंशी झाला (१७३३). त्यांना मालेराव हा मुलगा व मुक्ताबाई ही मुलगी होती. खंडेराव मल्हाररावांबरोबर स्वारीवर जात असत. त्यांना १७४० मध्ये शिलेदारीची वस्त्रे मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक लढायांत भाग घेतला. कुंभेरीच्या १७५४ च्या वेढ्यात त्यांस तोफेचा गोळा लागला व त्यांत त्यांचे निधन झाले (१७ मार्च १७५४). 

 

त्यांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी खंडेरावांचा मुलगा मालेराव यांस इंदूरच्या गादीवर बसविले. मालेराव राज्यप्राप्तीनंतर दहा महिन्यांत २७ मार्च १७६७ रोजी मरण पावल्याने राज्यकारभाराची सर्व जबाबदारी त्यांची आई अहिल्याबाई (कार. १७६७–९५) यांच्यावर पडली. त्यांनी स्वामिनिष्ठा, कर्तव्यतत्परता, धर्मशीलता इत्यादी गुणांच्या साह्याने संस्थानचे रक्षण करून मल्हाररावाचा मानसपुत्र तुकोजीराव यांस सेनापतिपद दिले. त्यांच्या कारकिर्दीत संस्थानची सर्वांगीण प्रगती झाली. 

 

तुकोजीरावांनी पेशव्यांना १७६९ च्या जाट व रोहिल्यांविरुद्ध, १७७८-७९ च्या इंग्रजांविरुद्ध, १७८६ च्या टिपूविरुद्ध, १७९५ च्या निजामाविरुद्ध, या मोहिमांत नुसती मदतच केली असे नाही, तर काही वेळा सेनानायक हे पदसुद्धा भूषविले. पेशवाईच्या उत्तरार्धात तर त्यांनी बारभाईंच्या कारस्थानात प्रत्यक्ष भाग घेऊन मराठी साम्राज्याची घडी पूर्ववत बसविण्याचे प्रयत्न केले. पुण्याजवळील वानवडी येथे १५ ऑगस्ट १७९७ रोजी ते मरण पावले. 

 

तुकोजीरावांस काशीराव व मल्हारराव (दुसरे) हे दोन औरस पुत्र असून यशवंतराव व विठोजी असे दोन अनौरस पुत्र होते. तुकोजीरावांनी मृत्यूपूर्वी आपल्यानंतर काशीराव या ज्येष्ठ मुलाने सुभेदार व्हावे, अशी व्यवस्था केली होती पण ते कर्तृत्ववान नव्हते. त्या मानाने मल्हारराव हुशार व कर्तबगार होते. मल्हाररावांस पेशव्यांनी सुभेदारीची वस्त्रे दिली पण नाना फडणीसांच्या बाजूने ते राजकारण करीत होते. त्यांस दौलत-राव शिंदे यांनी क्लृप्तीने ठार मारले (१७९७). त्याच सुमारास बापू गोखले यांनी विठोजींस पकडले आणि त्यांस पुण्यात आणून ठार मारले. अखेर यशवंतराव (कार. १७९९–१८११) यांनी या सर्व बंधूंच्या वधाचा सूड घेण्यासाठी पुणे सोडून उत्तरेकडे कूच केले. तापी आणि नर्मदेच्या खोऱ्यातून भ्रमंती करीत असताना त्यांना लाला भवानी शंकर हा विश्वासू नोकर व सल्लागार मिळाला. त्यांनी भिल्लांची फौज तयार केली आणि संपत्ती गोळा करून घोडदळ उभे केले. त्यांनी आपला पुतण्या खंडेराव यांच्या नावाने कारभार सुरू केला. 

 

त्यामुळे होळकरशाहीतील जुन्या लोकांनी यशवंतरावांना मदत केली. त्यांनी महेश्वर येथील अहिल्याबाईंनी जतन केलेला खजिना हस्तगत केला आणि फौजफाटा जमा करून शिंदेशाहीविरुद्ध आघाडी उघडली (१८००). त्या वेळी महादजी शिंद्यांच्या विधवा पत्न्या लकबा लाडच्या साहाय्याने दौलतराव शिंद्यांविरुद्ध एकत्र आल्या होत्या. यशवंतराव त्यांना भेटले आणि त्यांच्यात समझोता झाला तथापि या विधवा स्त्रिया उज्जैन येथे असताना यशवंतरावांनी अचानक नोव्हेंबर १८०० मध्ये त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा लकबाने दोघांचा समेट घडवून आणल्यावर विधवा स्त्रिया ग्वाल्हेरला गेल्या आणि यशवंतराव हे दौलतराव शिंद्यांशी लढण्यासाठी नर्मदेच्या खोऱ्यात आले. दक्षिणेत येऊन यशवंतरावांनी शिंदे व पेशवे यांच्या मुलखात लूटमार व जाळपोळ केली. तत्पूर्वी त्यांनी दुसऱ्या बाजीरावाकडे परशर दादाजी या प्रतिनिधीद्वारे आपल्या न्याय्य मागण्या केल्या होत्या पण त्यांस पेशव्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. या सुमारास होळकर शाहीचे फतेहसिंह माने आणि मीर खान हे सेनापती यशवंतरावांसोबतहोते. २५ ऑक्टोबर १८०२ रोजी यशवंतरावांनी हडपसरच्या लढाईत शिंद्यांच्या म्हणजे पेशव्यांच्या फौजेचा धुव्वा उडविला. बाजीराव चिमाजीसह सिंहगडला पळून गेला. यशवंतराव वानवडीला शिंद्यांच्या प्रासादात मुक्काम ठोकून होते. त्यांनी अमृतरावांना आणून पेशवेपदावर बसविले मात्र बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केल्यानंतर यशवंतरावाचे सर्व बेत फसले (१८०२). त्यांनी इंग्रजांविरुद्ध पुकारलेल्या युद्धात रणजित सिंग, भरतपूरचा राजा, शिंदे, भोसले (नागपूरकर) आदींची मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना फारसे यश आले नाही. तरीसुद्धा त्यांनी इंग्रजांना मोठ्या जिद्दीने तोंड दिले. अखेर १८०५ मध्ये त्यांना नाईलाजाने कर्नल लेकशी युद्धबंदीचा तह करावा लागला. उर्वरित जीवनात ते पराभवाने वैतागले आणि दारूच्या व्यसनात अडकले. शिवाय त्यांना अतिश्रमामुळे बुद्धिभ्रंश झाला (१८०७). त्यामुळे १८०७ ते १८११ दरम्यान संस्थानात अनागोंदी माजली होती. यशवंतराव अशा दयनीय स्थितीतच भानपुरायेथे मरण पावले (१८११). मराठेशाहीच्या स्वातंत्र्यासाठी झुंजणारे, स्वार्थत्यागी, लष्करी संघटक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. 

 

यशवंतरावांना अनेक बायका होत्या. त्यांपैकी तुळसाबाई ही पत्नी राज्यकर्ती बनली कारण यशवंतरावांस केसरबाई या पत्नीपासून ( तिसरा) मल्हारराव नावाचा चार वर्षांचा मुलगा होता. त्याच्या नावे तुळसाबाई ह्या तात्या जोग आणि गणपतराव या मुत्सद्द्यांच्या मदतीने कारभार पाही परंतु खजिना रिकामा झाल्यामुळे तुळसाबाईंना सैन्य ठेवणे कठीण झाले. शिवाय दौलतराव शिंद्यांनी होळकरांचा माळव्यातील काही मुलूख हस्तगत केला. तुळसाबाईंनी अमीर खान, गफूर खान व कोट्याचा झलिमसिंग यांच्या मदतीने राज्याचा गाडा चालविला होता. त्या देखण्या, बुद्धिमान व हुशार होत्या तसेच क्रूर व दुराचारीही होत्या. इंग्रजांशी मैत्री करावी या मताच्या त्या होत्या तथापि रोशन बेग हा होळकरांच्या सुसज्ज सैन्याचा प्रमुख असून रामदीन घोळदळाचा मुख्य होता. त्यांना तुळसाबाईंची ही योजना अपमानास्पद वाटली. त्यांनी तुळसाबाईंना क्षिप्रा नदीकाठच्या महिदपूर (उज्जैनच्या उत्तरेस सु. ५० किमी.वरीले) येथे नेऊन त्यांचा शिरच्छेद केला आणि मृतदेह नदीत टाकला. 

 

तिसरे मल्हारराव (कार. १८०७–३३) यांनी हिस्लॉपच्या नेतृत्वा-खालील ब्रिटिश सैन्याविरुद्ध पराक्रमाचे दर्शन घडविले (डिसेंबर १८१७). त्यांची विधवा भगिनी भिमाबाईंनीसुद्धा शौर्याने प्रतिकार केला. तसेच हरिराव (विठोजींचा मुलगा) यांनीही जीवाचे रान केले परंतु ब्रिटिशांच्या सुसज्ज तोफखान्यासमोर त्यांना मोहदपूर येथे शरणागती पतकरावी लागली. इंग्रजांच्या हाती होळकरांच्या ६३ तोफा आणि दारूगोळा पडला. अमीर खान आणि गफूर खान यांनी होळकर व ब्रिटिश यांमध्ये मध्यस्थी करून तहाची बोलणी केली. तात्या जोगांनी दिवाण माल्कमबरोबर होळकरांच्या-वतीने मंदसोर येथे ६ जानेवारी १८१८ रोजी तह केला. त्यानुसार संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक राज्य होऊन तेथे तैनाती फौज व एजंट राहू लागला. तैनाती फौजेसाठी होळकरांना बुंदीच्या उत्तरेकडील व सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडील प्रदेश खर्चासाठी द्यावा लागला. गफूर खानाला जावराची जहागीर बक्षीस मिळाली. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर हरिराव व खंडेराव हे सत्ताधीश झाले पण ते कर्तबगार नव्हते व अल्पायुशी ठरले. १८४३ मध्ये हरिराव अपत्यहिन मरण पावले, तेव्हा ब्रिटिशांनी होळकरांच्या आप्तांपैकी, विशेषतः रेसिडेन्ट रॉबर्ट हॅमिल्टन याच्या साह्याने भाऊ होळकरांच्या मुलास यशवंतरावांची पत्नी केसरबाई यांच्या सल्ल्यानुसार दत्तक घेऊन सवाई(दुसरे) तुकोजीराव (कार. १८४४–८६) यांस गादीवर बसविले. त्यांनी राजकुमार कॉलेजमधून शिक्षण घेतले होते. त्यांनी आग्रा, दिल्ली वगैरे शहरांचा त्यांनी दौरा केला (१८५१-५२). त्या सवाई तुकोजीरावांनी निरनिराळ्या देशांतील रीतीरिवाज व राज्यपद्धतींचा अभ्यास व अवलोकन करून आपल्या संस्थानात रेल्वे, पोस्ट, दिवाणी व फौजदारी कोर्ट, छापखाने, नगरपालिका इ. सुधारणा घडवून आणल्या. राज्यकारभाराचे प्रशासनाच्या दृष्टीने लोककर्म, विद्या, वैद्य वगैरे स्वतंत्र विभाग पाडून राज्य-कारभारात सुलभता व तत्परता आणली. पंतप्रधानपदी (दिवाण) राजा सर टी. माधवरावांची नियुक्ती झाल्यानंतर (१८७२) मंत्रिमंडळ स्थापन झाले. सर्व खात्यांपैकी महसूल खाते मात्र महाराजांच्या देखरेखीखाली होते. तुकोजीरावांनी सूतकताई व विणकाम फॅक्टरी सुरू केली (१८६९). त्यांनी इंदूरमध्ये प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत ३०० भिल्ल व त्यांच्या भार्या यांच्या सुरेख नृत्याने केले (मार्च १८७६). १८७७ च्या दिल्ली दरबाराच्या वेळी इंग्रज सरकारने त्यांना ‘जी. सी. एस्. आय्.’ हा बहुमानाचा किताब दिला. 

 

सवाई तुकोजीरावांच्या निधनानंतर (१८८६) त्यांचे थोरले पुत्र शिवाजीराव (कार. १८८६–१९०३) हे गादीवर आले. त्यांच्या पोरकट स्वभावामुळे राज्यकारभारात सुधारणा तर झाली नाहीच पण १८९९ मध्ये इंग्रजांनी इंदूर दरबारी आपला एक स्वतंत्र प्रतिनिधी नेमला. १९०२ मध्ये इंग्रजांनी होळकरांचे नाणे बंद करून आपले नाणे सुरू केले. इंग्रजांनी इंदूर संस्थानचा कारभार शिवाजीरावांचे पुत्र सर सवाई (तिसरे) तुकोजीराव(कार. १९०३–१९२७) यांच्याकडे सोपविला. सर सवाई तुकोजीरावांनी प्रजाहितदक्षतेने शिक्षण, शेती, उद्योगधंदे, व्यापार, वैद्यक यांत मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणल्याचे दिसून येते. सर सवाई तुकोजीरावांनी निवृत्ती घेऊन आपले पुत्र दुसरे यशवंतराव (कार. १९०३–१९४८) यांस गादीवर बसविले. त्यांच्या कारकिर्दीतच संस्थान मध्य भारत संघातप्रथम विलीन झाले. 

कांबळे, र. ह. भिडे, ग. ल.