हैफा : इझ्राएलमधील प्रमुख शहर व बंदर. लोकसंख्या २,६५,६०० (२००९). हे इझ्राएलच्या वायव्य भागात, तेल आवीव्हच्या उत्तरेस सु. ८५ किमी., कार्मेल पर्वत उतारावर व भूमध्य समुद्राच्या हैफा उप-सागरावर वसलेले आहे. हैफा इझ्राएलमधील तिसऱ्या क्रमांकाचे शहर असून याचे सांस्कृतिक, व्यापारी व औद्यागिक क्षेत्रांतील योगदान महत्त्वाचे आहे. हे दळणवळणाचे केंद्र असून लोहमार्गाचे प्रस्थानक आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून हैफा उपसागरावरील खोल पाण्याचे उत्कृष्ट बंदर म्हणून हे प्रसिद्ध आहे. येथून खनिज तेल, स्थानिक औद्योगिकउत्पादने, खनिजे, लिंबूवर्गीय फळे, कोळसा, पोटॅश इत्यादींची वाहतूक होते. हैफा बहाईंचे महत्त्वाचे प्रमुख ठिकाण आहे.
ज्यू लोकांच्या ⇨ टॅलमुड या धार्मिक ग्रंथात हैफाचा उल्लेख आहे. युसीबीअस या धर्मशास्त्रवेत्त्याने हैफाचा सीकमायनम असा उल्लेखकेलेला आहे. इ. स. ११०० मध्ये हे शहर धर्मयोद्ध्यांनी जिंकले वयाचे नामकरण ‘हैफा’ असे केले. नेपोलियनने हे शहर १७९९ मध्ये, तर ईजिप्तच्या इब्राहिम पाशाने हे १८३९ मध्ये जिंकले होते. १८४० मध्ये तुर्कांनी ब्रिटिशांच्या मदतीने यावर कब्जा केला होता. १९१८ मध्ये हे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होते. १९२२ मध्ये हे पॅलेस्टाइनचा भाग बनले. पॅलेस्टाइन युद्धात १९४८-४९ मध्ये हैफा बंदर हा संवेदनशीलभाग झालेला होता. याचा ताबा घेण्यासाठी अरब व ज्यू यांनी पराकाष्ठा केली होती. यामध्ये अरबांचा पराभव झाला होता. ब्रिटिश अखत्यारितहैफा बंदराचा विकास झाला. १९०५ आणि १९१९ मध्ये लोहमार्गबांधणी व १९३४ मध्ये बंदर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर याची भरभराट झाली. हैफामधील अनेक नागरी वस्त्या, व्यापारी क्षेत्र व शहराचा मुख्य भाग डोंगरउतारावर असून उच्चभ्रू लोकांची वस्ती, मोठी हॉटेले डोंगर-माथ्यावर आहेत.
बंदर, रेल्वे, रस्ते या दळणवळणाच्या सुविधा, हैफा उपसागरानजीक उपलब्ध जमीन, तुलनेने कमी खर्चात उपलब्ध ऊर्जा यांमुळे औद्योगिकी-करणास चालना मिळाली आहे. येथे तेलशुद्धीकरण, पोलाद, जहाज-बांधणी, रसायने, अन्नप्रक्रिया, सिमेंट, विद्युत्साहित्य, कापड, काच, खते इ. उद्योग विकसित झालेले आहेत.
हैफा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (१९२४), हैफा विद्यापीठ (१९६४) या संस्था उच्च शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य आहेत. हे बहाईंचेप्रमुख केंद्र असून युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात हैफा येथील बहाईंच्या पवित्र स्थळाचा समावेश केला आहे (२००८). येथील बहाई मंदिर, बहाई धर्म संस्थापकांचे सुपुत्र अब्दुल बहा यांची कबर असलेलीपर्शियन बाग, सागरी संग्रहालय (१९५४), एलिजाह गुहा, इझ्राएल नॅशनल म्यूझीयम ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड स्पेस, कला संग्रहालय इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.
पवार, डी. एच्.
“