हेर्ट्‌झल, थीओडोर : (२ मे १८६०–३ जुलै १९०४). ऑस्ट्रियन लेखक, यहुदी राष्ट्रीय आंदोलनाचा प्रणेता आणि पत्रकार म्हणून प्रसिद्ध. ज्यू लोकांच्या जागतिक संघटनेचा पहिला अध्यक्ष. 

 

त्याचा जन्म मध्यमवर्गीय सुख-वस्तू कुटुंबात बूडापेस्ट (हंगेरी) येथे याकोब व जेनेट हेर्ट्झल या दांपत्या-पोटी झाला. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जन्मगावीच झाले. पुढे त्याचे कुटुंब व्हिएन्नाला आले. त्याने व्हिएन्ना विद्यापीठातून काय-द्याची पदवी घेतली (१८८४). त्यानंतर त्याने एक वर्ष पत्र-कारितेचाही अभ्यास केला पण वकिली न करता लेखन-वाचन यांत व्यासंग करण्याचे ठरविले.

 

थीओडोर हेर्ट्‌झल
 

सुरुवातीस त्याने नाटके लिहिली. त्यांपैकी काही रंगभूमीवरही आली. 

 

थीओडोरचा विवाह व्हिएन्नातील एका श्रीमंत ज्यू उद्योजकाच्या ज्यूली नाशौएर या कन्येशी झाला (१८८९). त्याला तीन अपत्ये झाली. त्याने व्हिएन्ना येथील एका प्रसिद्ध नेऊए फ्रीए प्रेस या वर्तमानपत्रात एक लेख लिहिला. त्यामुळे त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली व त्याची त्या वर्तमानपत्राचा पॅरिसमधील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली. तो पत्नीसह पॅरिसमध्ये दाखल झाला (१८९१). त्याने १८९१–९५ या काळात पॅरिसचा वार्ताहर असताना अनेक लेख लिहिले. त्या लेखांमधून त्याने फ्रान्समध्ये असणारे आर्थिक घोटाळे, राजकीय द्वंद्व, सामाजिक विषमता, ड्रायफस प्रकरण आणि ज्यूविरोधी वातावरण यांवर लेखन केले. ड्रायफस प्रकरणामुळे तो झाय्निस्ट (यहुदी राष्ट्रप्रेमी) बनला. जोपर्यंत ज्यू लोकांवर होणारे अन्याय, अत्याचार अस्तित्वात आहेत, तोपर्यंत सामाजिक समरसता अशक्य आहे आणि यावर एकमेव मार्ग म्हणजे बहुसंख्य ज्यूंनीसंघटित होऊन स्वतःच्या देशात स्थलांतर करणे हा होय, असे त्याचे मतहोते. ‘द न्यूज घेट्टो’ या शीर्षकाच्या नाटकातून हाच अर्थ त्यालाअभिप्रेत होता. ज्यूंच्या स्वतंत्र देशाची संकल्पना पहिला नेपोलियन याने १७९९ मध्ये मांडली. इंग्लंडचा पंतप्रधान बेंजामिन डिझरेली या ज्यू गृहस्थाने टँक्रेड ही झिऑनिस्ट कादंबरी लिहिली. थिओडोरने लिओ पिन्स्करलिखित ‘इमॅन्सिपेशन’ ही पत्रिका वाचली. तीत पश्चिम यूरोपातील ज्यूंना पॅलेस्टाइनमध्ये वसाहत करण्यास आवाहन केले होते. 

 

थीओडोरने द ज्यूईश स्टेट हा ग्रंथ लिहिला (१८९६). त्यात त्याने ज्यूंचा प्रश्न हा सामाजिक वा धार्मिक प्रश्न नाही, तर तो राष्ट्रीय प्रश्नआहे, असे स्पष्ट केले. तसेच ज्यूंचे स्वतंत्र, सार्वभौम सत्ताकेंद्र उभे करण्याची अपरिहार्यता स्पष्ट केलेली आहे. या संदर्भात तो जर्मन सम्राट दुसरा विल्यम, ऑटोमन साम्राज्याचा दुसरा सुलतान अब्दुल हमीद वब्रिटिश मुत्सद्द्यांना भेटला. त्याने झाय्निस्ट लोकांची जागतिक परिषद घेण्याचे ठरविले. त्यामुळे सर्व देशांतील सर्वसामान्य ज्यूंचा पाठिंबा मिळेल, अशी त्याला आशा होती. 

 

थीओडोरने पंधरा निरनिराळ्या देशांतून – विशेषतः मध्य व पूर्व यूरोपातून – आलेल्या सु. २०० यहुदी प्रतिनिधींची सभा (पहिली झाय्निस्ट काँग्रेस) बाझेल येथे भरविली (ऑगस्ट १८९७) व पॅलेस्टाइनमध्ये ज्यू लोकांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा उद्देश जाहीर केला. या सभेत तो म्हणाला, ‘आपण घराच्या पायाचा दगड बसविणार आहोत व ते घर हे ज्यूंच्या राष्ट्रांचे आश्रयस्थान बनणार आहे.’ ‘झाय्निस्ट काँग्रेस’ ही त्याच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली चळवळ होती. त्यात झाय्निस्ट परिषद स्थापन करण्यात आली. प्रथमतः परिषदेचे अधिवेशन वर्षातून एकदा भरू लागले. १८९९ नंतर ते दोन वेळा भरविण्याचे ठरले. त्या निमित्ताने त्या काळात ६०–६५ देशांत विखुरलेला हा समाज त्या अधिवेशनांना उपस्थित राहू लागल्याने त्याला स्वाभाविकच जागतिक स्वरूप प्राप्त झाले. उर्वरित जीवन थीओडोरने या चळवळीच्या विस्तारात व्यतीत केले मात्र चरितार्थासाठी तो नेऊए फ्रीए प्रेस या वर्तमानपत्राचा वाङ्मयीन संपादक म्हणून अखेरपर्यंत कार्यरत होता. त्याने चळवळीच्या प्रचारार्थ डीए वेल्ट हे झाय्निस्ट जर्मन साप्ताहिक व्हिएन्ना येथे स्थापन केले. तसेच ज्यूईश नॅशनल फंड स्थापण्यात आला (१९०१). त्यानंतर लोकांच्या वर्गणीद्वारे ‘ज्यूईश कलीनल ट्रस्ट ‘ची स्थापना झाली. त्यातूनच अँग्लो पॅलेस्टाइन बँक जन्माला आली. त्याने ज्यू लोकांची एक राजकीय समिती तयार करून हिब्रू भाषा, साहित्य व कला यांच्या विकासाला प्राधान्य दिले आणि आर्थिक पायाभरणीसाठी वरील उपाय योजले.

 

सिनाई द्वीपकल्पाच्या ब्रिटिशांच्या अखत्यारीतील प्रदेशात ज्यूंच्या वसाहती स्थापण्यास ग्रेट ब्रिटन अनुकूल आहे, असे थीओडोरला वाटले पण तसे न होता ब्रिटिशांनी पूर्व आफ्रिकेतील युगांडाचा प्रस्ताव मांडला. ही योजना त्याला व काही अन्य झाय्निस्टांना मान्य होती परंतु १९०३ च्या झाय्निस्ट परिषदेत तिला तीव्र विरोध झाला. तो प्रामुख्याने रशियन ज्यूंनी केला होता. त्याचा थीओडोरच्या मनावर परिणाम झाला व तो हृदयविकाराच्या झटक्याने एड्लच, ऑस्ट्रिया येथे मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर चार दशकांनी इझ्राएल हे ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र उदयास आले (१९४९). तेव्हा त्याच्या इच्छेनुसार त्याचे अवशेष जेरूसलेम येथीलएका टेकडीवरील थडग्यात पुरण्यात आले. 

 

पहा : ज्यू राष्ट्रीय आंदोलन. 

 

संदर्भ : Elon, Amos, Herzl, New York, 1975. 

सोसे, आतिश सुरेश