हेर्टसेन, अल्यिक्‌सांडर आयव्हानोव्ह्यिच : (६ एप्रिल १८१२–२१ जानेवारी १८७०). रशियातील एक प्रमुख पत्रकार, राजकीय विचारवंत, लेखक व तत्त्ववेत्ता. त्याचा जन्म मॉस्कोयेथे एका सधन उमराव घराण्यात एका जर्मन तरुण रखेलीच्या पोटीझाला. त्याचे शिक्षण मॉस्को विश्वविद्यालयात (१८२९–३३) झाले. तत्पूर्वी वडिलांनी त्याला फ्रेंच, जर्मन आणि रशियन भाषांचे शिक्षण खासगी शिक्षकांकडून घरीच उत्तम प्रकारे दिले तथापि रशियन समाज त्याच्या अनौरस जन्मामुळे त्याच्याकडे तिरस्काराने पाहत असे. त्यामुळेच तो ‘डिसेंबरिस्ट’ या क्रांतिकारक गटात सामील झाला. त्या गटाने १८२५ मध्ये पहिल्या निकोलस झारविरुद्ध अयशस्वी उठाव केला. याच सुमारास तोफ्रीड्रिख शिलर या जर्मन नाटककाराच्या विमुक्तिवाद (लिबर्टेरिअनिझम) या कल्पनेने प्रभावित झाला आणि त्यांच्या मित्र-मंडळाने रशियाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देण्याची शपथ घेतली. एका राजकीय तत्त्वमीमांसक गटामध्ये सामील झाल्यामुळे १८३४ मध्ये त्याला अटक झाली आणि मॉस्कोपासून दूर अशा प्रांतात हद्दपार करण्यात आले. आठ वर्षांच्या (१८३४–४२) हद्दपारीत त्याला हाल सोसावे लागले आणि त्याचा शेलिंगच्या आदर्शवादावरील विश्वास उडाला मात्र या काळात त्याचे नतल्या झाखरिना या युवतीबरोबर प्रेमसंबंध जुळले व त्याची परिणती विवाहात झाली (१८३८). त्याने तत्कालीन थोर तत्त्वज्ञ हेगेल आणि फॉयरबाख यांच्या तार्किक विचारांनुसार ‘लेफ्ट हेगेलियनवादी’ तत्त्वप्रणाली आत्मसात केली आणि ‘अल्जेब्रा ऑफ रिव्ह्लूशन’ हा द्वंद्ववाद अंगीकारून फ्रेंच समाजवादातून प्रसृत झालेले ‘न्यायासाठी संघर्ष’ हे तत्त्व अंगीकारले. मॉस्कोला परत आल्यानंतर त्याने यूरोपियनांचा विवेकवाद आणि नागरी स्वातंत्र्य यांचा पुरस्कार केला. त्यानंतर त्याने या तत्त्वज्ञानावर ‘डायलेट्टँटिझम इन सायन्स’ आणि ‘लेटर्स ऑन द स्टडी ऑफ सायन्स’ (इं. शी., ‘लेटर्स ऑन द स्टडी ऑफ नेचर’) हे दोन ग्रंथ लिहिलेआणि ‘हू इज टू ब्लेम’ (इं. शी.) ही सामाजिक कादंबरी लिहिली तथापि लवकरच तो या पाश्चात्त्य उदारमतवादी समूहातून बाहेर पडून अराज्यवादी समाजवादी तत्त्वज्ञ प्रूदाँ याच्याकडे आकृष्ट झाला. या दरम्यान त्याचे वडील वारले (१८४६) पण त्यांनी बऱ्यापैकी संपत्ती त्याच्यासाठी ठेवली होती. 

 

हेर्टसेनने तत्काळ पॅरिस गाठले. त्याने १८४८ ची फ्रेंच राज्यक्रांती पाहिली. तिचे त्याने स्वागत केले. त्यामुळेच त्याला पुढे रशियात जाणे अशक्य झाले. १८५२ मध्ये तो लंडनमध्ये (इंग्लंड) स्थायिक झाला. तेथे त्याने रशियन मुद्रणालय स्थापले आणि ‘द पोलर स्टार’ (१८५५–६२, इं. शी.) व ‘व्हॉइसिस फ्रॉम रशिया’ (१८५६, इं. शी.) ही नियत-कालिके व ‘बेल’ (१८५७–६७, इं. शी.) हे साप्ताहिक चालू केले. ‘बेल’ हे साप्ताहिक रशियात चोरमार्गाने पाठविण्यात येत असले, तरी त्याचा प्रभाव खूप मोठा होता. रशियाचा बादशहा दुसरा अलेक्झांडर- देखील ते नियमित वाचत असे. 

 

हेर्टसेनला यूरोपातल्या समकालीन क्रांतिकारकांचा चांगलाच परिचय होता. फ्रेंच राज्यक्रांती व फ्रेंच समाजवादाचा प्रभाव त्याच्या विचारावर होता. ही विचारप्रणाली अनुसरणाऱ्यांना ‘झापादनिक्स’ ऊर्फ ‘पाश्चात्त्य पद्धतीचे पुरस्कर्ते’ असे नाव मिळाले होते. 

 

हेर्टसेनच्या नामांकित साहित्यकृतींत ‘फ्रॉम द अदर शोअर’ (१८४७–५०, इं. शी.) या राजकीय लेखांच्या संकलित ग्रंथांचा आणि ‘मायपास्ट अँड थॉट्स’ (१८६१–६७, इं. शी.) या सहा खंडांच्या संस्मरणिकेचा समावेश होतो. ‘फ्रॉम द अदर शोअर’ या ग्रंथात १८४० च्या चळवळीचे समीक्षण त्याने केले आहे, तर ‘माय पास्ट….’ हे हेर्टसेनचे आत्मचरित्र होय. त्याचे हे आत्मचरित्र रशियन साहित्यातील एक उत्कृष्ट साहित्य-कृती मानली जाते. ‘हू इज टू ब्लेम?’ (१८४५-४६, इं. शी.) ही त्याचीउत्कृष्ट सामाजिक कादंबरी. त्यात तत्कालीन रशियाचे अत्यंत उद्बोधक व वेधक असे चित्रण केलेले आहे. 

 

यांशिवाय ‘लिजेंड’ (१८३६ इं. शी.) ‘इलेना’ (१८३८ इं. शी.) ‘नोटस् ऑफ अ यंग मॅन’ (१८४० इं. शी.) ‘मीमोइझडोम’ (१८४६ इं. शी.) ‘डॉ. कृपा’ (१८४७ इं. शी.) ‘थिव्हिंग मॅगपी’ (१८४८ इं. शी.) ‘द रशियन पिपल ॲण्ड सोशिॲलिझम’ (१८४७ इं. शी.) ही त्याची उल्लेखनीय ग्रंथसंपदा. 

 

अल्पशा आजाराने पॅरिस येथे त्याचे निधन झाले. 

मेहता, कुमुद गुडेकर, विजया म.