हेमिकॉर्डेटा : प्राणिसृष्टीतील एक उपसंघ. पूर्वी याचा ⇨ कॉर्डेटा संघातील एक उपसंघ म्हणून उल्लेख करण्यात येत असे परंतु, आधुनिक वर्गीकरण पध्दतीनुसार या उपसंघाचा समावेश प्राणिसृष्टीच्या अपृष्ठवंशी ( पाठीचा कणा नसलेल्या) विभागात करण्यात आला असून हा सागरी कृमिसदृश अपृष्ठवंशी प्राण्यांचा समूह आहे. त्यांच्यात कॉर्डेटा व एकायनो-डर्माटा या दोन्ही संघांतील प्राण्यांशी काही लक्षणांमध्ये साम्य असून त्यांचे या दोन्हींशी जवळचे नातेसंबंध आहेत. हेमिकॉर्डेटा हा ग्रीक शब्द असून ‘हेमि’ म्हणजे अर्धा व ‘कॉर्डेटा’ म्हणजे मेरुक किंवा रज्जू म्हणून या प्राण्यांना अर्धमेरुक किंवा सामि-रज्जुमान प्राणी असे म्हणतात.या प्राण्यांच्या शरीराच्या काही भागांत पृष्ठरज्जू असतो. हे सागरी प्राणी कृमीसारखे असून पृष्ठवंशी प्राण्यांच्या जवळचे समजले जातात.
प्राण्यांची वैशिष्ट्ये : (१) या उपसंघातील प्राणी समुद्रातील वाळू, गाळ अगर चिखल यात एकएकटे अगर समूहाने राहतात. (२) शरीर कृमीसारखे लांबट असून शरीराचे शुंड (सोंड), कॉलर (गळपट्टी) व धड असे तीन भाग असतात. (३) मुख गळपट्टीच्या लगेच पुढे अधर पृष्ठावर असते. (४) या प्राण्यांचे शरीर द्विपार्श्विक व अवलयांकित असून ते तीन भित्तिकांचे बनलेले असते. (५) आहारनाल पूर्ण असून तो सरळ किंवा इंग्रजी यू (ण) आकाराचा असतो. (६) आहारनालाच्या (मुख ते गुदापर्यंतच्या अन्नमार्गाच्या) पृष्ठभित्तीपासून एक अंधनलिका (टोकाशी बंद असलेली नळी) निघून पुढे गळपट्टीत गेलेली असते, हीच याची पृष्ठरज्जू होय. (७) श्वसन तंत्रात धडाच्या अग्रभागात पार्श्व क्लोम-दरणांच्या जोड्या असतात. (८) रक्ताभिसरण तंत्र अनावृत रुधिर परिवहन प्रकारचे असते. यामध्ये रक्त काही अंशी वाहिकांतून, तर काही अंशी निश्चित भित्ती नसलेल्या लहान-मोठ्या कोटरांतून वाहते. या तंत्रात मध्य कोटर, हृद् वाहिनी, पृष्ठीय व अधर वाहिनी, कोटरे, पार्श्विक वाहिनी असतात. (९) उर्त्सजन तंत्रात कोशिकागुच्छ असतात. कोशिकागुच्छ शरीराच्या शुंडामध्ये असतात. (१०) बहुतेक प्राण्यांमध्ये लैंगिक प्रजनन होते. नर-मादी वेगवेगळे प्राणीअसतात. काही प्राण्यांमध्ये अलैंगिक प्रजनन आढळते. उदा., टेरोब्रँकिया वर्गातील प्राणी. (११) या प्राण्यांच्या भ्रूणाच्या विकासातील डिंभावस्थेस (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यत: क्रियाशील असलेल्या पूर्व अवस्थेस) टॉर्नारिया असे म्हणतात. (१२) या प्राण्यांमध्ये पुनर्जननाची (तुटलेल्या शरीर भागाच्या जागी नवीन शरीर भाग निर्माण करण्याची) शक्ती असते. (१३) सर्व हेमिकॉर्डेट प्राण्यांमध्ये निस्यंदक अशन यंत्रणा असते. पाण्यातील लहान प्राणी, वनस्पती व सेंद्रिय पदार्थ हे त्यांचे खाद्य आहे. ॲकॉर्न वर्म प्राण्यामध्ये शुंडाच्या साहाय्याने, तर टेरोब्रँक प्राण्यामध्ये संस्पर्शिकेच्या साहाय्याने अन्नकण पकडले जातात. या उपसंघात सु. ९० जातींचा समावेश होतो.
हेमिकॉर्डेटा या उपसंघात एंटरोन्यूस्टा, टेरोब्रँकिया व प्लँक्टोस्फिरॉयडिया या तीन वर्गांचा समावेश होतो.
(१) एंटरोन्यूस्टा : या वर्गामध्ये सु. ७० जातींचा समावेश असून त्यांचा आढळ किनाऱ्याजवळ समुद्रात सु. ४०० मी. खोलीपर्यंत असतो. हे कृमीसदृश प्राणी एकएकटे राहणारे असून त्यांचे शरीर द्विपार्श्विक असते. त्यांच्या शरीराचे रंग भडक असून त्यांना अकॉर्न वर्म असे म्हणतात. या प्राण्यामध्ये क्लोम-दरणांच्या पुष्कळ जोड्या असतात. त्यांच्या आकारमानात खूपच फरक असतो. काही प्राणी काही सेंमी. लांब (उदा., उत्तर समुद्रातील सॅक्कोग्लॉसस पिग्मिअस), तर काही प्राणी सु. २ मी. किंवा त्यापेक्षा मोठे (उदा., ब्राझील किनाऱ्याच्या पाण्यातील बॅलॅनोग्लॉसस गिगॅस) असतात.
(२) टेरोब्रँकिया : या वर्गामध्ये सु. २० जातींचा समावेश होतो. हे प्राणी आकाराने सूक्ष्म व निवहजीवी असतात. ते खोल किंवा उथळ समुद्रात राहतात. त्यांना क्लोम-दरणे सहसा नसतात, असल्यास क्लोम-दरणाची एकच जोडी असते. नर-मादी वेगवेगळे प्राणी असतात. काही प्रमाणात अलैंगिक प्रजनन मुकुलनाने होते. उदा., र्हॅब्डोप्ल्यूरा, सेफॅलोडिस्कस.
(३) प्लँक्टोस्फिरॉयडिया : यामध्ये अगदी थोड्या पाण्यावर तरंगणाऱ्या डिंभासारख्या प्राण्यांचा समावेश होतो. या प्राण्यांचे शरीर गोलाकार असून केसल पट्टे असतात. उदा., प्लँक्टोस्फिरा.
हेमिकॉर्डेटाची कॉर्डेटाशी साम्य असलेली वैशिष्ट्ये : (१) शरीराच्या काही भागांत पृष्ठरज्जू असतो. (२) तंत्रिका तंत्रात मज्जारज्जूसारखा पृष्ठीय कॉर्ड असतो. (३) क्लोम-दरणे या प्राण्यात असतात.
हेमिकॉर्डेटाची कॉर्डेटाशी साम्य नसणारी वैशिष्ट्ये : (१) कॉर्डेटामधील पृष्ठरज्जू हा भरीव असतो तर हेमिकॉर्डेटातील पृष्ठरज्जू हा पोकळ असून त्यावर आवरण नसते. (२) मज्जारज्जू हा पृष्ठीय व नळीसारखा असून फक्त गळपट्टीच्या भागात असतो. (३) या प्राण्यांमध्ये पायाच्या जोड्या नसतात, शरीरावर वलये नसतात, तांबड्या रक्तकोशिका नसतात. वृषणे अनेक असतात.
हेमिकॉर्डेटाची एकायनोडर्माशी साम्य असणारी वैशिष्ट्ये : प्रौढ हेमिकॉर्डेट प्राणी व प्रौढ एकायनोडर्म प्राणी यांमध्ये फारसे साम्य आढळत नसल्यामुळे या दोन्ही प्राण्यांमध्ये जवळचे संबंध असल्याचे बाह्य लक्षणांवरून आढळत नाही. बॅलॅनोग्लॉससचा टॉर्नारिया भ्रूण व ⇨ तारामीन माशाचा बायपिनॅरिया भ्रूण या दोन्हींमध्ये अनेक बाबतींत साम्य आढळते. सुरुवातीच्या काळात टॉर्नारिया भ्रूण हा एकायनो-डर्माचाच भ्रूण समजला जात होता. कारण (१) दोन्ही भ्रूण पाण्यावर तरंगणारे असून ते पारदर्शक असतात. (२) या भ्रूणावर केसाळ पट्टे असतात. (३) दोन्ही भ्रूणांच्या आतड्याची रचना सारखीच आहे. (४) दोन्ही भ्रूणांमध्ये सुरुवातीचा विकास सारखाच असतो.
यावरून हेमिकॉर्डेटा प्राण्यांचे कॉर्डेट व एकायनोडर्म प्राण्यांशी नाते असल्याचे दिसते. जातिविकासाच्या दृष्टीने हेमिकॉर्डेट प्राणी महत्त्वाचे समजले जातात. पूर्वी हे प्राणी कॉर्डेटा संघाच्या प्रोटोकॉर्डेटा या उपसंघात समाविष्ट केले जात असत. डिंभाच्या सखोल अभ्यासावरून तसेच जीव-रसायनविषयक परीक्षणातून आता असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, हे प्राणी वेगळ्या संघात समाविष्ट केले जावेत आणि त्यांचे स्थान अपृष्ठवंशी प्राण्यांच्या एकायनोडर्म संघानंतर आणि कॉर्डेटा संघाच्या आधी स्वतंत्र असे असावे. या नव्या दृष्टिकोनास अधिकाधिक प्राणि-शास्त्रज्ञांकडून मान्यता मिळत आहे.
पहा : कॉर्डेटा बॅलॅनोग्लॉसस.
संदर्भ :Bhamraha, H. S. Juneja, Kavita, A Text Book of Invertebrates, New Delhi, 1999.
पाटील, चंद्रकांत प.
“