हेन्रिसन, रॉबर्ट : (१४३०?–१५०६). स्कॉटिश कवी. ब्रिटनमधील आरंभीचा उत्कृष्ट बोधकथाकार. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही. काही ठिकाणी डन्फर्मलिनचा शाळाशिक्षक म्हणून त्याचा उल्लेख आढळतो. स्कॉटिश कवी विल्यम डनबारच्या (१४६५?–१५३०?) सु. १५०८ च्या सुमारास लिहिलेल्या द गोल्डन एज ऑफ एलिजी, लॅमेंट फॉर द माकारिस ह्या रूपक काव्यात मृत कवींच्या निर्देशांमध्ये त्याचे नाव आढळते. द मॉरल फेबल्स ऑफ इसाप द फ्रिजियन… (मुद्रित १६२१) हे त्याचे सर्वांत दीर्घ लेखन. ४०० हून अधिक कडवी असलेल्या ह्या ग्रंथात १३ नीतिकथा आहेत. ह्या बोधकथासंग्रहाला प्रवेशक आहे. हेन्रिसनच्या निवेदनात एक प्रकारचा ताजेपणा आहे. त्याचप्रमाणे नर्मविनोद आणि निवेदनाच्या ओघात येणारी स्कॉटलंडच्या ग्रामीण भागाची लहान लहान शब्दचित्रे आहेत. हेन्रिसनवर मध्ययुगातील सर्वश्रेष्ठ इंग्रज कवीचॉसर ह्याचा मोठा प्रभाव होता. इतका की त्याचे टेस्टमेंट ऑफ क्रिसेड (मुद्रित १५९३) हे काव्य १७२१ पर्यंत चॉसरच्या नावावर मोडत होते असा निर्देश आढळतो. हेन्रिसनच्या अन्य कवितांत ‘ऑर्फिअस अँड युरिडाइस’ ही कवितालक्षणीय आहे. तिची शैली आणि सूर टेस्टमेंट ऑफ क्रिसेड लाजवळचा आहे. हेन्रिसनच्या कविता जी. ग्रेगरी स्मिथ याने ‘स्कॉटिश टेक्सट सोसायटी ‘साठी संपादित केल्या आहेत. (३ खंड, १९०६–१४). 

 

डनफर्मलिन येथेच त्याचा मृत्यू झाला असावा. 

गुडेकर, विजया म.