हेडगेवार, केशव बळीराम : (१ एप्रिल १८८९–२१ जून १९४०). राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व भारतीय स्वातंत्र्य केशव बळीराम हेडगेवारलढ्यातील एक कार्यकर्ते. त्यांचा जन्म बळीराम व रेवतीबाई (पूर्वाश्रमीच्या यमुनाबाई पैठणकर) या दांपत्यापोटी नागपूर येथे झाला. त्यांचे मूळ घराणे आंध्र प्रदेशातील असून केशवरावांचे पणजोबा नरहरशास्त्री हे अठराव्या शतकात नागपुरात येऊन नागपूरकर भोसल्यांच्या आश्रयाखाली स्थायिक झाले. अध्ययन व अध्यापन ही या घराण्याची परंपरा असून केशवरावांनी व्यवहारापुरते वेदविद्येचे शिक्षण घेतले होते. त्यांना दोन वडीलबंधू आणि तीन बहिणी होत्या. गोल बंगला प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबात एखादा तरी मुलगा आंग्लविद्याविभूषित असावा म्हणून त्यांना नील सिटी हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षणासाठी दाखल केले (१९०१). आई-वडिलांचे प्लेगने एकाच दिवशी निधन झाले (१९०३). घरात पैलवानी परंपरा असल्याने केशवरावांनी त्या विद्येत प्रावीण्य मिळविले होते. इतर अनेक मर्दानी खेळांतही ते प्रवीण होते. त्यांचे क्रांतिकारक आचार-विचार व वंदेमातरम्चा उद्घोष केल्याप्रकरणी त्यांना शाळेतून निष्कासित करण्यात आले. वंगभंग चळवळ, स्वदेशी व बहिष्कार आणि केसरी तील स्फूर्तिदायक अग्रलेख यांमुळे ते व त्यांचे वर्गमित्र भारावून गेले होते. तेव्हा ते यवतमाळच्या ‘विद्यागृह’ या राष्ट्रीय शाळेत दाखल झाले (१९०९) पण ती शाळा सरकारने बंद केली. त्यानंतर द नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन (बंगाल) मधून ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर डॉ. मुंजे यांनी त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी कलकत्तायेथे पाठविले. नॅशनल मेडिकल कॉलेजमधून शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी एल्. एम्. अँड एस्. ही वैद्यकीय पदवी मिळविली (१९१४) आणि तत्संबंधीचा अनिवार्य प्रायोगिक अभ्यासक्रमही पूर्ण करून वैद्यकीचे प्रमाणपत्र प्राप्त केले (१९१५). विद्यार्थिदशेत असतानाच स्थानिक क्रांतिकारक गटांशी, विशेषतः पुलिन बिहारी दास यांच्या समितीशी त्यांची जवळीक वाढली होती. १९१० च्या जातीय दंगलीत रुग्णशुश्रूषा पथकात व १९१३ च्या बंगालच्या महापुराच्या वेळी त्यांनी झटून काम केले. कलकत्त्याच्या वास्तव्यात अरविंद घोष, श्यामसुंदर चक्रवर्ती प्रभृती क्रांतिवादी नेत्यांच्या संपर्कात ते आले. डॉक्टर झाल्यावर जन्मभर अविवाहित राहून देशसेवेचे व्रत पार पाडण्याचा निश्चय करून ते १९१६ मध्ये नागपूरला परतले. 

 

नागपूरला प्रांतिक काँग्रेस कमिटी, नागपूर नॅशनल युनियन, राष्ट्रीय मल्लशाळा, अनाथ विद्यार्थी गृह, रायफल असोसिएशन, राष्ट्रीय उत्सव मंडळ आदी संस्थांच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले. १९२० साली नागपूरला काँग्रेसचे अधिवेशन भरणार होते. त्याच्या व्यवस्थेसाठी त्यांनी डॉ. ल. वा. परांजपे यांच्याबरोबर स्वयंसेवक मंडळ उभारले. त्याचे ते कार्यवाह होते. प्रांतिक असहकार समितीचेही ते सदस्य होते. राष्ट्रीय आंदोलनाचा प्रचार करण्यासाठी प्रांतभर संचार करून त्यांनी जहाल भाषणे दिली. परिणामी त्यांच्यावर भाषणबंदीचा हुकूम बजावण्यात आला व पुढे आधीची दोन भाषणे राजद्रोही आहेत, असा आरोप ठेवून त्यांना एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली गेली (१९ ऑगस्ट १९२१). जुलै १९२२ मध्ये सुटल्यावर नॅशनल युनियनचे स्वातंत्र्य हे मुखपत्र चालविण्यासाठी त्यांनी वर्षभर खूप धडपड केली. तत्पूर्वी प्रांतिक काँग्रेसच्या संयुक्त कार्यवाहपदी त्यांची निवड झाली (ऑगस्ट १९२२). 

 

जातीय सलोखा आणि परस्परविश्वास संपादन करण्याच्या उदात्त हेतूने महात्मा गांधीजींनी खिलाफत चळवळीचे नेतृत्व केले परंतु ते अयशस्वी झाल्यानंतर सर्वत्र भीषण जातीय दंगली उद्भवल्या. मलबार, कोहाट यांसारख्या भागांत हिंदूंच्या कत्तली झाल्या. याची प्रतिक्रिया म्हणून सशस्त्र क्रांतीतील काही नेते जे प्रारंभी काँग्रेसबरोबर होते, ते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांत डॉ. हेडगेवार यांसारखे नेते हिंदुराष्ट्रवादाकडे आकर्षित झाले. जातीय तणावांच्या वेळी बहुसंख्य ठिकाणी आक्रमक पवित्रे घेणाऱ्या मुस्लिम शक्तींपुढे सदैव भीतिग्रस्त राहणाऱ्या असंघटित हिंदूंमध्ये स्वसंरक्षणाचे सामर्थ्य निर्माण करण्याची त्यांना आवश्यकतावाटू लागली. प्रांताप्रांतांतून संरक्षक दले उभारण्याचे प्रयत्न झाले. त्यांत सर्वाधिक यश हेडगेवारांना मिळाले. 

 

काँग्रेस स्वयंसेवक दलाचा हेडगेवारांना चांगलाच अनुभव होता पण अधिवेशनासारख्या प्रसंगी उत्साही सांगकामे कार्यकर्ते हे स्वयंसेवकांचे चुकीचे स्वरूप होते. त्याऐवजी सच्छील देशभक्त तरुणांसाठी त्यांना स्वेच्छेने अनुशासित जीवन जगण्यास व कर्तृत्व दाखविण्यास वाव देणारी संघटना उभारावी, असे त्यांच्या मनाने घेतले. लष्करी शिक्षण आणि शिस्तीची त्यांना खास आवड होती. हिंदुराष्ट्राला व सर्व स्तरांतील हिंदुसमाजाला त्याच्या स्वत्वाची जाणीव करून देऊन शक्तिसंपन्न व संघटित करण्यासाठी त्याला हिंदुराष्ट्रवादाची तात्त्विक बैठक देऊन संस्था उभारण्याचा श्रीगणेशा त्यांनी १९२५ च्या दसऱ्याला नागपूरमध्ये एका छोट्या बैठकीत केला. पुढे १७ एप्रिल १९२६ रोजी ‘सभासदां ‘च्या बैठकीत बहुमताने या संस्थेचे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ असे नामाभिधान करण्यात आले. त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या आणि राष्ट्रसेवेच्या विशुद्ध कल्पना कलकत्ता येथील विद्यार्थिदशेत उदित झाल्या होत्या. त्या कल्पनांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अत्यंत विकसित असे मूर्त स्वरूप होय. त्यामुळे अर्थातच त्यांची पहिले सरसंघचालक म्हणून निवड झाली. नागपूरचे रघुजीराजे (१८७२–१९५८) आणि राजे लक्ष्मणराव (१८७७–१९३२) हे दोन बंधू हेडगेवारांचे समकालीन असून त्यांचा डॉक्टरांवर व संघावर विशेष लोभ होता. राजे लक्ष्मणरावांनी खटपट करून संघास हत्तीखाना आणि साळूबाई मोहित्यांचा वाडा दिला. राजेसाहेबांच्याच कृपाछत्राखाली संघ वाढीस लागला. 

 

हेडगेवारांनी संघकार्याची रचना कौटुंबिक मूल्यांवर केलेली होती. संघ हे आपले कुटुंब आहे आणि कुटुंबात जसा आपण व्यवहार करतो, तसाच संघात केला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी लोकशाही, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था यांविषयी मूलभूत चिंतन मांडलेले नाही तथापि कोणतीही व्यवस्था उत्तम रीतीने चालविण्यासाठी काय केले पाहिजे, याचा जो मार्ग सांगितला, तो वादातीत आहे. माणसाला संस्कारित केल्याशिवाय व स्वबांधवांविषयी त्याच्या मनात आपुलकीची आणि कर्तव्याची भावना निर्माण केल्याशिवाय कोणतीही व्यवस्था कल्याणकारी ठरणार नाही, असे त्यांचे मत होते. 

 

हेडगेवारांनी संघ स्थापन केला, तरी काँग्रेस सोडली नव्हती. ते काँग्रेसच्या सर्व चळवळींत भाग घेत. लाहोर काँग्रेसच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावाने त्यांना अत्यानंद झाला. २६ जानेवारी १९३० रोजी संघाच्या प्रत्येक शाखेने काँग्रेसचे अभिनंदन करण्यासाठी सभा आयोजित कराव्यात, असा आदेश संघशाखांना त्यांनी काढला. नंतर डॉ. परांजप्यांच्या हाती सरसंघचालकपदाची सूत्रे देऊन त्यांनी स्वतः २२ जुलै १९३० रोजी सत्याग्रहात भाग घेतला. त्याबद्दल त्यांना अटक झाली. फेब्रुवारी १९३१ मध्ये त्यांची सुटका झाली. ऑगस्ट १९३६ मध्ये त्यांनी संघाच्या धर्तीवर चालणारी वेगळी राष्ट्रसेविका समिती सुरू करण्यास लक्ष्मीबाई केळकर (मावशी) यांना मान्यता दिली. 

 

हेडगेवारांनी पुण्यातील सोन्यामारुती सत्याग्रहात भाग घेतला (१३ मे १९३७). भोसला मिलिटरी स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी ते नाशिकला उपस्थित होते (२१ जून १९३७). त्यांनी हिंदू युवक परिषदेचे पुणे येथे अध्यक्षस्थान भूषविले (१९३८). 

 

हेडगेवारांची प्रकृती १९३२ पासून बिघडण्यास सुरुवात झाली. प्रांताप्रांतांचा दौरा, जिल्ह्याला भेटी, अधिकारी प्रशिक्षण वर्ग इ. कार्यक्रम त्यांनी प्रकृती बरी नसतानाही चालूच ठेवले. त्यामुळे दीर्घ औषधोपचार होऊ शकला नाही. अखेर मेंदूतील रक्तस्रावामुळे नागपूर येथे त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी माधवराव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांना संघाची धुरा सांभाळण्यासाठी सरसंघचालक नेमले. या सुमारास देशात संघाच्या ५०० शाखा कार्यरत होत्या आणि त्यांत साठ हजार नियमित स्वयंसेवक होते. 

 

डॉ. बाळकृष्ण मुंजे यांना हेडगेवार गुरुस्थानी मानीत. डॉक्टर व संघ यांना मुंजेंचा आधार होता. तसेच बाबाराव व नारायणराव हे सावरकर बंधू, बापूजी अणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नृसिंह पाचलेगावकर महाराज आदी निकटवर्तीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉ. हेडगेवार हे नव्या हिंदुराष्ट्रवादाचे जनक आणि सुप्त हिंदुराष्ट्राचे प्रबोधक मानले जातात. वि. दा. सावरकरांनी त्यांना हिंदुराष्ट्रवादाचा आधारस्तंभ म्हटले आहे. 

 

पहा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. 

 

संदर्भ : १. गोडबोले, श्रीरंग अरविंद, संपा. युगप्रवर्तक हेडगेवार, पुणे, २०१४.

           २. पतंगे, रमेश, मला उमगलेले डॉ. हेडगेवार, मुंबई, १९९८.

           ३. पालकर, नारायण हरी, डॉ. हेडगेवार चरित्र, पुणे, १९६०

नगरकर, वसंत