हेगेल, जॉर्ज व्हिल्हेल्म फ्रीड्रिख : (२७ ऑगस्ट १७७०–१४ नोव्हेंबर १८३१). आंतरराष्ट्रीय कीर्तीचा जर्मन तत्त्वज्ञ. त्याचा जन्म स्टट्गार्ट (वुर्टेनबर्ग) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सुरुवातीच्या शिक्षणानंतर १७८८ मध्ये ट्यूबिंगेन येथील ‘थिऑ-लॉजिकल सेमिनरी ‘मध्ये त्याला उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. १७९३ मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर बर्न आणि फ्रँकफुर्ट येथील एका धनाढ्य कुटुंबात त्याने शिक्षक म्हणून नोकरी धरली.१८०१ मध्ये ‘ग्रहांच्या कक्षा’ या विषयावर त्याने एक निबंध लिहिला. येना विद्या-पीठात त्याला शिक्षकाची नोकरी मिळाली तेथेच शेलिंग या प्रख्यात तत्त्वज्ञाबरोबर काम करायची संधी त्याला लाभली. 

 

जॉर्ज व्हिल्हेल्म फ्रीड्रिख हेगेल
 

हेगेलने त्याचा पहिला महत्त्वपूर्ण ग्रंथ फिनॉमिनॉलॉजी ऑफ माइंड (१८०६) पूर्ण केला त्याच वर्षी नेपोलियनने प्रशियन सैन्याचा मोठा पराभव केला व येना शहर ताब्यात घेतले. हेगेल येना सोडून हँबर्ग शहरी परतला व तेथे एका दैनिकाच्या संपादनाचे काम त्याने पतकरले. त्याचवेळी त्याने वरील ग्रंथाचे प्रकाशन केले (१८०७). १८०८ – १६ पर्यंत न्यूरेंबर्ग शहरी एका शाळेचा मुख्याध्यापक म्हणून त्याने काम केले. याच काळात सायन्स ऑफ लॉजिक हा ग्रंथ त्याने लिहिला. १८१६ – १८ पर्यंत हायड्लबर्ग विद्यापीठात व त्यानंतर त्याच्या मृत्यूपर्यंत (१८१८–३१) बर्लिन विद्यापीठात हेगेल याने तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून काम केलेव यूरोपच्या प्रख्यात तत्त्वचिंतकांत त्याला मानाचे स्थान मिळाले. 

 

न्यूरेंबर्ग येथील टकर्स घराण्यातील मेरी या तरुणीशी १८११ मध्ये त्याचा विवाह झाला. देकार्त, ह्यूम, कांट प्रभृती आधीचे यूरोपीय तत्त्वज्ञ आजन्म अविवाहित राहिले होते मात्र हेगेल याने वैवाहिक जीवनाचाएकेचाळीसाव्या वर्षी स्वीकार केला आणि पुढील वीस वर्षे संसारिक जीवनात घालविली. प्रेमळ पती व पिता या दृष्टीने त्याचे जीवन आदर्श होते. मानवी जीवनात तत्त्वचिंतकाचे आयुष्य एकाकी व अपूर्ण राहणे अटळ आहे, अशा भ्रामक समजुतीचा हेगेल याने स्वीकार केला नाही. त्याच्या तत्त्वज्ञानाला एक औरस चौरस भरीवपणा आणि मानवी जीवनाच्या साकल्याचा विवेक आहे, याची साक्ष त्याच्या वैवाहिक जीवनात आढळते. 

 

तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून विद्यार्थिवर्गात हेगेल याला आदराचे स्थान प्राप्त झाले व त्याची कीर्ती केवळ जर्मनीतच नव्हे, तर सर्व यूरोपीय देशांत पसरली. यशाच्या उच्च शिखरावर असतानाच कॉलऱ्याच्या साथीत त्याचे बर्लिन येथे निधन झाले. 

 

⇨ इमॅन्युएल कांटच्या (१७२४–१८०४) वस्तुनिष्ठ वा अतिशायी ⇨ चिद्वादा चा विकास करणाऱ्या प्रमुख जर्मन तत्त्वज्ञांत हेगेल याचे योगदान फार महत्त्वाचे आहे. हेगेलची केवळ चिद्वादी वा विश्वचैतन्यवादी तत्त्वप्रणाली अशी : जग हे विश्वचैतन्याचा वा केवल चिद्चा (ॲब्सोल्यूट आयडिया) आविष्कार आहे. विश्वाला एक संरचना असून विरोध-विकासातून किंवा द्वंद्वातून त्यात परिवर्तन घडते. परिवर्तन हे विश्वाचे तत्त्वच आहे. विश्वातील घटनांमागील चिद् (आयडियाज) प्रज्ञागर्भ किंवा श्रेयगर्भ असतात. त्या विश्वचैतन्याचे आविष्कारच असतात. त्या विकासाच्या दिशेने जाणाऱ्या असतात. विश्व हे सत्, सर्जनशील व परिवर्तनीय असल्याने त्याच्या अलीकडे वा पलीकडे, केवळ दृश्य किंवा आधाराचे काही नसतेच. वस्तुजातातील घडामोड, परिवर्तन ही अखंड चालणारी मूलभूत प्रक्रिया असून विकासाच्या दिशेनेच ती होत असते. विश्वामागे विवेक (रीझन) हे तत्त्व असून ते द्वंद्वात्मक रीतीने प्रकट होते. हेगेलने मानवी अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन सर्वव्यापी विश्वचैतन्याच्या तत्त्वाची संकल्पना मांडून या विश्वचैतन्याचा आविष्कार मानवी अस्तित्व, ज्ञान, इतिहास आणि कला यांच्यामधून कसा होतो, याचे विवेचन ⇨ द्वंद्ववादाचा सिद्धांत( डायलेक्टिक्स) मांडून केले. त्याने सत्य हे एक अंतिम व केवल वा अतीत स्वरूपाचे मूल्य मानले. सत्य हे केवल असते म्हणजे ते मानवी मनापलीकडचे असते, अशी भूमिका घेऊन त्याने ज्ञानमीमांसा केली. हेगेलच्या मते भौतिक वस्तू (मॅटर) आणि मन (माइंड) असे द्वैत दिसत असले, तरी ते एकात्म आहेत. तत्त्वज्ञान त्यांची एकता प्रस्थापित करते. सर्व मनोव्यापारच आत्मिक (स्पिरिच्युअल) आहेत. जे अस्तित्वात आहे त्याच्याकडून जे अस्तित्वात नाही त्याच्याकडे जाण्याची मानवाची प्रवृत्ती असते. मानवाचे कल्पक, क्रियाशील सर्जक मनच याला कारणीभूतअसते. हे मन म्हणजे विश्वचेतनेचा आविष्कार असते. माणसाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने स्वतःच्या जाणिवेने व इच्छाशक्तीने होत असते. ही वाटचाल करताना उद्दिष्टपूर्तीच्या आड येणाऱ्या विरोधी घटकांशी, अडथळ्यांशी विश्वचेतना लढत असते. या सततच्या, कधीही न संपणाऱ्या लढ्यातूनच विश्वचेतनेचा विकास होत असतो, हे हेगेलचे द्वंद्वीय विरोध-विकासाचे तत्त्व होय. सर्जनशील क्रिया हा चेतनाचा मूलस्वभाव असून सर्जनशील क्रियाशीलतेमुळे विश्वचेतन स्वतःला मूर्त स्वरूपात आणू शकते. स्वातंत्र्य हे हेगेलने महत्त्वाचे मूल्य मानले आहे. मानवी इतिहासाच्या विविध अवस्थांतून स्वातंत्र्याचे मूल्य अखंडपणे नांदते. विश्वचेतनाच्या विकासाच्या वेगवेगळ्या अवस्थांतून स्वातंत्र्याचे मूल्य प्रगत होत जाते. 

 

हेगेलने अतीत विश्वचैतन्याचे तत्त्व मांडून इतिहासाच्या अतीततेला (ट्रॅन्सेडन्स) पायाभूत मानणाऱ्या दृष्टिकोणाचे समर्थन केले. इतिहासाची एकसंधता, सलगता, सातत्य व अखंडत्व ही त्याच्या इतिहासवादी विवेचनाची मूलभूत सूत्रे होत. हेगेलने त्याच्या सायन्स ऑफ लॉजिक (१९६९) या ग्रंथामध्ये एकूण अस्तित्वाविषयी एक समग्र व्यूह मांडलेला आहे आणि त्यामध्ये ऐतिहासिक विकासाच्या प्रक्रियेला फार महत्त्वाचे स्थान आहे. हेगेलची अस्तित्वविषयक भूमिका थोडक्यात अशी : अस्तित्व हे एक चिद्स्वरूपी किंवा चैतन्यस्वरूपी अतिभौतिकीय तत्त्व (आयडिया, स्पिरिट किंवा जर्मन संज्ञा ॠळशीीं) असते. ते केवळ मानवांपुरते वाजीवांपुरते मर्यादित नसते, तर विशिष्ट अस्तित्वांच्या पलीकडे जाणारे तेएक केवल (ॲब्सोल्यूट) किंवा विश्वात्मक तत्त्व असते. हे चैतन्यस्वरूपी अस्तित्व आत्मनिर्धारणशील, विवेकरूप असते. केवल चिद् किंवा विश्वचैतन्य हे कधीही स्थिर नसते, तर इतिहासातून ते आत्मजाणिवेच्याव आत्मज्ञानाच्या दिशेने विकसित होत असते. मानवी जाणीव आणि स्वातंत्र्य हे केवल चिद्च्या किंवा विश्वचैतन्याच्या ऐतिहासिक विकासाचे अत्युच्च शिखर असते. 


सारांश, हेगेलच्या तत्त्वज्ञानात पुढील तीन गोष्टींना मुख्य स्थान आहे : मानवी मन, विश्वचैतन्य आणि विरोध-विकासात्मक द्वंद्ववादी परिवर्तनाचेसर्वग्राही सूत्र. ह्या तीन गोष्टींमधील परस्परविलगता व न सांधला जाणारा परस्परविरोध मानून, तत्त्वचिंतनाला आलेला कुंठितपणा हेगेल याने आपल्या सर्वंकष व्यूहामध्ये रिचवला आणि नव्या दिशांनी जाण्याच्या वाटा तत्त्वचिंतकांना मोकळ्या करून दिलेल्या आहेत. हेगेलनंतर यूरोपमध्ये जे तत्त्वचिंतन झाले त्याचा आढावा घेतल्यास आपल्या ध्यानात हेे येऊ शकते. केवळ चिद्वादी तसेच वास्तव चिद्वादीवा वस्तुचिद्वादी (ऑबजेक्टिव्ह आयडिॲलिझम) अशा दोन्ही अंगांनी हेगेलप्रणीत मार्गांनी तत्त्वदर्शनांची वाढ होत गेलेली दिसते. वस्तुचिद्-वादी हेगेलपंथ मुख्यतः ⇨ मार्क्सवादाच्या रूपाने वाढत गेला. हेगेल हा मार्क्सवादाचा पूर्वसूरी मानला जातो. त्याच्या तत्त्वज्ञानातल्या द्वंद्वात्मकता, विरोधविकास व ऐतिहासिकता या कल्पना मार्क्सवाद्यांना जवळच्या वाटल्या. टी. एच्. ग्रीन, फ्रान्सिस हर्बर्ट बॅ्रड्ली, मॅक्टॅगार्ट प्रभृतींनी चिद्वादाची मांडणी केली. माक्स वेबरसारख्या समाजशास्त्रज्ञांवरही हेगेलचा प्रभाव दिसून येतो. याचा अर्थ असा घेता येईल, की हेगेल याच्या चिंतनपद्धतीत काही सुप्त सर्जनशील सामर्थ्य होते आणि अनुकूल भूमी सापडताच ते प्रकट होत गेले. 

 

ग्रीक, यूरोपीय व भारतीय तत्त्वपरंपरांमध्ये मन आणि शरीर, मन आणि बाह्य वस्तू यांचे द्वैत जसे मानलेले आहे, तसे ते हेगेलने मानलेले नाही. पूर्वीच्या सर्व चिद्वादी तत्त्वज्ञांमध्ये या ना त्या स्वरूपात हे द्वैत गृहीत धरलेले आढळते. चिन्मय अशा परतत्त्वाला सत्य मानून प्रत्यक्ष वास्तवाला दृश्य जड वस्तुजाताचा पसारा किंवा मिथ्या मायाप्रपंच मानले जाते. ⇨जॉर्ज बर्क्ली या चिद्वादी तत्त्वज्ञाने असे प्रतिपादन केले, की राग, लोभ हे मनोविकार केवळ मनातच नांदतात ते मनोगतच आहेत, त्याप्रमाणे सारे वस्तुजात मनोगत आहे. वस्तूंना बाह्य स्वावलंबी अस्तित्व नसते. हेगेलच्या मते वस्तूंना आणि मनाला द्वैताच्या पद्धतीने असे विलग करतायेत नाही उलट द्वंद्वात्मक पद्धतीने या दोहोंचे परस्परावलंबन आणिद्वंद्वात्मक एकात्मता यांचे आकलन करावे लागते. प्लेटो व ॲरिस्टॉटल यांच्या भूमिकांतील भेद स्पष्ट करून हेगेल याने ॲरिस्टॉटलच्या भूमिकेला अग्रस्थान दिले. मनाने संकल्पिलेले रचनाकार (फॉर्म्स) आणि वस्तू यांतील द्वैताच्या जागी द्वंद्व मानल्यामुळे हेगेलला तत्त्वज्ञानातील एकअवघड प्रश्न सोडविता आला. मन आणि वास्तव यांतील विलगता अमान्य करून त्याने मनाला मूर्ततेशी जोडले व मूर्त वस्तुजातालाही जड नमानता चिद्गर्भ व गतिशील मानले. दोहोंमध्ये एकच द्वंद्वीय प्रक्रियाअखंड चालू आहे व म्हणून या दोहोंत एकात्मता नांदत आहे, असे प्रतिपादन करून हेगेलने आपले चिद्वादी दर्शन मांडले. ग्रीक, यूरोपीयव भारतीय चिद्वादी दर्शनांपेक्षा हेगेलचा चिद्वाद फार भिन्न प्रकृतीचाआहे, हे यावरून कळून येईल. 

 

तत्त्वज्ञानाचे लक्ष्य, पद्धती आणि उद्दिष्ट हेगेलने आमूलाग्र बदलले. प्रत्येक रूढी व सामाजिक संस्था मानवी मनाने विकासप्रयत्नात निर्माण केलेले, मनालाच मूर्त करणारे एक अस्थिर रूप आहे, असे हेगेलचे प्रतिपादन आहे. जे जे वास्तवात नांदते, ते ते सामाजिक दृष्ट्या निर्माण केलेले असते आणि विवेकदृष्टीला जे जे युक्त वाटते ते ते वास्तवात मूर्त होणारे असते, असे त्याचे एक वचन आहे. यात त्याच्या इतिहासदृष्टीचेमर्म आहे. मानवी प्रज्ञा, श्रेयाच्या कल्पना, सौंदर्याच्या कल्पना ह्या साऱ्यांना मिळून आपण मानवी मन म्हटले तर मनाच्या या सर्वांगीण व्यापारांना वास्तवातच मूर्त, कार्यशील व समक्ष व्हावे लागते. मानवी व्यक्तींच्या व समूहांच्या इतिहासातच मनाला समक्षता लाभते आणि साऱ्या वास्तवाला जी समक्षता आहे, तीही मानवी मनाने आकलन होण्याला, ते योग्य असण्यातच आहे. या दुहेरी, परस्परावलंबी अर्थाने मानवी इतिहास ही तत्त्वज्ञानाची आधारभूमी आहे, असे हेगेल याचे म्हणणे आहे. या इतिहासात गतिमानता किंवा विकासक्रम आहे असे मानले तर या विकासाची दिशा कोणती? ती कोण ठरवितो? ही दिशा बाहेरून लादलेली आहे का? असे प्रश्नउत्पन्न होतात. यावर हेगेल याचे उत्तर असे, की या विकासाला एकदिशा आहे, एक श्रेय आहे. ते गाठण्यासाठी हा क्रम किंवा प्रयत्न आहे. ‘स्वातंत्र्य’ ही माणसाची ईर्ष्या, श्रेय किंवा प्रयत्नाला दिशा देणारी प्रेरणा आहे. स्वतंत्र होणे हे मानवी प्रयत्नांचे अंतःसूत्र आहे. निसर्गाने लादलेल्या नियमांचे आकलन करून निसर्गावर मात करणारा मानव एक भौतिक स्वतंत्रता कमावत असतो. त्याचप्रमाणे वास्तव आणि स्वतःचे जीवित्व यांचे परस्परावलंबी नाते माणूस ओळखू पाहतो आणि आपल्याविषयीचे सत्य ज्ञान मिळवू पाहतो. यातही स्वतंत्रतेचीच ईर्ष्या असते. अगदी वन्यावस्थे-पासून वाटचाल सुरू केलेल्या माणसाने क्रमाक्रमाने पुष्कळशी स्वतंत्रता हस्तगत केली आणि आज स्वतंत्रतेच्या एका प्रगल्भ अवस्थेपर्यंत तो पोहोचला आहे, असे हेगेल याच्या इतिहासमीमांसेचे अंतिम प्रतिपादन आहे.

 

हेगेलच्या मते बुद्धिगम्य स्वातंत्र्याचे परिपूर्ण स्वरूप म्हणजे राज्यहोय. कुटुंब आणि नागरी समाजाला संयत करणाऱ्या तत्त्वांचा समन्वय होऊन ते भूतलावर अवतरते. राज्य हे व्यक्तीच्या इच्छा, आकांक्षा, स्वतंत्र प्रज्ञा यांच्यामार्फत आविष्कृत होणारे आत्मरूप आहे. मनुष्याची सर्व आध्यात्मिक सत्यता त्याला राज्यामार्फतच मिळते. हेगेल म्हणतो, ‘राज्य हा भूतलावर उमटलेला परमेश्वराचा पदन्यास आहे ‘. म्हणूनच हेगेलने निरंकुश राजसत्तेचा पाठपुरावा केलेला नाही व समकालीन उदारमतवादी तत्त्ववेत्त्याची भूमिकाच घेतलेली आहे. धर्माधिष्ठित राजसत्तेला त्यानेविरोध केला आहे. धर्मसंस्थेने अलग राहिले पाहिजे, तसेच राजसत्तेने व्यक्तीच्या धर्मस्वातंत्र्याला पूर्ण वाव दिला पाहिजे, असे त्याने म्हटलेआहे. युद्धांची वास्तवता इतिहासातील एक वास्तव म्हणून त्याने स्वीकारली असली, तरी आंतरराष्ट्रीय शांततेचा आदर्श त्याने राष्ट्रांपुढे ठेवला आहे. विवेकनिष्ठा, नैतिकता आणि स्वातंत्र्याची ईर्ष्या यांवर त्याचा सर्व भर असल्यामुळे ह्या मूल्यांना छेद देणाऱ्या निरंकुश राजसत्तेची किंवा हुकूमशाहीची कल्पना हेगेलने सर्वथा त्याज्य मानलेली आहे. 

 

हेगेलच्या विचारांचे सम्यक् दर्शन घडविणारा त्याचा मुख्य ग्रंथम्हणजे एन्सायक्लोपीडिया ऑफ द फिलॉसॉफिकल सायन्सेस (१८१७) हा होय. या ग्रंथात त्याने प्रथम ‘लॉजिक ‘चा (तर्कमीमांसा) ऊहापोहकेला असून, त्यातूनच ‘निसर्गाची तत्त्वमीमांसा’ व ‘मनाची तत्त्व-मीमांसा’ हे पुढील दोन विभाग क्रमविकासाने आलेले आहेत. तर्कशास्त्रातील संकल्पनेची मीमांसा केल्यावर तो निसर्गाकडे वळतो आणि म्हणतो, की संकल्पनांना मूर्त होण्याची गरज वाटली म्हणून मूर्त निसर्ग निर्माण झाला. एका आदिम विश्वमनाने संकल्प केल्यामुळे विश्वपसारा निर्माण झाला. अशा तर्‍हेची कल्पना ख्रिस्ती व इतरही धर्मांतून नांदताना दिसते. हेगेलचा प्रस्तुत विचार या धर्मविचारांशी जुळणारा वाटतो खरा परंतु असे परावलंबित्व तो निसर्गावर लादत नाही. निसर्गाला तो स्वयंगतिशील मानतो आणि निसर्गक्रमातूनच अचेतनातून सचेतन व सचेतनातून स्वत्वजाणीव असलेला मानव विकसित होत गेला, असा विचार त्याने मांडलेला दिसतो. 

 

अशा विकसित मनाचे हेगेल याने एक आवर्तन मानले आहे वत्यातून केवल मनाची (ॲब्सोल्यूट माइंड) अंतिम कोटी प्रतिपादनकेली आहे. आपल्या ठायीच स्वतंत्रतेचे भान असणारे अंतर्मुख व्यक्तिमन ही एक कोटी व तिला प्रतिद्वंद्वी कोटी म्हणजे स्वतंत्रतेला मूर्त रूपदेणारी इतर मानवी मनांची (म्हणजेच समाजाची) बहिर्मुखतेवर निर्भर असणारी कोटी. मानवी मनाच्या अंतर्मुख व बहिर्मुख अशा या द्वंद्वात्म कल्पनेतून परिपूरित मनाची समवर्तित कोटी नांदू लागते. या समावर्तित कोटीला मूर्त रूप आहे, ते मानवी मनाने संकल्पिलेली कला, हृदयसंवेद्य धर्मकल्पना आणि विवेकप्राप्त तत्त्वज्ञान यांच्या मूर्त प्रत्यक्ष वास्तवात.या परिपूरित कोटीची ईशकल्पनेशी एकात्मता आहे किंबहुना ही परिपूरित कोटी म्हणजेच ईश्वर आहे. याहून वेगळा कोणी ईश्वर वास्तवाच्या पलीकडे वा मागे परोक्ष नांदणारा नाही. मानवी मन आणि निसर्गवास्तव यांच्या द्वंद्वविकासी परस्परसंवादातच तो नांदणारा आहे. 


हेगेलची कला-सौंदर्यमीमांसा ही त्याच्या विश्वचैतन्यवादी तत्त्व-प्रणालीतून उद्भवली आहे. ‘सौंदर्य म्हणजे नियमिततेचा, चैतन्याचा इंद्रियगोचर आविष्कार. संवेदनांच्या विश्वात दिसणारे चैतन्याचे रूप म्हणजे सौंदर्य’, ही हेगेलची व्याख्या त्याच्या एकूण भूमिकेशी सुसंगतच आहे. ‘द अर्लिएस्ट सिस्टिम प्रोग्रॅम ऑफ जर्मन आयडिॲलिझम’ या लेखात हेगेलने असे म्हटले आहे, की सर्व कल्पनांना सामावून घेणारे बुद्धीचेजे कार्य असते ते मूलतः सौंदर्यात्मक कार्यच असते. सौंदर्यामध्ये सत्य आणि शिव या बहिणी म्हणून एकत्र येतात. सत्य, शिव व सुंदर हे विश्वचेतनेचे आविष्कार असून सौंदर्यविश्वात लयप्रधानता असते. कलाजगत हे सौंदर्यविश्वाचाच एक भाग असून आशयप्रधानता, आशयआकार समतोल व आकारप्रधानता हे त्याचे तीन ऐतिहासिक टप्पे आहेत. आशयप्रधानतेकडून आकारतत्त्वाकडे, रचनातत्त्वाकडे कलेचा प्रवास होतो, त्या दिशेने तिचा विकास होतो, हे सूत्र हेगेलने मांडले. हेगेलने सौंदर्यआणि कला यांचे क्षेत्र ज्ञानाच्या व इतिहासाच्या प्रांतामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या ईस्थेटिक्स (१८३५–३८) या ग्रंथात त्याने आपली कला-सौंदर्यविषयक भूमिका स्पष्ट केली आहे. कलेच्या ऐतिहासिक विकासाच्या दृष्टीने हेगेलने तीन टप्पे मानले : (१) प्रतीकात्मक ( सिंबॉलिक) कला, (२) अभिजात (क्लासिकल) कला व (३) स्वच्छंद (रोमँटिक) कला. प्राचीन ग्रीकपूर्व पाश्चात्त्य कलेप्रमाणेच ईजिप्त, भारत व पर्शिया या प्राचीन संस्कृतींमध्ये प्रतीकात्मक वास्तुकला निर्माण झाली. या कलेमध्ये संकल्पनात्मक आशय आणि त्याला व्यक्त करणारे मूर्त आकार यांच्यामध्ये सुसंवाद आढळत नाही. प्राचीन ग्रीक अभिजात शिल्पकलेत संकल्पनात्मक आशय आणि मूर्त रूप यांच्यात पूर्ण सुसंवाद आढळतो. मात्र केवळ ऐंद्रिय पातळीवरच व्यक्त होणारे शारीर सौंदर्य ही या कलेची मर्यादा होय. ग्रीक कलेत आढळणाऱ्या शारीर सौंदर्यापलीकडे जाऊन कला आत्मिक स्वरूपाची बनते ती स्वच्छंद कलेमध्ये (उदा., मध्ययुगीन ख्रिस्ती धार्मिक कला, यूरोपीय स्वच्छंदतावादी कला, विशेषतः साहित्य) . तेव्हा हेगेलच्या तत्त्वमीमांसेत कला ही एक आत्मिक आविष्कार म्हणून, विशिष्ट आत्मिक सत्याकडे नेणारे एक साधन म्हणून वावरते आणि हा आत्मिक आविष्कार विशिष्ट कलावंताचा आविष्कार नसतो, तर युगाच्या, संस्कृतीच्या, राष्ट्राच्या चैतन्याचा आविष्कार असतो. ‘युगधर्म’ ही संकल्पना याच भूमिकेतून निर्माण झाली. हेगेलने कलेचे माध्यम आणि आशय यांच्या समन्वयाचे विश्लेषण आपल्या द्वंद्ववादी भूमिकेतून केले. आदिमानवी काळापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या कलांचा आढावा घेऊन हेगेलने कलांची श्रेयश्रेणी लावली. अमूर्ताने मूर्त रूप घेणे, असा कलासर्जनाचा अर्थ त्याने लावला. मूळच्या चैतन्यतत्त्वाने (आयडिया) जड माध्यमातून मूर्त (काँक्रीट) रूप घेणे म्हणजे कलासर्जन होय. जे चैतन्य मूर्त रूप घेऊ शकेल असेच चैतन्य कलेच्या संदर्भात हेगेलला अभिप्रेत आहे. अमूर्त आशयाने जड माध्यमातून मूर्त रूप घेणे, असा त्याच्या भूमिकेचा अर्थ होतो. संगती, लय यांसारख्या तत्त्वांमुळे मूर्त रूपाला कलापद प्राप्त होते, असे त्याच्या तात्त्विक भूमिकेनुसार सूचित होत असले, तरी त्याने आपली भूमिका पूर्ण स्पष्ट केलेली नाही. संस्कृतीच्या प्रगतीनुसार कलेतही प्रगती घडून आली अशी भूमिका त्याने घेतली आणि या निकषानुसार प्रगतीच्या पहिल्या पायरीवर वास्तुकला, दुसऱ्या पायरीवर शिल्पकला आणि तिसऱ्या पायरीवर चित्रकला असा कलेच्या उत्कर्षाचा चढता आलेख हेगेलने कल्पिला. अमूर्ताने घेतलेले मूर्त रूप म्हणजे कलाकृती या त्याच्या कलासिद्धांताला अनुसरूनच त्याने ह्या श्रेणीव्यवस्थेची मांडणी केली आहे. 

 

हेगेलने कलेतील सौंदर्य हे निसर्गसौंदर्यापेक्षा वरच्या दर्जाचे असते, अशी भूमिका मांडली कारण जड जगतात विश्वचैतन्य फार अपुऱ्या स्वरूपात प्रकट होते पण याच जड जगतातील घटक घेऊन मानवाने कलाकृती निर्माण केली, की तिचा दर्जा एकदम उंचावतो. कारण कलाकृती निर्माण करताना चैतन्याच्या आविष्कारासाठी म्हणून मानव जड माध्यमालाविशिष्ट रूप देत असतो. चैतन्यतत्त्वाच्या आविष्कारासाठी मानवाने जेमुद्दाम घडवले त्यात चैतन्यतत्त्व जास्त चांगल्या रीतीने आविष्कृतहोते. मानवनिर्मित सौंदर्यामध्ये, कलेमध्ये मानवाचे स्वातंत्र्य, बुद्धिमत्ता, समतोल व विविधता ही तत्त्वे आविष्कृत होऊन त्याला श्रेष्ठत्व प्राप्तकरून देतात. म्हणून निसर्गसौंदर्यापेक्षा मानवनिर्मित कलासौंदर्याचा दर्जा वरचा असतो. 

 

चैतन्यमय आशय सर्व ठिकाणी सारखाच समृद्ध नसतो आणि पुन्हासर्व ठिकाणी तो ऐंद्रिय माध्यमाच्या द्वारा सारख्याच प्रमाणात आविष्कृत होत नाही. जेथे आशय फारसा समृद्ध नसतो आणि जेथे तो ऐंद्रिय माध्यमाच्या द्वारा नुसता सूचित होतो, तेथे प्रतीकात्मक कला निर्माण होते. जेथे आशय जास्त समृद्ध असतो व त्याला तुल्यबल असा ऐंद्रिय आविष्कार प्राप्त होतो, तेथे संयतशील वा अभिजात कला निर्माण होते आणि जेथे आशयाची समृद्धी ऐंद्रिय माध्यमावर मात करते, तेथे निर्भरशील वा स्वच्छंदतावादी कला निर्माण होते. प्रतीकात्मक कलेचे उत्तम उदाहरण वास्तुकलेत, अभिजात कलेचे शिल्पकलेत आणि स्वच्छंदतावादी कलेचे चित्रकलेत, संगीतात आणि विशेषतः काव्यात बघायला मिळते. हेगेलने आशयाच्या अनुरोधाने कलांची प्रतवारी ठरवली. 

 

हेगेलची कलाविषयक भूमिका आधुनिक काळात वादग्रस्त ठरली. विशेषतः संस्कृतीच्या प्रगतीनुसार कलेतही प्रगती घडून आली हे त्याचे विधान आणि त्याने आशयाच्या अनुरोधाने ठरविलेली कलेची प्रतवारी ह्या दोन्ही गोष्टी विवाद्य ठरल्या असून, त्यांबाबत नंतरच्या काळात कला-तज्ज्ञांनी विविध मतमतांतरे व्यक्त केली आहेत. सुसंस्कृत समाजाची कला श्रेष्ठ व असंस्कृतांची कनिष्ठ, असे समीकरण मांडता येत नाही. तथाकथित असंस्कृत आदिमानवाने प्राचीन काळी निर्मिलेली आदिम कला (प्रिमिटिव्ह आर्ट) आणि आदिवासींच्या लोककला (फोक आर्ट्स) यांमधला जिवंत जोम व सळसळते चैतन्य त्या कलांना श्रेष्ठपद बहाल करतात. 

 

संस्कृतीच्या प्रगतीबरोबरच कलेच्या प्रगतीचा आलेख मांडून दाखवणाऱ्या हेगेलच्या काळात अल्तामिरा येथील आदिमानवाने रंगवलेली गुहाचित्रे उपलब्ध झाली नव्हती. अमूर्त आशयाने मूर्त रूप धारण करणे, या हेगेलच्या सूत्रानुसार अल्तामिरा येथील रानगेंड्याचे वा रानबैलाचे चित्रण कलादृष्ट्या उत्कृष्ट ठरते. आशय व आकार ही कलेची दोन ध्रुवात्मक तत्त्वे मानावी लागतात. आशयतत्त्वाला व जीवनवादाला महत्त्व देणाऱ्या समीक्षक-सौंदर्यशास्त्रज्ञांवर हेगेलच्या विचारांचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. 

 

संदर्भ : 1. Desmond, William, Art and the Absolute : A Study of Hegel’s Aesthetics, New York, 1986.

            2. Fridrich, Carl J. Ed., The Philosophy of Hegel, 1965.

            3. Pinkard, T. Hegel’s Phenomenology :  the Sociality of Reason, Cambridge,  1994.

            4. Rosen, M. Hegel’s Dialectic and Its Criticism, Cambridge, 1982 .

            5. Wood, A. W. Hegel’s Ethical Thought, Cambridge, 1990. 

दाभोळे, ज. रा. इनामदार, श्री. दे.