हेकेल, एर्न्स्ट हाइन्रिख : (१६ फेब्रुवारी १८३४–९ ऑगस्ट १९१९). त्यांचे पूर्ण नाव हेकेल एर्न्स्ट हाइन्रिख फिलिप आउगुस्ट असे आहे. जर्मन प्राणिशास्त्रज्ञ आणि क्रमविकासतज्ञ, तसेच डार्विनच्या क्रमविकास सिद्धांताचे कट्टर पुरस्कर्ते. त्यांनी मानवी वंशानुक्रमासंबंधी नवीन अधिकल्पना मांडल्या. त्यांनी व्यक्तिवृत्त (भ्रूणविज्ञान व प्रत्येक भागाचा विकास) संक्षिप्तपणे आणि जातिवृत्त (जाती किंवा वंशाचा विकासात्मक इतिहास) कधीकधी जरूरीपुरते अपूर्णपणे व पुन:पुन्हा असे स्पष्ट केले.
हेकेल यांचा जन्म पॉट्सडॅम (प्रशिया, जर्मनी) येथे झाला. त्यांचे शिक्षण वुर्ट्सबर्ग व बर्लिन विद्यापीठात झाले. बर्लिन विद्यापीठातील शरीरक्रियाविज्ञ योहानेस पेटर म्यूलर या प्राध्यापकांनी उन्हाळी मोहिमेत लहान समुद्री जीवांच्या निरीक्षणासाठी हेकेल यांना हेलिगोलँडच्या समुद्रकिनाऱ्यावर नेले. या अनुभवामुळे हेकेल प्राणिविज्ञानाच्या अभ्यासाकडे आकर्षित झाले. परंतु, त्यांनी कुटुंबियांच्या इच्छेनुसार बर्लिन विद्यापीठातून वैद्यकीय पदवी संपादन केली (१८५७). काही वर्षे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय देखील केला. नंतर त्यांना इटली प्रवासासाठी जाण्यास वडिलांनी मान्यता दिली. इटलीत त्यांनी काही चित्रे देखील काढली आणि कलेमध्ये आपले भवितव्य घडविण्याचे ठरविले. मेसिना येथे त्यांनी एककोशीय प्रोटोझोआ संघाच्या रेडिओलॅरिया या गणातील प्राण्यांचा अभ्यास केला. या गणातील सदस्य प्राणी ठळकपणे स्फटिकीय स्वरूपात असतात. यावरून त्यांनी असे मांडले की, सामान्य कार्बनी जीव अकार्बनी घटकापासून उत्स्फूर्तपणे स्फटिकीकरण पद्धतीने तयार होतात.
हेकेल यांनी १८५९ मध्ये चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन हा ग्रंथ वाचला आणि त्यांच्या विचारांना वेगळे वळण मिळाले. त्यांनी १८६१ मध्ये येना येथे प्राणिविज्ञानातील आपला प्रबंध पूर्ण केल्यानंतर ते तेथेच व्याख्याते झाले.१८६२ मध्ये ते सहायक प्राध्यापक झाले. त्याच वर्षी त्यांनी रेडिओ-लॅरियावरील व्याप्तिलेख प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी डार्विनच्या क्रमविकास सिद्धांतावर सहमती दर्शविली होती. तेव्हापासून ते डार्विनवादाचे समर्थक समजले जाऊ लागले आणि त्याच्या समर्थनार्थ व्याख्यानेही देऊ लागले. डार्विन यांनी नवीन प्रजातींच्या निर्मितीकरिता होणाऱ्या नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेद्वारे क्रम-विकास सिद्धांत मांडला होता. त्याच्या आधारेच हेकेल यांनी आपली पुढील वाटचाल सुरू केली. ते १८६५ मध्ये पूर्णवेळ प्राध्यापक झाले आणि निवृत्त होईपर्यंत (१९०९) येना येथेच राहिले.
निसर्गातील व तत्त्वज्ञानातील सर्व तार्किक प्रश्नांचे स्पष्टीकरण करणारा एकत्रित पाया म्हणून हेकेल क्रमविकासवादाकडे पाहत होते. त्यांनी Generelle Morphologie der Organismen(१८६६ इं. शी. ‘जनरल मॉर्फोलॉजी ऑफ ऑर्गॅनिझम्स’) या ग्रंथात क्रमविकास-विषयक अनेक कल्पना मांडल्या होत्या. परंतु, वैज्ञानिकांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या कल्पना लोकप्रिय लेखन प्रकारातून मांडायला सुरुवात केली आणि ते लेखन मोठ्या प्रमाणावर वाचले जाऊ लागले.
हेकेल यांनी सारख्याच भौतिकीय नियमात अकार्बनी व कार्बनी प्रकृती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी सर्वांत लहान (निम्न) जीव हे निव्वळ जीवद्रव्य असून त्यात केंद्रक नसते ते कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन व सल्फर यांचा संयोग होऊन उत्स्फूर्तपणे निर्माण झाले असावे, असा त्यांनी तर्क केला. ज्या काळात वैज्ञानिकांचा विश्वास किंवा कल्पना ‘मोनेरा’ (एककोशिकीय) जीवद्रव्यावर नव्हता, त्या काळात हेकेल त्याच्या अस्तित्वाविषयी ठामपणे प्रतिपादन करत होते. यावरून त्यांनी एककोशिकीय केंद्रकासह असणारा आकार शोधला आणि दोघांच्या सीमारेषेवरील प्रोटिस्टा. निम्नस्तरीय जीवापासून मानव जातीचा विकास कसा झाला असावा, याचा एक वंशवृक्ष त्यांनी तयार केला होता.
हेकेल यांनी आनुवंशिकतेच्या समस्यांसंबंधी काही वर्षे बारकाईने संशोधन (अभ्यास) केले. केवळ सैद्धांतिक आधारावर १८६६ मध्ये त्यांनी सुचविले की, कोशिका केंद्रक हा आनुवंशिकतेशी निगडित असतो. Die Perigenesis der Plastidule (इं. शी. ‘द जनरेशन ऑफ व्हेव्ज इन स्मॉल व्हायटल पार्टिकल्स’ १८७६) या ग्रंथात त्यांनी रेणवीय घटकांच्याआधारे आनुवंशिकता शोधण्याचा प्रयत्न केला. या वेळेस देखील त्यांनी वंशवृक्ष आखणी पद्धतीचा वापर केला. यामध्ये त्यांनी आनुवंशिकता कार्यपद्धती आणि बाह्य परिस्थितीचा त्यावर होणारा परिणाम यांविषयी विचार केला. जीवद्रव्य बनविणाऱ्या कणांसाठी त्यांनी प्लास्टिड्यूल्स ही संज्ञा वापरली होती.
जरी हेकेल यांच्या पुनर्निर्मिती (पुनरुत्पादकता) यांविषयी असलेल्या संकल्पना अचूक नव्हत्या, तरी त्यांनी काही महत्त्वाच्या जीवशास्त्रीय प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यांचा गॅस्ट्रिया सिद्धांत, बहुकोशिकीय प्राण्यांचा क्रमविकास हा गृहित काधारित द्वि-स्तरीय पूर्वजांशी जोडणे या संकल्पनांनी विचारविमर्ष व संशोधन या गोष्टींना उत्तेजन मिळाले. त्यांनी क्रमविकासात केलेल्या क्रमबद्ध मांडणीमुळे मेड्यूसा, रेडिओलॅरिया, सायफोनोफोरा व कॅल्कॅरियस स्पंज या अपृष्ठवंशीय प्राण्यांची माहिती समजण्यास खूपच मदत झाली.
हेकेल यांनी येना येथे फायलेटिक वस्तुसंग्रहालयाचा आणि एर्न्स्ट हेकेल गृह यांची स्थापना केली. त्यात त्यांचा खाजगी संग्रह आणि अभिलेख तसेच अनेक स्मृतीचिन्हांचे जतन करण्यात आले आहे. त्यांचे Die systematische phylogenie (१८७४) Anthropogenie (१८७४, इंग्रजी अनुवाद १८७९) On our present knowledge regarding the origin of man (इं. शी. १८९८), The struggle over Ideas concerning evolution . इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत Kunseformen der Natur (१९०४) या ग्रंथात १०० रंगीत चित्रे छापण्यात आली होती.
हेकेल यांचे येना येथे निधन झाले.
जमदाडे, ज. वि. वाघ, नितिन भरत
“